Thursday, November 05, 2015

प्रेम - तुमचं, आमचं आणि त्यांचं



सदर लेख 'श्री. व सौ.' च्या दिवाळी अंक २०१५ साठी लिहिला आहे.
हा लेख लिहिण्यासाठी माझा मित्र अमोल उदगीरकरशी झालेली चर्चा लाख मोलाची होती. 
संपादक श्री. संदीप खाडिलकर ह्यांचे आभार ! त्यांनी तर लिहूनच घेतलं आहे माझ्याकडून !

काही दिवसांपूर्वी 'कट्टी-बट्टी' पाहिला. त्यातली ती बेदरकार कंगना राणावत आणि तिला तशीच स्वीकारणारा इम्रान खान पाहून बाहेर पडलो. चित्रपट तसा टुकारच होता. बहुतेक जण विचार करत होते की, 'चित्रपट जास्त बंडल होता की इम्रान खान?', पण माझ्या मनात मात्र  वेगळाच झगडा चालू होता. ह्या दोन व्यक्तिरेखांना
मान्य करतानाच माझी ओढाताण होत होती. म्हणजे एखाद्या मुलाने 'प्रपोज' केल्यावर स्वत:च 'अभी सिरियस का मूड नहीं हैं. टाईमपास चलेगा, तो बोल !' असं उत्तर देणारी कंगना आणि अश्या पूर्णपणे बेभरवश्याच्या मुलीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून त्या नात्याबाबत गंभीरही असणारा इम्रान काही केल्या माझ्या जराश्या प्रतिगामी बुद्धीला पचतच नव्हते. विक्रमादित्याच्या पाठुंगळीवरचा वेताळ बडबड करून, प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडत असे. माझं आणि माझ्या मनाचंही असंच काहीसं सुरु झालं होतं. काही वेळाने मनातल्या मनात एका चित्रपटापुरताच चाललेला हा संवाद द्वितीयपुरुषी झाला. माझं मन माझ्याच समोर आलं आणि म्हणालं -

"मित्रा,

तू आणि मी बऱ्याच पूर्वी 'मागल्या पिढीचे' झालो आहोत, हे मला तरी आत्ता आत्ता समजायला लागलंय. आता 'मागल्या पिढीचे' म्हणून लगेच स्वत:ला म्हातारा समजू नकोस ! तरुणाईतसुद्धा 'नवतरुण' आणि 'फक्त तरुण' असे दोन प्रकार असावेत. तू आणि मी 'फक्त तरुण' आहोत. नवतरुणाईशी बऱ्याच बाबतींत आपली आवड-निवड जुळत नाही किंवा जुळवून घेताना त्रासच होतो. राजकारण, क्रीडा, विज्ञान, धर्म, कला आणि एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा 'आजचा' दृष्टीकोन आणि 'आपला' दृष्टीकोन एकच आहे का रे ? पहा जरासा विचार करून.
मला तर असंही वाटतं की पिढ्यांतसुद्धा उप-पिढ्या पडायला लागल्या आहेत, आपल्या बहुपदरी जातिव्यवस्थेप्रमाणे ! तुझी आणि माझी अशीच एक उपपिढी. आजचीच, तरी वेगळी.  म्हणजे आपण स्वत:ला आजच्या पिढीचे समजावं, तर तिथे नाळ जुळत नाही आणि मागच्या पिढीचे समजावं, तर तेव्हढं वय झालेलं नाही ! काळ बदलतोय, मित्रा, Time is changing. आणि महत्वाचं म्हणजे, ही जी बदलाची गती आहे, तीसुद्धा सतत बदलते आहे, वाढते आहे. आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !

ह्या ओळींवरून आठवलं. हे गाणं तू कॅन्टीनच्या टेबलावर ठेका धरून गायचास कॉलेजात असताना. आज कुणी गात असेल का रे ? कुमार सानू, उदित नारायण वगैरेंच्या काळातही तू तरी किशोर, रफीमध्येच रमला होतास. 'ओ हंसिनी, मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली..' हे गाणं तू २ वर्षं कॅन्टीनमध्ये 'तिच्या'साठी गात होतास. शेवटपर्यंत मनातली गोष्ट सांगू शकला नाहीसच आणि 'ती' हंसिनी खरंच 'कहाँ उड़ चली' गयी ते तुझं तुलाच कळलं नाही. अशी प्रेमं तरी होत असतील का रे आजकाल ? कुणास ठाऊक !
माझा एक ठाम विश्वास आहे. चित्रपट आणि आजचा समाज ह्यांचं एक घनिष्ट नातं असतं. आता चित्रपटामुळे समाजात बदल होतात, समाजानुसार चित्रपट बदलतो की दोन्ही थोड्याफार प्रमाणात होतच असतं, हा विषय वेगळ्या मंथनाचा आहे. पण ते परस्परपूरक तर नक्कीच आहेत. मी काही फार पूर्वीचं बोलत नाही. २०-२२ वर्षांपूर्वीचे, १०-१२ वर्षांपूर्वीचे आणि आजचे चित्रपट पाहा. प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला, बदलला आणि बदलतोही आहे.

'क़यामत से क़यामत तक़', 'मैने प्यार किया' वगैरेचा जमाना आठव. अरे प्रत्येक चित्रपटात 'प्रेम, प्रेम आणि प्रेम'च असायचं ! म्हणजे नाही म्हटलं तरी ९९% चित्रपट हे 'प्रेम' ह्या विषयावरच आधारित असत आणि उर्वरित १% चित्रपटांत 'प्रेम' हे उप-कथानक असे. आमटीत कढीपत्ता टाकतात. तो खालला जात नाही. पण त्याचा स्वाद असतोच. तसंच, प्रत्येक चित्रपटाच्या कहाणीतली कढीपत्त्याची पानं म्हणजे 'प्रेम' असे. पुढे हे प्रमाण जरा बदललं. १% चं ६-७% वगैरे झालं असावं आणि आज तर अस्सल प्रेमकहाणी १% चित्रपटांत असेल. ९९% चित्रपटांत 'प्रेम' हे उपकथानक झालंय ! बरं, फक्त 'वेटेज' बदललंय असंही नाही. सादरीकरणही बदललंय.

प्रेमकहाणीतला खलनायक ही संज्ञा कालबाह्य होत चालली आहे बहुतेक. पूर्वी प्रेमातले अडथळे असायचे धर्म,
गरिबी-श्रीमंती, खानदानी दुष्मनी वगैरे. त्यामुळे ओघानेच खलव्यक्ती यायच्याच. आताच्या प्रेमातले अडथळे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे अडथळे नायक-नायिकेच्या मनातच असतात. त्यांना 'खल' ठरवता येत नाही. आजचे प्रेमी करियरकडेही लक्ष देतात. आर्थिक बदलांनंतर उघडलेल्या अनेक दरवाज्यांमुळे विविध स्वप्नं आजकाल खुणावतात. आयुष्य बदललं, तसं 'प्रेम'ही आणि त्यावर आधारित चित्रपटही.
'कभी हां कभी ना' मधला कुचकामी शाहरुख खान, त्याचं प्रेम असलेल्या 'सुचित्रा कृष्णमुर्ती'चं लग्न 'दीपक तिजोरी'शी होत असतानाही आनंदाने त्यात सहभागी असतो. त्याच्या पराभवात आपल्याला त्याचा विजय वाटला होता. पण त्या काळातल्या चित्रपटांच्या प्रकृतीचा विचार करता, तो शेवट 'अहेड ऑफ द टाईम' म्हणता येऊ शकेल. असा शेवट आजचे चित्रपट करतात, कारण असा विचारही आजची पिढी करते.
घरचं सारं काही सोडून देऊन स्वत:च्या प्रेमाखातर कुठल्याश्या दूरच्या गावी येऊन एखाद्या खाणीत अंगमेहनतीचं काम करणारा 'मैने प्यार किया' मधला सलमान आता दिसणार नाही. आता दिसेल, 'मला माझं स्वप्न साकार करायचं आहे', असं ठामपणे सांगून स्वत:चं प्रेमही मागे सोडून जाणारा 'यह जवानी है दीवानी' मधला रणबीर कपूर आणि त्याच्या त्या निर्णयाला 'त्याचा निर्णय' म्हणून स्वीकारणारी व स्वत:च्या आयुष्याकडे समंजसपणे पाहून पुढे जाणारी दीपिका पदुकोण. 'खानदान की दुष्मनी' मुळे घरून पळून जाणारे 'क़यामत से क़यामत तक' वाले आमीर खान आणि जुही चावला आता दिसणार नाहीत. आता मुलाने लग्नाला आयत्या वेळी नकार दिल्याने हट्टाने एकटीच हनिमूनला जाणारी 'क्वीन' कंगना राणावत दिसते आणि तिच्यात इतकी धमकही असते की नंतर परत आलेल्या त्या मुलाला ती झिडकारूनही लावेल !
फार पूर्वी, म्हणजे कृष्ण-धवल काळात, नायकाने नायिकेचा हात हातात घेणं म्हणजे 'अंगावर शहारा' असायचा. नंतर गळ्यात गळे पडू लागले आणि आता लग्नपूर्व संबंध किंवा किमान चुंबनदृश्यंही अगदी किरकोळीत चालतात ! 'कॉकटेल' सारख्या चित्रपटात बिनधास्त आयुष्य जगणारे सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण
दिसतात. दीपिकाची 'व्हेरॉनीका' तर 'ओपन सेक्स' चा खुलेआम पुरस्कार करते. तिथेच तिच्यासमोर असते 'डायना पेंटी'ने सादर केलेली एक व्यक्तिरेखा जी तिच्या पळून आलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी सैफ-दीपिकाच्या दुनियेत आलेली असते. संपूर्ण चित्रपटभर डायना पेंटीची 'मीरा' आपल्याला पटत नाही आणि उच्छ्रुंखल 'व्हेरॉनीका' मात्र चालून जाते. त्यांच्या कात्रीत अडकलेल्या सैफच्या 'गौतम'शी आपण नातं सांगतो. मात्र खऱ्या आयुष्यात हे संबंध आपण स्वीकारू शकणार नाहीच. कारण तू आणि मी वेगळ्या उप-पिढीचे आहोत ना रे !

