Monday, December 23, 2013

दीड दमडीचा धुमड्या (Movie Review - Dhoom - 3)

"ट्रकच्या मागे लिहिलेली वचनं" हा तत्वज्ञानाचा एक अविरत स्त्रोत आहे. द व्हेरी फेमस 'बुरी नजरवाले, तेरा मूह काला' पासून अनेक उत्तमोत्तम शेरही मी तिथे वाचलेत. पण अगदी हल्लीच, काही दिवसांपूर्वीच एका ट्रकवर वाचलेलं वचन मात्र सगळ्यांवर कडी असावं -

"भाई हो तो ऐसा, ना मांगे हिसाब ना मांगे पैसा !!"

ह्याच उदात्त विचारसरणीचा एक जादूगार नव्वदच्या दशकात शिकागोमध्ये होऊन गेला, हे काल धूम-३ पाहिल्यावर समजलं. पण हा जादूगार तर ट्रकवाल्या पेक्षाही उदात्त विचारसरणीचा असतो. तो अशी अपेक्षा स्वत:च्या भावाकडून नव्हे, तर बँकेकडून ठेवतो आणि कर्ज घेतो. पण ती बँक म्हणजे महाराष्ट्र सरकार नसतं आणि कर्ज घेणारा कुणी शेतकरीही नसतो. त्यामुळे व्यवहारास चोख बँक, हफ्ते चुकवणाऱ्या जादूगाराला नोटिशीची जादू दाखवते आणि हबकलेला हताश जादूगार आत्महत्या करतो. त्याने आत्महत्या केल्यावरही बँकेच्या अधिकाऱ्याचं हृदय द्रवत नाही. बिच्चाऱ्याला ट्रकवाला व जादूगाराचे उदात्त विचार माहित नसतात. तो जादूगाराची तारण मालमत्ता जप्त करवतो आणि त्या जादूगाराचा लहान मुलगा, मोठा झाल्यावर बँकेच्या कायदेशीर कारवाईचा बेकायदेशीर बदला घेतो. मायला ! चोर तो चोर, वर शिरजोर ? ही तर खोब्रागडेगिरी झाली ! असाच आहे धुमड्या, अर्थात धूम - ३.

धुमड्याची सुरुवात आश्वासक होते. आमिरची सनी लिओनीश पाठ दिसेपर्यंतची पहिली काही मिनिटं आपल्या अपेक्षा उंचावतात. नंतर कैच्याकै भंकस सुरु होते. बाईक चालवणारा चोर आमिर स्वत:चे तोंडही लपवत नाही आणि अमेरिकेचे पोलिस इतके दुधखुळे असतात की ते त्याला ओळखू शकत नाहीत. लगेच पुढच्या दृश्यात अभिषेक आणि उदय चोप्रा कृत गुंडांची पिटाई दाक्षिणव्रात्य सिनेमाला लाजवेल अशी आहे. पुढल्या चाकावर गोल गोल फिरणारी रिक्षा पाहिल्यावर तिचा स्टिअरिंग कॉलम बनवाणाऱ्या कंपनीच्या मालकाचा उर अभिमानाने भरून आला नसेल, तरच नवल !
केवळ दोन चोऱ्या करून अमेरिकन पोलिसदलास हवालदिल करणाऱ्या एक अज्ञात चोरास पकडण्यासाठी, दोन धुमड्यांतील सुपरफ्लॉप कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय 'सुपरकॉप' ठरलेल्या 'जय दीक्षित'ला (अभिषेक बच्चन) खास भारतातून बोलावले जाते. कारण कदाचित हे असावं की, हा चोर (आमिर खान) चोरी केल्यावर हिंदीत निरोप सोडत असतो - "तुम्हारी ऐसी की तैसी." गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते, तसा जयबरोबर 'अली'ही (उदय चोप्रा) येतोच !
पुढे काही बाही होत राहतं आणि सगळ्याचा हिशोब थोडक्यात मांडायचा झाल्यास - सुमारे ३ तासाच्या धुमड्यात तासभर बाईक्स व्रुमव्रुमत राहतात. तासभर आमिरवरून कॅमेरा हलत नाही. अर्धा तास गाणी, नाच, सर्कशीत जातो. १५ मिनिटं अभिषेक बच्चनच्या नाकावरील माशी उडवण्याच्या असफल प्रयत्नात जातात आणि उर्वरित १५ मिनिटं उदय चोप्रा प्रेक्षकांना वात आणण्यासाठी वापरतो. कतरिना पानात कतरी सुपारी असते, तशी हरवते किंवा पोह्यांवर भुरभुरवलेल्या खोबऱ्यासारखी नुसतीच दिसते.



