Saturday, January 09, 2016

२०१५ ची एक विना-शीर्षक आठवण

खरं तर, त्या दिवसाचा अनुभव मी दुसऱ्याच दिवशी लिहायला घेतला होता. पण जमलं नाही. मग अधूनमधून ३-४ वेळा मी प्रयत्न केला, तरी मला नेमके शब्द सुचलेच नाहीत. कदाचित मला काय सांगायचं आहे, हे आत्ताही माझं मलाच नीटसं उमगलेलं नाही. पण आता हे मनात अजून दाबून ठेवता येत नाहीय. लहान मुलाला एखादं खेळणं किंवा नवीन कपडा दिला किंवा मिळाला तर ते लहान मूल कमालीचं बेचैन होतं. ह्या विचाराने की 'कधी एकदा ते खेळणं किंवा तो कपडा मी सगळ्यांना दाखवीन !' ही बेचैनी माझ्यातल्या लहान मुलाने गेला महिनाभर अनुभवली आहे. आज त्या दिवसाला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. आज मी हे हातावेगळं करणारच आहे. माझी कमाई मी सर्वांना दाखवणारच आहे.

२०१६ सुरु होऊन नऊ दिवस होऊन गेलेत. आत्तापर्यंत नव्याची नवलाई ओसरली असेलच. काही लोकांची रिझोल्युशन्ससुद्धा गुंडाळून झालेली असतील. ह्या नऊ दिवसांत अनेकांनी 'त्यांच्यासाठी २०१५ कसं गेलं' हे सांगणाऱ्या पोस्ट्स टाकल्या. काय कमावलं, काय गमावलं, असा सगळा ताळेबंदही मांडून झाला.
पण मी माझा ताळेबंद मांडला नाही. ['लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा' (पापा कहतें हैं बड़ा नाम करेगा..) सारखं !]
Honestly, ताळेबंद मांडलाच जाऊ शकत नाही. कारण माझ्या बाबतीत आत्तापर्यंतच्या सगळ्या वर्षांची कमाई ह्या सरलेल्या वर्षातल्या एका दिवसातच झालेली आहे. एरव्ही 'बाईकने किती मायलेज दिलं' इथपासून ते 'मुलगा झाला' इथपर्यंत प्रत्येक लहान-मोठी बातमी मी फेसबुकवर जाहीर करत आलो आहे. ही गोष्ट मात्र मी आत्तापर्यंत फार कमी लोकांना सांगितली. This was differently special, specially special and differently different. जे घडलं, ते काही माझं स्वप्न वगैरे नव्हतं. मात्र ते घडून गेल्यावर कळलं की झालं ते स्वप्नवतच होतं !

३ डिसेंबर २०१५.
फेसबुक मेसेज बॉक्समध्ये कौस्तुभ दादाचा मेसेज आला. '९ तारखेला मी मुंबईत येतोय. आलास तर 'किशोर'च्या बंगल्यावर घेऊन जाईन!'
'किशोरच्या घरी जायला मिळणार ?' मी कसलाही विचार न करता ठरवून टाकलं की जायचंच !
९ ला सकाळी मुंबईला पोहोचलो. बरोबर एक किशोरभक्त मित्र तुषार ढेरे. कौस्तुभदाला दुपारी भेटून, जेवून आम्ही 'जुहू तारा'ला गेलो.



'किशोर कुमार गांगुली मार्ग', 'Kishore Kumar Bungalow' अश्या पाट्या दिसल्या आणि दोन-चार ठोके गडबडलेच छातीत !
गेटमधून आत पाउल टाकलं आणि मला एकाच वेळी पिसासारखं हलकंही वाटायला लागलं आणि पायांत काही किलोंचं वजन बांधल्यागत जड-जडही ! लाल रंगाचं ते टुमदार घर. इथल्याही झाडांशी किशोरदाने गप्पा मारल्या असतील का ? हा समोर जो झोपाळा आहे, तो त्याच्या काळीही असेल का ? त्यावर तो बसला असेल का ? त्याच्या गाडीची जागा कोणती असेल ? एकेक पाउल अतिशय शांतपणे टाकत आणि असे अनेक प्रश्न मनातच रुजवत गेटपासून मुख्य घरापर्यंत गेलो. दार उघडंच होतं. (Yes. You read it right. दार उघडंच होतं.) मंदिरात शिरताना किंवा स्टेजवर जाताना किंवा सामन्यापूर्वी मैदानावर पाउल ठेवताना जसा नमस्कार करतो, तसा नमस्कार तो उंबरा ओलांडून आत शिरण्याआधी अभावितपणेच केला गेला. मंद उजेड असलेल्या त्या वास्तूत समोर असलेल्या प्रशस्त जिन्यावरुन आम्ही तिघे एकेक पायरी चढत वर जात होतो. डावीकडच्या भिंतीवर किशोरदा आणि अमित कुमारचे स्वतंत्र व एकत्र असे लहान-मोठे खूप फोटो होते. दीड जिना चढून पुन्हा डावीकडे वळल्यावर एका दिवाणखान्यात आम्ही शिरलो. तिथे एक वयोवृद्ध माउली एका छोट्याश्या सोफ्यावर बसली होती. रुमा गुहा. किशोरदाच्या पहिल्या पत्नी. त्यांच्या पाया पडलो. त्या साध्याश्या दिवाणखान्यात मोजक्याच वस्तू होत्या. समोर असलेलं केनवूडचं सेंटर टेबलही इतकं साधंसं होतं की त्याच्या काचांवर चरेसुद्धा दिसत होते. काही वेळानंतर चहा आला. तो एरव्ही आपण चित्रपटांत पाहतो तसा पाणी, दूध, साखर, वगैरे सगळं वेगवेगळं असलेला नव्हता. माझ्या घरी जसा पाहुण्यांना दिला जातो, तसा सगळं एकत्र केलेला बदामी रंगाचा चहा.




