Sunday, August 23, 2015

सानदार, जबरजस्त, जिन्दाबाद ! (Movie Review - Manjhi The Mountain Man)

१९६०. चीनबरोबर वादाच्या ठिणग्या उडत होत्या आणि ह्या लबाड शेजाऱ्याशी भारताचे संबंध बिघडत चालले होते. 
१९६०. दशरथ मांझीचा दैवाशी वाद सुरु झाला होता आणि त्याने त्याच्या खडूस शेजाऱ्याला - एका डोंगराला - एकट्यानेच तोडायचा विडा उचलला होता.
१९६२ सगळा देश अनुक्रमे चीन युद्धाच्या जखमांनी व्यथित होता आणि १९६५, सगळा देश पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या युद्धातल्या जय-पराजयाचे आडाखे बांधत होता.
दशरथ मांझी निश्चल डोंगराशी असहाय्य झुंजताना पुन्हा पुन्हा हरत होता आणि पुन्हा पुन्हा त्याला भिडत होता.
१९७१. भारताने पाकिस्तानात रणभूमीवर चारी मुंड्या चीत केले आणि देशाने सोहळा साजरा केला, पण दशरथ मांझी अकरा वर्षांनंतरही यशाची चव चाखण्यापासून दूरच होता.
१९७५. देशात आणीबाणी लागू झाली. पण मांझी ? त्याच्या आयुष्यात पंधरा वर्षांपासून आणीबाणीच सुरु होती.
ज्या काळात देशातला तरुण अत्यंत समृद्ध अश्या सिनेसंगीताच्या आस्वादात धुंद होता, त्या काळात 'बिहार'च्या 'गया' जिल्ह्यातल्या 'गेहलौर' गावातला दशरथ मांझी दगडांशी झुंजत धूळ चाखत होता. बावीस वर्षांनी, १९८२ साली डोंगरातून आरपार रस्ता बनला. ह्या बावीस वर्षांत देशाने अनेक सांस्कृतिक, सांगीतिक, राजकीय, आर्थिक बदल पाहिले. एक दुष्काळ सहन केला. पण मांझी तिथेच राहिला, तेच काम करत राहिला. १९८२ साली डोंगर फुटला, चालत जाण्याचा रस्ता बनला. पण तरी गेहलौरला जाण्यासाठी पक्का रस्ता अजून २९ वर्षांनंतर २०११ साली बनला. तो रस्ता मांझी पाहू शकला नाही, कारण चार वर्षांपूर्वीच तो कॅन्सरशी झुंज हरला होता.

दशरथ मांझीची कहाणी बहुतेकांना माहित असेलच. एका टीव्ही शोमध्ये जेव्हा ही कहाणी दाखवली गेली, तेव्हा ती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. 'माऊण्टन मॅन' अशी उपाधीही त्याच्या नावासमोर लागली. एक माणूस आयुष्यभर राबला, झिजला आणि अथक तब्बल बावीस वर्षांच्या परिश्रमानंतर जिंकला. एका पहाडाशी एका पहाडाची एकमेवाद्वितीय टक्कर होती ही. कदाचित म्हणूनच वेगळे चित्रपट बनवण्यात रमणाऱ्या केतन मेहतांचं ह्या विषयाकडे लक्ष ओढलं गेलं आणि त्यांनी अजून एक चरित्रपट साकार केला. 

दशरथ मांझीची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी एक अशी व्यक्ती हवी, जी गर्दीतल्या कुणाही व्यक्तीचा चेहरा वाटायला हवी. इथे पिळदार यष्टी, उंची, गोरा रंग, बोलके डोळे, तजेला वगैरे बाबी नकोच होत्या. हवी होती, ती केवळ जीव ओतणारी अभिनय कुशलता. एक अफलातून जिद्द साकार करायची होती, ती साकार करण्यासाठी तश्याच जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीला निवडणं म्हणजे 'मास्टर स्ट्रोक'च ! नवाझुद्दिन हा मूर्तिमंत दशरथ मांझी आहे. जो दशरथ मांझी त्याने उभा केला आहे, तो त्याच्याशिवाय केवळ एकच व्यक्ती उभी करू शकली असती. ती म्हणजे स्वत: 'दशरथ मांझी.' तो आता हयात नाही, त्यामुळे नवाझुद्दिनला पर्यायच नाही. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा अगदी टिपिकल फिल्मी ग्रामीण तरुण, ग्रामीण भागातल्या जाचक, जातीभेदयुक्त समाजव्यवस्थेचा शोषित, पत्नीच्या विरहाने वेडसर झालेला पती, पेटून उठून आजवरच्या सगळ्या असंतोषाला एकवटून हातात छिन्नी, हातोडा आणि पहार उचलून एक अतिदीर्घकालीन लढा एकट्यानेच लढणारा पहाडाएव्हढा मर्द असे सगळे दशरथ मांझी तो लीलया साकारतो. दुष्काळी स्थितीत पाणी व अन्नासाठी बेचैन झाल्यावर त्याने 'जे काही' केलं आहे, ते केवळ पाहण्यासारखं आहे, वर्णन करता येण्यासारखं नाहीच. त्याचं हे काम माझ्यासाठी तरी आजवरचं त्याचं सर्वोत्कृष्ट काम आहे आणि जेव्हा नवाझुद्दिनसारख्या अभिनेत्याचं 'आजवरचं सर्वोत्कृष्ट काम' असेल, तेव्हा ते कदाचित इतिहासातल्या 'सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक' ठरेल. 

