Tuesday, December 29, 2015

ये हौसला कैसे झुके..

आजच्या चित्रपटांबाबत दुर्दैवाने हे खरं आहे की बराच काळ लक्षात राहतील अशी फारच मोजकी गाणी आजकाल बनत असतात. तीन चार अपवाद वगळले, तर 'संगीतकार' ही जमात आजच्या घडीला सैन्यासोबतच्या बाजारबोणग्यांसारखी बिनमहत्वाची झाली आहे. अपवादात्मक लोकांपैकीसुद्धा 'सलीम-सुलेमान' हे नाव जरा इतर नावांपेक्षा कमी गाजलंय, पण त्यांची काही गाणी खरंच लक्षात राहण्याजोगी आहेत.
तर दुसरीकडे 'हळुवारपणे उलगडत जाणारे चित्रपट' ही संकल्पनाही हळूहळू बाद होत चालली आहे. दिग्दर्शकाचा ठसा उमटेल असे वेगळे सादरीकरण असणे म्हणजे अंगावर येणारा भडकपणा किंवा बुचकळ्यात टाकणारी गुंतागुंत असा काहीसा 'ट्रेण्ड'ही अावा. पण त्यातही नागेश कुकुनूर सारखे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांचे सिनेमे सगळ्या भडकपणा आणि वास्तवाच्या रंजक चित्रणाच्या भडिमारातही वेगळे दिसून येतात.

तर नागेश कुकुनूरचा एक असाच हळुवार उलगडच चित्रपट म्हणजे 'डोर'. त्याला संगीत 'सलीम-सुलेमान'चं.
त्यातलं हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी काही कामानिमित्त बाहेरगावी एकटा राहत होतो. तेव्हा रात्री एफएमवरचा 'लव्ह गुरु' हा कार्यक्रम (आर जे अनमोल) मी रोज पूर्ण रेकॉर्ड करत असे. ह्या रेकॉर्डिंग उद्योगाचा नाद जडलेला असताना एके रात्री हे गाणं लागलं.

ये हौसला कैसे झुके
ये आरज़ू कैसे रुके
मंज़िल मुश्किल तो क्या
धुँधला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या

राह पे काँटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपा ले सूरज मगर
रात को इक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी..............

होगी हमें जो रहमत अता
धूप कटेगी साए तले
अपनी ख़ुदा से है ये दुआ
मंज़िल लगा ले हमको गले
जुर्रत सौ बार रहे
ऊँचा इक़रार रहे
ज़िंदा हर प्यार रहे...........

खरं तर काही ओळीच देणार होतो. पण थोडं थोडं करत सगळंच दिलं गेलं इथे. ह्यातल्या एकेक शब्दाने मला त्या नैराश्याने वेढलेल्या काळात हुरूप दिला होता. मला हे शब्द माझ्यासाठीच लिहिले आहेत असं वाटायचं. आजही जेव्हा अचानक कधी हे गाणं माझ्या मोबाईलवरच्या शेकडो गाण्यांच्या गर्दीतून वाजतं, तेव्हा मी काही काळासाठी तरी सुन्न होतो. गाणं ऐकलं आणि अक्षरश: भारावून गेलो. नंतर काही दिवसांनी व्हिडीओ पार्लरमधून 'डोर'ची सीडी आणली आणि तो चित्रपट पूर्ण पाहिला.

आखातातील एका देशात एक पाकिस्तानी युवक आणि एक भारतीय युवक एकत्र राहत असतात. एके रात्री दोघा मित्रांमध्ये किरकोळ वाद होतो आणि चुकून पाकिस्तानी युवकाचा धक्का लागून भारतीय युवक काही मजल्यांच्या उंचीवरून खाली पडून मृत्यू पावतो. पाकिस्तानी युवकाला देहदंडाची शिक्षा होते आणि जर मृत व्यक्तीच्या पत्नीने दयेचा अर्ज केला, तरच त्याची ती शिक्षा कमी होऊ शकणार असते. हे समजल्यावर पाकिस्तानी युवकाची पत्नी 'गुल पनाग' थेट भारतात तो अर्ज घेऊन येते. मृत भारतीय युवक राजस्थानातला आहे, इतकंच तिला माहित असतं. तिला त्या अर्जावर त्याच्या विधवा पत्नीची - जी भूमिका आयेशा टाकियाने केली आहे - स्वाक्षरी हवी असते. ती तिला कशी शोधते आणि अखेरीस काय होतं अशी सगळी ही कहाणी. श्रेयस तळपदे सहाय्यक भूमिकेत. बाकी संपूर्ण चित्रपट गुल पनाग आणि आयेशा टाकियाचाच. दोघी जितक्या सुंदर दिसल्या आहेत, त्याहूनही अधिक सुंदर त्यांचं काम आहे. आयेशाने साकारलेली अल्लड अवखळ 'मीरा' आणि गुल पनागची परिपक्व, समंजस 'झीनत' ह्या दोघींपैकी कोण जास्त आवडली, हे ठरवणं केवळ अशक्य !

