Wednesday, October 31, 2012

'साहिर'


उघड्या छातीवर वेदनेच्या झळांना
मुद्दाम, जाणीवपूर्वक झेलून
मी हृदयाला पोळले
आणि स्वत:च चालवल्या त्यावर कट्यारी
उभ्या, आडव्या, तिरक्या.... आरपारही
थबथबलेल्या हृदयातून ओघळणाऱ्या
प्रत्येक थेंबाला
कागदावर पसरवलं
आणि माझ्या उधार वेदनेचं
कृत्रिम भावविश्व मोठ्या आर्ततेने चितारलं
लालेलाल शब्दांनी
पानभर चितारूनही समाधान झालं नाही..
बोळा करून अजून एक पान कोपऱ्यात जमलेल्या ढिगाऱ्यात भिरकावलं..
वहीचं शेवटचं पान उरलं होतं..
माझ्याच नकळत, माझ्याच हातांनी लिहिलं -
'साहिर' !
त्या वेळी डोळ्यांना झालेली जखम खरी होती..
आता रक्ताला डोळ्यांतून टिपून..
कागदावर वेदनेला सजवायचं ठरवलं आहे..
'साम्यवादाने' !!

....रसप....
३१ ऑक्टोबर २०१२  

Tuesday, October 30, 2012

वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?


वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?
सरूनही पायी घुटमळणाऱ्या रस्त्यांचे काय करू ?
 
दुरून माझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांनी तुझ्या दिले
आज तुझ्या स्पर्शाने पडलेल्या प्रश्नांचे काय करू ?

एक गुन्हा केला प्रेमाचा, दुसरा हा की सांगितले
तुला भेटलो पुन्हा पुन्हा त्या अपराधांचे काय करू ?

तुझ्या सोबतीने सुचलेल्या कवितांना विसरुन झाले
विरहाच्या दु:खातुन फुलणाऱ्या गझलांचे काय करू ?

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?

खळकन तुटता पापणीमधे पाण्यासोबत स्वप्न झरे
काळजात रुतलेल्या खुपणाऱ्या काचांचे काय करू ?

आजकाल मी महत्प्रयासाने नजरेला आवरतो
मनामधे दाटुन येणाऱ्या उचंबळांचे काय करू ?  

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, कठिण जरी
गजबजलेल्या घरात माझ्या, एकांतांचे काय करू ?

....रसप....
२९ ऑक्टोबर २०१२  

Monday, October 22, 2012

अस्मादिक


स्वत:च दु:खाला कुरवाळत जपले आजपर्यंत जरी
दुसऱ्याच्या रडण्याला क्षुल्लक मानत असतो खुद्द तरी
"मित्रा, भरून आलेल्या थेंबाला गिळून हसणे शिक"
असले फुक्कट सल्ले देण्याला अग्रेसर अस्मादिक !

कुठे दूरवर झोपडीतला कंदिल निवांत मिणमिणतो
माळावरच्या घुबडाच्या सोबत रात्रीला जागवतो
मोजत असते घड्याळ त्याची एकटेच टिकटिक टिकटिक
कधी उशीवर वा खिडकीशी हिशेब करती अस्मादिक !

फक्त उद्याच्या काळजीमुळे 'आज' कितीसे कुरतडले
तरी 'उद्या' ना अजून आला रोज नव्याने खुणावले
ठेच लागल्यावरही ना बदले एखादा चिवट पथिक
दूरदृष्टिचा आव आणती खरे आंधळे अस्मादिक  

बरेच असते मनात पण ना कृतीत काही अवतरते
रोजच इमले उंच नवनवे चंचल मन बांधू बघते
शब्द बांधणे शब्द सांडणे होत न काही उणे-अधिक
उगाच गुरगुरती, चरफडती अन घुसमटती अस्मादिक

ओढुन ताणुन गोल लपेटुन बांधुन आवळती नाती
अन डोक्यावर ओझे घेउन प्रेमाचे गाणे गाती
कुंडीमध्ये हसतो चाफा अंगण पडले ओस पडिक
हवे तेव्हढे सारवणारे, सावरणारे अस्मादिक !

