Tuesday, September 30, 2014

प्रिय ऑर्कुट..

प्रिय ऑर्कुट,

आज हा आपला अखेरचा संवाद.
मला आठवतंय, माझी तुझी ओळख ताईमुळे झाली आणि तुझ्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली. नवी कसली, जी काही आहे ती ओळख तुझ्यामुळेच मिळाली.
कुठे मालवाहतुकीचा नीरस, रुक्ष आणि खोटा किरकोळ धंदा करणारा मी एक व्यावसायिक, जो ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, भंगारवाले वगैरे अभिरुचीहीन लोकांच्यात स्वत:चे परग्रहवासीपण समजुनही मन रमवायचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि कुठे तुझ्यामुळे मला लाभलेल्या असंख्य कविमित्र-मैत्रिणींच्या सहवासात स्वत:च स्वत:ला नकळत गवसलेला आजचा मी !

मित्रा,

काळासोबत मी बदलत गेलो. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्यातला बदल मलाच अवाक करतो. मात्र तू बदलला नाहीस. किंवा असं म्हणू योग्य वेळी योग्य तितका बदलला नाहीस. मी लोंढ्यासोबत वाहत फेसबुकवर आलो. तुझ्यापासून दूर आलो ही तुला माझी कृतघ्नता वाटली का रे ? असेल तर त्यात काही गैरही नाही म्हणा. मी खूप प्रयत्न केला होता तुझी साथ न सोडण्याचा. पण शेवटी तुझ्यापुढेच मला हार मानायला लागली. तुझा रागही आला. जाम अडेलतट्टूपणा केलास, नाहीच बदलायचं म्हणालास. मी खूप सांगितलं तुला की वाहत्या प्रवाहासोबत कधी कधी वाहायलाच लागतं. एका जागी रुतून बसलं, तर झीज होऊन अस्तित्वाच्या खुणाही पुसल्या जातात. पण तुला वाटत होतं की तू बांध आहेस आणि ह्या प्रवाहाला थोपवणार आहेस. अखेरीस मला तुझा हात आणि तुझी साथ सोडावीच लागली.

असो.
मला कारणं द्यायची नाहीत आणि हा आता वाद करणेही निरर्थकच आहे. पण काय करणार ! आपलं नातंच तसं होतं. आजकाल मला असं वाटायला लागलंय की प्रत्येक नातं हे शेवटी एका जखमेतच रुपांतरीत होऊन संपत असतं बहुतेक. फरक इतकाच की काही जखमा हव्याहव्याश्या असतात तर काही बोचऱ्या. तुझी जखम आज बोचते आहे म्हणून बोलतो आहे. नसीर काजमी म्हणतात -

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और ये चोट भी नई है अभी

पण मग जरा अजून विचार केल्यावर असंही जाणवतंय की तू चालला आहेस खरा, पण जाताना भरभरून देऊन जातो आहेस. किंबहुना, आधीच दिलेलं आहेस. त्यामुळे अशीसुद्धा खात्री वाटतेय की ह्या संपलेल्या नात्याची जखम हवीहवीशी असणार आहे. तुझी आठवण सुखदच असणार आहे. त्या जखमेच्या ठसठसण्यातही एक नशा असणार आहे.

तुझी आठवण येईल तेव्हा मला आठवेल -
माझी पहिली कविता..
माझी पहिली गझल..
माझं पाहिलं रसग्रहण..
माझी पहिली शिकवण..
माझे अनेक प्रयोग..
एकूणच तू म्हणजे माझ्या लेखनप्रवासाचा हमरस्ताच. आता रस्ता बदलला आहे, पण सुरुवात तूच करवली होतीस. कुठल्याही प्रवासाची दिशा, लक्ष्य, समाप्ती बदलू शकेल पण सुरुवात बदलणार नाहीच ना ? कारण शेवटी तो भूतकाळाचा भाग.

ऑर्कुट,
मी तर इथेच आहे. पण तू नसणार आहेस. मनात गैरसमज ठेवून गेलास तर बदलणार कसं ?
तुला एक सांगू का ? पटलं तर बघ. आयुष्य हे एक वर्तुळ आहे. ते पूर्ण होतंच. जिथून निघालो होतो, तिथेच परत पोहोचणार असतोच. माझी सुरुवात तुझ्यापासून झाली आणि कुणास ठाऊक शेवटही तुझ्यापाशीच होणार असेल. मी अखेरचा थांबीन, ती ओसरी तुझीच असेल कदाचित. एक नवा चेहरा घेउन येशील आणि आज मी जसा तुला निरोप देतो आहे, तसा तू तेव्हा मला देशील !