जास्त सविस्तर 'डोर'विषयी सांगता येत नाहीय कारण नंतर पुन्हा तो चित्रपट पाहता आला नाही. पण हे गाणं कायमस्वरूपी मनात घर करून आहे. शब्द 'मीर अली हुसेन' ह्यांचे आणि आवाज 'शफक़त अमानत अली' चा. दोघी मुख्य व्यक्तिरेखा आपापल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष, हतबलता आणि निराशेला सामोऱ्या जात आहेत. त्या दोघींचा दृढनिश्चय दाखवणारं हे गीत.

संगीत, काव्य हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्याचा रस्ता ते दाखवतील, चमत्कार घडवतील वगैरे असं काही नाही. मात्र अनेकदा त्यातून जेव्हा आपलीच मनस्थिती मांडली जाते, तेव्हा दु:ख, वेदना, यातना वाटल्या जाऊन एक उभारी मिळते. (हीसुद्धा एक प्रकारची जादू, एक प्रकारचा चमत्कारच का ?) हे गाणं म्हणूनच माझ्यासाठी खूप 'स्पेशल' आहे कारण माझी मनस्थिती मला त्यात अनेकदा दिसते. त्यातल्या रूपक तालाचा (7 beats) उसळून उसळून येणारा स्वभाव मनोधैर्य वाढवणारा वाटतो आणि उच्च स्वरांत रमलेली चाल आत्मविश्वासाला एका उंचीवर घेऊन जाते. तिथे, त्या उंचीवर 'धूप कटेगी सायें तले', 'रात को इक दिन ढलना ही है', 'हिम्मत रंग लाएगी', 'सुबह फिर आएगी', 'ऊँचा इक़रार रहे', 'ज़िंदा हर प्यार रहे', अश्या सगळ्या ओळी आशावाद आणि सकारात्मकता देतात. ही ऊर्जा मला प्रत्येक वेळी ह्या गाण्याने दिली आहे. प्रत्येक वेळी. एकदा तर मला आठवतंय की अर्धा-पाउण तास हे एकच गाणं ऐकत मी ऑफिसहून घरी आलो होतो.

हे असं काही मला मिळालं की पुन्हा पुन्हा मला वाटतं की देव आहे की नाही, ह्यावर वादविवाद होऊ शकतात. मात्र काही निर्मिती दैवी असतात, ह्यावर तरी वाद नसावाच. देव प्रत्येकातच असावा. जेव्हा जी व्यक्ती काही काळासाठी का होईना, त्याच्या/ तिच्या सर्वोच्च सृजनात्मक उंचीवर असते. तेव्हा ती व्यक्ती देवाचं रुप असते. देव म्हणजे काय ? विश्वासच ना ? माझा तरी विश्वास आहे की काही कामं काही वेळा काही लोकांकडून करवून घेतली जातात. ह्या गाण्याशी संबंधित सगळेच काही काळासाठी देवरूप झाले होते आणि त्यांनी ही निर्मिती केली खरी, पण कदाचित ही त्यांच्याकडून करवून घेतली गेली.
कारण कुठल्या तरी एका दिवशी त्या सगळ्यांपैकी कुणीच ह्या जगात नसेल, मीही नसेन. पण हे गाणं असेल. नक्कीच असेल.

- रणजित पराडकर

Sunday, December 27, 2015

सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)

-: २०१५ सालात प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांची एक प्रकाराची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न :-

~ ~ सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! ~ ~  

वक़्त रहता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमी सी हैं

गुलज़ार साहेबांच्या ह्या ओळी आपण साक्षात अनुभवतो प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. कारण वर्ष कितीही आनंदी गेलेलं असो वा दु:खी, खडतर वा सहज, जेव्हा डिसेंबरचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहतात, तेव्हा आपल्याला असंच वाटत राहतं की, 'कधी अख्खं वर्ष सरून गेलं, कळलंच नाही !' काय आलं, काय गेलं ह्याचा आपला हिशोब कधीच जुळत नसतो. मात्र चित्रपटांचं वेगळं असतं जरासं. इथले हिशोब नेहमीच जुळतात. इथे सरलेल्या वर्षातल्या प्रत्येक दिवसाने आपलं योगदान देऊन ठेवलेलं असतं आणि ते नोंदलंही जातं. सरलेल्या वर्षात आपण जे गमावलं असतं, ते कुणी न कुणी कमावलंही असतं आणि जे आपण कमावलं असतं, ते कुणी ना कुणी गमावलं असतं. मात्र पडद्याच्या पलीकडील आपल्या विरुद्ध दिशेला असेलेली व्यक्ती आपल्याला बहुतांशदा अज्ञातच असते.
बॉक्स ऑफिसवर मात्र जेव्हा एक सिनेमा काही कमावतो, तेव्हा ते ज्या दुसऱ्या कुणी गमावलेलं असतं, तोही समोर असतोच असतो. जसं, नुकतेच 'दिलवाले' आणि बाजीराव मस्तानी' एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांना वादाचं वलय लाभलं (की त्यांनीच ते मिळवलेलं?) होतं. शाहरुखचा चित्रपट म्हणजे दणकेबाज ओपनिंग मिळवणारच. अपेक्षेनुसार ह्या पहिल्या लढाईत 'दिलवाले' जिंकलाच. मात्र लौकरच प्रेक्षकांनी 'दिलवाले'ऐवजी 'बाजीराव'ला पसंती देण्यास सुरु केली आणि पहिल्या ३-४ दिवसांनंतर 'दिलवाले' मागे पडून 'बाजीराव'चं कलेक्शन वाढायला लागलं. ही दोन टुकारक्यांमधली भाग्यवान तुलना होती की अजून काही, हा भाग जाऊ देऊ. मात्र कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान हे स्पष्ट समजून येतच आहे. मग भले, रोहित शेट्टीने ते कितीही नाकारलं तरी !

