Thursday, August 21, 2008

मुंबईकर..!

गती आमच्या नसांत भिनली
श्वासा-श्वासांत
सेकंदाच्या काट्यासंगे
पळतो तालात

कितीक येवो महापूर वा
असंख्य हो विस्फोट
नमणे नाही शमणे नाही
कुठल्या आपत्तीत

अजिंक्य आम्ही रोजच लढतो
नवीन संग्राम
आकाशाच्या विराटतेचे
अम्हांस वरदान

अम्ही जाणतो सत्य एकचि
"विश्वचि अमुचे घर"
अम्हां रोखणे अशक्य केवळ
आम्ही मुंबईकर

थकून-भागून रवी मावळे
रोज सागरात
अन् मग हसतो सलाम करतो
सागर आम्हांस -

"कुठून मिळते तुम्हांस ऊर्जा, पुरे न सूर्यास
नतमस्तक मी तुम्हांपुढे धुतो पदकमलास..!!



....रसप....

Tuesday, August 19, 2008

रिता नसे हा प्याला मित्रा


रिता नसे हा प्याला मित्रा
काठोकाठ भरला रे
पुन्हा एकदा पहा जरासा
कसा छलकतो आहे रे

शब्द नाचती मला खुणवती
गुंफुनी माला करण्या रे
पडता बाहेर विखरून जातील
कुठून आणू लिहिण्या रे

अमृत ओठांचे त्या प्यालो
अंश सोडला आहे रे
काठावरती पेल्याच्या बघ
रंग गुलाबी चढला रे

गोड लाजरा रम्य साजिरा
तिचा झळकतो मुखडा रे
चोरून तिरके पाहून मजला
पेल्यामधुनी हसला रे

कंठ न ओला झाला हा परी
पिऊन सागर तरलो रे
सारे आहे भोगाया तरी
तिच्याविना मी झुरलो रे

कोण जन्मीचे पाप भोगतो
पुण्य की कोणा जन्मीचे
चार घडीचा डाव मांडला
तिने सोडला अर्धा रे

रिता नसे हा प्याला मित्रा
मीच जाहलो रिता रे
पोकळ उरले शरीर केवळ
मन आत्म्याची चिता रे


....रसप....
१९ ऑगस्ट २००८

Sunday, August 17, 2008

विचार..

खत नसो पाणी नसो
ही भूछत्रं
कुठे ही उगवतात 
कशीही वाढतात अन्
स्वच्छंदी जगतात

कन्नी नसो मांजा नसो
हे पतंग
उंच उंच उडतात
नभाला भिडतात अन्
गुंततात गळपटतात

गती नसो दिशा नसो
हे प्रवाह
खळखळा वाहतात
कधी साचतात कधी
नुसतेच वाया जातात

फूल नसो फळ नसो
ह्या बागा
सुंदर सजतात
क्षणात बहरतात अन्
क्षणातच कोमेजतात

इच्छा नसो वासना नसो
ही विचारांची  भूतं.. मानगुटीवर बसतात
पछाडतात.... झपाटतात..
अन् शेवटी...
बाटलीत बंद होतात ..!!


....रसप....
१७ ऑगस्ट २००८

Wednesday, August 13, 2008

स्पर्श मलमली भासत राही

एकदाच जो पडलो प्रेमी अद्यापी मी उठलो नाही
तो जो सुटलो शिखरावरुनी घसरण माझी थांबत नाही

जीव ओतला तुझ्याच दारी ठेवलेस तू मला किनारी
अंतरीतल्या कोंदणात ह्या नाव तुझे तरी कोरीव राही

कीतीक राती तारे मोजले दीवस दीवस मी कसे कंठले
ठाउक आहे मजला माझे व्यर्थ कुणा मी सांगत नाही

कणाकणाला माहीत झाले प्रेम हे माझे कीती थोरले
दगडान्नाही फुटला पाझर तुला तेवढे उमजत नाही

आज पाहता वळुन मागे तूटून बंध राहीलेत धागे
सुट्या मोकळ्या धाग्यांतुनही स्पर्श मलमली भासत राही

....रसप....
१३ ऑगस्ट २००८

Monday, August 04, 2008

व्यस्त तुझे शेह्जादे!

अम्हां न देणे-घेणे काही
तमा न भवितव्याची
काय जन्म हा फुका घालवू
लढून मरण्यासाठी ?

सुखे आमुची वैषयिक
ही उपभोगाया जगतो
अपुले घरटे अपुले विश्व
अपुल्या पुरते जपतो

कसला खुळचट भगतसिंग
अन् वेडा बाबू गेनू
कसली करिता क्रांती आम्ही
सगळे खुशालचेंडू

व्यर्थ रिकाम्या बाता सगळ्या
स्फुरण न कोणाला ते
पाहुन जाणून काणा डॊळा
शरम न कुणास वाटे

आक्रंदन हे कोण ऐकतो
तुझे ग धरती माते
आपण अपुल्या जगात सगळे
व्यस्त तुझे शेह्जादे


....रसप....

Friday, August 01, 2008

मन हीरवे हीरवे गार....

मन हीरवे हीरवे गार....

मन हीरवे हीरवे गार जाहले,
हीरवे हीरवे गार
बहरून आल्या दीशा दीशा,
मन हीरवे हीरवे गार

रीमझीम रीमझीम खळखळ खळखळ
नसानसांतून जोमची सळसळ
भारून गेलो नादांनी अन्
गंधांनी मृद्गंधाने
तांडवरूपी वरूण अवतरे धोधो संततधार
मन हीरवे हीरवे गार....

कुणास ठाउक कुठे लपवला
तळतळणारा गोल हरपला
करपूनी गेल्या चराचरांना
तृप्त करवीण्या वखवखल्यांना
प्रसन्नरूपी वरूण अवतरे एकमेव आधार
मन हीरवे हीरवे गार....


....रसप....
०१ ऑगस्ट २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...