आमिरचे बचकांडेपण कधी नव्हे इतकं धुमड्यात जाणवतं. त्या बाईक्सचा धुडांवर बसल्यावर त्याचे पाय खाली कसे पोहोचत असतील, हा एक संशोधनाचा विषय आहे.
दोरावरून बाईक चालवून एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डींगमध्ये जाणे असो की चालू-चालूमध्ये बाईक बोटमध्ये कन्व्हर्ट होणं असो की दोन बाईक्स एकमेकांना खटाखट जोडल्या जाऊन त्यांची एक चार चाकी बनून तिने उडी मारणं असो, सगळंच आजच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील असामान्य बुद्धिमानांसाठी एक जबरदस्त 'फूड फॉर थॉट' ठरायला हरकत नाही.
एकंदरीतच सगळे पाठलाग, स्टण्ट्स बॉन्ड-फॉण्ड, स्पायडर-वायडर मॅनांनी शिकवणी लावावी असेच.

धुमड्या संपल्यावर जरा वेळाने शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलेल्या चार गोष्टी -

१. आमिर आणि शाहरुखमध्ये काही फारसा फरक नाही. दोघेही स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत. 'जतहैंजा' मधला समर आणि धुमड्यातला समर दोघेही सारखेच पकवतात.
२. उदय चोप्रा हे यश चोप्रांना पडलेलं एक भयानक स्वप्न असावं, जे खरं झालंय.
३. प्रत्येक सिनेमागणिक अभिषेक बच्चन एक लांबलचक ठोकळा बनत चालला आहे.
४. रोहित शेट्टी, तू एकटा नाहीस.  

साधारण साडे नऊला धुमड्या संपला. माझ्या सुदैवाने दहा वाजता कलर्सवर '24' चा शेवटचा भाग होता. आमिरने केलेल्या घोर अपेक्षाभंगावर अनिल कपूरने अप्रतिम साकारलेला 'जयसिंग राठोड' एक उत्कृष्ट उतारा होता. त्यामुळे पराकोटीचा निराश झालेलो असतानाही मी शांतपणे झोपी जाऊ शकलो आणि सुचलेल्या बऱ्याच शिव्या विसरू शकलो !
थँक यू, अनिलकाका !

रेटिंग = जतहैंजा  

Wednesday, December 18, 2013

विचारू नका 'काय प्यालास' त्याला

विचारू नका 'काय प्यालास' त्याला
पुरे एव्हढे की विसरला जगाला

तुम्ही शुद्ध सांभाळली, काय झाले?
कुणी थांबुनी पाहतो का तुम्हाला?

तुझे दु:ख वाटे मला आपले, घे
तुला एक प्याला, मला एक प्याला

जुना वाळण्याची नवा वाट पाही
नसे ओढ आता जुनी आसवाला

मशीदी तुझ्या अन् तुझी देउळे पण
मनी फक्त आहे तिचा बोलबाला

तिचे रंग ओठावरी राहिलेले
नवे घोट घेता, नवा स्वाद आला

उधारी नको रोख घे सर्व दु:खा
तुझे व्याज देता रिता होय प्याला

....रसप....
१८ डिसेंबर २०१३

Thursday, December 12, 2013

'वेक अप सिड' - मला जाणवलेला - (Wake Up Sid - Movie Review)

काही वेळेस बोलायला खूप काही असतं. कदाचित, भेटणारी व्यक्ती बऱ्याच काळानंतर भेटलेली असते किंवा अचानक बरंच काही घडलेलंही असतं. अश्या संवादात वेळ चटकन निघून न गेल्यासच नवल. बरेचदा जर बोलण्यासारखं खूप काही असेल, तर अक्षरश: कुणीही बोलायला चालून जातं ! पण खरी दोस्ती तेव्हा कळते, जेव्हा बोलायला खूप कमी असतं किंवा नसतंही, तरी वेळ चटकन निघून जातो. न बोलताही, बरंच काही बोललं जातं. 'क्वालिटी टाईम' ह्यालाच म्हणत असावेत.

