Sunday, July 19, 2015

सुसह्य मेलोड्रामा (Movie Review - Bajrangi Bhaijaan)

अनपेक्षित धनलाभाचा आनंद खरं तर अतुलनीय असतो, पण तरी जर तुलना करायचीच झाली तर, 'तद्दन गल्लाभरू, व्यावसायिक आणि अक्कलदिवाळखोर असेल', अश्या धारणेने एखादा 'सलमानपट' बघावा आणि तो व्यावसायिक असला तरी अगदीच अक्कलदिवाळखोर न निघाल्याची भावना ही अनपेक्षित घबाड मिळाल्याच्या आनंदाच्या जवळपास जात असावी, असं मला 'बजरंगी भाईजान'मुळे जाणवलं.
चित्रपटातली एक कव्वाली अदनान सामीने गायली आहे. पडद्यावरही अदनान स्वत:च आहे. कोणे एके काळी तंबूइतका घेर असलेला अदनान सामी इतका बारीक झाला आहे की स्वत:च्या जुन्या कपड्यांत आता तो एका वेळी किमान चार वेळा मावू शकेल. अदनान सामीने बारीक होऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, तसाच, किंबहुना त्याहूनही मोठा धक्का सलमान खानने दिला आहे ! प्रथेप्रमाणे शर्ट न काढून नव्हे, शर्ट तर उतरतोच. पण त्याने चक्क बऱ्यापैकी अभिनय केला आहे ! मला जाणीव आहे की हे विश्वास ठेवायला थोडं जड आहे. पण असं झालंय खरं !
अर्थात ह्यामध्ये दिग्दर्शक कबीर खानचं अभिनंदन करायला हवं. कारण माझ्या मते, चांगले दिग्दर्शक सामान्य अभिनेत्यांकडूनही चांगलं काम करून घेऊ शकतात. (गुलजार साहेबांनी काही चित्रपटांत तर जम्पिंग जॅक जितेंद्रकडून अभिनय करून घेतला होता !) कबीर खानने सलमानच्या नाकावर 'एक था टायगर'मध्येही माशी बसू दिली नव्हती आणि 'काबुल एक्स्प्रेस' आणि 'न्यू यॉर्क'मध्ये त्याने जॉन अब्राहमच्या चेहऱ्यावर आठ्यांबरोबर अभिनयरेषाही उमटवल्या होत्या. 'न्यू यॉर्क'मध्ये तर मख्ख नील नितीन मुकेशसुद्धा त्याने यशस्वीपणे हाताळला होता !

कहाणीवर घट्ट पकड असणे, सर्वांकडून चांगला अभिनय करवून घेणे, कथानक एका विशिष्ट गतीने पुढे नेणे, अनावश्यक गाणी, प्रसंग टाळणे वगैरे कबीर खानची, किंबहुना कुठल्याही चांगल्या दिग्दर्शकाची वैशिष्ट्यं. 'बजरंगी भाईजान' मध्ये मात्र मध्यंतरापूर्वीच्या बहुतांश भागात कबीर भाईजान आपल्या एखाद्या सहाय्यकाला जबाबदारी सोपवून डुलकी घेत होते की काय, असं वाटलं. त्या वेळात मंद आचेवर शिजणाऱ्या 'मटन पाया'सारखं कथानक शिजत राहतं. शेवटी कुठे तरी कबीरसाहेबांना जाग येते आणि ते ताबा घेतात. मग मध्यंतरानंतर घटना पटापट घडत जातात आणि खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट सुरु होतो.

चित्रपटाचे ट्रेलर इतके बुद्धिचातुर्याने बनवले आहेत की कथानक कुणापासूनही लपलेलं नाही !
म्हणजे -
एक पाच-सहा वर्षांची पाकिस्तानी मुकी मुलगी एकटीच भारतात पोहोचते, हरवते. ती पवन कुमार चतुर्वेदी (सलमान) ऑल्सो नोन अ‍ॅज 'बजरंगी'ला भेटते. अल्पावधीतच त्या गोंडस मुलीवर प्रचंड माया करायला लागलेल्या बजरंगीला, ती पाकिस्तानातून चुकून भारतात आलेली आहे, हे समजल्यावर तो तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची शप्पथ घेतो आणि तिला घेउन पाकिस्तानात पोहोचतो.
- हे कथानक तर चित्रपटगृहात शिरण्याच्याही आधीपासून प्रत्येकाला माहित असतं. मला तरी एकदाच ट्रेलर पाहून समजलं होतं. त्यामुळे साहजिकच जे काही घडतं, ते कसं घडतं हे पाहणं हाच एक उद्देश उरतो. बजरंगी त्या लहान मुलीला घेऊन पाकिस्तानात कसा जातो ? तिला पोहोचवू शकतो का ? परत येतो का ? नवाझुद्दिन सिद्दिकीची काय भूमिका आहे ? सीमारेषेवर असलेला जीवाचा धोका तो कसा पार पाडतो ? वगैरे वगैरे लहान-मोठे प्रश्न पडत असल्यास 'बजरंगी भाईजान' अवश्य पाहावा.