गरीब-श्रीमंत ही तफावत दाखवण्यात तर आजकाल कुणी वेळ घालवतच नाही ! 'जब वी मेट' आणि 'वेक अप सिड' मधल्या नायक-नायिकांमधली आर्थिक परिस्थितीची तफावत सुस्पष्ट असली, तरी चित्रपट त्यावर भाष्य करत बसत नाही. कारण व्यक्तिरेखांना इतर अधिक महत्वाच्या समस्या आहेत. त्यांचा स्वत:शीच झगडा सुरु
आहे. आजच्या चित्रपटातील तरुण नायक-नायिका आपल्याच मनातला गोंधळ स्वीकारतायत आणि आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतायत. भटिंड्याहून मुंबईला शिकण्यासाठी आलेली खमकी करीना कपूर, अपयशी प्रेम व निराशाजनक आयुष्याला कंटाळून जीव देण्याच्या विचारापर्यंत पोहोचलेल्या अतिश्रीमंत शाहीद कपूरला फक्त एक मित्र म्हणून स्वीकारते, तेव्हा त्या नात्याबाबत तिच्या मनात कुठलेच संभ्रम नसतात. त्यामुळेच पुढे जेव्हा ती स्वत: प्रेमातल्या धक्कादायक अपयशाला सामोरी जाते, तेव्हा ती एकटीच उभी राहण्याची धडपड करत राहते. 'वेक अप सिड' मधला अमीरजादा बेजबाबदार रणबीर कपूर परिपक्व विचारांच्या, वयाने थोडी मोठी असलेल्या आणि दिसायलाही साधीच असणाऱ्या कोंकणा सेन शर्मावर प्रेम करायला लागतो. तो आयुष्यात इतका भरकटलेला व गोंधळलेला असतो की त्याचं प्रेमही त्याला स्वत:ला समजत नाही. ह्या व अश्या चित्रपटांत नायक व नायिकेत गरिबी व श्रीमंतीची एक मोठी दरी असतानाही, प्रेमकहाणीचा सगळा 'फोकस' व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक समस्यांवरच ठेवलेला आहे.

