Monday, February 29, 2016

प्रभावी सत्यकथन - 'अलिगढ़' (Movie Review - Aligarh)

'अलिगढ़'.
सत्यघटनेवर आधारित अजून एक चित्रपट. पण हा वेगळा आहे. कारण ही घटना काही माध्यमांचा टीआरपी वाढवणारी नव्हती किंवा ह्यात एखादा लोकप्रिय चित्रपट बनेल असा मालमसालाही नव्हता. किंबहुना, ही जी घटना आहे किंवा हा जो विषय आहे, तो आपल्याकडेच नव्हे तर जगाच्या बहुतांश भागात अस्पर्श्य, निषिद्ध आहे. 'समलिंगी संबंध'. ह्यावर बोलायचीही बहुतेकांची इच्छा नसते. ही एक अमानवी विकृती आहे, हे आपल्या मनावर कोरलं गेलेलं आहे. भारतीय संविधानानुसार समलिंगी संबंधांना 'गुन्हा' मानलं गेलं आहे. २००९ साली त्यात एक अमेंडमेंट झाली आणि 'समलैंगिक संबंध असणे हा गुन्हा नाही' असं ठरवलं गेलं. मात्र पुन्हा एकदा २०१३ साली त्याला गुन्हा ठरवलं गेलं. आजच्या घडीस समलैंगिक संबंध हे गुन्हाच आहेत.


'अलिगढ़' ही कहाणी आहे 'डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरस' ह्यांची. डॉ. सिरस अलिगढ़ विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. २००९ साली विद्यापीठानेच करवून आणलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉ. सिरस त्यांच्या राहत्या घरात एका व्यक्तीसह समलिंगी संबंध साधत असताना त्यांना व्हिडीओ शूट करण्यात आलं. ह्यानंतर तडकाफडकी त्यांना विद्यापीठाने निलंबित केलं आणि कालांतराने त्या निलंबनाविरुद्ध डॉ. सिरस कोर्टात गेले व केस जिंकलेही. मात्र काही दिवसांतच त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. ह्या मृत्यूमागेही अलिगढ विद्यापीठातील काही लोकांचा तसेच, डॉ. सिरस ह्यांची व्हिडीओग्राफी करणाऱ्या पत्रकारांचा हात असल्याचा संशय वर्तवला गेला होता. पण तशी केस दाखल होऊनही, पोलिसांना पुरावा न मिळाल्याने ती रद्द ठरली. डॉ. सिरस ह्यांचा मृत्यू आत्महत्या मानला जातो, तरी त्या मागचं गूढ उकललं गेलेलं नाहीच.
सिरस ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक तरुण पत्रकार दीपू सबॅस्टियनने खूप मदत केली होती. डॉ. सिरस दोषमुक्त तर झाले, पण वाचले मात्र नाहीत.

ही सगळी कहाणी चित्रपटात येते. ह्यात लपवण्यासारखं काही नाही कारण हे सारं कथानक विविध ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध आहेच. पण मग जर हे सगळ्यांना माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांना वाचण्यासाठी उपलब्धही आहे, तर चित्रपट का पाहायचा ?
कुणी म्हणेल मनोज वाजपेयीसाठी, कुणी म्हणेल हंसल मेहतासाठी.
माझ्या मते एक चित्रपट ज्या ज्या घटकांमुळे बनतो, त्या प्रत्येक घटकासाठी 'अलिगढ़' पाहायला हवा. दिग्दर्शन, अभिनय, कथानक, पटकथा, संकलन, छायाचित्रण, संशोधन, असा प्रत्येक घटक. इथला संथ फिरणारा किंवा काही वेळा एकाच जागी मठ्ठासारखा बसून राहिलेला कॅमेरा, हळूहळू पुढे सरकणारं कथानक 'कोर्ट'सारखा अंत पाहत नाहीत. कथानक तयार उपलब्ध होतं. पण पटकथेसाठी व संशोधनासाठी केलेलं काम जाणवतं. कोर्टात चाललेल्या खटल्यापासूनच सुरुवात करून 'फ्लॅशबॅक' तंत्राचा उपयोग करून चित्रपट अधिक नाट्यमय बनवता आला असता, पण ते न करण्याचा संयम दाखवला गेला आहे. समलिंगी व्यक्तीची देहबोली, त्याची मानसिकता, ह्याचा व्यवस्थित अभ्यास करुन जीवनशैली, आवड-निवड, वागण्या-बोलण्याची ढब ठरवली गेलेली आहे. कुठल्याही प्रकारचं बालिश, उथळ समर्थन देण्याचा हास्यास्पद प्रयत्नसुद्धा कुठे केला गेलेला नाही. सगळा भर जे आहे, जसं आहे ते व तसं दाखवण्यावर राहिलेला आहे.


