Friday, November 17, 2017

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )

पन्नास षटकांचा क्रिकेट सामना. निर्जीव खेळपट्टी. बोथट गोलंदाजी. पाच फलंदाज प्रत्येकी पन्नास धावा करतात आणि तेसुद्धा दर षटकाला बरोब्बर पाच एकेरी धावा धावून. संपूर्ण पन्नास षटकांत एकसुद्धा चौकार किंवा षटकार नाही. इतकंच काय, चेंडू जोरात किंवा उंचावरून फटकावण्याचाही प्रयत्न नाही. सगळं कसं 'ऑल अलाँग द ग्राऊण्ड', कॉपी-बुक शॉट्स, प्लेईंग इन द 'व्ही' वगैरे. जणू काही हा क्रिकेट सामना नसून नेट प्रॅक्टीसच चालली असावी.
कोण खेळतं असं ? सुनील गावस्करनी एकदा पूर्ण साठ षटकं खेळपट्टीवर उभं राहून छत्तीस धावा केल्या होत्या. But, gone are those days now.
पण मराठी चित्रपटांना मात्र असा सपाट खेळ करायची आवडच जडलेली दिसतेय सध्या. सिनेमाभर काहीही विशेष न घडणाऱ्या कथानकांचे सिनेमे बनवायचं एक 'फॅड'च आलंय बहुतेक. असं सपाट काही तरी बनवलं की ते कलात्मक वगैरे मानलं जात असावं. जितकं जास्त सपाट, तितकं जास्त कलात्मक !


'बापजन्म' ह्या सपाटपणाच्या मोजपट्टीवर साधारणपणे मध्याच्या थोडंसं पुढे वगैरे असावा. 'रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग' अर्थात 'रॉ'साठी आयुष्यभर यशस्वीपणे काम करून निवृत्त झालेला एक सीक्रेट एजंट 'भास्कर पंडित' (सचिन खेडेकर) पत्नीच्या निधनानंतर पुण्यात एकटाच राहतो आहे. आयुष्यभर जाणीवपूर्वक कमीत कमी भावनिक ओढ ठेवल्याने मुलांशी संबंध संपुष्टातच आल्यात जमा. आपल्याला कॅन्सर असून फार तर वर्षभराचं आयुष्यच आता हाती उरलं आहे, हे समजल्यावर त्याच्या मनात कालवाकालव सुरु होते. मुलांना भेटायची ओढ लागते. पण मुलांशी संबंध इतके वाईट असतात की त्याने नुसतं बोलावल्याने ती येणार नाहीत, ह्याचीही खात्री असते.
प्रश्न - अश्या वेळी तो काय करतो ?
उत्तर - आचरटपणा.
प्रश्न - कसा ?
उत्तर - स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचतो. जेणेकरून मुलं नक्की येतील.
प्रश्न - मग ती येतात आणि सारं काही सुरळीत होतं का ?
उत्तर - येतात की ! पण तरीही तो त्यांना सोडून एकta राहायला दूर अज्ञातवासात निघून जातो !
प्रश्न - म्हणजे त्यांच्यासाठी मेलेलाच राहतो ?
उत्तर - मुलाला सगळं सांगतो, मुलीला नाही सांगत !
प्रश्न - अरे मग हेच आधी का नाही करत ? किंवा जर निघूनच जायचं होतं तर इतकी नौटंकी का करतो ? केलीच आहे तर थांबत का नाही ? मुलाला सांगतो, तसं मुलीलाही का सांगत नाही ?
उत्तर - आवरा !!