'आपल्याच विश्वी रमलेले अप्पलपोटे' म्हणे कुणी
मुखदुर्बळ, निश्चल, निष्प्रभ संभावुन किंमत करे कुणी
जबाबदाऱ्यांना वागवता उडते जी त्रेधा तिरपिट
मुकाट कसरत जीवनभर ती करत राहती अस्मादिक..!


....रसप....
२१ ऑक्टोबर २०१२

Saturday, October 20, 2012

Blunder of the year ! (Student of the Year - Movie Review)


'हसत खेळत शिक्षण' ही संकल्पना मी तरी अनुभवली नाही आणि मला नाही वाटत माझ्या पिढीच्या इतर कुणीही अनुभवली असावी किंवा आजची पिढी अनुभवत असावी. पण करण जोहरने मात्र ती अनुभवली आहे, हे नक्की. तो शिकला आहे हे त्याला इंग्रजी छान येतं ह्यावरून कळतं आणि तो हसत खेळत(च) शिकला आहे हे त्याचा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' पाहून कळावं. (तसं तर ते 'कुछ कुछ होता हैं' मध्येच दिसलं होतं पण तेव्हा तो लहानही होता!)
असो.

सिनेमा पाहाण्याआधी (किंवा हे परीक्षणही वाचण्याआधी) मला सांगा -
"तुम्ही कुछ कुछ होता है, जो जीता वोही सिकंदर,दिल तो पागल हैं, मोहब्बतें, मैं हूं ना,कल हो ना हो, जाने तू या जाने ना हे सिनेमे पाहिले आहेत का ?"
हो? मग 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' मध्ये आणि ह्या परीक्षणातही तुम्हाला नवीन काही मिळणार नाहीये! सेव्ह युअर मनी. सेव्ह युअर टाईम.

सुरुवात होते अत्यंत बंडल, घरी बनविल्यासारख्या अक्षरातील टायटलल्सनी.
मग सिनेमा सुरू होतो. फर्स्ट टेक - 'जाने तू या जाने ना..' चौघे मित्र मिळून कथाकथन करत आहेत.
पुढे सुरु होतो 'मोहब्बतें'. मस्तपैकी कॉलेज.. (त्याला 'स्कूल' म्हणायचं असतं) इतकं जबरदस्त की, मी त्या कॉलेजात गेलो असतो तर आयुष्यभर पास झालोच नसतो.
मग थोडासा - मैं हूं ना.. थोडा 'दिल तो पागल हैं'..थोडा 'कल हो ना हो..' भरपूर 'कुछ कुछ होता है' आणि ''जो जीता वोही सिकंदर' असा सगळा ढापूगिरीचा प्रवास करत 'कभी अलविदा ना कहना..' चा शेवट कसा 'अंत' पाहातो, तसा अंत पाहून सिनेमा संपतो.
कीर्तनाची नांदी आणि शेवटचा गजर कसा जेव्हढ्यास तेव्हढा असायला हवा ना..? जास्त लांबवूनही किंवा अगदी चटकन उरकूनही चालणारं नसतं. तसंच सिनेमाचंही असावं. पण हे करणला कसं कळणार ? तो प्रॉम्स, डिस्कोज इ. ला गेला आहे, कीर्तन? जीजस क्राईस्ट.. व्हॉट इज इट लाईक?

तुम्ही अजून वाचताय ? स्टोरी ऐकायचीच आहे? ओके!



एक लै भारी, 'आटपाट' कॉलेज (त्याला 'स्कूल म्हणायचं - हे एकदा सांगूनही समजत नाहीये माझं मलाच!) असतं. (इतकं लै भारी असतं की प्रत्येक मुला/ मुलीच्या बाकावर स्वतंत्र असा टेबल लॅम्प, सेव्हन स्टार हॉटेलचा डायनिंग हॉल फिका पडेल असं कॅन्टीन, दिल्लीचा लाल किल्ला + उदयपूरचा एखादा राजवाडा + मुंबईची नॅशनल लायब्ररी + ताज महाल हॉटेल + आजपर्यंत पाहिलेली सगळी कॉलेजं X ४-५ अशी एकंदरीत इमारत) इथे असतो एक श्रीमंत बापाचा पोरगा रोहन (वरुण धवन) आणि त्याची श्रीमंत गर्लफ्रेंड शनया (आलीया भट्ट). हे दोघं मजेत राज्य करत असतात आणि मग येतो एक मध्यमवर्गीय घरातला अभिमन्यू सिंघ (सिद्धार्थ मल्होत्रा). पुढे जे काही होतं ते आजपर्यंत 'क्ष' वेळा झालेलं आहे. ते तसंच होतं आणि जाम पकवतं.