डॉ. सिरसच्या भूमिकेत मनोज वाजपेयीने एक महान कामगिरी केली आहे. ह्या कामासाठी अप्रतिम, जबरदस्त, कमाल वगैरे नेहमीची विशेषणं थिटी आहेत. 'डॉ. सिरस' ही व्यक्तिरेखा काव्यात्मक आहे. काव्य आवडेल किंवा नावडेल, पण ते चूक किंवा बरोबर असत नाही. त्यात असलेल्या गुंतागुंतीला गूढता म्हणतात, अनाकलनीयता नाही. सिरस समजून घेण्याला कठीण आहे कारण ते कुठलं बाळबोध गद्य नाही. ते काव्य आहे. काव्य समजून घेणं म्हणजे एखाद्या अज्ञात अथांग डोहाच्या तळाशी जाणं. ह्यात धोका आहे, काहीच न मिळण्याचा किंवा काही तरी धक्कादायक सापडण्याचा किंवा हरवून जाण्याचाही. मनोज वाजपेयी 'सिरस' नावाच्या काव्यात्मक व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून तळाचा ठाव घेऊन परत येतो आणि ह्या शोधमोहिमेत त्याला काय सापडलं ते पडद्यावर विलक्षण ताकदीने सादर करतो. अंगावर संकटांमागून संकटं चाल करून येत असताना, समजून घेणारं, धीर देणारं असं कुणीही जवळचं माणूस नसतानाही डॉ. सिरस ह्यांची सूचक विनोदबुद्धी अत्यंत गंभीर विषयाला सादर करताना गांभीर्याचा समतोल ढळू देत नाही. ह्या मागे मनोज वाजपेयीचा संयत अभिनय आणि अप्रतिम देहबोली आहे. 'ळ' चा उच्चार आणि बोलण्याची मराठी ढब त्याने व्यवस्थित निभावली आहे.

पत्रकार दीपू सबॅस्टियनच्या भूमिकेत राजकुमार राव आहे. तो बहुतेक दिग्दर्शक हंसल मेहतांचा आवडता अभिनेता असावा. शाहीद, सिटीलाईट्स नंतर हा त्या दोघांचा तिसरा चित्रपट. राजकुमार रावचं अभिनयकौशल्य काय पो छे, शाहीद, सिटीलाईट्स मध्ये दिसलंच आहे. इथेही ते दिसतं. सिरसच्या मृत्यूची बातमी समजल्यावर गोंधळलेल्या मनस्थितीला त्याने ज्या सहजतेने सादर केलं आहे त्याला तोडच नाही. सहजाभिनय करणाऱ्या काही आश्वासक नावांपैकी राजकुमार एक. त्याच्या नावाभोवती कुठलं स्टारपणाचं वलय नाही. त्याचं तसं व्यक्तिमत्वही नाही. कदाचित म्हणूनच तो पडद्यावर त्या त्या व्यक्तिरेखेवर भारी होत नाही. तर ती व्यक्तिरेखा आणि तो एकरूप होतात.


थोड्याश्या कालावधीत दीपू आणि सिरसमध्ये जोडलं गेलेलं मैत्रीचं नातं खूप सुंदर सादर झालं आहे. ह्याचं श्रेय दोन्ही अभिनेते व ह्या दोन्ही व्यक्तिरेखा लिहिणारे अपूर्व असरानी आणि इशानी बॅनर्जी ह्यांनाही द्यायला हवं. सिरस दीपूशी बोलताना खूप कम्फर्टेबल आहे, तरीही नेमक्या विषयावर बोलताना तो नजर मिळवत नाही. खासकरून दोघांमधला बोटीतला संवादाचा प्रसंग तर खूपच परिणामकारक झाला आहे. इथे कॅमेरा गडबडला आहे की काय, असंही क्षणभर वाटतं. पण प्रत्यक्षात ते दोघे समोरासमोर बसूनही दोन विरुद्ध दिशांना बघत बोलत असल्यामुळे आपलाच गोंधळ झालेला असतो ! अर्थपूर्ण, योग्य जागी योग्य तितके खुमासदार, सूचक संवादसुद्धा चित्रपटाला अर्थवाही बनवतात.


'चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे' असं नेहमी म्हटलं जातं. 'मला काय सांगायचं आहे' हे जेव्हा दिग्दर्शकाला स्वत:लाच नीट समजलेलं नसतं, तेव्हा चांगल्या विषयाचीही हेळसांड होते आणि जेव्हा ही एक जाणीव अगदी स्वच्छ पाण्यासारखी आरपार असते, तेव्हा मसान, मांझी, अलिगढ सारखे चित्रपट बनतात. इथे दिग्दर्शक नवा असो वा जुना त्याचा उद्गार किती अनन्यसाधारण आहे, हे समजून येतं. हंसल मेहतांना 'सिरस'ची कहाणी दाखवायची होती. त्यांनी ती दाखवली. ती दाखवत असताना त्यांना बरंच काही करता आलं असतं. अलिगढ विद्यापीठ ही एक मुस्लीम बहुल संस्था. तिथे एक हिंदू प्रोफेसर एक प्रादेशिक भाषा शिकवतो आणि हेड ऑफ द डिपार्टमेण्ट होतो, ही बाब मत्सर वाटण्यासारखीच आणि एकूणच ह्या केसमध्ये उपलब्ध माहितीनुसार विचार केला तर कुठल्याश्या आकसापोटीच कारवाई झालेलीही जाणवते. इथे 'अल्पसंख्यांकावरील अन्याय' हाही एक मुद्दा होता. दुसरं म्हणजे, 'समलैंगिक संबंध व समलिंगी व्यक्ती ह्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा बदलायला हवा', ह्यावरही एक दुढ्ढाचारी भाष्य करता येऊ शकलं असतं. मात्र मेहता असल्या कुठल्याही फंदात पडत नाहीत आणि तरीही ते ह्या सगळ्यावर विचार करायला भाग पाडतात. ते सिरसना सहानुभूतीच्या बुळबुळीतपणात बरबटवत नाहीत. ते 'सिरस' ही व्यक्ती उभी करतात. मग तिच्याबद्दल माणुसकी व त्यायोगे सहानुभूती स्वाभाविकपणेच निर्माण होणार असते.

मेहतांनी इथे गाण्यांनाही टाळलं आहे. तसं पाहता गाणी कुठल्याच कथानकासाठी अगदी अत्यावश्यक नसतातच, त्यामुळे ते इथे खटकत नाही. मात्र भारतीय चित्रपटाचा निस्सीम चाहता म्हणून मला नेहमी असं वाटत आलं आहे की चित्रपट संगीत हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि त्याला आपण जपावं. हे एक साधन आहे, त्याचा खुबीने वापर करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. टाळणे म्हणजे वापर करणे नव्हे.