'ठरलेलं लग्न करावं की नाही ?' ह्या द्विधेत असलेल्या अभय देओलला, लग्नाच्या पत्रिकाही वाटून झालेल्या असतानाही, त्याचा मित्र हृतिक रोशन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये म्हणतो, 'Dude, its YOUR life !' तिथेच फरहान अख्तरचा एका स्पॅनिश मुलीसोबतचा 'वन नाईट स्टॅण्ड' दाखवताना त्या नात्याला 'व्यभिचार' म्हणून दाखवलं जात नाही.
इतर कुणाहीपेक्षा माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे, हा विचार आताशा मनांत रुजायला लागला आहे. स्वबळावर नितांत विश्वास असणाऱ्या ह्या मनाला आता देव, धर्म, आई-वडिलांचा आधार वगैरे अनन्यसाधारण वाटत नाहीत. ह्याच मनाला 'प्रेम' ही गोष्टही दुय्यम किंवा तिय्यम झाली आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधला प्रियकर, आपल्या त्या प्रेमाखातर ज्याच्या परस्परमान्यतेची खातरजमाही
निश्चित झालेली नसते, लंडनहून थेट भारतात येतो, पंजाबमधील आपल्या प्रेयसीच्या गावीही पोहोचतो आणि अखेरीस तो दिलवाला शाहरुख आपल्या दुल्हनिया काजोलला प्राप्तही करतो. आजचा 'कभी अलविदा ना कहना' मधला शाहरुख प्राप्त केलेल्या प्रेमाशी लग्नोत्तर मतभेद झाल्यावर नव्याने प्रेमात पडतो आणि त्या प्रेमामुळे संसार संपवतो.
'कभी अलविदा ना कहना' वरून आठवलं. नातीही ठिसूळ झाली आहेत रे मित्रा आजकाल. माझ्या परिचयातल्या कित्येक जणांनी परस्पर सामंजस्याने कायदेशीर घटस्फोट घेतले आहेत आणि कित्येक जण त्याचा विचारही करत आहेत. तडजोड करणे, हेसुद्धा आताशा कालबाह्य होत चाललं आहे. कारण ? 'माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे'. म्हणूनच व्यावसायिक चित्रपटकर्तेही 'कभी अलविदा ना कहना', 'चलते चलते', 'साथिया' सारखे चित्रपट बनवतात. ते तिकीट खिडकीवरसुद्धा चांगले आकडे दाखवतात.
एकूणच चित्रपटकर्त्यांची 'प्रेम' ह्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. नव्हे चित्रपटाकडेच पाहण्याची दृष्टी व्यापक झाली आहे. 'प्रेम' हा विषय टाळून, गाळून कहाणी सादर होते. चित्रपटातील पात्रं प्रेमाच्या पुढचा विचार करणारी दाखवली जात आहेत. 'मैं हूँ ना', 'रंग दे बसंती', 'अब तक छप्पन्न', 'चक दे इंडिया', 'थ्री इडियट्स', 'तारे जमीं पर', 'पा', 'बजरंगी भाईजान' सारखे अनेक चित्रपट जे लोकांनी खूप डोक्यावर घेतले, ते काही प्रेमकहाणी सांगणारे नव्हतेच. करायचंच असतं तर ह्या व अश्या इतर सगळ्या चित्रपटांत प्रेमकहाणीला घुसडता आलंच असतं. पण ते केलं गेलं नाही. चरित्रपटांची जी एक लाट सध्या आली आहे तीसुद्धा म्हणूनच. चित्रपटात प्रेमकहाणी नसली, तरीही तो व्यावसायिक यश मिळवू शकतो, हा विश्वास आल्यामुळेच उत्तमोत्तम तसेच नवोदित दिग्दर्शकही चरित्रपट बनवत आहेत आणि ते यशस्वीही ठरत आहेत. नाही म्हणता, मध्येच एखादा 'रांझणा' येतो, जो एक अस्सल प्रेमकहाणीच असतो. पण तो अपवादच. किंवा एखादा 'लंच बॉक्स' येतो. पण तोही वेगळेपणामुळेच लक्षात राहतो.
हे सगळं कशाचं द्योतक आहे ?
ह्याचंच की, 'प्रेम' ही गोष्ट आताशा Just another thing झालेली आहे. आजच्या पिढीसाठीही. किंवा असं म्हणू की आजच्या त्या उप-पिढीसाठी, जिचा तू आणि मी कदाचित भाग नाही आहोत ! दिसतील. आजही कुणाच्या प्रेमासाठी वेड्यासारखे वागणारे प्रेमवीर दिसतील. ही जमात नामशेष होणार नाहीच. पण तिची संख्या कमी झाली आहे.