सिनेमा बघताना/ बघितल्यावर तुम्हाला असे काही प्रश्न पडले तर तुमची सारासारविचारशक्ती शाबूत आहे -
१. हे नक्की कुठल्या अभ्यासक्रमाचं कॉलेज आहे? (स्कूल!!) कारण, रोहन-शनया व कं. तिथे आधीपासून Established आहेत आणि अभिमन्यू नंतर येतो पण सगळे एकत्रच!
२. त्यांना एकदाही काहीही शिकवलं जात नाही! फक्त खेळत असतात नाही तर नाचत असतात नाही तर भांडत असतात.. नक्की शैक्षणिक संस्थाच आहे ना?
३. आई बाप नसलेला, काकांकडे उपऱ्यासारखा राहणारा अभिमन्यू असल्या टकाटक कॉलेजची (स्कूल!!) जिथे करोडपती बापांची पोरंही शिकत(?) आहेत, फी कशी जमवतो?
४. नक्की 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' निवडायचा असतो की ' स्पोर्ट्समन ऑफ द इयर'?

नवीन चेहरे वरुण (डेव्हिडचा पोट्टा), आलिया (महेशरावांची कार्टी) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (सेंट परसेंट 'मॉडेल') दिसायला फ्रेश दिसतात. वरुण धवन लक्षात राहातो. 'आलिया' म्हणजे.. 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागते. सिद्धार्थ मल्होत्रा एका क्षणासाठीही कुमारवयीन वाटत नाही आणि एखादा मॉडेल जितपत अभिनय करू शकतो, तितपतच करतो.
छोट्याश्या भूमिकेतील 'कायोझ इराणी' (सिनेमात 'कायोझ सोडावॉटरबॉटलओपनरवाला' उर्फ 'सुडो') छाप सोडतो. त्याला अखेरीस एका दृश्यात बराच वाव मिळाला आहे. त्या एका दृश्यात तो सिनेमा खाऊन टाकतो. (शेवटी 'बोमन'चा पोरगा आहे!)  
करण जोहरच्या सिनेमाची पटकथा इतकी ठिगळं जोडलेली पहिल्या प्रथमच !
संगीत, २-३ पंजाबी गाणी काहीही समजत नाहीत, ती बहुतेक स्वानंदासाठी बनवली असावीत. राधा, रट्टा मार ही गाणी बरी जमली आहेत. (म्हणजे विशाल-शेखर अजून 'रीकव्हरेबल' आहेत.)
ऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर व इतर मंडळी आपापलं काम चोख करतात.

खुसखुशीत संवाद काही ठिकाणी चांगली विनोदनिर्मिती व काही ठिकाणी चांगले 'ठोसे' (Punches) देतात.

एकूण विचार केल्यास हा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' म्हणजे करण जोहरचं 'ब्लंडर ऑफ द इयर' आहे.

रेटिंग - **

Saturday, October 13, 2012

Bhoot Returns for nothing ! (Bhoot Returns - Movie Review)


कधी 'फ्लश' खेळला आहात? जुगार... तीन पत्ती..! ह्या तीन पत्तीमध्ये अफलातून पानं (ट्रायो/ कलर सिक्वेन्स इ.) क्वचितच येतात. बहुतकरून जोड्या किंवा सपाट पानं येत असतात. चांगला खेळणारा असतो ना, तो ह्या जोड्यांच्या किंवा सपाट पानांच्या जोरावर 'ब्लफ' करतो आणि जिंकतोही! पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं! भयपट म्हणजे पण असाच एक जुगार असावा. 'आता काही तरी होणार' असं भासवून काहीच न घडवणं.. हे 'ब्लफ' एका मर्यादेपर्यंत ठीक. पण हे 'ब्लफिंग' अति झालं, की जेव्हा खरोखरच काही 'होतं', तोपर्यंत हवा निघून जाते आणि मोठ्या आवेशात 'शो' करावा, तर बाजी फिक्कीच असते फार काही जिंकलेलं नसतंच, कुणी काही 'लावलेलं' नसतंच !! 'भूत रिटर्न्स' चा जुगार असाच फसला आहे.