वर्षाखेरीस तीन खानांपैकी किमान एकाचा चित्रपट येणे, ह्यात नवीन काहीच नाही आणि एका वर्षांत अक्षय कुमारचे ३-४ सिनेमे येऊन त्या सर्वांनी बऱ्यापैकी गल्ला जमवणे, ह्यातही नवीन काहीच नसावं. २०१५ मध्येही अक्षयचे ४ सिनेमे आले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. वर्षाची सुरुवातच अक्षयने दमदार 'बेबी'ने करून दिली. दिग्दर्शक नीरज पांडेंसोबत 'स्पेशल २६' नंतर अक्षय पुन्हा एकदा दिसला आणि पुन्हा एकदा एक वेगवान थरारपट बनला. पुढे आलेले 'सिंग इज ब्लिंग', 'ब्रदर्स' आणि 'गब्बर इज बॅक' सुद्धा बरे चालले, मात्र 'बेबी' च्या पातळीला ते पोहोचू शकणार नव्हतेच. त्यांचं यश तिकीटबारीपुरतंच मर्यादित राहिलं.

महानायक अमिताभ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला दिग्दर्शक आर. बाल्कीनी एकत्र आणलं आणि 'शमिताभ' बनवला. पण ह्या जैन पावभाजीला क्लासेस आणि मासेस दोघांनीही नापसंतीच दर्शवली. धनुषला अमिताभचा आवाज देणे, ही कल्पना सर्वांनाच अजीर्ण झाली आणि 'शमिताभ' एक फरगेटेबल अनुभव ठरला.
असाच फरगेटेबल अनुभव 'रॉय' आणि 'अब तक छप्पन - २' नीही दिला. लोक 'रणबीर कपूर'साठी 'रॉय' पाहायला गेले आणि त्यांना चित्रपटभर अर्जुन रामपालच मिळाला. चिकन बिर्याणीऐवजी फडफडीत मसाले भात वाढला आणि तो कितीही चविष्ट असला तरी विरस होणारच. 'रॉय' ने तेच केलं. तर, 'अब तक छप्पन - १' च्या प्रभावाला अजूनही न विसरलेले लोक जेव्हा त्याचा दुसरा भाग पाहायला गेले, तेव्हा त्यांना साचेबद्ध कहाणीच्या ठोकळेबाज सादरीकरणाला पाहावं लागलं. 'नाना होता म्हणून पूर्ण पाहिला तरी' अशी एका ओळीची प्रतिक्रिया लोकांनी दिली.

सर्व थरांतले प्रेक्षक पुन्हा एकदा प्रभावित झाले ते फेब्रुवारीत आलेल्या 'बदलापूर'ने. दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांचा 'एजंट विनोद' सपशेल फसला होता. मात्र त्यांचा पहिला चित्रपट 'एक हसीना थी' आणि नंतर आलेल्या 'जॉनी गद्दार' मधून त्यांनी जी पकड दाखवली होती, ती त्यांनी पुन्हा एकदा 'बदलापूर' मध्ये दाखवली. वरुण धवनसुद्धा अभिनय करू शकतो, हेही ह्या सिनेमाने दाखवून दिले. (अर्थात, वर्षाखेरीस 'दिलवाले' मधून वरुण धवनने लोकांचा हा गैरसमज दूर केलाच !) इथला नकारात्मक भूमिकेतला नवाझुद्दिन सिद्दिकी केवळ अप्रतिम होता.

नवाझुद्दिन ह्या वर्षी नंतर अजून दोन सिनेमांत झळकला. 'दशरथ मांझी'च्या जीवनकथेवर आधारलेल्या केतन मेहता दिग्दर्शित 'मांझी - द माउन्टेन मॅन' मधला त्याचा 'मांझी' अविस्मरणीयच ! ह्या गुणी अभिनेत्याच्या कुवतीचं चीज करणारी ही भूमिका होती. चित्रपट गाजला खरा, मात्र सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला त्यात नव्हताच. किंबहुना, व्यावसायिक यश डोळ्यांसमोर ठेवून तो बनवला नव्हताच. मात्र त्याच्या थोडा आधी आलेला 'बजरंगी भाईजान' मात्र भरपूर चालला. ह्या सलमानपटातला नवाझुद्दिनचा पाकिस्तानी रिपोर्टर लोकांना 'बदलापूर'मधल्या 'लायक'इतकाच आवडला. 'बजरंगी भाईजान' सुपर हिट होणार होताच आणि झालाच. मात्र तो ह्या वर्षातला पहिला सुपर हिट नव्हता.
वर्षातला पहिला 'सुपर हिट' मात्र मे महिन्यात मिळाला. कंगना राणावतच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' ने खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसला खडबडून जाग आणली. चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि रसिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र कंगनाच्या कामाची मात्र भरपूर प्रशंसा झाली. माधवनने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग नेहमीच जपला आहे. तोही अजिबात निराश झाला नाही. सप्टेंबरमध्ये झळकलेल्या 'कट्टी बट्टी' मधून मात्र कंगनाला ही जादू पुन्हा साधता आली नाही. तीच ती कंगना पाहून लोकांना जरा कंटाळाही आला असावा आणि इम्रान खानने त्या कंटाळ्यात भर घालायचं काम चोख निभावल्याने 'कट्टी बट्टी'शी लोकांनी कट्टीच घेतली.