पहिला अर्धा भाग खुरडत, लंगडत चालला असला तरी त्या भागाला अगदीच कंटाळवाणा न होऊ देण्याचीही खबरदारी घेतलेली आहे. ह्या भागात टिपिकल सलमानछाप पांचट कॉमेडी न दाखवता खुसखुशीत प्रसंगांच्या पेरणीतून विनोदनिर्मिती केली आहे.
अधूनमधून करीना बोअर करते. पण सध्या तिने असंही खर्चापुरतंच किरकोळ काम करायचं ठरवलेलं असल्याने तिच्या भूमिकेची लांबी तिच्या 'झीरो फिगर' प्रमाणे 'कंट्रोल्ड' आहे. तिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगला एक-दोन ठिकाणीच केंद्रित करून ठेवून एरव्ही तिला सलमान किंवा शरत सक्सेनाच्या जोडीला सहाय्यक म्हणूनच काम करायला दिलेलं आहे. जिच्याकडे काही काळापूर्वी एक आश्वासक अभिनेत्री म्हणून पाहिलं जात होतं, तिला अशी दुय्यम कामं मिळणं, ह्यामागे इतरांचा दोष वगैरे काही नसून तिचं तिनेच ठरवलेलं 'खर्चापुरतंच किरकोळ काम' आहे. त्यामुळे नो सहानुभूती !
लहान मुलगी 'मुन्नी/ शाहिदा' म्हणून झळकलेली चिमुरडी 'हर्षाली मल्होत्रा' अमर्याद गोंडस व निरागस दिसते. बजरंगीच्या आधी आपलाच तिच्यावर जीव जडतो. तिचा टवटवीत फुलासारखा चेहरा आणि डोळ्यांतला निष्पाप भाव ह्यांमुळे ती मुकी वगैरे वाटतच नाही. कारण ती गप्प बसूनही खूप बोलते.
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकीची एन्ट्री उत्तरार्धात होते. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात 'आता अजून कुणीही शिरू शकत नाही' वाटत असतानाही शिरलेला एखादा किमयागार जसा आपल्यापुरती जागा करूनच घेतो, तसा पहिल्या प्रसंगापासूनच नवाझुद्दिन कथानकात स्वत:साठी एक कोपरा पकडतोच. त्याचा 'चांद नवाब' खरं तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बजरंगीच्याच बरोबरीचं मुख्य पात्र बनला आहे. अर्थात, नवाझुद्दिन हा एक हीरा आहे आणि सलमान 'हीरो', अभिनेता नाही. हीरा आकाराने कितीही छोटा असला तरी महाकाय दगड त्याच्यासमोर कधीही फिकाच. त्यामुळे ही तुलना खरं तर दुर्दैवी आहे.  
करीनाच्या वडिलांच्या भूमिकेत शरत सक्सेनाची भूमिकाही मर्यादित आहे, ती ते जबाबदारीने पार पाडतात.
छोट्या छोट्या भूमिकांत सीमारेषेवरील अधिकारी, पोलीस अधिकारी, बस कंडक्टर वगैरे अनोळखी चेहरे धमाल करतात.

बहुचर्चित 'सेल्फी ले ले' गाणं चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पाडतं. मात्र इतर गाणी जास्त चांगली आहेत. 'चिकन सॉंग' तर मस्तच जमून आलं आहे आणि त्याची पेरणीही अगदी अचूक झाली आहे. 'ह्या जागी एक गाणं हवंच होतं' असं क्वचित वाटतं, ते ह्या गाण्याबाबत वाटलं. एकूणच सर्व गाण्यांत मेलडी आहे. पण संगीत प्रीतम चक्रवर्तीचं असल्याने नेमकं कौतुक कुणाचं करावं की करूच नये, हे समजत नसल्याने मी हात आखडता घेतो !

उत्तरार्धात 'गदर'ची कॉपी मारायचा फुटकळ प्रयत्न तर केलेला नाही ना, अशीही एक भीती मला होती. पण सुदैवाने तसं काही झालेलं नाही. अर्थात, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, काही ठिकाणी मेलोड्रामाही आहे. पण हे सगळं सहनीय आहे. डोळ्यांत येणारं पाणी जर मेलोड्रामामुळे असेल, तर तो नक्कीच जमून आलेला आहे असं म्हणावं लागेल. ह्याचं श्रेय लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि संवादलेखक कबीर खानला द्यायला हवं. संवाद अगदी लक्षात राहतील असे नसले, तरी मार्मिक आहेत, खुमासदार आहेत. तडातड उडणारी माणसं (एक किरकोळ अपवाद!), गाड्या आणि फुटणाऱ्या भिंती वगैरे टाईप हाणामाऱ्या इथे नाहीत.

उत्तुंग पर्वतराजी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि नजरेच्या पट्ट्यात न मावणारी रखरखीत वाळवंटं थक्क करतात. छायाचित्रण अप्रतिमच झालेलं आहे.

'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' ह्यांच्या शक्तिप्रदर्शनात चित्रपटगृह चालकांची चांदी आहे, हे ओसंडून वाहणारे पार्किंग लॉट्स सांगत आहेत. सर्वत्र परवापर्यंत चर्चा होती की 'बाहुबलीमुळे बजरंगी मार खाणार की बजरंगीमुळे बाहुबली', प्रत्यक्षात दोघांमुळे इतरांना मार बसणार आहे.

थोडक्यात, सलमानभक्तांना 'बजरंगी' आवडेल ह्यात तिळमात्र शंका नाही आणि सलमानत्रस्तांनाही तो असह्य होणार नाही, अशी खात्री वाटते.
काबुल एक्स्प्रेस, न्यू यॉर्क आणि एक था टायगर ह्या हॅटट्रिकनंतरच कबीर खान माझ्यासाठी 'Must watch Director' च्या यादीत विसावला होता. 'बजरंगी'ने त्याचं स्थान अजून भक्कम केलं आहे !

रेटिंग - * * *१/२


हे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१९ जुलै २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...