एक असतो रामू. हुशार, सुस्वभावी आणि चुणचुणीत मुलगा. वर्गात अगदी पहिला नंबर नसला, तरी पहिल्या पाचात हमखास. शाळेच्या प्रत्येक वर्षी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी असणारा रामू दहावीत येतो आणि काही तरी बिनसतं. तो सगळ्यांशी फटकून वागू लागतो. गृहपाठ अर्धवटच करू लागतो. शिक्षकांच्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरं देऊ लागतो. वर्गात असताना लक्ष भलतीकडेच, शून्यात पाहात बसू लागतो.. कसाबसा पास होऊन रामू शाळेतून बाहेर पडतो. पण त्याला अचानक काय झालं होतं हे समजत नाही. काही जण म्हणतात, 'रामूला भुताची लागण झाली!'.
------------------------------------ ही सिनेमाची कहाणी नाही हो! ही आपल्या रामूची कहाणी आहे. रामू... आपला पूर्वीचा रामगोपाल वर्मा. त्यालाही अशीच भुताची लागण झाली आणि त्याचा 'रामसेगोपाल वर्मा' झालाय. म्हणून तर त्याने 'भू.रि.' बनवला!

सर्वपथम, ह्या सिनेमाला 'भू.रि.' म्हटल्यामुळे ह्याचा 'उर्मिला'वाल्या 'भूत'शी काही संबंध आहे, असं जर तुम्हाला वाटलं असेल.. तर तसं काहीही नाहीये ! हाच सर्वात पहिला 'ब्लफ' आहे रामूचा! सिनेमाची कहाणी मी अगदी थोडक्यात सांगतो कारण ती 'अगदी थोडकी'च आहे
एका 'शबू' नामक भूताने झपाटलेल्या घरात एक नवीन कुटुंब राहायला येते. तरुण अवस्थी (चक्रवर्ती), बायको नम्रता अवस्थी (मनीषा कोईराला), मोठा मुलगा 'तमन' आणि लहान मुलगी 'निमी'. सोबत एक नोकर 'लक्ष्मण' आणि ते राहायला आल्यानंतर अचानक सरप्राईज म्हणून आलेली 'तरुण'ची लहान बहिण 'प्रिया' (मधू शालिनी). 'शबू' लहानग्या निमीला पछाडते. पुढे काय घडतं ते सांगण्या-ऐकण्या-लिहिण्या व पाहण्याइतकं महत्वाचं नाहीच ! जे कुठल्याही भुताटकीच्या सिनेमांत होतं तेच आणि तस्संच..!

फक्त दीड तासाचा सिनेमाही रटाळ कसा बनवता येतो, हे अभ्यासण्यासाठी भू.रि. अवश्य पाहावा. नि:शब्दपणे, संथ गतीने कॅमेरा फिरून फिरून आपल्या घाबरण्यासाठीच्या इच्छेचा अंत पाहातो. जे काही घडतं, ते फक्त शेवटच्या १५-२० मिनिटात घडतं आणि ते 'भयावह' पेक्षा 'बीभत्स' प्रकारात मोडतं.

'भू. रि.' चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याची पात्रनिवड आहे. एकही पात्र भूमिकेशी न्याय करत नाही. 'चक्रवर्ती' नामक दगड तर निव्वळ असह्य. मनीषा का परत आली आहे, हे तिला किंवा रामूलाच ठाऊक. दोन्हीही मुलं नुसतीच वावरतात. काहीही 'स्पार्क' नाही. बहिणीच्या भूमिकेतील 'मधू शालिनी' तर फक्त उघड्या मांड्या दाखवण्याची सोय असावी.

संदीप चौटाचं आदळआपट करणारं पार्श्वसंगीत 'भो:' करण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न पिक्चरभर करत राहतं.

