Saturday, November 09, 2013

'सत्या'चार - (Movie Review - Satya -2)

कलाकाराने आयुष्यभर विद्यार्थी राहायचं असतं. किंबहुना, जो आयुष्यभर विद्यार्जन करत राहातो, तोच चांगला कलाकार असतो. ज्या क्षणी, 'मला आता हे येत आहे' अशी भावना मनात उत्पन्न होते, त्याच क्षणी कलेचा व कलाकाराचा ऱ्हास सुरु होतो. कधी मिळालेला पैसा, लाभलेली प्रसिद्धी डोक्यात शिरते आणि काही अश्या निर्मिती खपून जातात ज्या प्रत्यक्षात साधारण असतात, हे त्या कलाकाराला माहित असतं. पण 'मी काहीही केलेलं आवडून जातंय' अशी एक 'ग'ची बाधा होते आणि मग निर्मितीमागे पूर्वीसारखी मेहनत घेतली जात नाही, वैचारिक बैठक कमजोर होते किंवा नष्टही होते. इथपर्यंत येईतो लोकांचं प्रेम आटलेलं असतं आणि अचानक त्या कोणे एके काळच्या उत्कृष्ट कलाकाराला, त्याचे कोणे एके काळचे चाहते झिडकारतात, नाकारतात, जागा दाखवतात. झोपेत बरळणाऱ्याला खणखणीत कानाखाली बसावी आणि तो खाडकन् जागा व्हावा, तसं सर्वज्ञानाच्या फसव्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या त्या कलाकाराला सत्यस्थितीचे भान येते आणि तो धाडकन् जमिनीवर आपटतो.
रामगोपाल वर्मा कधी जमिनीवर आपटणार आहे, ह्याची माझ्यासारखे त्याचे कोणे एके काळचे चाहते वाट बघत असावेत. रामूने 'शोले'चा रिमेक बनवला तेव्हाच त्याच्यावर सर्वच स्तरांतून झालेली टीका खरं तर जाग येण्यासाठी पुरेशी होती, पण नाही आली. एकेका सिनेमागणिक रामू स्वत:च स्वत:चं तोंड काळं करत राहिला आणि आता त्याने 'सत्या-२' बनवला. शोलेचा रिमेक पाहिल्यावर अनेकांनी म्हटलं होतं की, 'वाटच लावायची असेल, तर दुसऱ्या कुणाच्या निर्मितीची का लावायची. स्वत:च्याच एखाद्या निर्मितीची लावावी की !' त्या लोकांची ही इच्छा 'सत्या - २' मधून पूर्ण झाली आहे.

'सत्या' - हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड. 'गँगवॉर मूव्हीज' प्रकारात हिंदी चित्रपटाला एका वेगळ्या पातळीवर ह्या चित्रपटाने नेलं. अण्डरवर्ल्डकडे बघण्याचा दृष्टीकोन, तो विषय हाताळण्याची विचारधारा ह्या चित्रपटाने पूर्णपणे बदलून टाकली. बराच काळ झाकोळलेला मनोज वाजपेयीसारखा एक तगडा अभिनेता झोतात आणला. 'सत्या' हा रामूचाच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांतला एक असावा. अश्या चित्रपटाला 'सत्या - २' उजळणी देणार होता.

ह्या उजळणीची सुरुवात संमिश्र होते. कॅमेरा अप्रतिम फिरतो, फिरवतो आणि निवेदक सदोष हिंदी बोलतो. तो आवाज ओळखीचा आहे, पण कोण आहे ते विचार करण्यात वेळ दवडावासा वाटला नाही. कुठल्याश्या गावातून 'सत्या' (पुनीत सिंग रत्न) मुंबईत येतो, त्याच्या प्राणप्रिय प्रेयसीला - 'प्रिया' (अनाइका सोती)ला - न सांगता. का ? माहित नाही. विचारलं तर म्हणतो, 'विचारायचं नाही!'. बरं ज्या मुंबईत ४ संपर्क दिल्याशिवाय कुणी चपराश्याची नोकरी देत नाही, तिथे ह्याला एक करोडपती बिल्डर (महेश ठाकूर) सहाय्यक म्हणून ठेवतो. त्याचं पूर्ण नावही न विचारता ! ह्या बिल्डरच्या मदतीने इतर काही बड्या धेंडांशी ओळख वाढवून, त्यांची मोठमोठे डॉन व त्यांचा वारेमाप पैसासुद्धा करू शकत नसलेली कामं चुटकीसरशी करून सत्या आपलं बस्तान बसवतो. त्याला बनवायची असते एक 'कंपनी'. बोले तो - 'गँग' ! अशी गँग जिचे मेंबर्स कोण आहेत, हे त्यांना स्वत:लाही माहित नसेल. पैसा कुठून येतो, कसा येतो हे कुणालाही कळू नये म्हणून तो एक 'फायनान्शियल कन्स्लटन्ट'सुद्धा नेमतो ! (तो नेमकं काय करणार असतो हे कथालेखकाच्या डोक्याबाहेरचं असल्याने ते दाखवलेलं नाही. पण तो काही तरी करतो आणि ते व्यवस्थित करतो ह्यावर अंधविश्वास ठेवणे, हे इथे प्रेक्षकांकडून अपेक्षित आहे.) ह्या कंपनीत सगळे सिस्टिममुळे दुखावलेले लोक असतात. सिस्टिमने दुखावलेला कुणीही माणूस गँगस्टर बनू शकतो, देशद्रोह करू शकतो, गद्दारी/ नमक-हरामी करू शकतो आणि तेही एका पूर्ण नावही न सांगणाऱ्या छपरी झिपऱ्याच्या शब्दांत येऊन, इतका दुधखुळेपणाही प्रेक्षकांत असायलाच हवा, म्हणजे हे पटतं.