एक कलाकार आणि त्याचा श्रोता/ वाचक/ प्रेक्षक ह्यांच्यातल्या नात्याचा विचार करतानाही असेच काहीसे विचार माझ्या मनात येतात. तूर्तास आपण चित्रपटाबद्दल बोलू. समजा एखादी कहाणीच जबरदस्त असेल. जसं की 'मुघल-ए-आझम'. तीन साडे तीन ताससुद्धा सर्रकन् निघून जातात. किंवा (जुना) 'वक़्त'. राजकुमारसुद्धा चालून जातो. पण खरी गंमत तेव्हा असते जेव्हा 'प्लॉट' छोटासाच असतो किंवा काही विशेष असा नसतो, पण तरीही मन गुंतून राहातं.

'वेक अप सिड'.
अगदी सामान्य कहाणी. कुठलेच धक्के, झटके नाहीत. जे जे जसं जसं आहे/ होईल, ते ते तसं तसं दाखवलेलं. प्रामाणिकपणे. पण किंवा म्हणूनच मन गुंततं. इथला प्रत्येक चेहरा आपल्याला परिचित वाटतो. कुणाचा राग येतो, कुणाची कीव येते, कुणाला आपण 'हुं' करून उडवून लावतो आणि कुणी अगदी आपलंसं वाटतं.

सिद्धार्थ मेहरा - सिड - (रणबीर कपूर) एक बडे बाप की बिगडी औलाद. दक्षिण मुंबईच्या अनेक गल्ल्यांत, भागांत असे सिड दिसून येतात. बापाच्या पैश्यावर ऐश करणारे. पब्स-डिस्कोज मध्ये थिरकणारे, महागड्या गाडयांतून मित्रांसोबत मस्तवाल घोड्यासारखे उधळणारे आणि हे सगळं करताना त्यात काही विशेष न वाटणारे. सिडसाठी आयुष्य खूप सोपं आहे. मित्र, त्यांच्याबरोबर टाईमपास, पार्ट्या, मजा-मस्करी, नाईट आऊट्स आणि जेव्हा जे मनात येईल तेव्हा ते करणं. जे तोंडाला येईल ते बोलणं, कुणालाही उडवून लावताना क्षणभर विचारही न करणं. मग ती आई असो वा बाप.
वडिल (अनुपम खेर) एक 'सेल्फ मेड' यशस्वी माणूस. अत्यंत साधारण परिस्थितीतून वर येऊन स्वत:चं एक मोठ्ठं Business Empire उभारलेला एक नावाजलेला उद्योजक. साहजिकच कामाच्या व्यापात मुलाच्या बेमुर्वतखोर वागण्याकडे विशेष लक्ष न देता येणारा, एक हताश, पराभूत बाप. आई (सुप्रिया पाठक), एक अर्धशिक्षित गृहिणी. जिचं जग म्हणजे नवरा व मुलगा, इतकंच. त्यापलीकडे काही नाही. स्वत:सुद्धा नाही.
दुसरीकडे आयेशा (कोंकणा सेन-शर्मा) - लेखिका बनण्याचं स्वप्न घेऊन, कोलकत्याहून मुंबईला एकटीच आलेली एक उत्साही, कॉन्फिडण्ट तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, आयुष्याकडून मोजक्याच पण विशिष्ट अपेक्षा व त्या अपेक्षांची पूर्ती करवून घेण्याचा आत्मविश्वास असणारी आयेशा अति-लाडावलेल्या, लक्ष्य-हीन सिडच्या आयुष्यात येते. किंबहुना, दोघेही एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि क्षणाक्षणातून आनंद टिपणाऱ्या दोघांच्या दृष्टीला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा कोन मिळतो. स्वत:च्याच नकळत सिडमध्ये आमुलाग्र बदल घडवणारी आयेशा, त्याच नकळतपणे तिच्या दृष्टीने तिच्यासाठी पूर्णपणे मिसफिट असलेल्या सिडकडे आकर्षित होते आणि स्वत:च्या आत जाणीवपूर्वक जपलेला 'बच्चा' आयेशाच्या सहवासात कधी मोठा, जबाबदार होतो हे स्वत: सिडलाही कळत नाही.