'किशोरदाच्या घरात बसून मी चहा प्यायलेला एक कप चहा' ही होती ह्या वर्षाची कमाई. ही कमाई आजवरच्या सगळ्याला पुरून उरलीय. तिथे अर्धा-पाउण तास आम्ही रुमाजींशी काय गप्पा मारल्या, माझ्या लक्षात नाही. कारण माझी नजर फक्त हेच टिपत होती की कुठे कुठे किशोरदा दिसतोय.. तो मला खिडकीत उभा असलेला दिसला. आजूबाजूच्या खोल्यांतून ये-जा करताना दिसला. समोर असलेल्या अगदी छोट्याश्या खोलीत हार्मोनियम घेऊन बंगाली गाणं गातानाही दिसला. मध्येच तो समोरच्या सोफ्यावरसुद्धा दिसला आणि विक्षिप्तपणे म्हणाला, 'हो गया मुझे देखकर ? अभी आप जा सकतें हो, आपसे मिलकर बड़ी ख़ुशी हुई !'

जरा वेळाने लीना चंदावरकरसुद्धा भेटल्या.
बरेच फोटो झाले. पण जे डोळ्यांनी टिपलं, ते कॅमेरा टिपू शकणार नव्हताच. जे कानांनी ऐकलं, ते ह्या शब्दांत मी कथन करू शकणार नाहीच. मी आजही एकच कल्पना करून शहारतोय की घर व सभोवतालच्या त्या संपूर्ण परिसरात एखाद्या ठिकाणी तरी असं झालं असेलच ना की जिथे कधीकाळी किशोरदाचं पाउल पडलं असेल अगदी तिथेच बरोब्बर माझंही पडलं असेल ?



I am sure, तुषारचा अनुभवही असाच काही असणार आहे. ह्यासाठी कौस्तुभदाचे आभार वगैरे मानणं, म्हणजे शुद्ध करंटेपणा ठरेल. त्याने आम्हाला तिथे का नेलं, हे मी समजू शकतो. त्याने आम्हाला श्रीमंत केलं आणि आम्हाला श्रीमंत केल्याचा आनंद त्याला संपन्न करून गेला. असे अनेक आनंद त्याने आजपर्यंत वेचले आहेत आणि त्या प्रत्येक आनंदक्षणाने तो संपन्नांतलाही संपन्न होत गेला आहे अन् जाणार आहे.

- आपला (नवश्रीमंत)
रणजित पराडकर 

Saturday, January 02, 2016

उणीवांची जाणीव - नटसम्राट (Movie Review - Natsamrat)

'नटसम्राट' पाहून झाल्यावर एक वेगळीच जाणीव जागृत होते. ही जाणीव उणीवेची की रितेपणाची, नक्की समजायला थोडा वेळ जातो. तोपर्यंत आपण आपल्या मनाची हीच समजूत घातलेली असते की हे एक रितेपणच आहे. जळून खाक झालेल्या नाट्यगृहात, त्या अवशेषांप्रमाणेच ध्वस्त, मोडकळलेला, खंगलेला एक महान कलाकार जे रितेपण अनुभवत असतो, तेच आपल्या मनातही आलं असावं, असं वाटतं. असं वाटण्यामागे कारणंही आहेत. नाना पाटेकरने साकारलेला अप्रतिम 'नटसम्राट गणपत रामचंद्र बेलवलकर', मेधा मांजरेकरनी साकारलेली 'सौ. बेलवलकर', बेलवलकरांच्या मित्राच्या सहाय्यक भूमिकेत कमाल करणारे विक्रम गोखले, मूळ संहितेचा जपलेला प्राण, एकापेक्षा एक जबरदस्त स्वगतं, सर्व सहाय्यक कलाकारांचा (एखादा अपवाद वगळता) जबरदस्त अभिनय, सक्षम तांत्रिक बाजू (कॅमेरावर्क इत्यादी) अशी अनेक कारणं.

