Friday, December 18, 2015

भेलवाले (Movie Review - Dilwale)

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.



तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *

5 comments:

  1. नमस्कार रणजित,
    इकडे आलो होतो बाजीराव मस्तानी चे तुमचे परीक्षण पहायला..
    भेळवाले :D दिसले..
    शाहरुख पुन्हा तावडीत सापडला तुमच्या..
    >>"इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं."

    हाहा.. खतरनाक.. :D

    बाजीराव पहाच.. आणि लेख येउद्या..

    ReplyDelete
    Replies
    1. :D

      तावडीत वगैरे काही नाही. मला राग ह्याचा येतो की कुवत असूनही बिनडोक आणि भंकस सिनेमे का करतो तो ? मला तो आवडत नसला, तरी त्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ह्याबद्दल वादच नाही. पण किती दिवस नुसतं गल्लाभरूपणा करायचा ? I mean, you can do commercial movies and still make sense or at least give good entertainment like CHENNAI EXPRESS. जब तक है जान, रा-वन, Happy New Year आणि आता हा दिलवाले, लाजिरवाणे सिनेमे आहेत.

      Delete
  2. तुम्ही शेवटपर्यंत कसा काय सहन केला देव जाणे, मि संगणकावरच अर्धा पाहीला, कंटाळलो आणि डिलीट केला

    ReplyDelete
  3. तुम्ही शेवटपर्यंत कसा काय सहन केला देव जाणे, मि संगणकावरच अर्धा पाहीला, कंटाळलो आणि डिलीट केला

    ReplyDelete
  4. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !

    हा हा हा …. हे आवडल

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...