Lets see. Till then goodbye, mate !

चलते रहते हैं कि चलना है मुसाफिर का नसीब,
सोचते रहते हैं किस राह गुज़र के हम हैं;
अपनी मर्जी से कहाँ अपनी सफर के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
(निदा फाजली)

Thanks a lot for everything you gave me.

तुझाच,

....रसप....





Tuesday, September 23, 2014

जाऊ विठू चल घरी..

बोलावते पंढरी
जाऊ विठू चल घरी

डोळे तुझी आरती
ओंजळ बनो कोयरी

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

जगतो मनापासुनी
मज्जाव आहे तरी

सोबत इथे फक्त मी
का यायचे ह्या घरी ?

आवळ स्वत:चा गळा
घे फास काळेसरी

तू बोल, थांबीन मी
मृत्यू मिळाला तरी

बोटावरी मोजल्या
मी पावसाच्या सरी

पाषाण काळा 'जितू'
अन् रेघ तू पांढरी

----------------------------------

जहरी नजर दे मला
बघशील तर तू खरी !

....रसप....
२३ सप्टेंबर २०१४

Saturday, September 13, 2014

गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)

'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.

चित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की अँजेलिना (दीपिका पदुकोन), फर्डिनंट (नसीरुद्दीन शाह), डॉन पेद्रो (पंकज कपूर), रोझी (डिम्पल कापडिया) आणि सावियो द गामा (अर्जुन कपूर) ह्यांची ही कहाणी. हे पाच लोक 'फॅनी'च्या शोधात निघतात.... बस्स्. इतकंच. ह्यातलं कोण काय आहे? कसा आहे ? 'फॅनी' कोण आहे ? ती मिळते का ? वगैरे प्रश्न पडत असतील, तर पडू द्यावेत. त्याची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहुन मिळावीत अशी माझी इच्छा आहे !
निसर्गरम्य गोव्यात घडणारं हे कथानक. गोव्याला 'भूतलावरील स्वर्ग' किंवा 'God's own land' का म्हणतात, हे हा चित्रपट पाहुन कळेल. गोव्याचं इतकं सुंदर दर्शन घडतं की आत्ताच्या आत्ता उठावं आणि निघावं आठवडाभराच्या सुट्टीवर असंच वाटतं. मुख्य म्हणजे, हे सौंदर्य दाखवताना गोव्यातला समुद्र दाखवलेला नाही किंवा अगदीच जर कुठल्या फ्रेममध्ये दिसलाही असेल तरी माझ्या लक्षात राहिला नाही, इतकं किरकोळ. गोव्याचं समुद्ररहित दर्शन हे म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर एकाही खड्ड्यात न जाता गाडी घरपर्यंत पोहोचणं इतकं अशक्यप्राय वाटत असेल, तर मात्र तुम्ही हा चित्रपट ज्या किंमतीत तिकीट मिळेल, त्या किंमतीत काढून बघायला हवा.

दीपिका पदुकोन ह्या चित्रपटाचं मुख्य 'व्यावसायिक' आकर्षण आहे, निर्विवाद. 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये दिसलेल्या दीपिकाचं वर्णन अगदी अचूकपणे एका शब्दात होतं. 'सेक्सी'. तिचं बोलणं, चालणं, हसणं, बसणं, अगदी काहीही करणं निव्वळ दिलखेचक आहे. गालावरच्या खळीत तर मी किमान अडुसष्ट वेळा जीव दिला. पण पुन्हा पुन्हा जिवंत झालो कारण पुन्हा जीव द्यायचा होता.

रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचं अजून एक आकर्षण म्हणजे नसीरुद्दीन शाह व पंकज कपूर ह्या दोन तगड्या अभिनेत्यांना एकत्र पडद्यावर बघणं. लडाखला गेलो असताना हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांतली अनेक उंच उंच शिखरे पाहिली, अर्थातच दुरूनच. प्रत्येक शिखर दुसऱ्याला मान देऊन उभं असल्यासारखं वाटत होतं. नसीर व पंकज कपूर ही दोन शिखरंही अशीच जेव्हा जेव्हा समोरासमोर आली आहेत, एकमेकांना मान देऊन उंच उभी राहिली आहेत. तसंच काहीसं इथेही होतं. दोघांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यात कुणीही दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत नाही. दोघेही आपापल्या जागेवरून धमाल करतात.