'अलिगढ़' हा मुख्य धारेतला चित्रपट नक्कीच नाही. त्याच्या वाटेला सामान्य प्रेक्षक जाणार नाही. जाऊच नये. ते 'अरसिकेषु कवित्व निवेदनं' होईल. मोठ्या शहरांत, मल्टीप्लेक्सेसमध्ये आताशा असे चित्रपट बऱ्यापैकी चालतात. त्यामुळे भरपूर गल्ला जमत नसला, तरी मेहनतीचं चीज तरी होतं. एक उत्तम चित्रपट रसिकांच्या पोचपावतीसाठी चित्रपटगृहांत वाट पाहतो आहे. ज्यांचं चित्रपटावर प्रेम आहे, त्यांनी तो आवर्जून पाहावा. सत्यघटनेवर आधारित चित्रपटांचा ओव्हरडोस झाला आहे, हे जरी मान्य केलं, तरी त्यामुळे चांगला चित्रपट वाईट ठरत नाही.

रेटिंग - * * * *

Sunday, February 28, 2016

समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग ! (India vs Pakistan - Asia Cup T20 - 2016)


भारत व पाकिस्तानची मॅच म्हणजे 'भारतीय फलंदाजी' वि. 'पाकिस्तानी गोलंदाजी'. कालची ट्वेंट२० ही तशीच. त्यात भारत जिंकला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं कारण दोन्ही संघांच्या कमजोर बाजूंची तुलना केल्यास त्या गरिबांतला भाग्यवान श्रीमंत भारतच ठरतो. I mean, पाकिस्तानची फलंदाजी जितकी दरिद्री आहे, त्याहून भारताची गोलंदाजी निश्चितच बरी आहे. ट्वेंटी२० क्रिकेट हा काही अस्सल तंत्रशुद्ध फलंदाजीसाठीचा खेळ नाहीच. पण गोलंदाजीला मदत करणाऱ्या पीचवर खेळत असताना फलंदाजाकडे आवश्यक असलेल्या किमान तंत्रशुद्धतेचाही सपशेल अभाव पाकिस्तानच्या फलंदाजीत असावा, इथेच तो संघ पराभूत ठरतो. एकही भेदक गोलंदाज नसलेल्या गोलंदाजीने माफक ८३ धावांत एखाद्या संघाला उखडावं, ही त्या संघाची फलंदाजदारिद्र्य दाखवणारी कामगिरीच. भारताच्या ठीकठाक गोलंदाजीसमोरही जर हे फलंदाज अश्या प्रकारे नांगी टाकत असतील, तर दर्जेदार गोलंदाजीसमोर त्यांची काय दाणादाण उडू शकते, सांगता येत नाही !

कालच्या मॅचचे हायलाईट्स माझ्या मते तीन होते -
१. भारताची फिल्डिंग
२. मोहम्मद आमीरची बोलिंग
३. विराट कोहलीची फलंदाजी

भारतीय फिल्डर्स एक-एक रन जीव तोडून वाचवत होते आणि आधीच उसळत्या पीचवर खेळताना भंबेरी उडत असलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी दिलेल्या छोट्यातल्या छोट्या संधीचाही पुरेपूर फायदा भारतीयांनी उठवला. त्यामुळेच पाकिस्तानी खूप दबावाखाली आले आणि त्या मानाने सामान्य गोलंदाजीही जबरदस्त ठरली. विराट कोहलीने कव्हर्समधून धावत येत चेंडू उचलून बोलरच्या बाजूला मारलेली डायरेक्ट हिट आणि रवींद्र जडेजाने स्क्वेअर लेगकडून मारलेला सपाट थ्रो ज्यावर धोनीने अक्षरश: प्रकाशाच्या गतीने उडवलेले स्टंप्स ही चित्रं तर डोळ्यांसमोरून जाणार नाहीत. ह्याच संधी जर पाकिस्तानी फिल्डर्सना मिळाल्या असत्या तर त्यांनी तिथे दोन विकेट्स सोडल्या आहेत, हे कुणाला जाणवलंसुद्धा नसतं ! तीस यार्डांच्या वर्तुळाच्या आत आणि बाऊंड्री लाईनजवळ वाचवलेले रन्ससुद्धा खूप महत्वाचे. आशियाई संघांना फिल्डिंगचं महत्व जरा उशीराच कळलं आहे. पण पाकिस्तानला तर अजूनही कळलेलं दिसत नाही. कारण अशी चपळाई त्यांच्या फिल्डर्समध्ये अजिबातच दिसली नाही. ते कसेबसे कॅचेस पकडत होते, कसेबसे चेंडू अडवत होते. एकूणच आपल्याला काहीही जमत नसतानाही सगळं येत असल्याचा नाटकी आविर्भाव त्यांच्या देहबोलीत स्पष्टपणे जाणवत होता.