मला असं वाटतं, साधारणत: 'दिल चाहता है' ह्या २००१ सालच्या चित्रपटानंतर चित्रपटांत बराच बदल घडला आहे. ती कहाणी तीन मित्रांची होती. आमीर खान एक फ्लर्ट, जो दर वीकेंडला गर्लफ्रेंड बदलत असावा. सैफ अली खान एक गोंधळलेला नवतरुण, जो दर काही महिन्यांनी कुणा न कुणाच्या प्रेमात मनापासून पडत असावा. आणि अक्षय खन्ना, कलाकार असलेला, हळव्या मनाचा, सभोवतालच्या प्रत्येक चीजवस्तूकडे, व्यक्तीकडे संवेदनशीलपणे पाहणारा. अक्षय खन्नाचं त्याच्या जवळजवळ दुप्पट वयाच्या डिम्पल कपाडियाच्या प्रेमात पडणं, जे ह्या चित्रपटात दाखवलं आहे, तो हिंदी चित्रपटासाठी एक 'कल्चरल शॉक'च होता. पण ज्या विश्वासाने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक फरहान अख्तरने ही कहाणी सादर केली, त्यामुळे ती लोकांपर्यंत तर पोहोचलीच; पण इतर चित्रपटकर्त्यांनाही एक दृष्टी मिळाली की असा वेगळा विचार करूनही व्यावसायिक चित्रपट बनू शकतो. त्यानंतर पुढे 'प्रेम' ह्या संकल्पनेला सर्वांनीच एक तर उंच आकाशात बिनधास्त विहार करणाऱ्या पतंगाप्रमाणे मोकळं सोडलं किंवा चित्रपटाच्या दुचाकीच्या 'बॅक सीट'वर बसवलं. रायडींग सीटवर इतर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, वैयक्तिक समस्या आल्या, त्यांच्या कहाण्या आल्या. 'रायडर'चं लक्ष रस्त्यावर राहिलं आणि 'बॅक सीट'वर बसलेलं प्रेम एक तर पूर्णपणे शांत राहिलं किंवा परत खुल्या हवेचा आनंद बिनधास्तपणे घेऊ लागलं. पूर्वी शहरातल्या मुलीही स्वत:च्या अफेअर्सची खुलेआम चर्चा करत नसत. सामान्य मुलींचं सोड रे. सिनेतारकाच पहा की ! ऐश्वर्या आणि सलमानचं नातं जगजाहीर असतानाही कधी ऐश्वर्याने त्याची बिनधास्त कबुली दिली ? ते नातं दोघांकडून होतं की नाही, हे माहित नाही. पण नक्कीच काही तरी शिजतच होतं, ह्याची खात्री झाली जेव्हा सलमानने दारुच्या नशेत धिंगाणा केला. इंटरनेटवर जरासा शोध घेतला तर जुन्या जुन्या तारे-तारकांच्या प्रेमसंबंधांच्या अनेक कहाण्या वाचायला मिळतील. पण हे सगळं नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्यात येत असे. मात्र आजची दीपिका पदुकोण 'My choice' चा नारा लावून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगते. ती रणबीरशी अफेअर असताना शरीरावर त्याचं नाव गोंदवून घेते. ते नातं संपवल्यानंतर रणवीर सिंगसोबत जोडलेल्या नव्या नात्यालाही लपवून ठेवत नाही. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर तर एकत्र राहतात. अनुष्का शर्माही विराट कोहलीसोबतचे आपले संबंध सर्वांसमोर येऊ देते.
'हे काय वय आहे का लग्नाचा निर्णय घेण्याचं ?' असं आजची मुलं स्वत:च म्हणतात. पूर्वी हा डायलॉग आई-बाप मारायचे. ही मुलं प्रेम करतात पण पुढचा निर्णय मात्र विचारपूर्वक घेतात. हाच बदल चित्रपटांत परिवर्तीत होतो आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुणामध्ये कुणामुळे बदल झाला हे विचारमंथन स्वतंत्र करू. पण दोघांतही बदल झाला आहे, हे नक्कीच !