पण काही काळ गेल्यावर आपलंच आपल्याला समजतं की ही जाणीव रितेपणाची नाही ! ही जाणीव तर उणीवेची आहे किंवा 'उणीवांची' आहे !
सगळ्यात मोठी उणीव ही की ह्या कहाणीत काही म्हणता काहीसुद्धा नाविन्य राहिलेले नाही. मुलांनी नाकारलेल्या म्हाताऱ्यांची फरफट आजपर्यंत कित्येकदा पाहिलेली आहे. वेगवेगळ्या भाषांतून पाहिलेली आहे. अगदी थेट आणि तितकीच भ्रष्ट नक्कल आपण हिंदी चित्रपट 'बागबान'मध्ये पाहिली. तो चित्रपट वेगवेगळ्या वाहिन्यांवरुन इतक्या वेळा माथी मारून झाला आहे की इच्छा नसतानाही पाहिला गेला आहे. असेच इतरही अनेक चित्रपट, मालिका आपल्या माथी मारल्या गेल्या आहेत. असेल, त्या सगळ्याचं उगमस्थान वि.वा. शिरवाडकरांचं 'नटसम्राट'च असेल आणि त्या अर्थी हा चित्रपट 'ओरिजिनल'ही असेल. पण हा ओरिजिनल अनेक 'डुप्लिकेट्स' नंतर आल्याने, त्याची 'ओरिजिनलिटी' लुप्त झालेल्या एखाद्या मोहेंजोदडोसारख्या संस्कृतीसारखी गाडली गेलेली आहे.
अर्थात, चित्रपट पाहायला जातानाच आपल्याला हे सगळं माहित असतं. असं अजिबात नाही की आपल्याला कहाणीची कल्पना नसताना हे कथानक आपल्यासमोर उलगडतं. पण मग हे जे नाट्य रंगभूमीवर गाजलं आहे, ते मोठ्या पडद्यावर सादर केलं जात असताना त्यात काय वेगळेपण असेल, हे कुतूहल उरतं. त्या कुतुहलापोटी चित्रपट पाहत असताना विक्रम गोखलेंचं 'रामभाऊ' हे पात्र वगळता ठसठशीत वेगळेपण असं काही दिसत नाही. नाटकाचं चित्रपटीकरण करताना एक अजून वाव मिळतो, तो म्हणजे संगीताचा. खासकरून प्रचंड भावनिक ओढाताण व नाट्यमयता असलेल्या कथानकात तर संगीत खूपच महत्वाचा भाग बनू शकतं. किंबहुना, ते बनायला हवं, अशी अपेक्षा असल्यासही गैर नसावं. मात्र इथे ही बाजू सपशेल लंगडी पडली आहे. १-२ गाणी जी अध्ये-मध्ये अर्धी-मुर्धी वाजतात ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली जातात. But then, 'संगीत' हा चित्रपटाचा एक भाग असणं, ही संकल्पनासुद्धा आता कालबाह्य झालीच आहे. त्यामुळे त्याकडे होणारा कानाडोळा स्वाभाविकच.
मात्र चित्रपट पाहायला जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं, 'नाना.' नाना निराश करत नाही. नानाने कधीच निराश केलेलं नाही. नाना हा अभिनेता निराश करणाऱ्या अभिनेत्यांच्या जमातीचा नाहीच. बेलवलकराचा विक्षिप्तपणा आणि मनस्वीपणा तो पुरेपूर साकार करतो. बापाचं हळवेपण, पतीचं प्रेमळ मन, कलावंताचा अभिमानी बाणा अशी सगळी रूपं हा महान अभिनेता अजोड सक्षमपणे सादर करतो. "मी आहे ज्युलियस सीझर, मी प्रतापराव, मी ऑथेल्लो, मी सुधाकर आणि मीच गणपत रामचंद्र बेलवलकर 'नटसम्राट!' " हे म्हणतानाचा नानाचा आवेश अंगावर काटा आणतो ! ज्यांनी डॉ. श्रीराम लागूंचा 'नटसम्राट' पाहिला आहे, त्यांना नानाच्या नटसम्राटावरही त्याचा प्रभाव जाणवेल. मात्र तो केवळ 'प्रभाव'. नानाचा 'नटसम्राट' स्वतंत्रपणे नक्कल करण्याचा विषय आहे खचितच.
रामभाऊच्या भूमिकेतले विक्रम गोखले मनावर आघात करतात. 'अरे नीच माणसा, चप्पल हरवल्याचं दु;ख लंगड्याला तरी सांगू नकोस !' असं हसत हसत आपल्या मित्राला सुनावताना त्यातली सुप्त व्यथा ते बेमालूमपणे पोहोचवतात. दोघांवर चित्रित झालेल्या प्रत्येक प्रसंगांत अश्या प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळते. इस्पितळात गणपतराव आणि रामभाऊ 'कौन्तेय' मधील कृष्ण-कर्ण संवाद उत्स्फूर्तपणे सादर करतात. तो प्रसंग अभिनयाच्या जुगलबंदीचं एक शिखर आहे.
इतर वेळी कधी मेधा मांजरेकर तर कधी मृण्मयी देशपांडे जान ओततात. खासकरून मुलीच्या घरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावरचा जो प्रसंग आहे, ज्यात मुलीला (मृण्मयी) उपरती होऊन ती गयावया करून आई-वडिलांची क्षमा मागते आणि अपमानामुळे रागाचा पारा चढलेली आई (मेधा मांजरेकर) जळजळीत कटाक्ष टाकून दोन शब्द सुनावते, तो सगळा प्रसंग तर 'बॉयलिंग पॉईण्ट' ला पोहोचणारा आहे. सगळ्या सहाय्यक अभिनेत्यांत 'अजित परब' का आहेत, हे मात्र समजत नाही. त्यांचं संगीत जितकं नीरस वाटतं, तितकाच त्यांनी साकारलेला मुलगासुद्धा. त्या भूमिकेसाठी इतर कुणीच का मिळू नये ?

ह्या सर्व कलाकारांकडून उत्तम काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सलामच. मात्र हे नाटक चित्रपटात आणताना पदरचं जे काही ओतलं, घातलं आहे, ते कमी पडल्याने; त्याचं माध्यमांतर करण्याचा हेतू काय ते कळत नाही. 'पुनरुज्जीवन' हाच जर हेतू असेल, तर तो साध्य नक्कीच झाला आहे. पण त्याहून पुढे त्यांनी जायला हवं होतं. कुठे तरी त्यांच्यातला पटकथाकार बचावात्मक झाला.