डिम्पल कापडिया हा रोल तिच्याचसाठी असावा इतकी रोझी'च्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. एका दृश्यात अपेक्षाभंगाचं व अपमानाचं दु:ख तिने अतिशय सुंदर दाखवलं आहे.  

दुसरीकडे अर्जुन कपूर त्याला कुठलाही रोल दिला तरी काहीही फरक पडणार नाही, हे दाखवून देतो. चविष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत असताना अचानक दाताखाली खडा येऊन होणारा रसभंग अर्जुन कपूर पडद्यावर येऊन वारंवार करतो. त्याच्याकडे पाहुन हा अजून 'टू स्टेट्स'मध्ये आहे की 'गुंडे'मध्ये आहे की 'इशक़जादे'मध्ये की अजून कुठला आलेला असल्यास त्यात आहे हे कळत नाही. त्याच्यासाठी सगळी पात्रं सारखीच आहेत.

निखळ विनोदांची पेरणी करतानासुद्धा हास्याचा खळखळाट घडवला जाऊ शकतो, हे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही 'फाईण्डिंग फॅनी' बघायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी असा खळखळून हसवणारा हलका-फुलका चित्रपट आला आहे. विनोदाची पातळी कंबरेखाली गेलेली असताना किंवा विनोदाच्या नावाने नुसता पाचकळपणा चालत असताना किंवा एखाद्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय विनोदनिर्मिती होत नसताना आलेला 'फाईण्डिंग फॅनी' मला तरी काही काळासाठी का होईना बासुदा, हृषिदांच्या जमान्यात घेउन गेला. मध्यंतरापर्यंत तर मी हा चित्रपट आजपर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट ठरवला होता. पण मध्यंतरानंतर जराशी लांबण लागली आणि काही दृश्यं व विनोद वरिष्ठांसाठीचे असल्याने मी गोल्ड मेडलऐवजी 'सिल्व्हर' दिले आणि असं म्हटलं की,' हा आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.'

आजकाल चित्रपटाचं संगीत मेलडीपासून दूर गेलं आहे. ह्या निखळ विनोदाला जर तरल, गोड चालींच्या संगीताची जोड मिळाली असती तर कदाचित मी हा चित्रपट पाठोपाठचे शोसुद्धा पाहिला असता, असा एक अतिशयोक्तीपूर्ण विचार मनाला स्पर्श करतो आहे. गोव्यातल्या कहाणीत 'माही वे' वगैरे शब्दांची गाणी का हवी? असा विचार करायला हवा होता. पण ते किरकोळ.

होमी अदजानियाने ह्या चित्रपटापासून माझ्या मनात तरी अशी 'इमेज' तयार केली आहे की केवळ त्याच्या नावावर चित्रपट बघायला जावा. 'बीइंग सायरस'मध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर एका वेगळ्या पद्धतीने हाताळल्यावर, 'कॉकटेल'सारखा व्यावसायिक विषयही त्याने खूप संयतपणे हाताळला आणि एक निखळ विनोदी चित्रपट केला आहे. भीती एकच. 'सायरस'मध्ये असलेल्या सैफबरोबर त्याने 'कॉकटेल' केला आणि 'कॉकटेल'मधल्या दीपिकाबरोबर 'फाईण्डिंग फॅनी' केला. आता समीकरण पुढे नेण्यासाठी पुढील चित्रपट अर्जुन कपूरबरोबर करू नये !



हा चित्रपट मुळात इंग्रजीमध्ये बनला आहे. हिंदीतला चित्रपट डब केलेला असेल हे माहित नव्हतं त्यामुळे जुळवून घेईपर्यंत जरासा वेळ गेला. पण जर इंग्रजीत पाहिला तर जास्त मजा येईल, असंही वाटलं.