'दम लगा के हैश्या', 'एनएच 10' आणि 'हंटर' ह्या तीन पूर्णपणे भिन्न सिनेमांनीही उत्तम कामगिरी केली. आपापला 'टारगेट ऑडीयन्स' तर त्यांनी सिनेमागृहाकडे ओढलाच, पण समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली. 'दम लगा के हैश्या' ह्या एका वेगळ्याच धाटणीच्या प्रेमकहाणीने 'नव्वदचं दशक' हाही एक 'विशिष्ट चित्रपटकाल' होता, हे जाणवून दिलं. क्वचितच मिळणारं सुश्राव्य संगीत ह्या सिनेमाने दिलं. 'एनएच 10' हा बेचैन करणारा सिनेमा होता. वास्तवदर्शन करवताना अतिरंजन टाळूनही आवश्यक परिणामकारकता साधणारा पुरेसा थेटपणा - ज्याला भडकपणाही म्हणता येऊ शकेल - असा एक अत्यंत कठीण समतोल त्याने साधला. अनुष्का शर्माचं ह्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाउल पडलं. एक निर्माती आणि अभिनेत्री अश्या दोन्ही आघाड्यांवर तिच्यासाठी हा चित्रपट यशस्वीच होता. 'हंटर' ही एक प्रकारची 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' होती. हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल इतपत सौम्यपणा त्यात चतुराईने जपला होता आणि कदाचित त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली !

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'बॉम्बे वेलवेट' आणि 'मै और चार्ल्स' हे तीन सिनेमे वेगळ्या हाताळणीचे होते. पैकी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ने समाधानकारक कमाई केली कारण ती व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली असल्याने लोकांना आकर्षित करणारीच होती. इथला सुशांतसिंग राजपूत लक्षवेधी ठरला. मात्र रणबीरचा 'बॉम्बे वेलवेट' आणि रणदीपचा 'मै और चार्ल्स' मात्र लोकांना काही झेपले नाहीतच. अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' त्यातल्या वाया गेलेल्या बहुतांशामुळे लोकांनी नाकारला. हा वाया गेलेला बहुतांश म्हणजे करण जोहर (अभिनेता म्हणून), चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या व्यक्तिरेखांच्या 'Rags to Riches' जाणाऱ्या जीवनप्रवासाचा प्रभाव, के के मेनन, संगीत वगैरे बाबी. ह्या सगळ्या बाबी चित्रपटाची बलस्थानं ठरायला हव्या होत्या. मात्र त्या निष्प्रभ ठरल्याने चित्रपटाचा एकत्रित परिणामही फारसा जमून आला नाही. 'मै और चार्ल्स' चा अपूर्णपणा त्याच्या गुंतागुंतीला अंधाऱ्या गूढतेकडून अनाकलनीयतेकडे घेऊन गेला. रणदीप हुडाने अप्रतिम साकारलेला 'चार्ल्स सोभराज' चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशामुळे दुर्लक्षिला गेला.

'पिकू' आणि 'दिल धडकने दो' ने हलक्या फुलक्या मनोरंजनाची मागणी व्यवस्थित पूर्ण केली. निखळ विनोद जो 'पिकू'ने दिला, तो सध्याच्या चित्रपटविश्वात अभावानेच मिळतो. आचरटपणा आणि चावटपणाला माथी मारून विनोद केल्याचा आविर्भाव आणणे, हे सध्याचं यशस्वी समीकरण आहे. दिग्दर्शक शुजीत सरकारनी 'पिकू'द्वारे असला कोणताही थिल्लरपणा न करता निर्भेळ विनोद सादर केला आणि लोकांनीही त्याला पूर्ण पसंती दिली. 'शमिताभ' मध्ये नाकारलेला अमिताभ लोकांनी इथे उचलून धरला. तर 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा 'Live your life, your way' चा संदेश अजून एकदा दिला. अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अश्या सर्वांचा दमदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्रास न देणारं संगीत ह्यांच्या जोरावर 'दिल धडकने दो' ने यश संपादन केले. स्वशोधाचा प्रवास दाखवणारा अजून एक चित्रपट 'मसान' सुद्धा होता. मात्र ह्या दोन्हींतला शोध वेगवेगळ्या प्रतलांवर होता. 'मसान' समांतर सिनेमाशी नातं सांगणारा होता. दिग्दर्शक नीरज घायवानचा हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कमालच केली. मसानला तिकीटबारीवर यश मर्यादितच लाभलं, मात्र रसिक व समीक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