मांझीची पत्नी 'फागुनिया'च्या भूमिकेत 'राधिका आपटे' मात्र थोडी कमी पडते. तिचे उच्चार सहज वाटत नाहीत. दिसते छान, वावर (स्क्रीन प्रेझेन्स) सुद्धा मस्त. पण ती 'फागुनिया' न वाटता 'राधिका'च वाटत राहते. हे कदाचित तिच्यासमोर असलेला अभिनेता एक अत्युच्च सादरीकरण करत असल्याने तुलनात्मक दुर्दैव असू शकतं, पण जाणवतं नक्कीच.

इतर भूमिकांमध्ये अश्रफुल हक़ (मांझीचे वडील), प्रशांत नारायणन (झुमरू - मांझीचा मित्र), तिगमांशु धुलिया (गावचा जमीनदार), पंकज त्रिपाठी (जमीनदाराचा मुलगा) हे लोक लक्षात राहतात. 

'भगवान के भरोसे मत बैठो. का पता भगवान् तुम्हारे भरोसे बैठा हो !' असे अनेक अर्थपूर्ण संवादसुद्धा लक्षात राहतात. शहजाद अहमद आणि वरदराज स्वामींनी संवादलेखनाबरोबर कथेसाठीचं संशोधनही केलं आहे. 

'केतन मेहता' हे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांनी कधी तिकीटबारीवर खोऱ्याने पैसा ओढणारा चित्रपट बनवलेला नाही. 'मंगल पांडे'सारखा चित्रपट मात्र तिकीटबारीवरही फसला आणि रसिकांच्या पसंतीसही उतरला नव्हता. मांझीच्या कहाणीस आवश्यक तसं जोडकथानक देऊन त्यांनी इथे मात्र एक अप्रतिम कलाकृती निर्माण केली आहे. काही गोष्टी 'प्रेडिक्टेबल' ठरतात. उदा. मांझीच्या जीवनावर चित्रपट येतो आहे म्हटल्यावर मला वाटलं होतं की चित्रपटाचं सुरुवातीचं दृश्य 'डोंगरासमोर उभा असलेल्या संतापाने पेटून उठलेला नवाझुद्दिन' असेल. ते तसंच झालं. मात्र अनेक जागांवर अतिरंजन करण्याचा कुठलाही मोह केतन मेहतांना पडलेला नाही, हेही तितकंच खरं. संदेश शांडिल्यांच्या गाण्यांचाही त्यांनी चांगला उपयोग केला आहे. गाणी लुडबुड करत नाहीत आणि ती तुकड्यांतही आहेत, त्यामुळे कथा व संगीत ह्यांची जी वीण आवश्यक असते, ती नक्कीच जमून आलेली आहे.

सुरुवातीच्या दृश्याला लागून पुढे डोंगरावर आग लागण्याचं जे दृश्य घेतलं आहे, त्यातले स्पेशल इफेक्ट्स सुमार दर्ज्याचे आहेत. ह्या एका बाबतीत हिंदी चित्रपटाने आता शम्भ वर्षांनंतर तरी अधिक आग्रही व चोखंदळ भूमिका घेण्यास हरकत नसावी. हे एक खर्चिक काम असेल, पण आता बजेटची चणचण नक्कीच नसते. हे कठीण काम असेल, पण मांझीच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास 'पहाड़ तोड़े से भी मुस्किल है का?'

जुन्या काळचा भारत दाखवण्यासाठी इथे फार विशेष काही करावं लागलं नसावं. कारण सगळं चित्रण एका दुर्गम गावाचं आहे. त्यामुळे ना तिथे गाड्या, ना इमारती, ना चित्रपटांची पोस्टर्स, ना वेशभूषा. तरी, मेळे, रेल्वे स्टेशन आणि बस व एकंदर लोकांचे राहणीमान ह्या गोष्टींतून सारं काही व्यवस्थित उभं राहिलं आहे. 
इंदिरा गांधींच्या 'ओझरत्या' भूमिकेत दिसलेली 'दीपा साही' हुबेहूब इंदिरा दिसली आहे ! 

दशरथ मांझीने डोंगर तोडायला सुरुवात केल्यानंतर ५१ वर्षांनी त्या जागी पक्का रस्ता बनला. आता त्या रस्त्याला 'मांझी'चं नावही दिलं गेलं असावं. तो मांझी काही आता आपल्याला दिसणार नाही, भेटणार नाही. पण 'नवाझुद्दिन मांझी' मात्र नक्कीच भेटू शकतो. त्याची भेट नक्की घ्या. त्याचे हे शब्द तुमच्या मनात, डोक्यात, कानांत घुमत राहतील - 'सानदार, जबरजस्त, जिन्दाबाद !'

रेटिंग - * * * * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये २३ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...