सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.
पहिला दबंग सल्लूपटांतला शिरोमणी होता. त्याचाच हा दुसरा भाग, म्हणजे हाणामाऱ्यांमध्ये (नवराबायकोच्या फिल्मी भांडणां उडणाऱ्या उश्यांप्रमाणे) ठोश्यासरशी उडणारी माणसं आली (इथे ती टप्पे वगैरे पण खातात, हे मूल्यवर्धन), बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं वाकडं-तिकडं होऊन हसणं आलं आणि शेवटच्या दृश्यात सल्लूभायच्या शर्टाने लाजणंही आलंच. हे सगळं येणार हे माहित असतानाही हा सिनेमा बघायचा होता म्हणून मी सोबत एक मोठी रिकामी पिशवी घेऊन गेलो होतो.. बायको आणि माझं डोकं काढून ठेवायला !
तर डोकं काढून ठेवेपर्यंत जरासा उशीर झाला आणि सुरुवातीचा काही भाग चुकला.. पण जिथून पाहिला तिथून पुढे असं काहीसं झालं -
पहिल्या दबंग प्रमाणे (प.द.प्र.) एका गोडाऊनमध्ये इन्स्पेक्टर पांडे १५-२० गुंडांना यथेच्छ तुडवतो, उडवतो आणि त्याच्या तावडीतून एका लहान मुलाला सोडवतो. प.द.प्र., गोडाऊनच्या बाहेर त्याचे सहकारी पोलिस उभे असतात आणि प.द.प्र.च इथेही तो गुंडांनी 'कमावलेला' माल हडप करतो. (मुलाच्या बदल्यात देण्यासाठी बापाने आणलेले पैसे) पूर्वी लालगंजमध्ये असणाऱ्या इन्स्पेक्टर पांडेची आता कानपूरला बदली झाली आहे आणि त्याच्या सोबतीने तिवारी-मिश्रा सुद्धा आहेत. त्यांच्याशिवाय सिद्दिकी आणि अजून एक-दोन जण नव्याने आले आहेत. कानपुरातला बाहुबली आहे बच्चा भैया (प्रकाश राज). त्याचे दोन भाऊ - चुन्नी आणि गेंदा. हे तिघे मिळून कानपुरात दहशतीचं साम्राज्य पसरवून असतात. अर्थातच 'रॉबिन हूड' पांडे वि. बच्चा भैया पार्टी असा सामना रंगतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही खेळाडू आश्वासक खेळ करतात, पण मध्यंतरात हत्तीच्या कानात मुंगी पुटपुटते आणि अचानक खेळ गुंडाळला जातो.. प.द.प्र., इथे पांडे 'एकटा जीव सदाशिव' नसतो, आता भाऊ, बाप व बायकोसोबत राहाणारा जबाबदार कुटुंबकर्ता असतो. साहजिक आहे, त्याच्या पोलिसी दुष्मनीचे चटके त्याच्या कुटुंबाला बसतात. वडिलांना धमकी, भावाला मार आणि गरोदर बायकोच्या मनावर मूल जन्माआधीच मरायचा वार.. हे सगळं झाल्यावर रॉबिन हूड पांडे चवताळतो आणि कपडे काढून (स्वत:चे) सर्व दुर्जनांना यमसदनी धाडतो. हे सगळं करताना तो अनेक अचाट हाणामाऱ्या करतो, मध्ये-मध्ये वेळ मिळाल्यावर कधी भावासोबत, कधी बायकोसोबत, कधी पोलिसांसोबत तर कधी नर्तकींबरोबर रस्त्यावर/ स्टेजवर/ परदेशात वगैरे ठिकाणी नाचतो व गातो. खुसखुशीत संवादही 'फेकतो'. एकंदरीत विद्या बालनला जामच सिरीयसली घेऊन मनोरंजन-मनोरंजन-मनोरंजन करतो.
शीर्षक गीत (पु. लं. च्या भाषेत) 'बिपीशायला जायपीचा डबा' जोडल्यासारखं प.द.प्र.'हूड हूड दबंग..दबंग..दबंग..' करतं. बाकी गाणी ठीक-ठाक. 'दगाबाज नैना' प.द.प्र. 'तेरे मस्त मस्त दो नैन..' ची जादू करतं.
प्रकाश राज सारख्या नटाला पूर्णपणे वाया घालवलं आहे. संपूर्ण चित्रपटात त्याला एकून मिळून १५ वाक्यंही नसावीत. प.द.प्र. सोनू सूदइतका रोल तरी त्याच्यासाठी लिहिला जायला हवा होता.
सोनाक्शी सिन्हा आता जरा तासलेला ओंडका दिसायला लागली आहे. तिचं आकारमान आटोक्यात येण्याच्या मार्गावर असलं तरी कंबर मात्र काही केल्या हलता हलत नाही आणि नाकावरची माशी काही केल्या उडता उडत नाही.
अरबाज व विनोद खन्नालाही काहीही काम नाही.
छायाचित्रणाला विशेष वाव नव्हताच, पण तेवढ्यातही माती खाऊन झालीय.
दिग्दर्शक अरबाज खान, हीरो सलमान असल्याने तरतो, अन्यथा अजून खूप प्रयत्न हवे आहेत नक्कीच. लहान मुलाने, आधीच काढून दिलेली अक्षरं गिरवावीत तसा तो बहुतांश पहिला दबंग जसाच्या तसा गिरवतो.
सलमान खान हा अभिनेता नाही म्हणजे नाहीच. तो फक्त हीरो आहे आणि त्याची हीरोगिरी प.द.प्र. इथेही पैसा वसूल ! नाही म्हणायला त्याने इस्पितळातल्या एका दृश्यात डोळ्यात पाणी वगैरे आणलं आहे, ती त्याच्या अभिनयाची पराकाष्ठा असावी.
एकूणात, प.द.प्र. हा 'दबंग' थ्रूआउट मनोरंजन न करता अर्ध्यावरच बावचळतो.
सिनेमा पाहन बाहेर आल्यावर मला पहिला दबंग पाहाण्याची अतीव इच्छा झाली, पण बाहेर येईपर्यंत खऱ्या पोलिसांनी माझी बाईक उचलून नेली होती, ती सोडवून आणण्यात इच्छा विरली आणि 'खरे पोलिस' कसे असतात ह्याची जाणीव पाकिटाला जबरदस्त फोडणी बसून झाली !
असो... ह्यात पांडेजीचा काय दोष ?
रेटिंग - * *
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!