लगेच इतका चिंताक्रांत होऊ नकोस, मित्रा. पण बदलत्या काळासोबत बदलायला हवं. कारण कालबदल हा उतारावरून गडगडत येणारा एक मोठा धोंडा आहे. तू आणि मी फक्त त्याच्या रस्त्यातून बाजूला होऊ शकतो.
'प्रेम' ही काही नामशेष होणारी बाब नाही. ते शाश्वत आहे. इतर बाबी येतील आणि जातील, पण जोपर्यंत माणसाच्या भावना शाबूत आहेत, जोपर्यंत त्याचा 'रोबो' होत नाही तोपर्यंत तो प्रेम करतच राहील. त्याचं महत्व कमी होईल इतकंच. स्त्री आणि पुरुष दोघांना एकमेकांची मानसिक व शारीरिक गरज असणे, हा निसर्गनियम आहे. तो पिढ्यांच्या उप-पिढ्या पडल्याने बदलणार नाही. तो नियम पाळायचा की नाही, हा व्यक्तिगत निर्णय असला, तरी समुदायाचा कल हा नियम पाळण्याकडेच असणार आहे. त्याच्या तऱ्हा, वेळा बदलतील. प्रेम प्रत्यक्ष आयुष्यातही केलं जाईल आणि चित्रपटांतही दाखवलं जाईल. फक्त ते तू केलंस, त्यापेक्षा जरा वेगळं असेल. आजची 'नवतरुणाई' करतेय, त्यापेक्षा उद्याची वेगळ्या प्रकारे करेल. कारण आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !"

घरी पोहोचलो. मन-मित्राचा घसा अखंड बडबडीने कोरडा पडला असावा. आता ताबा डोक्याने घेतला. 'हम दिल दे चुके सनम' पासून ते अगदी काल-परवा आलेल्या 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' पर्यंतचे चित्रपट आठवले, त्यातली पात्रं आठवली. खोलवर समुद्रात उठलेल्या उंच लाटेने किनाऱ्यावर येईपर्यंत रेतीत मिसळून जावं, तसं काहीसं वाटलं. डोळ्यांसमोरून झरझर करत अनेक चित्रपट सरकले. 'सोचा ना था', 'लाईफ इन अ मेट्रो', 'रॉक स्टार', 'दम लगा के हैश्या' अश्या काही वेगळ्या धाटणीच्या प्रेमकहाण्या आठवल्या. ह्या सगळ्या पात्रांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. पण होत्या प्रेमकहाण्याच. हाताळणी वेगळी होती. पण होतं सगळं 'सच्चं'च.
माझ्या जन्माच्याही आधी एक चित्रपट आला होता. 'एक दुजे के लिये'. त्यातले कमल हसन आणि रती अग्निहोत्री अखेरीस आत्महत्या करतात. मला इतकंच माहित आहे की त्या नंतर लोकांमध्ये अश्याप्रकारे एकत्र आत्महत्या करण्याचंही वेड पसरलं होतं. ते त्या वेळीही वेडच मानलं गेलं असेल आणि आजही तसंच मानलं जाईल. पण आज कुणी असला फिल्मी बाष्कळपणा करेल असं वाटत नाही. एरव्ही आयपीएल क्रिकेटपासून यो यो हनी सिंगपर्यंत सामान्य व अतिसामान्य दर्ज्याच्या कलागुणांत रमणारी आजची पिढी ही मागल्या कैक पिढ्यांपेक्षा स्वत:च्या आयुष्याबाबत, भविष्याबाबत खूप जागरूक आहे. ती 'तेरे नाम' मधल्या सलमानमुळे प्रभावित होईल, त्याची नक्कल म्हणून 'पोमेरीयन'सारखी हेअर स्टाईल करतील, पण अपयशी प्रेमाच्या दु:खात जीव देणार नाहीत.