वेलकम टू कराची, मिस तणकपूर हाजीर हो आणि बँगिस्तान हे तीन 'लो प्रोफाईल' विनोदी चित्रपट फ्लॉप ठरले. खरं तर हे तिन्ही 'फ्लॉप'च्या पातळीचे निश्चितच नव्हते. 'वेलकम टू कराची' आणि बँगिस्तान' हे साधारण एकाच पठडीचे. 'सिली कॉमेडी.' आणि दोघांनाही दहशतवादाच्या विषयाची जोड होती. तर 'मिस तणकपूर हाजीर हो' मधला उपरोध अनेकांना समजलाच नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली काही तरी अचाट आणि अतर्क्य कथानक आणि भरमसाट पांचटपणा करूनही नाना पाटेकर, अनिल कपूरचा 'वेलकम बॅक' मात्र बऱ्यापैकी गल्ला जमवून गेला.

इतर महत्वाच्या सिनेमांत 'तमाशा' आणि 'तलवार' चा उल्लेख आवश्यक आहे. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा'मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री जरी लोकांना आवडली तरी, दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केलेली 'जब वी मेट' आणि 'रॉक स्टार' ची पुनरावृत्ती लोकांना फारशी पसंतीस पडली नसावी. रहमानचं संगीतही काही जादू करू शकलं नाही आणि 'तमाशा'ची कमाई 'फ्लॉप झाला नाही' एव्हढ्यावरच मर्यादित राहिली.
नॉयडामध्ये २००८ साली झालेल्या आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' मध्ये इरफान खान, कोंकणा सेन, नीरज कबी असं गुणी व दमदार स्टार कास्ट होतं. ह्या सिनेमाने मात्र व्यावसायिक आणि कलात्मक असं दोन्ही यश मिळवलं. इरफान खानचा 'अश्विन कुमार' जबरदस्त जमून आला होता. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या 'जजबा' मध्येही इरफान खानची भूमिका तपास अधिकाऱ्याचीच होती. मात्र ऐश्वर्या रायचा पुनरागमनाचा सिनेमा असूनही 'जजबा' खूप काही करामत करू शकला नाही. 'आउटडेटेड थरार' दिल्याबद्दल संजय गुप्तांचा हा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला.

निशिकांत कामतनी दक्षिणेच्या 'दृश्यम'चा हिंदीत केलेला त्याच नावाचा रिमेकसुद्धा एक उल्लेखनीय चित्रपट होता. अजय देवगणचा विजय साळगावकर आणि त्याचा प्लान लोकांच्या इतका पसंतीस पडला की त्यावर आधारित जोक्स Whatsapp वर फिरायला लागले !

ह्या सर्वांच्या जोडीने 'मिस्टर एक्स', 'हमारी अधुरी कहानी', 'एबीसीडी-२', 'फॅण्टम', 'हीरो', 'कॅलेंडर गर्ल्स', 'शानदार', 'हेट स्टोरी-३' सारखे सपशेल फरगेटेबल सिनेमेही अधूनमधून आले आणि गेले. विशेष काही सांगावं असे काहीच नसलेलेही कित्येक येऊन गेले.
मात्र २०१५ साल लक्षात राहील ते 'बाहुबली - द बिगिनिंग' मुळे. आजपर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आणि आजपर्यंतच्या सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक 'बाहुबली' ही भारतीय चित्रपटाची एक मोठी उडी होती. 'बाहुबली'ने तांत्रिक सफाईचं एक उदाहरणच इतर सिनेमांसमोर ठेवलं. ह्या कहाणीचा उत्तरार्ध 'बाहुबली - द कन्क्ल्युजन' २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कुठल्याही सिनेमाची केली गेली नसेल, अशी प्रतीक्षा त्याची होत आहे, ह्यातच सर्व काही आलं !

ह्या सर्व चित्रभडिमारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे उत्तम सिनेसंगीताचा अभाव. मराठीत तरी 'कट्यार काळजात घुसली' ने ही तहान भागवली. मात्र हिंदीत सिनेसंगीताचा दर्जा इतका खालावला आहे की संपूर्ण वर्षभरातला एकही सिनेमा 'म्युझीकली' उत्तम म्हणवण्याच्या लायकीचा नाही. अगदी गाण्यांची भरमार असलेला 'प्रेम रतन धन पायो'सुद्धा अतिसुमारपट असूनही केवळ सलमानच्या स्टार पॉवरवरच चालला. 'राजश्री'च्या सिनेमांतलं संगीत एकेक पायरी उतरत 'प्रेम्रतन धन्पायो' (असाच उच्चार आहे गाण्यात!) पर्यंत गेलं आहे, ह्यात बडजात्यांना शरम वाटणार नाहीच, कारण त्यांनी त्यातूनही कोट्यवधी कमावले आहेत !

सध्या खोऱ्याने पैसा ओढत असलेल्या 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' ना शुभेच्छा आणि येणारं वर्ष उत्तम चित्रपट, सुश्राव्य संगीत आणि दर्जेदार मनोरंजनाने सजलेलं, गच्च भरलेलं असावं हीच सदिच्छा !