'नटसम्राट - असा नट होणे नाही'.
डोळ्यांत पाणी आणतो. व्याकुळ करतो. मात्र तरीही ही जाणीव मागे सोडतोच की अजूनही काही तरी हवं होतं. अगदी हीच नाही, पण अशीच थोडीशी जाणीव 'कट्यार काळजात घुसली'नेसुद्धा मागे सोडली होतीच. मात्र 'कट्यार' मध्ये असलेल्या 'नटसम्राट'च्या मानाने प्रचंड मोठ्या उणीवांवरसुद्धा 'कट्यार'ने मात केली होती, ती त्यात असलेल्या इतर काही प्राबल्यांमुळे. इथे मात्र 'अभिनय' वगळता त्या उणीवांवर मात करण्यासाठी काहीच नसल्याने 'अभिनय ह्या लोकांनी करायचा नाही, तर कुणी करायचा?' असा सरळसाधा प्रश्न पडतो आणि उणीवांवर मात केली जात नाही. थोडक्यात, ज्या कारणासाठी 'कट्यार' आवडला, त्याच कारणामुळे 'नटसम्राट' कमी आवडतो. 'आवडत नाही' असे मी म्हणणार नाही. पण अजूनही खूप आवडायला हवा होता. कारण अखेरीस आपण आवंढे गिळतो. पाणी पुसतो आणि खुल्या दिलाने ह्या कलाकृतीला दादही देतो. मात्र ती दाद खऱ्या अर्थाने असते पडद्यावर दिसलेल्या कलाकारांसाठीच. पूर्ण चित्रपटासाठी नव्हे.

रेटिंग - * * *

Tuesday, December 29, 2015

ये हौसला कैसे झुके..

आजच्या चित्रपटांबाबत दुर्दैवाने हे खरं आहे की बराच काळ लक्षात राहतील अशी फारच मोजकी गाणी आजकाल बनत असतात. तीन चार अपवाद वगळले, तर 'संगीतकार' ही जमात आजच्या घडीला सैन्यासोबतच्या बाजारबोणग्यांसारखी बिनमहत्वाची झाली आहे. अपवादात्मक लोकांपैकीसुद्धा 'सलीम-सुलेमान' हे नाव जरा इतर नावांपेक्षा कमी गाजलंय, पण त्यांची काही गाणी खरंच लक्षात राहण्याजोगी आहेत.
तर दुसरीकडे 'हळुवारपणे उलगडत जाणारे चित्रपट' ही संकल्पनाही हळूहळू बाद होत चालली आहे. दिग्दर्शकाचा ठसा उमटेल असे वेगळे सादरीकरण असणे म्हणजे अंगावर येणारा भडकपणा किंवा बुचकळ्यात टाकणारी गुंतागुंत असा काहीसा 'ट्रेण्ड'ही अावा. पण त्यातही नागेश कुकुनूर सारखे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांचे सिनेमे सगळ्या भडकपणा आणि वास्तवाच्या रंजक चित्रणाच्या भडिमारातही वेगळे दिसून येतात.

तर नागेश कुकुनूरचा एक असाच हळुवार उलगडच चित्रपट म्हणजे 'डोर'. त्याला संगीत 'सलीम-सुलेमान'चं.
त्यातलं हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी काही कामानिमित्त बाहेरगावी एकटा राहत होतो. तेव्हा रात्री एफएमवरचा 'लव्ह गुरु' हा कार्यक्रम (आर जे अनमोल) मी रोज पूर्ण रेकॉर्ड करत असे. ह्या रेकॉर्डिंग उद्योगाचा नाद जडलेला असताना एके रात्री हे गाणं लागलं.

ये हौसला कैसे झुके
ये आरज़ू कैसे रुके
मंज़िल मुश्किल तो क्या
धुँधला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या

राह पे काँटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपा ले सूरज मगर
रात को इक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी..............

होगी हमें जो रहमत अता
धूप कटेगी साए तले
अपनी ख़ुदा से है ये दुआ
मंज़िल लगा ले हमको गले
जुर्रत सौ बार रहे
ऊँचा इक़रार रहे
ज़िंदा हर प्यार रहे...........

खरं तर काही ओळीच देणार होतो. पण थोडं थोडं करत सगळंच दिलं गेलं इथे. ह्यातल्या एकेक शब्दाने मला त्या नैराश्याने वेढलेल्या काळात हुरूप दिला होता. मला हे शब्द माझ्यासाठीच लिहिले आहेत असं वाटायचं. आजही जेव्हा अचानक कधी हे गाणं माझ्या मोबाईलवरच्या शेकडो गाण्यांच्या गर्दीतून वाजतं, तेव्हा मी काही काळासाठी तरी सुन्न होतो. गाणं ऐकलं आणि अक्षरश: भारावून गेलो. नंतर काही दिवसांनी व्हिडीओ पार्लरमधून 'डोर'ची सीडी आणली आणि तो चित्रपट पूर्ण पाहिला.