फिल्डिंगकडून 'बेसिक मिनिमम'पेक्षा जास्त अपेक्षा नसताना आणि स्कोअर बोर्डवर धावांचं 'कुशन'ही नसताना बोलर्सचं मनोबल खच्ची होतं. पण इथेच पाकिस्तानी बोलर्स वेगळे ठरतात. अश्याच वेळी त्यांच्यात एक विजीगिषु वृत्ती संचारते. पहिल्या ओव्हरपासून ते असे काही आक्रमक होतात की जणू त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असावा !
मोहम्मद आमीरची झणझणीत बोलिंग पाहणं, हा एक रोमांचित करणारा अनुभव होता ! 'मॅच फिक्सिंग करून देशाचं नाव खराब करणारा खेळाडू' हीच मोहम्मद आमीरची ओळख. तत्पूर्वी, तो खरोखरच एक अत्यंत गुणी वेगवान डावखुरा गोलंदाज होता. पण खेळातल्या गैरव्यवहारांची सोबत नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटशी राहिली आहे. त्यात हा गुणी तरुण खेळाडू ओढला गेला. थोडक्यात वाचला कारण त्याने गुन्हा केला तेव्हा त्याचे वय 'सुजाण' नव्हते ! तर शिक्षा भोगून परत आलेला हा मोहम्मद आमीर आजही त्यात तिखटपणे बोलिंग करतो आहे, हे पाहून कुणाही सच्च्या क्रिकेटरसिकाला आनंदच झाला असेल. फलंदाजांना आंदण दिलेल्या आजच्या क्रिकेटमध्ये आमीरसारखे गोलंदाज मोजकेच बनतात. त्याने आपली चुणूक पहिल्याच चेंडूपासून दाखवली. रोहित शर्माला बेनिफिट ऑफ डाऊट मिळाला. पण दुसऱ्या चेंडूवर मात्र तो वाचला नाही आणि इनिंगच्या तिसऱ्या चेंडूपासून कोहली मैदानात आला. मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सपैकी प्रत्येक चेंडू फलंदाजांची परीक्षा पाहणारा होता. तो चेंडूला 'कट' करत होता, 'स्विंग' करत होता, उसळीसुद्धा देत होता. जनरली डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज एकत्र असले की गोलंदाजाला लाईन पकडताना जरा त्रास होतो. पण दोन उजव्या हाताचे फलंदाज आउट केल्यावर समोर आलेल्या डावखुऱ्या सुरेश रैनाला आमीरने टाकलेला पहिला चेंडू रैनाला दिसला तरी होता का, कुणास ठाउक !
दुसरीकडूनही मोहम्मद इरफान नावाचा साडेसात फूट उंचीचा पहाड धावत अंगावर येत होता आणि त्याचीही लाईन-लेंग्थ impeccable च होती. तेव्हाही समोर युवराज सिंग - विराट कोहली अशी फलंदाजांची डावी-उजवी जोडी होती. तरी आमीर आणि इरफान आग ओकत होते.

हे एक अग्निदिव्य होते आणि ते कोहलीने पार पाडले. कोहलीची खेळी रेकॉर्ड्समध्ये 'जस्ट अनदर इनिंग' म्हणूनच नोंदवली जाईल. कारण तो ४९ वर बाद झाला. तसं झालं नसतं तर तिची एक 'फिफ्टी' म्हणून स्वतंत्र नोंद झाली असती. दुर्दैवाने तसं होणार नाही. अम्पायर लोकांनी काही वेळेस जराशी माणुसकी ठेवावी. इतकं सुंदर खेळल्यानंतर एखाद्याला १ रनसुद्धा नाकारावा, असा विघ्नसंतोषीपणा करू नये. बरं, आउट दिला तोसुद्धा डाउटफुल होताच. मग द्यायचा होता की बेनिफिट ऑफ डाऊट ! ह्या न मिळालेल्या एका रनमुळे कोहलीची ही इनिंग रेकॉर्ड्समध्ये लपून जाईल, पण लोकांच्या आठवणींतून पुसली जाणार नाही. सापासारखे फुत्कार सोडणाऱ्या चेंडूंचा त्याने ज्या आत्मविश्वासाने सामना केला, त्याला तोडच नाही ! असं वाटत होतं की युवराज वेगळ्या पीचवर खेळतोय आणि कोहली वेगळ्या ! जर कोहलीने आपला सर्वोत्कृष्ट खेळ काल केला नसता, तर ८३ धावा भारतालाही झेपल्या नसत्याच कदाचित ! गोलंदाजांना मदत करणाऱ्या पीचवरच्या मॅचमध्ये एक फलंदाज कोहली म्हणूनच 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

कालची मॅच खरं तर अपेक्षाभंग करणारी होती. पाकिस्तानच्या बोलिंगच्या पहिल्या ८-९ ओव्हर्स वगळल्या तर पूर्णपणे एकतर्फी मॅच ! भारत-पाकिस्तानकडून क्रिकेटच्या फॅन्सना अजून काही तरी हवं असतं. ठस्सन, खुन्नस तर दिसली नाहीच, पण 'फाईट'ही फारशी पाहायला मिळाली नाही. लोक अगदीच निराश होणार नाहीत, ह्याची काळजी मोहम्मद आमीरने घेतली. 'भारत जिंकला, पाकिस्तान हरलं' हा आनंद असला, तरी तेजतर्रार बोलिंगवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्याला ह्या निकालापेक्षा जास्त आनंद मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सनी आणि त्या तोफखान्याचा निडरपणे यशस्वी सामना करणाऱ्या कोहलीच्या ४९ धावांनी दिला ! पुरेसं नव्हतं, पण समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग !

ह्या निमित्ताने एक प्रश्न पडतो. जसे तेज गोलंदाज पाकिस्तानकडे बनतात, तसे भारताकडे का बनत नाहीत ? ही काही आजची कहाणी नाही. वर्षानुवर्षं हेच चित्र का आहे ? बहुतेक हा फरक आपल्या दृष्टीकोनातच आहे, 'कल्चर'मध्येच आहे. आपल्याकडे लहान लहान मुलांना सिक्सर मारण्यातच आनंद मिळतो. सेंच्युरी मारुन, शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन आपल्या संघाला विजयी करणारा 'भुवन' च 'लगान' ला सुपरहिट सिनेमा बनवू शकतो. पण चक्रव्यूह, सापळा रचून फलंदाजांना बाद करणाऱ्या जलदगती 'इक़्बाल' चा चित्रपट मात्र येतो आणि जातो. आपल्याकडे 'हीरो' हा नेहमी फलंदाजच राहिला आहे आणि गोलंदाज साईड हीरो. ह्या साईड हीरोच्या 'ब्रेक ऑफ' वर चित्रपटात विनोद केले जातात आणि क्रिकेटमध्ये ह्याच साईड हीरोला बळीचा बकरा बनवून पाटा पीचेसवर डावांचे मनोरे रचले जातात. म्हणूनच गेल्या काही वर्षांत आपल्याकडे जलदगतीच काय, फिरकी गोलंदाजही फारसे पुढे आलेले नाहीत. तीच ती २-४ नावं आहेत आणि त्यांच्यातही नियमितता नाही. अश्विन आपला सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज. पण स्पष्टपणे जाणवतंय की त्याला जर थोडं उशीराने बोलिंगला आणलं, तर तो हमखास मार खातो. बरं, त्याच्या जोडीला कोण ? रवींद्र जडेजा. ही काही गोलंदाजीतली श्रीमंती नक्कीच नाही.

थोडक्यात आपल्याकडे ना धड तेज गोलंदाज आहेत, ना फिरकी. आपण फक्त काम चालवून घेतो आहे आणि हाच जो दृष्टीकोन आहे तो बदलणं गरजेचं आहे. आपल्या क्रिकेटमधला भेदभाव जेव्हा आपण संपवू, तेव्हाच आपल्याकडेही तेज तिखट बोलर्स बनतील. तोपर्यंत इशांत शर्मा, उमेश यादव आणि आशिष नेहराशिवाय पर्याय नसेल.

- रणजित पराडकर

Wednesday, February 24, 2016

नीरजा - She deserved more (Movie Review - Neerja)

'चरित्रपट किंवा एखाद्या सत्यघटनेवर बेतलेला चित्रपट बनवणे' हा एक प्रकारचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हे चांगलं की वाईट, हा प्रश्न नाही. पण मध्यंतरी (हम आपके है कौन) नंतर कौटुंबिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. एक तर संपूर्ण चित्रपटच कौटुंबिक भपकेबाज किंवा कुठून तरी काही तरी करून एखादं लग्नातलं/ 'मंगनी'तलं गाणं वगैरे घुसडायचं, असं चाललं होतं. जे अजूनही अधूनमधून दिसतंच. त्या ट्रेंडने बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपटापासून दूर नेलं. त्यांतल्या बहुतेकांना चित्रपटाकडून जी 'सेन्सिबिलीटी'ची अपेक्षा होती, ती त्याच सुमारास झालेल्या इंटरनेट व केबल टीव्ही क्रांतीमुळे सहज उपलब्ध झालेल्या परदेशी चित्रपटांत मिळाली आणि तो प्रेक्षकवर्ग दुरावला तो कायमचाच. आता हा एक ट्रेंड आला आहे. ठराविक कालावधीनंतर एखादा चरित्रपट येतोच येतो. सत्यघटनेवर आधारित चित्रपट येतोच येतो. आता ह्यातही 'तोचतो'पणा वाटायला लागला आहे. असं वाटायला लागलं आहे की असे चित्रपट बनवत असताना कथानक व बऱ्याच अशी पटकथाही बऱ्यापैकी 'तयार'च असते आणि त्याला सत्यतेची पार्श्वभूमी असल्यावर 'सेन्सिबिलीटी' तर असली/ नसली तरी गृहीत धरली जातेच जाते. मग मिल्खा सिंगवर राकेश मेहरांनी बनवलेल्या लांबसडक चित्रपटात फरहान अख्तर काही दृश्यांत सपशेल तोकडा पडला असतानाही त्याचं कौतुक होतंच. 'मेरी कोम'वरील चित्रपटाला पाहताना, जो विषय आजपर्यंत नेहमीच चित्रपटांनी अव्हेरला आहे, तो - 'ईशान्येकडील लोकांच्या समस्या' - पुन्हा एकदा पूर्णपणे टाळला असतानाही, 'मेरी कोम'चा संघर्ष त्यात पूर्णपणे आला असल्याचीच हवा होते. कधी कधी वाटतं की 'मांझी', 'एअरलिफ्ट' हे चित्रपट 'सत्यघटनेवर आधारित' असं न सांगता बनवले गेले असते, तर ती कथानकं लोकांनी स्वीकारली तरी असती का ? पण मार्क ट्वेनने म्हटलंय, '“Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.” म्हणूनच 'आधारित' शब्दाचा फायदा घेऊन जेव्हा सत्यघटनेला मनासारखं सादर केलं जातं, तेव्हा त्यालाही स्वाभाविकपणे 'सेन्सिबल' मानलं जातं. त्यातूनही जर देश, जातीभेद, स्त्री शक्ती वगैरे संवेदनशील विषय असेल, तर त्याच्या निवडीतच ७५% यश दडलेलं असतं.

राम माधवानी ह्यांनी आपला पहिला (फुल लेंग्थ) चित्रपट करण्यासाठी असाच काहीसा 'सेफ गेम' खेळला आहे.त्यांनी विषय निवडला 'नीरजा भानोट'चा.

