Wednesday, February 24, 2010

सहनशक्ती दे..

 

विकोपास गेलेल्या दुखण्याची
इतकी वेदना व्हावी
दुखून दुखून तिला स्वत:लाच
कळ लागावी
तळपत्या सुर्याने
इतकी आग ओकावी
पोळणारी झळ त्याला
स्वत:लाच लागावी
अशी पराकोटीची सहनशक्ती
जेव्हा तू देशील
छोट्या हळूवार फुंकरीलाही
अनमोल बनवशील

इथे तुझ्यासमोर
सगळे लाचार होऊन बसतात
दु:खावर औषध म्हणून
सुखाची भीक मागतात
शिकव त्यांना..
दु:ख पचवण्याची ताकद असणं,
हेच सुख
सुख वाटण्याची दानत असणं ,
हेच सुख

तुझं काम फक्त निर्मितीचं आहे?
मग जडणघडण कुणाच्या अखत्यारीत आहे?
की तुलाही एक न्यूनगंड आहे?
महत्त्व कमी होइलशी भीती आहे?
नाही?
मग बाहेर ये त्या दगडातून
दे एक कवडसा निबिड काळोखातून
आणि खंगत चाललेल्या
जीर्ण माणुसकीच्या
शीर्ण मनाला
उभारी दे
आधार दे
पुनरुज्जीवन दे
शक्ती दे
सहनशक्ती दे.. सहनशक्ती दे


….रसप….

Tuesday, February 23, 2010

मी मोल फेडले होते

चित्रात रंग भरताना का भाव वेगळे होते
आकाश गूढ नेत्री तांबूस जाहले होते

अंदाज बांधले सारे अदमास राहिले होते
शब्दांस प्राणही देता खोटेच वाटले होते

मांडू नको पुन्हा तू जे खेळ संपले होते
मी खेळ जिंकलो जे जिंकून हारले होते

वाटेवरी पुन्हा त्या पाऊल थांबले होते
कोणास दोष द्यावा मी खुद्द बांधले होते

माझ्याच सावलीचे मी हाल पाहिले होते
हातात फक्त माझ्या चेहरेच राहिले होते

मी वैषयिक सारे सुख मुक्त भोगले होते
घेऊन रोष आता मी मोल फेडले होते


….रसप….
२३ फेब्रुवारी २०१०

संचित.. सारं माझंच - २

रंगलेल्या राती
नवी नवी नाती
गावलेले साथी
सारं माझंच

खास वेगळी वाट
बोटांवर ललाट
सावलीला पाठ
सारं माझंच

तुटला जरी साज
अष्टम सुरी आवाज
बिनधास्त अंदाज
सारं माझंच

स्वप्नांची रास
मनासारखा भास
प्रारब्धाची कास
सारं माझंच

जपलेली हूरहूर
बाकी सगळा धूर
निवळलेलं काहूर
सारं माझंच

खुपलं तर ठोकणं
विकलं सारं दुखणं
खोटं-खोटं घुसमटणं
सारं माझंच


....रसप....
२२ फेब्रुवारी २०१०

Thursday, February 18, 2010

संचित.. सारं माझंच

जागलेल्या राती
तोडलेली नाती
भरकटलेले साथी
सारं माझंच

दूरवरची वाट
पुसलेलं ललाट
सावलीची पाठ
सारं माझंच

उतरलेला साज
कणसुरा आवाज
चुकलेला अंदाज
सारं माझंच

आठवणींची रास
हुबेहूब भास
सुटलेली कास
सारं माझंच

सिगरेटचा धूर
अनामिक हूरहूर
विचारांचं काहूर
सारं माझंच

डोळ्यांत खुपणं
विकतचं दुखणं
मुकं घुसमटणं
सारं माझंच


....रसप....
१८ फेब्रुवारी २०१०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...