आखातातील एका देशात एक पाकिस्तानी युवक आणि एक भारतीय युवक एकत्र राहत असतात. एके रात्री दोघा मित्रांमध्ये किरकोळ वाद होतो आणि चुकून पाकिस्तानी युवकाचा धक्का लागून भारतीय युवक काही मजल्यांच्या उंचीवरून खाली पडून मृत्यू पावतो. पाकिस्तानी युवकाला देहदंडाची शिक्षा होते आणि जर मृत व्यक्तीच्या पत्नीने दयेचा अर्ज केला, तरच त्याची ती शिक्षा कमी होऊ शकणार असते. हे समजल्यावर पाकिस्तानी युवकाची पत्नी 'गुल पनाग' थेट भारतात तो अर्ज घेऊन येते. मृत भारतीय युवक राजस्थानातला आहे, इतकंच तिला माहित असतं. तिला त्या अर्जावर त्याच्या विधवा पत्नीची - जी भूमिका आयेशा टाकियाने केली आहे - स्वाक्षरी हवी असते. ती तिला कशी शोधते आणि अखेरीस काय होतं अशी सगळी ही कहाणी. श्रेयस तळपदे सहाय्यक भूमिकेत. बाकी संपूर्ण चित्रपट गुल पनाग आणि आयेशा टाकियाचाच. दोघी जितक्या सुंदर दिसल्या आहेत, त्याहूनही अधिक सुंदर त्यांचं काम आहे. आयेशाने साकारलेली अल्लड अवखळ 'मीरा' आणि गुल पनागची परिपक्व, समंजस 'झीनत' ह्या दोघींपैकी कोण जास्त आवडली, हे ठरवणं केवळ अशक्य !

जास्त सविस्तर 'डोर'विषयी सांगता येत नाहीय कारण नंतर पुन्हा तो चित्रपट पाहता आला नाही. पण हे गाणं कायमस्वरूपी मनात घर करून आहे. शब्द 'मीर अली हुसेन' ह्यांचे आणि आवाज 'शफक़त अमानत अली' चा. दोघी मुख्य व्यक्तिरेखा आपापल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष, हतबलता आणि निराशेला सामोऱ्या जात आहेत. त्या दोघींचा दृढनिश्चय दाखवणारं हे गीत.

संगीत, काव्य हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्याचा रस्ता ते दाखवतील, चमत्कार घडवतील वगैरे असं काही नाही. मात्र अनेकदा त्यातून जेव्हा आपलीच मनस्थिती मांडली जाते, तेव्हा दु:ख, वेदना, यातना वाटल्या जाऊन एक उभारी मिळते. (हीसुद्धा एक प्रकारची जादू, एक प्रकारचा चमत्कारच का ?) हे गाणं म्हणूनच माझ्यासाठी खूप 'स्पेशल' आहे कारण माझी मनस्थिती मला त्यात अनेकदा दिसते. त्यातल्या रूपक तालाचा (7 beats) उसळून उसळून येणारा स्वभाव मनोधैर्य वाढवणारा वाटतो आणि उच्च स्वरांत रमलेली चाल आत्मविश्वासाला एका उंचीवर घेऊन जाते. तिथे, त्या उंचीवर 'धूप कटेगी सायें तले', 'रात को इक दिन ढलना ही है', 'हिम्मत रंग लाएगी', 'सुबह फिर आएगी', 'ऊँचा इक़रार रहे', 'ज़िंदा हर प्यार रहे', अश्या सगळ्या ओळी आशावाद आणि सकारात्मकता देतात. ही ऊर्जा मला प्रत्येक वेळी ह्या गाण्याने दिली आहे. प्रत्येक वेळी. एकदा तर मला आठवतंय की अर्धा-पाउण तास हे एकच गाणं ऐकत मी ऑफिसहून घरी आलो होतो.

हे असं काही मला मिळालं की पुन्हा पुन्हा मला वाटतं की देव आहे की नाही, ह्यावर वादविवाद होऊ शकतात. मात्र काही निर्मिती दैवी असतात, ह्यावर तरी वाद नसावाच. देव प्रत्येकातच असावा. जेव्हा जी व्यक्ती काही काळासाठी का होईना, त्याच्या/ तिच्या सर्वोच्च सृजनात्मक उंचीवर असते. तेव्हा ती व्यक्ती देवाचं रुप असते. देव म्हणजे काय ? विश्वासच ना ? माझा तरी विश्वास आहे की काही कामं काही वेळा काही लोकांकडून करवून घेतली जातात. ह्या गाण्याशी संबंधित सगळेच काही काळासाठी देवरूप झाले होते आणि त्यांनी ही निर्मिती केली खरी, पण कदाचित ही त्यांच्याकडून करवून घेतली गेली.
कारण कुठल्या तरी एका दिवशी त्या सगळ्यांपैकी कुणीच ह्या जगात नसेल, मीही नसेन. पण हे गाणं असेल. नक्कीच असेल.

- रणजित पराडकर

Sunday, December 27, 2015

सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)

-: २०१५ सालात प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांची एक प्रकाराची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न :-