एकंदरीत हा सिनेमा पाहिल्यावर माझी तरी खात्री पटली आहे की रामूला त्याचे जुने मित्र मणीरत्नम, शेखर कपूर ह्यांची सांगत आवश्यक झाली आहे. त्याच्या मानगुटीवर बसलेलं भुताटकीचं भूत त्याने लौकरात लौकर झटकायला हवं नाही तर 'फॅक्टरी' बुडणार हे निश्चित.

टू कन्क्ल्युड, इतकंच म्हणावंसं वाटतं - 'गेट वेल सून, रामू..!'

रेटिंग - १/२*  

Friday, October 12, 2012

विचारू चला !


घराची दिशा चालणारी कुठे वाट आहे जगाला विचारू चला
'मला ठाव नाही' म्हणाले कुणी तर 'विचारू कुणाला?' विचारू चला !

सुगंधी हवा वाहते, पैंजणांचा घुमे नाद वाऱ्यासवे मुग्धसा
'तुझा गंध चोरून गेली कुठे ती?' जुई-मोगऱ्याला विचारू चला

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला !

इथे रोजच्या दगदगीतून जगणे स्वत:च्या मनासारखे विसरलो
हसावे कसे अन रडावे कसे गोजिऱ्या बालकाला विचारू चला

कुठे देश आहे असा की जिथे कायदाही नसे, नांदते शांतता
'कुणी आखल्या सांग सीमा इथे?', माजल्या मानवाला विचारू चला !

'जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला !

....रसप....
११ ऑक्टोबर २०१२

Wednesday, October 10, 2012

द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या


आकाशातुन झाला होता एक वेगळा तारा
पापणीस चुकवून वाहिला जेव्हा चुकार पारा..
आरपार हृदयाच्या गेली एक वेदना हळवी
कुणास ठाउक गदगद झाला कसा कोरडा वारा

ह्याच दिशेला दूरवर तिथे माझे घर थरथरते
छताकडे बघतो बाबा आई केवळ गहिवरते
मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या
भगवंता रे सावर आता मन माझे भिरभिरते

ह्या जन्मी मी मायभू तुझे सारे ऋण फेडावे
पुढील जन्मी हक्काचे डोक्यावर छत बांधावे
एक क्षण तरी बाप जगावा चिंता सोडुन साऱ्या
एकदाच आईने माझ्या आनंदाश्रू प्यावे

यमदेवा, तू चाल पुढे मी निरोप घेउन येतो
सहकाऱ्यांना विजयासाठी अभिष्टचिंतन देतो
जाता जाता घरी एकदा क्षणभर जावे म्हणतो
त्या म्हाताऱ्या दोन जिवांचे अखेर दर्शन घेतो

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

Monday, October 08, 2012

सुरस कथा माझ्या प्रेमाची..


सुरस कथा माझ्या प्रेमाची नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा मांडला
हरेक वेळी माझी खेळी पराभूत जाहली
तरी नव्या प्रेमाची आशा पुन्हा पुन्हा बांधली

पहिले होते बालपणीचे चौथ्या वर्गातले
कुणास ठाउक कधी तिनेही होते का जाणले ?
मला पकडले होते बाईंनी बघताना तिला
हातावरती प्रसादही मग यथेच्छ होता दिला !

त्यानंतर मी सुतासारखा झालो होतो सरळ
पण हे मनही जात्या होते पक्के चंचल चपळ
वर्ग दहावीचा होता तो तिच्यात गुंतुन फसलो
'निकाल' पाहुन मार्कशीटवर स्वत:च कुंथत बसलो

कॉलेजाच्या दुसऱ्या वर्षी केले तिसरे प्रेम
जितका चुकला तितक्या वेळा परत लावला नेम
लाल गुलाबाला माझ्या पायाने चुरले तिने
बॉयफ्रेंडला सगळे सांगुन मस्त तुडवले तिने !