आपल्याला माहित असतं की पुढे काय होणार आहे. तरी प्रत्येक दृश्य बघावंसं वाटत राहतं. ह्यामागे पडद्यावरील व्यक्तिरेखांचा सहजसुंदर अभिनय खूप महत्वाचा आहे.

रणबीर कपूरने, तसं पाहिल्यास भावनिक चौकट अगदीच छोटीशी असणारं 'सिड'चं पात्र अत्युत्तम साकारलं आहे. त्याची बदलत जाणारी शारीरिक भाषा, त्याच्यातलं खट्याळ लहान मूल त्याच्या डोळ्यांतून दिसणं, त्याचा 'हू केअर्स !' अटिट्यूड आपल्याला अगदी पटतो. काही ठिकाणी त्याच्या वागण्याचा संताप येणं, काही ठिकाणी त्याचा हेवा वाटणं आणि काही ठिकाणी त्याची गंमत वाटणं ह्या आपल्या भावना रणबीरने साकारलेल्या 'सिड'च्या यशाचं द्योतक मानता येऊ शकतात.
सुप्रिया पाठक आणि अनुपम खेर ह्यांना तसं कमी काम आहे. पण प्रत्येक दृश्यात दोघेही जान ओततात.
रणबीर - अनुपम खेरच्या वादाचा आणि नंतर ऑफिसमध्ये संवादाचा असे दोन प्रसंग ह्या सिनेमाचे हायलाईट्स आहेत.

कोंकणाची 'आयेशा' मात्र मन जिंकते. बॉसने डेटची ऑफर दिल्यावर तिचं खट्याळ हसणं, घरातला पसारा पाहून वैतागणं, प्रेमभावनेची जाणीव होणं, अश्या छोट्या-मोठ्या प्रसंगातून तिने अशी काही करामत केली आहे की सिडच्या आधी आपणच तिच्या प्रेमात पडतो. तिचा वावर इतका सहज आहे की जणू हे तिचंच आयुष्य ती जगत असावी. गालावर खळ्या नाहीत, मधाळ चेहरा नाही, दिलखेचक फिगर नाही तरीही ही अभिनेत्री जगातली सगळ्यात सुंदर स्त्री वाटते. Hats off !

शंकर-एहसान-लॉय आणि अमित त्रिवेदीचं संगीत टवटवीत फुलांसारखं तजेलदार आहे. अमित त्रिवेदीचं 'इकतारा' नि:संशय गेल्या अनेक वर्षांत तयार झालेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

सो गयी रात जा के दिन है अब जाग उठा
आँखें मसलता है सारा यह समां
आवाजें भी लेती है अंगडाइयाँ - (जावेद अख्तर)  

किंवा

बीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने
बंद दरवाजा देखे लौटी है सुबह
ठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें
गूँजे टकराके इनमें दिल की सदा - (अमिताभ भट्टाचार्य)

अश्या सहजसुंदर शब्दांतून पडद्यावरील पात्र व्यक्त होतात.

निरंजन अयंगारचे संवादही साधेच, कुठलीही फेकाफेक नसलेले आहेत, अगदी तसेच जशी अयान मुखर्जीच्या कथेची गरज आहे.

