Saturday, September 13, 2014

गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)

'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.

चित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की अँजेलिना (दीपिका पदुकोन), फर्डिनंट (नसीरुद्दीन शाह), डॉन पेद्रो (पंकज कपूर), रोझी (डिम्पल कापडिया) आणि सावियो द गामा (अर्जुन कपूर) ह्यांची ही कहाणी. हे पाच लोक 'फॅनी'च्या शोधात निघतात.... बस्स्. इतकंच. ह्यातलं कोण काय आहे? कसा आहे ? 'फॅनी' कोण आहे ? ती मिळते का ? वगैरे प्रश्न पडत असतील, तर पडू द्यावेत. त्याची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहुन मिळावीत अशी माझी इच्छा आहे !
निसर्गरम्य गोव्यात घडणारं हे कथानक. गोव्याला 'भूतलावरील स्वर्ग' किंवा 'God's own land' का म्हणतात, हे हा चित्रपट पाहुन कळेल. गोव्याचं इतकं सुंदर दर्शन घडतं की आत्ताच्या आत्ता उठावं आणि निघावं आठवडाभराच्या सुट्टीवर असंच वाटतं. मुख्य म्हणजे, हे सौंदर्य दाखवताना गोव्यातला समुद्र दाखवलेला नाही किंवा अगदीच जर कुठल्या फ्रेममध्ये दिसलाही असेल तरी माझ्या लक्षात राहिला नाही, इतकं किरकोळ. गोव्याचं समुद्ररहित दर्शन हे म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर एकाही खड्ड्यात न जाता गाडी घरपर्यंत पोहोचणं इतकं अशक्यप्राय वाटत असेल, तर मात्र तुम्ही हा चित्रपट ज्या किंमतीत तिकीट मिळेल, त्या किंमतीत काढून बघायला हवा.

दीपिका पदुकोन ह्या चित्रपटाचं मुख्य 'व्यावसायिक' आकर्षण आहे, निर्विवाद. 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये दिसलेल्या दीपिकाचं वर्णन अगदी अचूकपणे एका शब्दात होतं. 'सेक्सी'. तिचं बोलणं, चालणं, हसणं, बसणं, अगदी काहीही करणं निव्वळ दिलखेचक आहे. गालावरच्या खळीत तर मी किमान अडुसष्ट वेळा जीव दिला. पण पुन्हा पुन्हा जिवंत झालो कारण पुन्हा जीव द्यायचा होता.

रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचं अजून एक आकर्षण म्हणजे नसीरुद्दीन शाह व पंकज कपूर ह्या दोन तगड्या अभिनेत्यांना एकत्र पडद्यावर बघणं. लडाखला गेलो असताना हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांतली अनेक उंच उंच शिखरे पाहिली, अर्थातच दुरूनच. प्रत्येक शिखर दुसऱ्याला मान देऊन उभं असल्यासारखं वाटत होतं. नसीर व पंकज कपूर ही दोन शिखरंही अशीच जेव्हा जेव्हा समोरासमोर आली आहेत, एकमेकांना मान देऊन उंच उभी राहिली आहेत. तसंच काहीसं इथेही होतं. दोघांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यात कुणीही दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत नाही. दोघेही आपापल्या जागेवरून धमाल करतात.

डिम्पल कापडिया हा रोल तिच्याचसाठी असावा इतकी रोझी'च्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. एका दृश्यात अपेक्षाभंगाचं व अपमानाचं दु:ख तिने अतिशय सुंदर दाखवलं आहे.  

दुसरीकडे अर्जुन कपूर त्याला कुठलाही रोल दिला तरी काहीही फरक पडणार नाही, हे दाखवून देतो. चविष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत असताना अचानक दाताखाली खडा येऊन होणारा रसभंग अर्जुन कपूर पडद्यावर येऊन वारंवार करतो. त्याच्याकडे पाहुन हा अजून 'टू स्टेट्स'मध्ये आहे की 'गुंडे'मध्ये आहे की 'इशक़जादे'मध्ये की अजून कुठला आलेला असल्यास त्यात आहे हे कळत नाही. त्याच्यासाठी सगळी पात्रं सारखीच आहेत.