१९८६ साली अयशस्वी अपहरण करण्यात आलेल्या 'Pan Am 73' ह्या विमानाची हेड अटेंडंट असलेल्या नीरजा भानोटने आपल्या जीवाची पर्वा न करता विमानातील प्रवासी, सहकर्मचारी ह्यांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिले आणि त्या प्रयत्नात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. ह्या अद्वितीय शौर्यासाठी तिला भारत, पाकिस्तान व अमेरिका ह्या देशांकडून अनेक मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. सर्वोच्च भारतीय सन्मान 'अशोक चक्र' तिला देण्यात आला. वय वर्ष २३. कुठून आलं असेल तिच्यात इतकं मानसिक बळ ? एका अत्यंत बिकट प्रसंगी तिने प्रसंगावधान बाळगून स्वत:चा जीव धोक्यात टाकूनही इतरांचे जीव वाचवले, हे शौर्य कुठून आलं असेल ? संस्कार, शिक्षण हे विचारांची दिशा ठरवतात. पण पराकोटीच्या तणावपूर्ण प्रसंगी निर्णयक्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारं मनोधैर्य हे फक्त आणि फक्त अनुभवांतून येतं. कुठल्या अनुभवातून काय शिकवण मिळेल हे सांगता येत नाही. लहान मुलाला आपण रस्त्यावरच्या गाड्या दाखवत असताना ते दिव्यांना ओळखायला शिकतं. तसंच आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगातून आपण स्वत:सुद्धा काय वेचून, टिपून घेऊ ह्याचा नेम नसतो. जेव्हा दशरथ मांझीने एकट्याने एक पहाड खोदून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता बनवला, तेव्हा वर्षानुवर्षं त्या शुद्ध वेडेपणा वाटणाऱ्या कामासाठी झटताना लागलेलं मनोधैर्य त्याला त्याच्या पत्नीवरील प्रेमातून किंवा त्याच्या जातीमुळे समाजाकडून मिळालेल्या तुच्छ वागणुकीबद्दलच्या असंतोषातून असेल किंवा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाच्या संतापातून मिळालं असेल. 'मांझी' बनवताना केतन मेहतांनी ह्या सर्व विषयांना सूचकपणे सादर केलं. त्यांनी फक्त 'मांझी'चा पराक्रमच दाखवून शॉर्ट कट मारला नाही. 'नीरजा'ची कहाणी दाखवताना मात्र 'नीरजा'च्या संघर्षाला नीट सादर केलं जात नाही. एका अयशस्वी लग्नाबाबतचे संदर्भ फ्लॅशबॅकमध्ये येतात. निकराने विरोध करून उभं राहण्याची मन:शक्ती तिला ह्या अनुभवातून मिळालेली असेल का ? असू शकते. लग्नानंतर होणारे अत्याचार एका स्त्रीला पूर्णपणे ध्वस्त करतात किंवा तिच्यात हजार स्त्रियांचं बळ आणून सगळ्यांविरुद्ध उभं करतात, अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. ह्या व्यतिरिक्तही नीरजाच्या पूर्वायुष्यात असे अनेक संदर्भ असू शकतात, ज्यांची नोंद तिच्या संवेदनशील मनाने घेतलेली असणार आणि ह्या सगळ्याचं एकत्रित फलित ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्यात अपरिमित शौर्याच्या रूपाने आलं असणार. 'सिनेमॅटिक लिबर्टी' हे साधन ह्या सगळ्या विचारमंथनासाठीसुद्धा वापरलं गेलं पाहिजे. जसं ते 'मांझी'मध्ये वापरलं गेलं. मात्र हे सगळं बळ तिला वडिलांच्या फिल्मी संवादांतून मिळालं असल्याची पोरकट थिअरी इथे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. Is this some kind of a joke ? अद्वितीय शौर्याचा आढावा घेताना तुम्ही ह्याहून पुढे विचार करू शकत नाही ?