- रणजित पराडकर

हा लेख दै. मी मराठी लाईव्हमध्ये आज दि. २७ डिसेंबर २०१५  रोजी प्रकाशित झाला आहे -




Saturday, December 26, 2015

मी आदिशक्ती

भविष्यात कुठल्याही परिस्थितीत परत न करण्याच्या अटीवर एका कवी महोदयांना एक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला ! माझा त्यांच्याशी थोडासा परिचय असल्याने मला त्यांना पुरस्कार मिळणार असल्याचं आधीपासून माहीतच होतं. (हो. पुरस्कार मिळणार आहे, हे पुरस्कार जाहीर होण्याआधी माहित असतंच बहुतेकदा !) अभिनंदन करणं औपचारिक आणि आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेला कविता संग्रह मुख्यत्वेकरून स्त्रीवादी कवितांचा होता. कवी महोदय अल्पावधीतच एक आश्वासक स्त्रीवादी कवी म्हणून नावारूपास आलेले होते. औपचारिक अभिनंदन केल्यावर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मी विसावलो, गप्पा सुरु झाल्या आणि कवी महोदयांनी फर्मान सोडलं. 'चहा आण गं !' काही मिनिटांनी त्यांच्या पत्नी दोन कप चहा, बिस्किटं वगैरे घेऊन आल्या. तो चहा आम्ही प्यायलो. माझा कप मी ट्रेमध्ये ठेवला. कवी महोदयांनी त्यांचा कप त्यांच्या बाजूच्या छोट्या कॉर्नर टेबलवर ठेवला. त्यांच्या पत्नी आल्या आणि तो कप उचलून ट्रेमध्ये ठेवून घेऊन गेल्या. जाता जाता त्यांना 'अमुक अमुक पुस्तक आण' म्हणून सांगितलं गेलं, त्यांनी ते आणून दिलं आणि कवी महोदयांनी त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाची प्रत मला स्वाक्षरीसह दिली.
स्त्रीवादी कवी. त्यांच्या वास्तववादी कविता समाजात स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल ताशेरे ओढणाऱ्या, डोळ्यांत जळजळीत अंजन टाकणाऱ्या, कधी हळहळणाऱ्या, कधी निराश होणाऱ्या होत्या. ज्या वाचून महनीय समीक्षक वाहवा करत होते. आणि स्वत:च्या घरात मात्र, जिला 'लक्ष्मी' म्हटलं जात होतं, ती समोर चहाचा ट्रे आणत होती. आज्ञा स्वीकारत होती.

ह्या विरोधाभासाने मी मनाशीच खजील झालो.
घरी परत निघालो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माहितीतल्या शेकडो स्त्रिया भन्साळीच्या सिनेमात दाखवतात तसं काही एक संबंध नसतानाही एकत्र येऊन हसत, रडत, नाचत, बोलत होत्या. त्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून मला त्या डिवचत असल्याचा भास होत होता. त्यात अशिक्षित, सुशिक्षित, गृहिणी, नोकरदार, विवाहित, अविवाहित, यशस्वी, अयशस्वी, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, परिचित, अपरिचित अश्या सगळ्या होत्या. 'घराकडे लक्ष देणे, मुलांना सांभाळणे, वडिलधाऱ्यांची सेवा करणे, स्वयंपाक अश्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या पेलत होत्या. भारतीय स्त्री घराला जे हवं ते करत असते. राहुल द्रविड कसा संघाला हवं तर विकेटकीपिंग, नेतृत्व, सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, शॉर्ट लेगचा फिल्डर, स्लीपमधला फिल्डर अश्या सगळ्या भूमिका निभवायचा, तश्याच ह्या स्त्रिया. ह्या स्त्रिया व्यावसायिक आयुष्यात अत्युच्च शिखर गाठतात, तरी त्यांच्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, 'घराची जबाबदारी कशी निभावली ?'

मला आठवलं. कसं आजही किती तरी लोकांना 'मुलगी' नकोच असते. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' वगैरे गोंडस घोषणा आठवल्या. त्या किती पोकळ आहेत, हे जाणवलं. माझं लग्न ठरलं, तेव्हा एका ड्रायव्हरने बाबांना विचारलं होतं, 'किती हुंडा ठरला ?' बाबांनी 'हुंडा वगैरे काही नाही' म्हटल्यावर त्याला विश्वास बसेना ! त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. जर मुलासाठी हुंडा घेतला नाही, तर मुलीसाठी हुंडा कसा देणार ? अशी त्याची भाबडी समस्या होती. हुंडा देणे आणि घेणे, हा आजही लोकांना अधिकार वाटत असताना नुसत्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे ?