नजर फिरवुनी कुणासही मग कधीच ना पाहिले
'हि'ने मला हेरले एकदा अन जाळे टाकले
बेसावध होतो मी फसलो बंधनात अडकलो
लग्नाच्या बेड्यांना माळुन 'श्रीयुत' मी जाहलो

आजच आली मैत्र विनंती फेसबूकवर नवी
कॉलेजच्या तिसऱ्या प्रेमाची तीच हासरी छवी
स्विकार केले विनंतीस मी गप्पाही रंगल्या
'फटके पडलेल्या' दिवसांच्या आठवणी जागल्या !

मी म्हटले की, "सुरस कथा त्या नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा हारला
मला आठवे ना कुठलाही आज जुना चेहरा
जे न मिळाले त्यास गमविण्याचा तोटा ना खरा !!"

....रसप....
८ ऑक्टोबर २०१२

Sunday, October 07, 2012

'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)


प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.)

तर अशीच एक मध्यमवयीन, उच्च मध्यमवर्गीय 'आई' - शशी गोडबोले (श्रीदेवी). मोठी मुलगी व लहान मुलगा कॉन्व्हेन्ट शाळेत. नवरा कुठल्याश्या खाजगी कंपनी मोठ्या हुद्द्यावर. एकंदरीत सुखवस्तू कुटुंब. शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. साध्या सरळ शशीने इतर अनेक आयांप्रमाणे स्वत:चं विश्व स्वत:च्या मुलांत, नवऱ्यात व घरात बंदिस्त केलं असतं. तिचं हे 'गृहिणी'पण, तिचा साधेपणा आणि सर्वात मोठं म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या घरातील (सासू - सुलभा देशपांडे - वगळता) इतरांसमोर तिचं (न येणारं) "Enगlish Vingliश" ! चिमुरडी मुलगीसुद्धा आईचा पाणउतारा करत असते आणि सोशिक शशी जसं नवऱ्याने वारंवार झिडकारणं सहन करत असते तसंच मुलीचं फटकारणंही.
शशीसाठी माहेर म्हणजे फक्त तिची एक अमेरिकास्थित बहिण असते. ह्या बहिणीच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरतं आणि अमेरिकेला जायचं ठरतं. नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा.. उरली शशी! तिला एकटीलाच अमेरिकेला लग्नाच्या तयारीसाठी सर्वांच्या आधी जावं लागतं. एकटीने जाण्याची भीती वाटत असतानाही, शशीचं काहीही चालत नाही आणि मर्जीविरुद्ध ती अमेरिकेला जाते. (श्रीदेवीचा अभिनय अ-फ-ला-तू-न.) अमेरिकेला गेल्यावर कमजोर इंग्रजीमुळे तिला एका लहानश्या कॅफेत आलेला अनुभव तिला (आणि आपल्यालाही) हेलावून टाकतो आणि ती ठरवते की "बस्स.. आता हे इंग्लिश विन्ग्लीश शिकायचंच." कुणाला काही कळू न देता, ती एका 'इंग्लिश स्पीकिंग क्लास'मध्ये प्रवेश घेते आणि सुरू होतो एक गमतीशीर, भावनात्मक अध्याय.



पुढे काय होतं, हे सांगायची आवश्यकता नाहीच. कारण ही काही कुठली 'सस्पेन्स' कहाणी नाही. अपेक्षित वळणांनी ही कहाणी एका अपेक्षित शेवटावर संपते. पण हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाटत राहाते.
हिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम. पुनरागमन जर असं होणार असेल, तर प्रत्येक अभिनेत्रीने वारंवार पुनरागमनच करत राहावं.. असा एक 'इल्लॉजिकल' विचार माझ्या मनात येऊन गेला!
सिनेमातील प्रत्येक लहान-मोठं पात्र आपली एक छाप सोडतं. 'लौरेंट' ह्या फ्रेंच माणसाच्या भूमिकेतील 'मेहदी नेब्बौ' खूप सहज वावरतो आणि मनाला स्पर्श करतो.
अतिशय भावनाप्रधान कथा असतानाही कुठेही अतिभावनिक नाट्य (मेलोड्रामा का काय ते..) न रंगवता अत्यंत संयतपणे आणि तरीही मनाला स्पर्श करत केलेल्या मांडणीसाठी नवोदित दिग्दर्शिका गौरी शिंदेला सलाम !
'नवराई माझी लाडाची..' हे गीत ठेका धरायला लावतं. अमित त्रिवेदीची बाकी गाणीही ठीक आहेत.    
पण अखेरीस... मनात घर करते श्रीदेवीच.
थ्री चिअर्स टू श्रीदेवी..! टेक अ बाउ !
She is back with a BANG..!