निखळ विनोदांची पेरणी करतानासुद्धा हास्याचा खळखळाट घडवला जाऊ शकतो, हे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही 'फाईण्डिंग फॅनी' बघायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी असा खळखळून हसवणारा हलका-फुलका चित्रपट आला आहे. विनोदाची पातळी कंबरेखाली गेलेली असताना किंवा विनोदाच्या नावाने नुसता पाचकळपणा चालत असताना किंवा एखाद्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय विनोदनिर्मिती होत नसताना आलेला 'फाईण्डिंग फॅनी' मला तरी काही काळासाठी का होईना बासुदा, हृषिदांच्या जमान्यात घेउन गेला. मध्यंतरापर्यंत तर मी हा चित्रपट आजपर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट ठरवला होता. पण मध्यंतरानंतर जराशी लांबण लागली आणि काही दृश्यं व विनोद वरिष्ठांसाठीचे असल्याने मी गोल्ड मेडलऐवजी 'सिल्व्हर' दिले आणि असं म्हटलं की,' हा आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.'

आजकाल चित्रपटाचं संगीत मेलडीपासून दूर गेलं आहे. ह्या निखळ विनोदाला जर तरल, गोड चालींच्या संगीताची जोड मिळाली असती तर कदाचित मी हा चित्रपट पाठोपाठचे शोसुद्धा पाहिला असता, असा एक अतिशयोक्तीपूर्ण विचार मनाला स्पर्श करतो आहे. गोव्यातल्या कहाणीत 'माही वे' वगैरे शब्दांची गाणी का हवी? असा विचार करायला हवा होता. पण ते किरकोळ.

होमी अदजानियाने ह्या चित्रपटापासून माझ्या मनात तरी अशी 'इमेज' तयार केली आहे की केवळ त्याच्या नावावर चित्रपट बघायला जावा. 'बीइंग सायरस'मध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर एका वेगळ्या पद्धतीने हाताळल्यावर, 'कॉकटेल'सारखा व्यावसायिक विषयही त्याने खूप संयतपणे हाताळला आणि एक निखळ विनोदी चित्रपट केला आहे. भीती एकच. 'सायरस'मध्ये असलेल्या सैफबरोबर त्याने 'कॉकटेल' केला आणि 'कॉकटेल'मधल्या दीपिकाबरोबर 'फाईण्डिंग फॅनी' केला. आता समीकरण पुढे नेण्यासाठी पुढील चित्रपट अर्जुन कपूरबरोबर करू नये !



हा चित्रपट मुळात इंग्रजीमध्ये बनला आहे. हिंदीतला चित्रपट डब केलेला असेल हे माहित नव्हतं त्यामुळे जुळवून घेईपर्यंत जरासा वेळ गेला. पण जर इंग्रजीत पाहिला तर जास्त मजा येईल, असंही वाटलं.

'फाईण्डिंग फॅनी' हा कुठला आत्मशोध नाही. पडद्यावर कुणाला काय मिळतं, काय नाही ह्यापेक्षा प्रेक्षकाला दोन घटका निर्भेळ आनंद मिळतो, हे जास्त महत्वाचं आहे. कामाच्या व्यापात गुरफटल्यावर आपल्याला अधूनमधून एक बेचैनी जाणवत असते. काही तरी हवं असतं, पण काय ते कळत नसतं. अश्यातच ३-४ दिवस लागून सुट्ट्या येतात आणि मित्रांसह एका सहलीचा प्लान बनतो. सहलीहून परतल्यावर आपल्याला समजतं की इतके दिवस आपल्याला काय हवं होतं.
गेले अनेक दिवस मीसुद्धा चित्रपटात काही तरी शोधत होतो. काय ते कळत नव्हतं. मी एक 'फाईण्डिंग फॅनी' शोधत होतो. काल तो शोध पूर्ण झाला. आता मी पुन्हा एकदा मसालेदार खाण्याला पचवायला तयार आहे.

रेटिंग - * * * *

1 comment:

  1. मराठी वृत्तपत्रा मध्ये ह्या सिनेमाचा review एकदम घाणेरडा दिला आहे, IBN लोकमतचा पुराचुरे तर TV सॆरिअल्स च्या review चा पण लायकीचा नाही....अभिजात विशयप्रधान सिनेमे ह्या लोकांना पचत नाहीत किंवा त्यांची बौधिक पातळी तेवढी नसते..ह्या सगळ्या कमतरते मध्ये ..अगदी खरा खरा review लिहणारे तुझ्यासारखे असले तर प्रेकाश्कांची फसवणूक थांबेल व चांगला अनुभव पदरात पडेल ..अभिनंदन - riya kulkarni

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...