ह्या सगळ्या विचारात घरी आलो. समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं. त्यात बातमी दिसत होती. त्यात लिहिलं होतं की, 'UN'च्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की स्त्री-पुरुष असमानतेत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही पुढे आहे ! त्या बातमीत दिलेली आकडेवारी एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. अर्थात, अशी सर्वेक्षणं कितपत विश्वासार्ह असतात, ह्यावरही वाद होऊ शकतो. मात्र महासत्ता होण्याचं, औद्योगिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहणारा भारत आजही स्वत:ची तुलना पाकिस्तानशी करण्यातच धन्यता मानतो आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, ह्याचाच आनंद मानतोय हे विदारक आहे. पाकिस्तानचं जाऊ देऊ, पण जे पुढारलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? ह्या आकडेवारीचा तर उल्लेखही कुठेच नव्हता. म्हणजे ती तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती.

बरोबर आहे. कशी होईल तुलना ? आजही, एका स्त्रीने देवाचं दर्शन घेतलं म्हणून आपण देवाचं शुद्धीकरण करतोय. देवाचं ? तेही मनुष्याने शुद्धीकरण करणं, ही कल्पनाच मुळात नारळाच्या झाडाला सादाफुलीने सावली देण्याचा प्रयत्न करण्यासारखी निरर्थक आहे. पण असो. मला सांगा, त्या शुद्धीकरणासाठी आणलेलं दूध बैलाचं होतं का ? की प्राण्यांमधली स्त्री वंदनीय आणि माणसातली मात्र अस्पृश्य ? पुरोगामी महाराष्ट्राची जर ही अवस्था असेल, तर उर्वरित भारताची आणि त्यातही ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी !

मुळात 'समानता' म्हणजे काय, हेही समजून घ्यायला हवं. 'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही.

माझ्या एका मित्राचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. पण नंतर त्याच्या घरी गेलो. त्याची बायको त्याला 'अहो-जाहो' करताना पाहून मला फार गंमत वाटली ! मी त्याला म्हटलं, 'अहो' काय अरे ! किती विचित्र वाटतं !'
त्यावर त्याने शांतपणे हसून उत्तर दिलं, 'अरे कुणी मान देत असेल, तर देऊ द्यावा की ! काय फरक पडतो !'
आपण भारतीय इतके चाकरीलोलुप आहोत, की जर कुणी आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते आपल्याला पटतही नाही.

डोकं बधीर झालं. पेपर खाली ठेवला आणि कवी महोदयांचं पुस्तक उघडलं. पहिलीच कविता होती.. 'मी आदिशक्ती !'
कुत्सित हसलो आणि पुढची कविता मी वाचलीच नाही. मनातल्या मनात पुढच्या ओळींची मीच कल्पना केली -

'मी आदिशक्ती
माझ्या ह्यांच्या घरात धुणी-भांडी करते
चहा-पाणी बघते
स्वयंपाक करते
आणि माझ्यावरच्या कवितांमुळे
पुरस्कारही मिळवून देते'

- रणजित पराडकर

शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी 'दै. दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत प्रकाशित लेख -


Friday, December 18, 2015

भेलवाले (Movie Review - Dilwale)

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.



तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *

Sunday, December 06, 2015

बथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate Story - 3)

शाळेत प्रत्येक वर्गात काही वात्रट, द्वाड पोरं असतात. त्यांना सगळे शिक्षक 'वाया गेलेले' म्हणत असतात. इतर 'सभ्य' मुलांपैकी कुणी मेहनती मुलगा जर त्या द्वाड मुलांच्यात रमताना आढळला, तर त्याची एक प्रेमळ कानउघाडणी होत असे. 'तू हुशार आहेस, मेहनती आहेस. अभ्यासाकडे लक्ष दे. त्या पराडकरच्या नादाला लागू नकोस.' असे डोस दिले जात असत. शर्मन जोशीचीही अशी प्रेमळ कानउघाडणी कुणी तरी करायला हवी. 'तू चांगला अभिनेता आहेस. मेहनती आहेस. विचारपूर्वक सिनेमे कर. त्या विक्रम वगैरेच्या नादी लागू नकोस. ते लोक तुला कधी 'ओम् भट् स्वा:' करतील, ह्याचा काही नेम नाही !

खरंच. का केला असेल शर्मन जोशीने हा 'हेट स्टोरी - ३' कळत नाही ! कुठे ते फेरारी की सवारी, रंग दे बसंती, थ्री इडियट्स वगैरे आणि कुठे हे 'सॉफ्ट पॉर्न' ! बरं असंही नाही की त्याच्या भूमिकेत काही विशेष आव्हानात्मक असावं. मग तिथे हा आपला वेळ का वाया घालवतोय ? बाकीच्या लोकांचं ठीक आहे. Beggars are no choosers. (भिखारी को भीख, जितनी मिलें ठीक !) झरीन खान, करण सिंग ग्रोवर, डेजी शाह वगैरेंना असंही कुणी चांगला दिग्दर्शक एखादी चांगली भूमिका देऊन एखाद्या चांगल्या चित्रपटाचं मातेरं कधीच करणार नाही. त्यामुळे हे ठोकळे जर एखाद्या बंडल चित्रपटात तितक्याच बंडल भूमिका मनापासून बंडल अभिनय करून सादर करत असतील, तर करोत बापडे ! तो एक क्रिकेटर मध्यंतरी झळकला होता. 'जोगिंदर शर्मा.' ट्वेंटी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिसबाह उल हकने एक सपशेल मूर्खपणा केला आणि फालतू शॉट मारून आपली विकेट जोगिंदर शर्माला आणि विश्वचषक भारताला बहाल केला. जोगिंदरला क्षणभर वाटलं असावं की तो 'सुपर स्टार' झाला. पण आज त्याला पाणी नेऊन देण्याच्या कामापुरतासुद्धा संघात घेत नाहीत. हे झरीन, करण, डेजी इत्यादी लोक्स म्हणजे चित्रपटातले 'जोगिंदर शर्मा' आहेत. शर्मन जोशीसारख्याने ह्यांच्यात किती रमावं, हे त्याला समजून आलं असावंच. नसलंच तर मात्र 'अल्लाह मालिक !'