तसं पाहिलं, तर आजही जेव्हा एखादा स्टारपुत्र किंवा एखादी स्टारकन्या पदार्पण करते किंवा त्याचं वा तिचं पदार्पण करवलं जातं तेव्हा 'लव्ह स्टोरी' च निवडली जाते. कारण आजही 'लव्ह स्टोरी' हा बॉक्स ऑफिसवर 'सेफ गेम'च आहे. पण ती करताना वाहवत गेलेला दिग्दर्शक 'लाफिंग स्टॉक' होण्याचीच शक्यता जास्त. कुतूहलापोटी त्या नव्या चेहऱ्यांना लोक पहिल्यांदा पाहतीलही, पण जर त्यांनी अजून एखादा चित्रपटही हाच बाष्कळपणा केला, तर हृतिकच्या 'कहो ना प्यार है' नंतर त्याच 'हृतिक-अमिषा'च्या 'आप मुझे अच्छे लगने लगे' चं जे झालं, तेच होईल. कारण जमाना 'गर्ल नेक्स्ट डोअर'चा असला तरी, 'चॉकलेट बॉय' इमेजचा राहिलेला नाही.
'रोमिओ-ज्युलियेट' सारखं प्रेम दाखवणारा संजय लीला भन्साळीचा 'राम-लीला' मी जेव्हा पाहिला होता, तेव्हा हादरलोच होतो. हा कसला थिल्लरपणा आहे, हे माझं तेव्हाचं मत आजही कायम आहे. ते प्रेम मला प्रेम न वाटता वासनाच वाटली होती. पहिल्याच भेटीत, ओळख-पाळख तर सोडाच, नावही माहित नसताना शारीरिक जवळीक, नंतरचे सगळे संवादही अश्लीलतेकडे झुकणारे, हे सगळं मला भन्साळीकडून, ज्याने 'हम दिल दे चुके सनम' सारखी 'शालीन' प्रेमकहाणी दाखवली होती, अपेक्षित नव्हतं. पण कदाचित भन्साळीची दृष्टी बरोबरच असेल. कारण आजचा लोकप्रिय प्रियकर आहे 'इम्रान हाशमी'. त्याचं प्रेम जितकं 'उत्कट' आहे, तितकंच सापेक्षही. त्यात शारीर संबंधांना आडकाठी नाही. 'प्रेमात वासनेलाही जागा असते' असा विचार करणारा, प्रत्येकाने मनात स्वत:च्याच नकळत जपलेला प्रियकर आजकाल पडद्यावर येऊ लागला आहे कारण तो मनातून बाहेर प्रत्यक्ष आयुष्यातही येऊ लागला आहे. 'प्रेमानंतरची पुढची अपरिहार्य पायरी 'लग्न' असते', ही समजूत आता उरलेलीच नाही. 'रील' आणि 'रियल' दोन्ही 'लाईव्स'मध्ये !

आता मला चित्रपट आणि समाजात एक वेगळंच नातं जाणवायला लागलं. 'गुन्हेगार' आणि 'कायदा' हे ते नातं. गुन्हा करायच्या पद्धती जसजश्या प्रगत होत गेल्या, तसतसा कायदाही शहाणा होत गेला आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खास कायदे जन्माला येतात किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल केले जातात. कधी हे बदल, गुन्ह्याच्या एक पाउल पुढचे असतात तर कधी त्याच्या मागोमाग, त्याच्या जोडीने असतात. 'चित्रपट' हा तो 'कायदा' आहे, जो 'समाज' कुठे चालला आहे, हे पाहून आपलं पाउल टाकतो. कधी समाजाच्या एका पाउलासोबत चित्रपट दोन पाउलं टाकतो, कधी त्याच्या जोडीने एकच. कायद्यातील पळवाटा शोधून नवनवे गुन्हे करण्याच्या क्लृप्त्या काढल्या जातात, तद्वतच चित्रपटातून 'योग्य' तो बोध घेऊन समाज आपली दिशाही ठरवत असतो.
'समाज' आणि 'चित्रपट' = 'गुन्हेगार' आणि 'कायदा'
ह्या जोड्या परस्परांकडून खूप काही शिकतात. चित्रपटाने समाजाला आणि समाजाने चित्रपटाला 'प्रेम' शिकवलं आहे. एकमेकांनी, एकमेकांची घेतलेली ही शिकवणी नेहमीच चालू राहणार आहे.
मित्र बरोबर बोलत होता. 'बदल' झाला आहे, 'अस्त' किंवा 'अंत' नाही. कारण आजचा तरुण जेव्हा जावेद अख्तर साहेबांच्या शब्दात बोलतो तेव्हा तो बोलतो -

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम


आजही इथे 'दिलो में' आहे, 'दिमागों में' नाही. म्हणजे आजही 'दिल'ला महत्व आहेच. पूर्वीपेक्षा कमी असलं तरी काय झालं ?

- रणजित पराडकर

3 comments:

  1. अतिशय सुंदर लेखन.अप्रतिम शब्दरचना. पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.
    पद्माकर जोशी

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेखन.अप्रतिम शब्दरचना. पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.
    पद्माकर जोशी

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...