ह्या सगळ्याच्या जोडीला आहेत अत्यंत सपक संवाद व कमकुवत लेखन. कराची विमानतळावरील अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सुंदर खुलवता येऊ शकली असती. 'गुलजार'च्या 'अचानक' मध्ये ओम शिवपुरींनी साकारलेली 'डॉक्टर'ची छोटीशी व्यक्तिरेखा असो किंवा प्रमोद चक्रवर्तींच्या 'मजबूर'मध्ये 'सज्जन'ने साकारलेली तशीच अतिशय छोटीशी 'डॉक्टर'ची व्यक्तिरेखा असो. १-२ दृश्यांत ह्या दोघांनी आपापली छाप सोडली होती. अतिरेक्यांशी संवाद साधण्यासाठी झटणारा तो कराची विमानतळावरील अधिकारी शेवटी तीच हताशा अनुभवतो, जी ह्या डॉक्टरांनी अनुभवली. पण लेखकाला ते दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातला एकही संवाद लक्षात राहू नये. वजन आणण्यासाठी राजेश खन्नाच्या चित्रपटांतील 'पुष्पा, आय हेट टियर्स' , 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' वगैरे डायलॉग उधार घेऊन त्यातच सार्थक मानावं, काहीच ओरिजिनल देऊ नये ह्याचं वैषम्य वाटावं.
अतिरेक्यांशी संवाद साधणे, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेलेच दाखवणे क्रमप्राप्त होतं कारण घटना त्यांच्या भूमीतली. पण भारत, अमेरिका व इतर देशांकडून पाकिस्तानमार्फत का होईना काही प्रयत्न झाले किंवा न झाले हे दाखवूसुद्धा नये, हेसुद्धा पटलं नाही. 'मिशन'वर निघता एक अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला प्लान सांगतो, हे पाहून तर हबकायलाच होतं.
मुख्य व्यक्तिरेखेपासून अगदी छोट्यातल्या छोट्या सहाय्यक व्यक्तिरेखेपर्यंत कुणीही बारकाईने लिहिल्यासारखं वाटतच नाही.
सोनम कपूरचा चेहरा 'नीरजा भानोट'शी बराच मिळता-जुळता वाटतो. ती दिसलीही सुंदर आणि फ्रेश आहे. 'सांवरिया'पासून 'प्रेम रतन धन पायो' पर्यंत सुमार अभिनयाच्या पायऱ्या चढत गेलेल्या सोनमसाठी 'नीरजा' ही एक चांगली संधी होती, जीनाच बदलण्याची. त्या संधीचं तिने सोनं केलं, असं म्हणता येणार नाही, हे अनिल कपूरचं दुर्दैव. मरतानाचा अभिनय 'अग्निपथ'मध्ये हृतिकला जमला नाही आणि इथे सोनम कपूरला. तिला मरतानाचा काय, झोपतानाचाही अभिनय जमलेला नाही. रात्री एक वाजता तिची आई शबाना आझमी तिला उठवत असताना इतका कंटाळा येतो की वाटतं बादलीभर गार पाणी ओतावं आता ! तुकड्या-तुकड्यांत ती चांगली कामगिरी करते. आपल्याला वाटतं की 'आता हिने पकड घेतली', की लगेच गैरसमज दूर होतो.
'योगेंद्र टिक्कू'नी साकारलेला बापसुद्धा सहज वाटत नाही. विमान अपहरणाची पहिली बातमी कार्यालयात असताना समजल्यावर 'त-त-प-प' करत घरी फोन करुन सांगतानाचा प्रसंग सपशेल नाटकी झाला आहे. कथानक संपल्यावरही चित्रपट सुरूच राहतो. ह्या वाढीव १५-२० मिनिटांत शबाना आझमी पीळ-पीळ पिळतात. 'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. हा सगळा वाढीव भाग फक्त आणि फक्त शबाना आझमींना 'फुटेज' देण्यासाठी जोडलेलं एक निरर्थक ठिगळ आहे. त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.
तीन लहान मुलांना वाचवण्यासाठी स्वत: गोळ्यांना झेलणारी नीरजा दाखवताना कॅमेरावर्क शेवटच्या गटांगळ्या खातं. चित्रपटभर आपण ते सहन करत असतो. पण एक अत्यंत महत्वाचा प्रसंगसुद्धा 'जस्ट अनदर थिंग' म्हणून चित्रित व्हावा ?

'नीरजा'ची कहाणी वाचताना जो रोमांच येतो, तो रोमांच ही कहाणी पडद्यावर पाहताना येऊन पुरेसं नव्हतं. पडद्यावर हे नाट्य दाखवताना प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर आणणं अपेक्षित व शक्यही होतं. फक्त डोळे पाणावणे पुरेसं नव्हतं, तर कित्येक ठोके चुकणं आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना सुन्न मनस्थिती असणं अपेक्षित व शक्यही होतं. असं काही न होता मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते आणि बाहेर पडल्यावरसुद्धा 'चांगला होता मूव्ही' वगैरे पॉपकॉर्नी गप्पा चघळत रस्ता धरत होते.
Neerja deserved more, much more than this.

रेटिंग - * *

Monday, February 15, 2016

बल्लीमाराँसे दरिबेतलक

दिल्ली

चोरों की दिल्ली, हीरों की दिल्ली
बाजारों की दिल्ली, दीवारों की दिल्ली
बेचनेवाली दिल्ली, खरीदनेवाली दिल्ली
छोले कुलचों की दिल्ली, चीला पराठों की दिल्ली
बड़ी बड़ी सडकों की दिल्ली, भरी भरी गलियों की दिल्ली
सरकारों की दिल्ली, बेकारों की दिल्ली
खानेवालों की दिल्ली, पीनेवालों की दिल्ली
दिलवालों की दिल्ली, बवालों की दिल्ली
बेगानों की दिल्ली, दीवानों की दिल्ली
बल्लीमारान की दिल्ली, झंडे वालान की दिल्ली
ग़ालिब की गज़लों की दिल्ली, साहिर की नज्मों की दिल्ली
ज़फर की दिल्ली, जवाहर की दिल्ली
झांसीवालीयों की दिल्ली, निर्भयाओं की दिल्ली
साइकल रिक्शों की दिल्ली, रोल्स रॉईसों की दिल्ली
इतिहास की दिल्ली, आज की दिल्ली
खूबसूरत दिल्ली, बदसूरत दिल्ली
इस की दिल्ली, उस की दिल्ली
तब की दिल्ली, सब की दिल्ली
अब की दिल्ली, कब की दिल्ली
दिल्ली

- अशी सगळी दिल्ली तर मी अजून पाहिलेली नाही. पण दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला एका माळेत का गुंफतात हे मला समजलंय. ह्यांच्याबद्दल तुम्ही उदासीन (Neutral) असू शकत नाही. ही शहरं तुमच्या अंगावर येतात, डोळ्यांत भरतात, उर दडपवतात, तुम्हाला हादरवतात, मोहवतात, बरंच काही करतात. त्यांचा प्रभाव तुम्ही टाळू शकत नाही. ही शहरं भाग पाडतात तुम्हाला, त्यांच्याबद्दल एक मत बनवण्यासाठी. कोणतंही. प्रिय किंवा अप्रिय. पण तुम्ही उदासीन राहू शकत नाही.