~ ~ सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! ~ ~  

वक़्त रहता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमी सी हैं

गुलज़ार साहेबांच्या ह्या ओळी आपण साक्षात अनुभवतो प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. कारण वर्ष कितीही आनंदी गेलेलं असो वा दु:खी, खडतर वा सहज, जेव्हा डिसेंबरचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहतात, तेव्हा आपल्याला असंच वाटत राहतं की, 'कधी अख्खं वर्ष सरून गेलं, कळलंच नाही !' काय आलं, काय गेलं ह्याचा आपला हिशोब कधीच जुळत नसतो. मात्र चित्रपटांचं वेगळं असतं जरासं. इथले हिशोब नेहमीच जुळतात. इथे सरलेल्या वर्षातल्या प्रत्येक दिवसाने आपलं योगदान देऊन ठेवलेलं असतं आणि ते नोंदलंही जातं. सरलेल्या वर्षात आपण जे गमावलं असतं, ते कुणी न कुणी कमावलंही असतं आणि जे आपण कमावलं असतं, ते कुणी ना कुणी गमावलं असतं. मात्र पडद्याच्या पलीकडील आपल्या विरुद्ध दिशेला असेलेली व्यक्ती आपल्याला बहुतांशदा अज्ञातच असते.
बॉक्स ऑफिसवर मात्र जेव्हा एक सिनेमा काही कमावतो, तेव्हा ते ज्या दुसऱ्या कुणी गमावलेलं असतं, तोही समोर असतोच असतो. जसं, नुकतेच 'दिलवाले' आणि बाजीराव मस्तानी' एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांना वादाचं वलय लाभलं (की त्यांनीच ते मिळवलेलं?) होतं. शाहरुखचा चित्रपट म्हणजे दणकेबाज ओपनिंग मिळवणारच. अपेक्षेनुसार ह्या पहिल्या लढाईत 'दिलवाले' जिंकलाच. मात्र लौकरच प्रेक्षकांनी 'दिलवाले'ऐवजी 'बाजीराव'ला पसंती देण्यास सुरु केली आणि पहिल्या ३-४ दिवसांनंतर 'दिलवाले' मागे पडून 'बाजीराव'चं कलेक्शन वाढायला लागलं. ही दोन टुकारक्यांमधली भाग्यवान तुलना होती की अजून काही, हा भाग जाऊ देऊ. मात्र कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान हे स्पष्ट समजून येतच आहे. मग भले, रोहित शेट्टीने ते कितीही नाकारलं तरी !

वर्षाखेरीस तीन खानांपैकी किमान एकाचा चित्रपट येणे, ह्यात नवीन काहीच नाही आणि एका वर्षांत अक्षय कुमारचे ३-४ सिनेमे येऊन त्या सर्वांनी बऱ्यापैकी गल्ला जमवणे, ह्यातही नवीन काहीच नसावं. २०१५ मध्येही अक्षयचे ४ सिनेमे आले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. वर्षाची सुरुवातच अक्षयने दमदार 'बेबी'ने करून दिली. दिग्दर्शक नीरज पांडेंसोबत 'स्पेशल २६' नंतर अक्षय पुन्हा एकदा दिसला आणि पुन्हा एकदा एक वेगवान थरारपट बनला. पुढे आलेले 'सिंग इज ब्लिंग', 'ब्रदर्स' आणि 'गब्बर इज बॅक' सुद्धा बरे चालले, मात्र 'बेबी' च्या पातळीला ते पोहोचू शकणार नव्हतेच. त्यांचं यश तिकीटबारीपुरतंच मर्यादित राहिलं.

महानायक अमिताभ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला दिग्दर्शक आर. बाल्कीनी एकत्र आणलं आणि 'शमिताभ' बनवला. पण ह्या जैन पावभाजीला क्लासेस आणि मासेस दोघांनीही नापसंतीच दर्शवली. धनुषला अमिताभचा आवाज देणे, ही कल्पना सर्वांनाच अजीर्ण झाली आणि 'शमिताभ' एक फरगेटेबल अनुभव ठरला.
असाच फरगेटेबल अनुभव 'रॉय' आणि 'अब तक छप्पन - २' नीही दिला. लोक 'रणबीर कपूर'साठी 'रॉय' पाहायला गेले आणि त्यांना चित्रपटभर अर्जुन रामपालच मिळाला. चिकन बिर्याणीऐवजी फडफडीत मसाले भात वाढला आणि तो कितीही चविष्ट असला तरी विरस होणारच. 'रॉय' ने तेच केलं. तर, 'अब तक छप्पन - १' च्या प्रभावाला अजूनही न विसरलेले लोक जेव्हा त्याचा दुसरा भाग पाहायला गेले, तेव्हा त्यांना साचेबद्ध कहाणीच्या ठोकळेबाज सादरीकरणाला पाहावं लागलं. 'नाना होता म्हणून पूर्ण पाहिला तरी' अशी एका ओळीची प्रतिक्रिया लोकांनी दिली.

सर्व थरांतले प्रेक्षक पुन्हा एकदा प्रभावित झाले ते फेब्रुवारीत आलेल्या 'बदलापूर'ने. दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांचा 'एजंट विनोद' सपशेल फसला होता. मात्र त्यांचा पहिला चित्रपट 'एक हसीना थी' आणि नंतर आलेल्या 'जॉनी गद्दार' मधून त्यांनी जी पकड दाखवली होती, ती त्यांनी पुन्हा एकदा 'बदलापूर' मध्ये दाखवली. वरुण धवनसुद्धा अभिनय करू शकतो, हेही ह्या सिनेमाने दाखवून दिले. (अर्थात, वर्षाखेरीस 'दिलवाले' मधून वरुण धवनने लोकांचा हा गैरसमज दूर केलाच !) इथला नकारात्मक भूमिकेतला नवाझुद्दिन सिद्दिकी केवळ अप्रतिम होता.