पुढे ही अत्यंत फडतूस कथा, त्याहून फुटकळ सादरीकरणाने पुढे सरकते. अनेक निष्पाप मरतात आणि सगळ्यांचा तथाकथित बाप 'सत्या' कोठडीत जातो. पण तरीही ही स्टोरी संपत नाही. निवेदक धमकी देतो की बाकीची कहाणी पुन्हा कधी तरी सांगीन ! समोरचा पडदा काचेचा नसतो आणि प्रोजेक्टर लगेच झाकला जातो त्यामुळे चप्पल फेकून काही फुटणार नसतं. म्हणून ती धमकी ऐकून क्षणभर संतापलेलं पब्लिक 'खड्ड्यांतून रस्ता शोधतो, फुरफुरणारे नळ बघतो, सडकछाप लोकप्रतिनिधींना मत देतो तर एक गंडलेला पिच्चर पण सहन करू आता !' अशी काहीशी मनाची समजूत घालून मुकाटपणे बाहेर पडतं.


पुनीत सिंग रत्न हे एक असं रत्न रामूने निवडलं आहे की सांगावं ! हा दिसतो 'चंद्रचूड सिंग'सारखा, बोलतो 'चक्रवर्ती'सारखा आणि अभिनय म्हणजे 'सुनील शेट्टी' झक मारेल असा ! इंटरव्ह्यू दिल्यासारखे सपाट डायलॉग मारणं आणि 'ठिक्कर पाणी' खेळल्यासारखं चालणं हे दोन नियम सगळीच पात्रं इमाने इतबारे पाळतात. कदाचित त्याच अटीवर त्यांना काम दिलं असावं. एक व्यक्तिरेखा तर सहजता यावी म्हणून कंबरडं मोडलेलीही दाखवली आहे.

'पुनीत'चं रत्न शोभेल अशीच त्याची जोडीदार आहे. 'अनाइका सोती' हे  नाव जितकं अनाकलनीय आहे, तितकीच व्यक्ती अनाकर्षक. आणि पुनीत रत्न जितका ठोकळा आहे तितकीच ही थडथडा उडणारं पॉपकॉर्न. एक जोक ऐकला होता. बसचे तिकीट काढताना प्रवासी म्हणतो, 'दीड तिकीट द्या. कारण माझा हा मित्र डोक्याने अर्धवट आहे.' कंडक्टर म्हणतो, 'तरी दोन घ्यावीच लागतील. त्यांचं अर्धं आणि तुमचं दीड!' रामूने हिरो + हिरवीण = २ होण्यासाठी असाच काहीसा हिशेब केला असावा.

गाणी का आहेत ? हा प्रश्न त्या गाण्यांपेक्षाही जास्त अत्याचार करतो. तो जो कुणी पुरुष गायक आहे तो फिक्का चहा भुरके आणि झुरके मारून प्यायल्यासारखा भंकस गाणी आळवून आळवून गातो. डोक्याला शॉट !!

एक मात्र खरंय; मी 'सत्या - १' पाहिल्यावर जितका भयसाटलो होतो, तितकाच 'सत्या - २' पाहून भयसाटलो. पिच्चरचं प्रत्येक अंग वाईटात वाईट कसं करता येईल, ह्याकडे रामूने अगदी जातीने लक्ष पुरवले आहे. आणि हा त्याचा प्रयत्न अगदी १००% यशस्वी झालेला असल्याने, ही सर्टनली डिझर्व्ज अ‍ॅन अप्प्लॉज !

वेल डन रामू ! वे टू गो.............................................................................................. टू गेट लॉस्ट.

रेटिंग - घंटा 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...