कधी 'फ्लश' खेळला आहात? जुगार... तीन पत्ती..! ह्या तीन पत्तीमध्ये अफलातून पानं (ट्रायो/ कलर सिक्वेन्स इ.) क्वचितच येतात. बहुतकरून जोड्या किंवा सपाट पानं येत असतात. चांगला खेळणारा असतो ना, तो ह्या जोड्यांच्या किंवा सपाट पानांच्या जोरावर 'ब्लफ' करतो आणि जिंकतोही! पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं! भयपट म्हणजे पण असाच एक जुगार असावा. 'आता काही तरी होणार' असं भासवून काहीच न घडवणं.. हे 'ब्लफ' एका मर्यादेपर्यंत ठीक. पण हे 'ब्लफिंग' अति झालं, की जेव्हा खरोखरच काही 'होतं', तोपर्यंत हवा निघून जाते आणि मोठ्या आवेशात 'शो' करावा, तर बाजी फिक्कीच असते फार काही जिंकलेलं नसतंच, कुणी काही 'लावलेलं' नसतंच !! 'भूत रिटर्न्स' चा जुगार असाच फसला आहे.
एक असतो रामू. हुशार, सुस्वभावी आणि चुणचुणीत मुलगा. वर्गात अगदी पहिला नंबर नसला, तरी पहिल्या पाचात हमखास. शाळेच्या प्रत्येक वर्षी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी असणारा रामू दहावीत येतो आणि काही तरी बिनसतं. तो सगळ्यांशी फटकून वागू लागतो. गृहपाठ अर्धवटच करू लागतो. शिक्षकांच्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरं देऊ लागतो. वर्गात असताना लक्ष भलतीकडेच, शून्यात पाहात बसू लागतो.. कसाबसा पास होऊन रामू शाळेतून बाहेर पडतो. पण त्याला अचानक काय झालं होतं हे समजत नाही. काही जण म्हणतात, 'रामूला भुताची लागण झाली!'.
------------------------------------ ही सिनेमाची कहाणी नाही हो! ही आपल्या रामूची कहाणी आहे. रामू... आपला पूर्वीचा रामगोपाल वर्मा. त्यालाही अशीच भुताची लागण झाली आणि त्याचा 'रामसेगोपाल वर्मा' झालाय. म्हणून तर त्याने 'भू.रि.' बनवला!
सर्वपथम, ह्या सिनेमाला 'भू.रि.' म्हटल्यामुळे ह्याचा 'उर्मिला'वाल्या 'भूत'शी काही संबंध आहे, असं जर तुम्हाला वाटलं असेल.. तर तसं काहीही नाहीये ! हाच सर्वात पहिला 'ब्लफ' आहे रामूचा! सिनेमाची कहाणी मी अगदी थोडक्यात सांगतो कारण ती 'अगदी थोडकी'च आहे
एका 'शबू' नामक भूताने झपाटलेल्या घरात एक नवीन कुटुंब राहायला येते. तरुण अवस्थी (चक्रवर्ती), बायको नम्रता अवस्थी (मनीषा कोईराला), मोठा मुलगा 'तमन' आणि लहान मुलगी 'निमी'. सोबत एक नोकर 'लक्ष्मण' आणि ते राहायला आल्यानंतर अचानक सरप्राईज म्हणून आलेली 'तरुण'ची लहान बहिण 'प्रिया' (मधू शालिनी). 'शबू' लहानग्या निमीला पछाडते. पुढे काय घडतं ते सांगण्या-ऐकण्या-लिहिण्या व पाहण्याइतकं महत्वाचं नाहीच ! जे कुठल्याही भुताटकीच्या सिनेमांत होतं तेच आणि तस्संच..!
फक्त दीड तासाचा सिनेमाही रटाळ कसा बनवता येतो, हे अभ्यासण्यासाठी भू.रि. अवश्य पाहावा. नि:शब्दपणे, संथ गतीने कॅमेरा फिरून फिरून आपल्या घाबरण्यासाठीच्या इच्छेचा अंत पाहातो. जे काही घडतं, ते फक्त शेवटच्या १५-२० मिनिटात घडतं आणि ते 'भयावह' पेक्षा 'बीभत्स' प्रकारात मोडतं.
'भू. रि.' चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याची पात्रनिवड आहे. एकही पात्र भूमिकेशी न्याय करत नाही. 'चक्रवर्ती' नामक दगड तर निव्वळ असह्य. मनीषा का परत आली आहे, हे तिला किंवा रामूलाच ठाऊक. दोन्हीही मुलं नुसतीच वावरतात. काहीही 'स्पार्क' नाही. बहिणीच्या भूमिकेतील 'मधू शालिनी' तर फक्त उघड्या मांड्या दाखवण्याची सोय असावी.
संदीप चौटाचं आदळआपट करणारं पार्श्वसंगीत 'भो:' करण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न पिक्चरभर करत राहतं.
एकंदरीत हा सिनेमा पाहिल्यावर माझी तरी खात्री पटली आहे की रामूला त्याचे जुने मित्र मणीरत्नम, शेखर कपूर ह्यांची सांगत आवश्यक झाली आहे. त्याच्या मानगुटीवर बसलेलं भुताटकीचं भूत त्याने लौकरात लौकर झटकायला हवं नाही तर 'फॅक्टरी' बुडणार हे निश्चित.
टू कन्क्ल्युड, इतकंच म्हणावंसं वाटतं - 'गेट वेल सून, रामू..!'
रेटिंग - १/२*
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!