अत्यंत सामान्य कथानकाला एखाद्या कवितेसारखं सादर करणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मन:पूर्वक अभिनंदन ! प्रत्येक दृश्य, प्रत्येक क्षण अत्यंत तजेलदार ठेवल्याने हा चित्रपट तरुणाईची एक जादूई, हळुवार झुळुक अंगावरून नेतो. सिडने बोलता बोलता आयेशाला सहज प्रपोज करणं आणि तिने त्यावर त्याला त्याच सहजतेने नाकारणं, अशी काही दृश्यं रंगवताना अयान मुखर्जीने हा विचार केलेला जाणवतं की हे खऱ्या आयुष्यात घडलं असतं, तर कसं घडलं असतं ?
दोन सव्वा दोन तासानंतर चित्रपट संपल्यावर गालावर मोरपीस फिरल्यासारखं हलकं हसू आपल्या चेहऱ्यावर राहतं. असं आजकाल क्वचितच अनुभवायला मिळतं, नाही ?

'वेक अप सिड' ही एक सोप्या शब्दांतली प्रामाणिक कविता आहे. त्यात काही ठिकाणी काही चुका असतील, पण तरी तिचा परिणाम कमी होत नाही. हा चित्रपट सर्वश्रेष्ठ नसेल, पण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा निश्चितच आहे.

....रसप….

ह्या चित्रपटावर लिहिण्याची प्रेरणा दिल्याबद्दल फेसबुकवरील मीनाक्षी कुलकर्णी ह्यांचे मनापासून आभार !

Wednesday, December 11, 2013

अंधार

ऊब देण्यास असमर्थ शाल
काही बोचऱ्या शब्दांची उशी
पुन्हा पुन्हा कूस बदलणे
मनात बेचैनी अखंडशी

अशीच एक रात्र पुन्हा येणार आहे
आजही माझी तयारी कमी पडणार आहे

घडयाळाचा काटा डोळ्यांत टिकटिकत राहील
वेळ कूर्मगतीने पुढे सरकत राहील
तरी वेळ बदलणार नाही
अंधार ओसरणार नाही..

....रसप....
११ डिसेंबर २०१३

Sunday, December 08, 2013

पुस्तक

एक पुस्तक लिहावं, असा विचार करतो आहे

नाव 'तू'
हक्क तुझे
प्रस्तावना तुझी
मुखपृष्ठ तू
मलपृष्ठही तूच
आतला शब्दन् शब्द तुझाच
फक्त मनोगत माझं....

हे पुस्तक जगासाठी नसेल
फक्त आपल्यासाठी असेल
कारण खूप काही अव्यक्त राहिलंय
कारण खूप काही अव्यक्तच राहणार आहे

एक पुस्तक लिहिणार आहे
आठवांच्या पानांवर, आसवांच्या शाईने..

....रसप....
७ डिसेंबर २०१३

Saturday, December 07, 2013

जाग


अंगावरची शाल बाजूला झाल्याने थंडी वाजतेय,
असं वाटून जाग आली
प्रत्यक्षात तू जराशी बाजूला झाली होतीस
तुझा सैल पडलेला हात माझ्या गळ्यात होता,
पण तो शालीसारखाच निपचित

तुझ्या केसांचा सुगंध श्वासांत बाकी होता
विझलेल्या उदबत्तीच्या गंधासारखा
तुझ्या स्पर्शाचा शहारा अजून जाणवत होता
मावळतीच्या तांबड्या रंगासारखा

त्या पहाटे सूर्य उगवला नाही
आजपर्यंत सूर्य उगवलाच नाही

....रसप....
७ डिसेंबर २०१३

Wednesday, December 04, 2013

अनासक्त

चांदण्यांनी जमिनीवर उतरावं, तसा -
रोज पहाटे ओलसर अंगणात,
पारिजातकाचा सडा असतो..
तू बोलायचीस तेव्हा असाच सडा
मोत्यांचा पडायचा
जो तू नसताना मी तासन् तास न्याहाळायचो

वेचलेला सुगंध जसा सहज उडून जातो,
तितक्याच सहज तू दुरावलीस
हे झाड म्हणून तुझ्यासारखंच आहे,
माझंच असूनही परकं आणि
अनासक्तीने सगळ्या चांदण्या झटकून देणारं...

....रसप....
४ डिसेंबर २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...