चित्रपटाची बकवास कहाणी थोडक्यात अशी -

आदित्य दीवान (शर्मन जोशी) हा एक तरुण व प्रचंड यशस्वी उद्योजक आहे. विविध क्षेत्रांत त्याच्या 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' ची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्याची सुविद्य व बलदंड पत्नी सिया (झरीन खान) त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या सोबतीने नेहमीच एका आदर्श सहचारिणीसारखी उभी राहत आली आहे. (हे तिचं उभं राहणं सहचारिणीपेक्षा अंगरक्षकासारखं वाटतं मात्र.) आदित्यसोबत काम करणारी काया (डेजी शाह) ही एक मेहनती व हुशार व्यवस्थापक आहे. 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' च्या यशात तिचाही हातभार खूप मोलाचा आहे. अचानक एक दिवस एक अनोळखी व्यक्ती आदित्यकडे मैत्रीचा हात पुढे करते. ही व्यक्ती म्हणजे सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोवर). सौरव 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' मध्ये आदित्य म्हणेल तितके पैसे विना व्याज, विना तारण गुंतवायला तयार असतो. मात्र त्याची एक अशी विचित्र मागणी असते, जी एक आदर्श पती कधीच पूर्ण करू शकणार नसतो. सौरवच्या येण्याने 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज', आदित्य, सिया आणि कायाचा पुढील प्रवास कोणकोणती वळणं घेतो आणि कुठे जाऊन संपतो ही झाली 'हेट स्टोरी ३'.

गळक्या छत्रीतून पाणी हळूहळू ओघळत आत येतं. पण ह्या कथानकाच्या छत्रीला तर भोकंच भोकं आहेत. ही भोकं लगेचच अजून वाढत जातात, कथानक नावाचं कापड फाटून उडून जातं. आणि मग दिग्दर्शकाच्या हातात फक्त मूठ आणि छत्रीचा दांडा राहतो. चिंब होऊन कुडकुडणाऱ्या मनोरंजनात जरा 'ऊब' आणण्यासाठी मग तो भरपूर गरमागरम दृश्यं पेरतो.
पण 'हेट स्टोरी' ला 'हॉट स्टोरी' करायचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरतो.
कारण मुख्य स्त्री भूमिकेतली झरीन खान म्हणजे सतत एक मैद्याचं पोतं वाटत राहते. तिला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात वापरलेला सगळा मेक अप तिला सुंदर न बनवता भयावह बनवतो. तर डेजी शाहला पाहूनही आनंद होण्यासारखं काही वाटत नाही ! चारही मुख्य पात्र पुरुषीच वाटतात. त्यांतल्या दोघांनी पुरुषाची आणि दोघांनी स्त्रीची वेशभूषा केली आहे, असंच वाटतं.

ह्या बंडल चित्रपटाचं श्रेय सुमार पटकथेसाठी विक्रम भट्टना द्यावं की झोपाळू दिग्दर्शनासाठी विशाल पंड्याना हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे आपण हे श्रेय दोघांना विभागून देऊ !
'संगीत म्हणजे ढणढणाट' हे सूत्र पाळणारे अनेक फुटकळ संगीतकार अचानकच भूछत्रांसारखे गेल्या काही वर्षांत उगवले आहेत. कधी कधी वाटतं की ह्यांच्या कामाला अनुल्लेखानेच मारावं. आपलं काम पाहून 'हे कुणी केलं आहे' अशी उत्सुकताही कुणाला वाटू नये, ही एखाद्या कलाकारासाठी एक अतिशय शरमेची बाब आहे. आताशा बहुतांश हिंदी चित्रपटांचे संगीत ऐकताना खरोखर 'संगीतकार कोण?' ही उत्सुकताच वाटत नाही. (आणि जर वाटलीच तर 'शिव्या नेमक्या कुणाला घालायच्या' ह्यासाठीच वाटत असावी !)

'हेट स्टोरी - ३' मधून टवाळांच्या हाती काही लागणार नाही आहे आणि रसिक तर अश्या चित्रपटांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीतच. ह्या चित्रपटाला जर श्रेय द्यायचंच झालं तर एकच देता येईल. ते म्हणजे, 'शर्मन जोशीने काय करू नये', हे ह्या चित्रपटाने प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे.

रेटिंग - *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज ०६ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झालं आहे - 


Tuesday, December 01, 2015

कट्यार काळजात घुसली - Another Take

चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.

मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.

हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.

हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)

आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.

संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !

आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.

चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.

तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...