'फाईण्डिंग फॅनी' हा कुठला आत्मशोध नाही. पडद्यावर कुणाला काय मिळतं, काय नाही ह्यापेक्षा प्रेक्षकाला दोन घटका निर्भेळ आनंद मिळतो, हे जास्त महत्वाचं आहे. कामाच्या व्यापात गुरफटल्यावर आपल्याला अधूनमधून एक बेचैनी जाणवत असते. काही तरी हवं असतं, पण काय ते कळत नसतं. अश्यातच ३-४ दिवस लागून सुट्ट्या येतात आणि मित्रांसह एका सहलीचा प्लान बनतो. सहलीहून परतल्यावर आपल्याला समजतं की इतके दिवस आपल्याला काय हवं होतं.
गेले अनेक दिवस मीसुद्धा चित्रपटात काही तरी शोधत होतो. काय ते कळत नव्हतं. मी एक 'फाईण्डिंग फॅनी' शोधत होतो. काल तो शोध पूर्ण झाला. आता मी पुन्हा एकदा मसालेदार खाण्याला पचवायला तयार आहे.

रेटिंग - * * * *

Saturday, September 06, 2014

नो गोल्ड फॉर 'मेरी कोम' (Mary Kom - Movie Review)

'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा. गेल्या एका तपाहून अधिक काळ शर्मिला उपोषण करत आहेत. 'मणिपूर'मध्ये लष्कराकडून होणाऱ्या जाचाविरुद्ध, तिथे शांती नांदावी म्हणून.
असुरक्षित वातावरणात रोजगार, दळणवळण सुविधा सगळ्याचीच उणीव. त्यामुळे नजीकचे भविष्यच काय, हातावरचा आजसुद्धा अनिश्चित ! म्हणूनच राजकीय व सामाजिक अस्थैर्य असलेल्या प्रांतात सगळ्यात आधी भरडला व भरकटत जातो तो तिथला तरुण वर्ग.
अश्या एका अस्थिर वातावरणातून वर आली एम. सी. मेरी कोम. 'मेरी कोम' मधून तिच्या ह्या संघर्षावर व एकूणच बऱ्याच लोकांना बऱ्याच अंशी अनभिज्ञ असलेल्या ईशान्येकडील राज्यांतल्या विचित्र परिस्थितीवर भाष्य होईल, अशी एक माफक अपेक्षा घेऊन मी चित्रपट पाहायला गेलो आणि लक्षात आलं की कदाचित ही अपेक्षा माफक नव्हती, खूपच जास्त होती.

धावपटू मिल्खा सिंगवरील 'भाग मिल्ख भाग'मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी होती. 'मेरी कोम'ची सुरुवातही एक प्रखर संघर्षमय वाटचाल दाखविली जाणार आहे, असा एक आभास निर्माण करते. दुर्दैवाने, शेवटपर्यंत तो आभास, आभासच राहतो आणि ही कहाणी एका महिला क्रीडापटूच्या कौटुंबिक संघर्ष व फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या संघर्षापुढे जातच नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट सतत अशी आशा दाखवत राहतो की १०० वर्षांत ज्या विषयाला, ज्या संघर्षाला हिंदी चित्रपटात कुणी स्पर्शही केला नाही, तो इथे दाखवला जाईल, पण तसं होत नाही आणि चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ एक डॉक्युमेंटरी वाटतो.
उत्तरार्धात कहाणीत जरा 'कहाणी' येते. पण कथानकाची सगळी वळणं नेहमीचीच असतात आणि अपेक्षाभंगाची पूर्तता होते.

व्यावसायिक जीवन व कौटुंबिक जीवन ह्यातला संघर्ष कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच करत असतो. व्यावसायिक आयुष्य जितकं विशाल होतं, तितकाच हा संघर्षही प्रखर होतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. एक उदाहरण अगदी लगेच आठवलं. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले. सतत फिरतीवर असणाऱ्या खेळाडूंना 'वर्क-लाईफ' बॅंलन्स जुळवणं नेहमीच कठीण असतं. मेरी कोम ह्यांच्या लग्नामुळे त्यांच्या बॉक्सिंग कारकीर्दीत आलेला एक स्वल्पविराम, नंतर त्यांच्या जुळ्या मुलांच्या संगोपानामुळे होणारी ओढाताण, त्यावेळी पतीने दिलेला आधार, मुलाच्या आजारपणामुळे जीवाला लागलेला घोर ह्या बाबींवर चित्रपट केंद्रित केल्याने, चित्रपटाच्या विषयामुळे एका अत्यंत संवेदनशील समस्येला वाचा फोडण्याची संधी माझ्या मते वाया गेली आहे.