दिल्लीची तुलना मुंबईशी करणं, माझ्यासाठी अपरिहार्य आहे. ही तुलना करताना मला जाणवतं की दोन्ही शहरं काही बाबतींत एकमेकांपेक्षा सरस आहेत. दिल्लीची हवा 'थंड व कोरडी' ते 'उष्ण व कोरडी'पर्यंत बदलते. तर मुंबईची हवा 'उष्ण व दमट'पासून 'उष्ण व दमट'पर्यंत(च) बदलते, हा सगळ्यात महत्वाचा व झटक्यात जाणवणारा फरक ! रस्त्यांचं म्हणायचं तर दिल्लीचे रस्ते म्हणजे डेल स्टेनचा रन अप आणि मुंबईचे रस्ते म्हणजे आशिष नेहराचा, इतका फरक आहे. दिल्लीकडे भरपूर जमीन आहे, मुंबईकडे असलेली जमीनही समुद्र बुजवून बनवलेली आहे. कदाचित मोठमोठे रस्ते असणं म्हणूनच दिल्लीला परवडणारं आहे आणि टोलेजंग इमारती असणं हे मुंबईसाठी आवश्यक.

अर्थात ही सगळी तुलना नव्या दिल्लीशी. पुरानी दिल्ली हे सगळं प्रकरणच वेगळं असावं. मी फक्त चांदनी चौक, क़ुतुब मिनार वगैरे भाग पाहिला. त्यावरून तरी असंच वाटतं. मी मुंबईतल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांतून, बाजारांतून खूप फिरलोय. पण लाल किल्ला ते चांदनी चौक आणि मग तिथून दरीबा कलान, बल्लीमारान, जामा मशीद वगैरे भाग फिरताना जे जाणवलं ते फार वेगळंच काही तरी होतं. हा सगळा भाग मुस्लीम बहुल. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांत शहरांतल्या जुन्या बाजारांत असते तशीच प्रचंड गर्दी, कचरा, दाटीवाटी आणि गोंधळ ! गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा ! आम्हीही एका सायकल रिक्शातच होतो. त्यामुळे 'खरेदी' नामक बायकांच्या अत्यंत कंटाळवाण्या व खर्चिक टाईमपासपासून माझी सुटका झाली. आम्ही दोघंही, खरं तर आम्ही अडीच, कारण सव्वा वर्षांचा मुलगाही होता, तर आम्ही अडीचही जण डोळे फाडून चोहो बाजूंना न्याहाळत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकमेकांना गर्दीत माणसांचे माणसांना धक्के लागावेत, तश्या निर्विकारपणे एकमेकांना खेटत, घासत होत्या. डोक्यावर वायरींचे इतके दाट जाळं होतं, की त्यांतून एखादी माशीसुद्धा पार होऊ शकणार नाही. प्रत्येक साईजच्या वायरी इथून तिथे आणि तिथून इथे झुलत होत्या. माझा एक हात कॅमेरा पकडून होता, दुसरा हात मुलाला आणि बारीक लक्ष सगळीकडे होतं. हे वेगळ्या प्रकारचं लक्ष होतं. कोण कुठून कसा येईल आणि आमच्या पाकीट, पर्स, कॅमेरा, गळ्यातल्यावर हात टाकेल किंवा आमच्याच नकळत लंपास करेल, ह्याचा नेम नव्हता. खासकरून 'गली परांठेवाली' नामक अत्यंत ओव्हररेटेड खाऊगल्लीत पायी फिरत असताना तर मी खूपच लक्ष ठेवून होतो. 'गली परांठेवाली'मध्ये आम्ही दोन ठीकठाक पराठे खाल्ले आणि एक अक्षरश: थुकरट लस्सी प्यायलो. ह्यापेक्षा उत्तम पराठा आणि लस्सी करोल बागेत मिळते आणि ती शांतपणे खाता/पिताही येते, असं आपलं माझं वैयक्तिक मत.

एकंदरीतच हा सगळा भाग निश्चिंतपणे फिरावं असा वाटलाच नाही. डोक्यावर लटकणाऱ्या वायरींच्या धोक्याप्रमाणे सतत एक अनिश्चितता तुमच्या मागावर आहे असंच वाटत राहतं. बल्ली मारान भागातच गालिबची हवेली आहे. ती बाहेरून किंवा दुरून का होईना पाहावी अशी इच्छा होती. पण त्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेमका त्याच दिवशी कसलासा मोर्चा होता त्यामुळे ना गालिबच्या हवेलीकडे जाता आलं ना जामा मशीदीपर्यंत. (त्या मोर्च्याचीसुद्धा एक वेगळीच गंमत होती. मोर्च्याचा बॅनर घेऊन आघाडीला दोघे जण चालत होते. तो रस्ता (गल्ली) इतका लहान होता की तो बॅनर त्यांना सरळ उघडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघे एकामागे एक 'Sideways' चालत होते. म्हणजे मोर्च्याला समांतर त्यांचा बॅनर होता !) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच ! नकोच. सायकल रिक्शा करूच नका ! पायी फिरा. कुणी तरी ओळखीचा लोकल माहितगार माणूस शोधा आणि त्याला बरोबर घ्या, तेच बेस्ट !

पुरानी दिल्ली हा गजबजाट आवडण्यासारखा नाहीच. गुलजार म्हणतो 'तुझसे मिलना पुरानी दिल्ली में..' पण परिस्थिती अशी आहे की इथे 'किसी से मिलना..' म्हणजे फक्त 'देखना'च शक्य आहे ! 'बल्लीमाराँसे दरिबेतलक' इथे आहे फक्त गजबजलेली अनिश्चितता, तीही मुबलक कचऱ्यासह. 'स्वच्छ भारत अभियान' मुळे असेल, पण हा कचरा दर काही अंतरावर गोळा करून एक ढिगारा केलेला असतो, इतकीच काय ती सोय !

माझ्यासाठी धारावी, क्रॉफर्ड मार्केट, रानडे रोड, फॅशन स्ट्रीटच बरी ! तिथल्या कचऱ्यासह !

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...