रेटिंग - * * * *

Tuesday, October 02, 2012

तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते


चर्चा करण्यासाठी नविन विषयही होते
त्यांना चर्चा हरण्याचे पण भयही होते

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

तिला पाहिल्यावर हृदयाची साद वाढली
धडधडते ठोके मग चुकले लयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

....रसप....
२७ सप्टेंबर २०१२

Monday, October 01, 2012

सुमार, टुकार उलाढाल! (Kamaal Dhamaal Malamaal - Movie Review)


विंग्रजीतील एक म्हण म्हणते की, 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, पण त्याला पाणी पाजता येत नाही.' म्हणजे, त्याला तहान असेल तरच तो पाणी पिणार... कितीही काहीही करा..! पण माणसाचं जरा वेगळं असावं.. म्हणजे, जर एखाद्याने ठरवलं की त्याला शेणच खायचं तर तुम्ही त्याला गोठ्यापासून कितीही दूर न्या.... तो काही ना काही करून शेण खाणारच ! 'कमाल धमाल मालामाल' च्या निमित्ताने एक चांगली कहाणी प्रियदर्शनला मिळाली होती पण... आता शेणच खायचं ठरवलं असेल, तर काय करणार ना ? असो.. उगाच कुणाचं खाणं-पिणं काढू नये म्हणतात. आपण शेणेमाबद्दल बोलू... सॉरी, सिनेमाबद्दल बोलू..