नवाझुद्दिन ह्या वर्षी नंतर अजून दोन सिनेमांत झळकला. 'दशरथ मांझी'च्या जीवनकथेवर आधारलेल्या केतन मेहता दिग्दर्शित 'मांझी - द माउन्टेन मॅन' मधला त्याचा 'मांझी' अविस्मरणीयच ! ह्या गुणी अभिनेत्याच्या कुवतीचं चीज करणारी ही भूमिका होती. चित्रपट गाजला खरा, मात्र सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला त्यात नव्हताच. किंबहुना, व्यावसायिक यश डोळ्यांसमोर ठेवून तो बनवला नव्हताच. मात्र त्याच्या थोडा आधी आलेला 'बजरंगी भाईजान' मात्र भरपूर चालला. ह्या सलमानपटातला नवाझुद्दिनचा पाकिस्तानी रिपोर्टर लोकांना 'बदलापूर'मधल्या 'लायक'इतकाच आवडला. 'बजरंगी भाईजान' सुपर हिट होणार होताच आणि झालाच. मात्र तो ह्या वर्षातला पहिला सुपर हिट नव्हता.
वर्षातला पहिला 'सुपर हिट' मात्र मे महिन्यात मिळाला. कंगना राणावतच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' ने खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसला खडबडून जाग आणली. चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि रसिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र कंगनाच्या कामाची मात्र भरपूर प्रशंसा झाली. माधवनने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग नेहमीच जपला आहे. तोही अजिबात निराश झाला नाही. सप्टेंबरमध्ये झळकलेल्या 'कट्टी बट्टी' मधून मात्र कंगनाला ही जादू पुन्हा साधता आली नाही. तीच ती कंगना पाहून लोकांना जरा कंटाळाही आला असावा आणि इम्रान खानने त्या कंटाळ्यात भर घालायचं काम चोख निभावल्याने 'कट्टी बट्टी'शी लोकांनी कट्टीच घेतली.

'दम लगा के हैश्या', 'एनएच 10' आणि 'हंटर' ह्या तीन पूर्णपणे भिन्न सिनेमांनीही उत्तम कामगिरी केली. आपापला 'टारगेट ऑडीयन्स' तर त्यांनी सिनेमागृहाकडे ओढलाच, पण समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली. 'दम लगा के हैश्या' ह्या एका वेगळ्याच धाटणीच्या प्रेमकहाणीने 'नव्वदचं दशक' हाही एक 'विशिष्ट चित्रपटकाल' होता, हे जाणवून दिलं. क्वचितच मिळणारं सुश्राव्य संगीत ह्या सिनेमाने दिलं. 'एनएच 10' हा बेचैन करणारा सिनेमा होता. वास्तवदर्शन करवताना अतिरंजन टाळूनही आवश्यक परिणामकारकता साधणारा पुरेसा थेटपणा - ज्याला भडकपणाही म्हणता येऊ शकेल - असा एक अत्यंत कठीण समतोल त्याने साधला. अनुष्का शर्माचं ह्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाउल पडलं. एक निर्माती आणि अभिनेत्री अश्या दोन्ही आघाड्यांवर तिच्यासाठी हा चित्रपट यशस्वीच होता. 'हंटर' ही एक प्रकारची 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' होती. हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल इतपत सौम्यपणा त्यात चतुराईने जपला होता आणि कदाचित त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली !

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'बॉम्बे वेलवेट' आणि 'मै और चार्ल्स' हे तीन सिनेमे वेगळ्या हाताळणीचे होते. पैकी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ने समाधानकारक कमाई केली कारण ती व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली असल्याने लोकांना आकर्षित करणारीच होती. इथला सुशांतसिंग राजपूत लक्षवेधी ठरला. मात्र रणबीरचा 'बॉम्बे वेलवेट' आणि रणदीपचा 'मै और चार्ल्स' मात्र लोकांना काही झेपले नाहीतच. अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' त्यातल्या वाया गेलेल्या बहुतांशामुळे लोकांनी नाकारला. हा वाया गेलेला बहुतांश म्हणजे करण जोहर (अभिनेता म्हणून), चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या व्यक्तिरेखांच्या 'Rags to Riches' जाणाऱ्या जीवनप्रवासाचा प्रभाव, के के मेनन, संगीत वगैरे बाबी. ह्या सगळ्या बाबी चित्रपटाची बलस्थानं ठरायला हव्या होत्या. मात्र त्या निष्प्रभ ठरल्याने चित्रपटाचा एकत्रित परिणामही फारसा जमून आला नाही. 'मै और चार्ल्स' चा अपूर्णपणा त्याच्या गुंतागुंतीला अंधाऱ्या गूढतेकडून अनाकलनीयतेकडे घेऊन गेला. रणदीप हुडाने अप्रतिम साकारलेला 'चार्ल्स सोभराज' चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशामुळे दुर्लक्षिला गेला.

'पिकू' आणि 'दिल धडकने दो' ने हलक्या फुलक्या मनोरंजनाची मागणी व्यवस्थित पूर्ण केली. निखळ विनोद जो 'पिकू'ने दिला, तो सध्याच्या चित्रपटविश्वात अभावानेच मिळतो. आचरटपणा आणि चावटपणाला माथी मारून विनोद केल्याचा आविर्भाव आणणे, हे सध्याचं यशस्वी समीकरण आहे. दिग्दर्शक शुजीत सरकारनी 'पिकू'द्वारे असला कोणताही थिल्लरपणा न करता निर्भेळ विनोद सादर केला आणि लोकांनीही त्याला पूर्ण पसंती दिली. 'शमिताभ' मध्ये नाकारलेला अमिताभ लोकांनी इथे उचलून धरला. तर 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा 'Live your life, your way' चा संदेश अजून एकदा दिला. अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अश्या सर्वांचा दमदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्रास न देणारं संगीत ह्यांच्या जोरावर 'दिल धडकने दो' ने यश संपादन केले. स्वशोधाचा प्रवास दाखवणारा अजून एक चित्रपट 'मसान' सुद्धा होता. मात्र ह्या दोन्हींतला शोध वेगवेगळ्या प्रतलांवर होता. 'मसान' समांतर सिनेमाशी नातं सांगणारा होता. दिग्दर्शक नीरज घायवानचा हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कमालच केली. मसानला तिकीटबारीवर यश मर्यादितच लाभलं, मात्र रसिक व समीक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