प्रियांका चोप्राने एक सुजाण अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. ह्या भूमिकेतही ती जीव ओतते. तिची मेहनत खांदे, दंड व हाताच्या टरटरलेल्या स्नायूंतून रसरसून दिसते. भाषेचा लहेजाही तिने चांगलाच आत्मसात केला आहे (असावा). एका आव्हानात्मक भूमिकेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे आणि पटकथेत, संवादांत असलेल्या काही उणीवांना एक प्रकारे भरून काढलं आहे.

मेरी कोमच्या पतीच्या भूमिकेत 'दर्शन कुमार' आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'सुनील थापा' लक्षात राहतात.
भाजणीचं थालीपीठ तव्यावर असताना त्याचा एक मस्त खमंग सुवास घरभर पसरतो, पण पहिला घास घेतल्याबरोबर ती चव वासाच्या खमंगपणासमोर कमी पडते आणि माझा तरी अपेक्षाभंग होतो. आवडत नाही, असं नाही. पण अजून खूप काही तरी हवं असतं. 'मेरी कोम' हा विषय व चित्रपटाचे ट्रेलर ह्यांमुळे एक वेगळी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि असाच एक अपेक्षाभंग वाट्यास आला. ईशान्येकडील भागाचं सुंदर दर्शन (तिथेच चित्रीकरण झाले असावे, असे गृहीत धरून) घडतं, पण त्या सौंदर्याच्याआड असलेलं एक अप्रिय वास्तव समोर येत नाही. आपण चित्रपटगृहातून एम. सी. मेरी कोम ह्या स्त्रीच्या 'स्त्री' म्हणून वैयक्तिक संघर्षाला बघून हळहळत बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सेव्हन सिस्टर्सबद्दल औदासिन्यच मनात रुजवतो.

एक वेगळा विषय, त्याला पूर्णपणे न्याय दिला गेला नसला तरी, हाताळल्याबद्दल बहुतेकांना हा चित्रपट आवडेल. त्याला समीक्षकांकडून चांगले शेरेही मिळतील, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र असह्य प्रसववेदना सुरु झालेल्या असताना, बाहेरील अशांत वातावरणात लपतछपत हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करणारे सुरुवातीच्या दृश्यातील नवरा-बायकोच आत्तासुद्धा येत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही.

रेटिंग - * * *

Monday, September 01, 2014

गलिच्छ

फुटपाथावर,
रस्त्यावरती
ठेले लावुन
भाजीवाले
कपडेवाले
गॉगलवाले
कुलूप-किल्ल्या
खेळ-खेळणी
चप्पल-बॅगा
अजून काही
विकणारे अन्
त्यांच्या पुढ्यात
चिकचिकलेली
थबथबलेली
गलिच्छ गर्दी

जरा थांबुनी
नीट पाहिले
त्या ठेल्यांच्या
अवतीभवती
भडक चेहरे
चोपडलेले
गच्च शरीरे
ताठरलेली
निर्जल डोळे
खुणावणारे
काही लंपट
घुटमळणारे
एकच बरबट
ओशट ओंगळ
गजबजलेली
बजबजलेली
कळकटलेली
गलिच्छ गल्ली

बाजाराचा
माल कोणता
समजुन आले
शहार दाबुन
इकडे तिकडे
हळुच पाहिले
गाड्या होत्या
माड्या होत्या
काही बारिक
जाड्या होत्या
एक पाहिली
अल्पवयाची
नजर चोरटी
खमकी झाली
पायापासून
वरती नेली
थांबत थांबत
अन् आस्वादत

सात्विक सदरा
पाहुन माझा
ती हसली पण,
तिच्या खुणेने
एकच म्हटले,
'गलिच्छ मी तर
गलिच्छ तूही..'
क्षणात आलो
मी भानावर
घाणीमध्ये
भरली चप्पल
तसाच ओढत
निघून आलो

आजही मला
पाउल माझे
डगमग करता
समोर दिसतो
माझी वखवख
जागवणारा
शुष्क, कोवळा
शून्य चेहरा
अजून छळते
अवतीभवती
गच्च शरीरे
वागवणारी
बरबटलेली
गलिच्छ गल्ली .

....रसप....
३० ऑगस्ट २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...