'प्रियन'च्या इतर अनेक सिनेमांप्रमाणे ही कथाही बरेच फाटे असणारी आहे.
उत्तर भारतातील कुठल्याश्या भागातील एक खेडेगांव - 'बिजनोर'. [इथे अजून घराघरात वीजही पोहोचली नाहीये पण गावांतल्या समस्त स्त्रीवर्गाने चिकनं-चुपडं दिसण्यासाठी पावडर, लिपस्टिक, हेअर स्ट्रेटनर, चांगले कपडे, ई. जीवनावश्यक गोष्टी मुबलक उपलब्ध असाव्यात. बिच्चारा पुरुषवर्ग मात्र एकदम 'लायकीत'ले कपडे व एकंदर अवतार करून वावरतो, अपवाद - 'जॉनी बेलिंडा (श्रेयस तळपदे).] कोणे एके काळी इथे दोन जिवलग मित्र असतात.. ओम पुरी आणि परेश रावल. प्रेम सोडून इतर सगळं भागीदारीत करणारे...! अर्धे अर्धे पैसे देऊन लॉटरीचं तिकीट घेतात.. जिंकतात आणि पैश्यांवरून एकमेकांशी भांडतात. परेश रावल सगळे पैसे हडपतो आणि ओम पुरी त्याच्या मित्राची गर्लफ्रेंड पळवतो अन लग्न करतो. जिवलग मित्र जानी दुश्मन बनतात.
पुढे श्रीमंत मा. मित्र धटिंगण बनतो... (मा. = माजी. असंस्कृत लोकांनी विकृत अर्थ काढू नये.) दोन-तीन वळू-टाईप मुलगे आणि गरीब मित्राच्या डरपोक पोराच्या प्रेमात पडण्यासाठी एक टकाटक पोरगी पैदा करतो. बायको गचकली असावी कारण ती दिसत नाही. गरीब मित्र ओम पुरी खड्डे खणून कुटुंबाची गुजराण करत असतो. कसले खड्डे ? का ? असले प्रश्न विचारू नका. ते त्यालाही पडले नव्हते म्हणून मलाही पडले नाहीत. पण सुचेल तेव्हा हातात कुदळ-फावडा घेऊन हा खड्डेच खणत असतो. मुलगा श्रेयस तळपदे गावातल्या शेंबड्या पोरांकडूनही मार खात असतो तर गर्लफ्रेंडच्या सांड भावांकडून का नाही खाणार..? एकदम हक्काने ते त्याला येता-जाता ठोकत असतात. पण आळशी पोराला कशाचं काही नसतं. कुत्र्यासारखा मार खाऊनही त्याला मुका मार, जखमा काही होत नसतात. (तो बहुधा अमिबा आणि टर्मिनेटरचं मिक्स ब्रीड असावा. म्हणून जखमा भरून निघत असाव्यात आणि मुके मार, सूज वगैरे बदलत्या आकारात सपाट होत असाव्या.) तो तिन्ही त्रिकाळ घरात एक तर घरात पडून राहात असतो किंवा गावभर हुंडारत असतो. बाप खड्डे खोदतोय आणि पोरगा फक्त लॉटरीची तिकिटं विकत घेतोय.. !
तर हे असं सगळं चालू असताना एक अनोळखी इसम (नाना पाटेकर) गावात येतो आणि थेट ओम पुरीचं घर गाठतो. तो गावात येतो दुपारच्याला आणि घरी येतो रात्री.. का ? कारण अंधारातून येताना रस्त्यात येणाऱ्या विहिरीत पडणं आवश्यक असतं. हा अनोळखी इसमही एक धटिंगण असतो आणि त्याच्या येण्याने मरतुकड्या जॉनीला 'बॉडीगार्ड' मिळतो आणि तो त्याला स्वत:च्याच घरात 'वाइल्ड कार्ड एन्ट्री' मिळवून देतो.
अनेक भरीचे सीन झाल्यावर, एक दोन चोरलेल्या गाण्यांवर हिरो-हिरोईनची अंगविक्षेप करायची हौस फिटवून झाल्यावर सिनेमा अपेक्षित वळणावर येतो. हिरोईनचा बाप, हिरोसमोर 'टार्गेट' ठेवतो. नाताळच्या सुटीत दिवसभर उलटा लटक किंवा काय हवं ते कर. गावाच्या चर्चला पूर्वी एक सोन्याचा क्रूस होता, जो चोरीला गेला आहे; तसा एक सोन्याचा क्रूस चर्चसाठी आण आणि पोरीला ने ! (च्या मारी ! पोरगी चर्चच्या पायरीवर मिळाली होती की काय ?) आत्तापर्यंत चाणाक्ष प्रेक्षकाला कळलेलं असतं की तो क्रूस कोणे एके काळी कुणी चोरलेला असतो आणि तोच क्रूस मरतुकड्या जॉनीला येनकेन प्रकारेण मिळणार आहे. मिळतो. त्यात अर्थातच धटिंगण नाना मदत करतो. शेवटच्या १५ मिनिटात सर्व पात्रं अचानकच सभ्य, समजूतदार, मोठ्या मनाची वगैरे होतात आणि सिनेमा आपटतो... सॉरी आटोपतो.



'नाना नक्की कोण आहे?' ह्या एकाच प्लॉटवर अख्खा सिनेमा लै भारी उत्कंठावर्धक बनवता आला असता. पण आधी म्हटल्याप्रमाणे शेण खायचंच ठरवलं असेल, तर कोण काय करणार ?

श्रेयस तळपदे जीव तोडून जॉनीच्या व्यक्तिरेखेत जीव ओतायचा प्रयत्न करतो, पण पटकथा आणि दिग्दर्शनातील भगदाडं, ओम पुरी व नंतर नानाने खोदलेल्या सर्व खड्ड्यांपेक्षा मोठी आहेत. नाना, परेश रावल आणि ओम पुरी ह्यांनी विडी-काडीचा खर्च भागविण्यासाठी हा सिनेमा केला असावा.

कुठल्याश्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे, हे माहित होतं पण माहित नसतं तरी जाणवावं इतका काही ठिकाणी सिनेमा विचित्र उचंबळ दाखवतो.

आताशा मला असं वाटायला लागलं आहे की, प्रियदर्शन आणि शाहीद आफ्रिदी बहुतेक 'एकही चक्की का पिसा आटा' खात असावेत. एक तर ३७ चेंडून १०० किंवा एकदम 'सुमार, टुकार उलाढाल' !

रेटिंग - *
Related Posts Plugin for WordPress, Blogger...