वेलकम टू कराची, मिस तणकपूर हाजीर हो आणि बँगिस्तान हे तीन 'लो प्रोफाईल' विनोदी चित्रपट फ्लॉप ठरले. खरं तर हे तिन्ही 'फ्लॉप'च्या पातळीचे निश्चितच नव्हते. 'वेलकम टू कराची' आणि बँगिस्तान' हे साधारण एकाच पठडीचे. 'सिली कॉमेडी.' आणि दोघांनाही दहशतवादाच्या विषयाची जोड होती. तर 'मिस तणकपूर हाजीर हो' मधला उपरोध अनेकांना समजलाच नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली काही तरी अचाट आणि अतर्क्य कथानक आणि भरमसाट पांचटपणा करूनही नाना पाटेकर, अनिल कपूरचा 'वेलकम बॅक' मात्र बऱ्यापैकी गल्ला जमवून गेला.

इतर महत्वाच्या सिनेमांत 'तमाशा' आणि 'तलवार' चा उल्लेख आवश्यक आहे. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा'मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री जरी लोकांना आवडली तरी, दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केलेली 'जब वी मेट' आणि 'रॉक स्टार' ची पुनरावृत्ती लोकांना फारशी पसंतीस पडली नसावी. रहमानचं संगीतही काही जादू करू शकलं नाही आणि 'तमाशा'ची कमाई 'फ्लॉप झाला नाही' एव्हढ्यावरच मर्यादित राहिली.
नॉयडामध्ये २००८ साली झालेल्या आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' मध्ये इरफान खान, कोंकणा सेन, नीरज कबी असं गुणी व दमदार स्टार कास्ट होतं. ह्या सिनेमाने मात्र व्यावसायिक आणि कलात्मक असं दोन्ही यश मिळवलं. इरफान खानचा 'अश्विन कुमार' जबरदस्त जमून आला होता. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या 'जजबा' मध्येही इरफान खानची भूमिका तपास अधिकाऱ्याचीच होती. मात्र ऐश्वर्या रायचा पुनरागमनाचा सिनेमा असूनही 'जजबा' खूप काही करामत करू शकला नाही. 'आउटडेटेड थरार' दिल्याबद्दल संजय गुप्तांचा हा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला.

निशिकांत कामतनी दक्षिणेच्या 'दृश्यम'चा हिंदीत केलेला त्याच नावाचा रिमेकसुद्धा एक उल्लेखनीय चित्रपट होता. अजय देवगणचा विजय साळगावकर आणि त्याचा प्लान लोकांच्या इतका पसंतीस पडला की त्यावर आधारित जोक्स Whatsapp वर फिरायला लागले !

ह्या सर्वांच्या जोडीने 'मिस्टर एक्स', 'हमारी अधुरी कहानी', 'एबीसीडी-२', 'फॅण्टम', 'हीरो', 'कॅलेंडर गर्ल्स', 'शानदार', 'हेट स्टोरी-३' सारखे सपशेल फरगेटेबल सिनेमेही अधूनमधून आले आणि गेले. विशेष काही सांगावं असे काहीच नसलेलेही कित्येक येऊन गेले.
मात्र २०१५ साल लक्षात राहील ते 'बाहुबली - द बिगिनिंग' मुळे. आजपर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आणि आजपर्यंतच्या सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक 'बाहुबली' ही भारतीय चित्रपटाची एक मोठी उडी होती. 'बाहुबली'ने तांत्रिक सफाईचं एक उदाहरणच इतर सिनेमांसमोर ठेवलं. ह्या कहाणीचा उत्तरार्ध 'बाहुबली - द कन्क्ल्युजन' २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कुठल्याही सिनेमाची केली गेली नसेल, अशी प्रतीक्षा त्याची होत आहे, ह्यातच सर्व काही आलं !

ह्या सर्व चित्रभडिमारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे उत्तम सिनेसंगीताचा अभाव. मराठीत तरी 'कट्यार काळजात घुसली' ने ही तहान भागवली. मात्र हिंदीत सिनेसंगीताचा दर्जा इतका खालावला आहे की संपूर्ण वर्षभरातला एकही सिनेमा 'म्युझीकली' उत्तम म्हणवण्याच्या लायकीचा नाही. अगदी गाण्यांची भरमार असलेला 'प्रेम रतन धन पायो'सुद्धा अतिसुमारपट असूनही केवळ सलमानच्या स्टार पॉवरवरच चालला. 'राजश्री'च्या सिनेमांतलं संगीत एकेक पायरी उतरत 'प्रेम्रतन धन्पायो' (असाच उच्चार आहे गाण्यात!) पर्यंत गेलं आहे, ह्यात बडजात्यांना शरम वाटणार नाहीच, कारण त्यांनी त्यातूनही कोट्यवधी कमावले आहेत !

सध्या खोऱ्याने पैसा ओढत असलेल्या 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' ना शुभेच्छा आणि येणारं वर्ष उत्तम चित्रपट, सुश्राव्य संगीत आणि दर्जेदार मनोरंजनाने सजलेलं, गच्च भरलेलं असावं हीच सदिच्छा !

- रणजित पराडकर

हा लेख दै. मी मराठी लाईव्हमध्ये आज दि. २७ डिसेंबर २०१५  रोजी प्रकाशित झाला आहे -




Related Posts Plugin for WordPress, Blogger...