एका अस्सल अचाट आणि अतर्क्य कथानकात भरपूर पाणी घालून एक अत्यंत पांचट सिनेमा कसा बनवावा, त्याचा हा परिपाठ !
मुलं नाराज आहेत, त्यांना एकदा पाहायचंय वगैरे कुठल्याही कारणाने कुणी स्वत:च्या मृत्यूचं नाटक का रचेल ? मी देशाच्या सेवेत इतकी वर्षं अमुक अमुक करत होतो, हे सांगितल्यावर ती मुलं समजून घेणार नाहीत का ? मुलगा घेतोच की ! बरं, नसतीलच जर घेणार आणि समजून घेतल्यावरही सारं काही सोडून निघून जाणंच फायनल असेल तर मग ही जबरदस्तीची सगळी जुळवाजुळव कशासाठी ?
मग हा सगळा भावनिक मूर्खपणा जस्टीफाय करण्यासाठी भास्कर पंडितला कॅन्सर वगैरे झाला असल्याचं एक ठिगळ जोडणं. घरात कॅमेरे लावून सगळ्यांना पाहू, त्यांनी घरी यावं म्हणून मेल्याचं नाटक करू असल्या आयडिया डोक्यात येण्यासाठी शेजारच्या 'आपटे' काकांच्या पात्राचं अजून एक ठिगळ !
मेलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावल्यावर 'शरीर थंड का लागत नाहीय?' असा प्राथमिक प्रश्नही कुणाला पडत नाही.
आईच्या बाजूला निजलेल्या दीड-दोन वर्षांच्या लहान बाळाला आजोबा उचलून घेऊन जातो. त्याआधी ते लहान बाळ चुळबूळ करतं, आवाजही करतं. काही तास ते बाळ तिथे नसतं, त्या काळात आई कूसही बदलते. पण तिला अजिबात जाणवतही नाही की आपलं बाळ आपल्या जवळ नाहीय ! अशी कुठली आई असते ?
हे असे साधे प्रश्न कुणाला पडूही नयेत, ह्याचं वैषम्य वाटतं.
त्याहून वैषम्य ह्याचं वाटतं की अश्या आचरट सिनेमावर अनेक लोक स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. का बरं ? मराठी आहे म्हणून ? ह्या फडतूस अस्मितांमधून बाहेर पडून एखाद्या कलाकृतीचा 'एक कलाकृती' म्हणून आपण कधी आस्वाद घेणार ?

टीचभर कथेवर रचलेली सुमार पटकथा असली तरी सचिन खेडेकर, शर्वरी लोहकरे आणि सत्यजित पटवर्धन ह्या
तिघा मुख्य कलाकारांची कामं अप्रतिम वाटली. पण पुष्कराज चिरपुटकरचा नोकर 'माउली' प्रचंड कंटाळवाणा आहे. गाणी श्रवणीय आहेत आणि पार्श्वसंगीतही आवडलं.

माझ्यासारखे अनेक सिनेरसिक मराठी सिनेमाकडे एक 'प्रायोगिक सिनेमा' म्हणून पाहतात. मात्र गेल्या काही काळापासून हे 'काहीही न घडणाऱ्या' सिनेमांचं जे पीक आलं आहे, त्यामुळे ही प्रायोगिकता नकोशी वाटायला लागेल, अशी भीतीही वाटते आहे. मराठी सिनेमा तमाश्याच्या फडातून बाहेर पडला, त्यानंतर थिल्लर विनोद करत बसला आणि आता ह्या सपाटपणात रमला आहे, असं वाटतंय. जर सिनेमा प्रेक्षकांना गुंतवणार, आकर्षित करणार नसेल तर प्रेक्षकाने त्याला टाळल्याचीही त्याला तक्रार नसावी.


रेटिंग - * *

- रणजित पराडकर 

Tuesday, October 03, 2017

एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'
एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !


पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -> अतिसुमार -> बरा -> सहनीय -> सुमार' असा ग्राफ असलेला हा एकमेव 'अ‍ॅक्टर(?)' असावा बहुतेक !)
रिमेकसुद्धा पाहिला नसताच पण, स्त्री-हट्टापुढे कुणाचे काय चालणार ? मॅडमनी हुकुम सोडला आणि मी गपगुमान तिच्यासोबत गेलो. खरं तर तिने हट्टाने पाहायला लावलेल्या काही सिनेमांच्या आठवणी भयाण आहेत. उदा. - जब तक हैं जान, हॅप्पी न्यू इयर, तीस मार खान, दिलवाले, वगैरे. अर्थात, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन, रईस अश्या शाहरुखपटांनी जरासा बॅलन्सही केला होता. पण तरी भयाण आठवणी स्वत:चा भयाणपणा कधी कमी होऊ देत नसतातच. त्यामुळे मनात धाकधूक घेऊनच गेलो 'जुडवा-२' ला.
ह्या धाकधुकीचं दुसरं कारण म्हणजे धवनपुत्र ! 'वरुण धवन' हा वरून, खालून, डावी-उजवीकडून सगळीकडूनच सल्लूइतका उल्लू नसला, तरी ती दोन गरीबांमधली भाग्यवान तुलनाच आहे. 'बदलापूर'मध्ये तो मला आवडला होता. अगदी, 'ढिशुम'मध्येही आवडला होता. पण तसा तर सल्लूसुद्धा 'दबंग' आणि 'वॉण्टेड' मध्ये आवडला आहेच.
असो.

तर 'जुडवा-२' पाहिला आणि चक्क आवडलाही !
फार ताणला आहे आणि शेवटाकडे अगदीच रिडीक्युलसोत्तम वगैरे लेव्हल गाठली आहे, पण तरी ओव्हरऑल मजा आलीच ! अनेक वेळा खळखळून हसलो.. अनेक वेळा गडगडाटीसुद्धा हसलो ! जुन्या 'जुडवा'मधल्या सल्लूच्या टुकार आठवणी वरुणने पुसून टाकल्या आहेत. अर्थात, सिनेमा संपल्यावर सल्लू पडद्यावर डोकावून जातोच आणि मजबूत पीळतोच. पण ते 'सिनेमा संपल्यावर' असल्यामुळे तेव्हढा भाग आपण नाही पाहिला तरी चालतंय.

सिनेमाचं कथानक सर्वांना माहित असावंच. त्यामुळे त्यावर रेंगाळत बसत नाहीय. डायरेक्ट काय आवडलं, काय नाही, ह्यावरच येतो.

'जॅकलिन फर्नांडीस' ही मला पूर्वी अजिबात आवडायची नाही. (Yes ! I am sorry for this !) पण आता हळूहळू आपुन का उस पे दिल आ रैलाय. जामच खट्याळ सौंदर्य आहे हे ! तिचा स्क्रीन प्रेझेन्स चिल्ड बियरच्या पहिल्या घोटासारखा असतो. अतिशय बोलका चेहरा, जबरदस्त आत्मविश्वास, दिलखेचक अदा आणि डवरलेल्या मोगऱ्याचं सौंदर्य असं डेडली कॉम्बिनेशन असलेली ही गुलबदन नशिल्या नजरेने सटासट बाण सोडून घायाळ करते !
ऑन द अदर हॅण्ड, 'तापसी पन्नू' म्हणजे उकडलेल्या भाज्यांच्या सलाडसारखी अळणी, बेचव वाटते. तिने बेबी, नाम शबाना, पिंक सारखे सिनेमेच करावेत. रोमॅण्टिक वगैरे रोल्समध्ये तिचा खप्पड मरतुकडेपणा फारच खटकतो. जोडीला जॅकलिन असल्यामुळे तर ती जास्तच मिसफिट वाटते.
राजपाल यादवने शक्ती कपूरची इरिटेटिंग उणीव भरून काढली आहे. प्रचंड बोअर करतो !
खेडेकर, खेर, झाकीर हुसेन वगैरे मंडळी मस्तच, पण सपोर्ट कास्टमध्ये भाव खाललाय तो लंडनमधला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेतल्या 'पवन मल्होत्रा'ने !

'म्युझिक' नावाचा भिकार प्रयत्न चांगला जमून आलाय. कारण ते उच्चतम भिकार बनलं आहे. पण आत्तापर्यंत आपण सुमार संगीताला सहन करण्याची दुर्दैवी सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या भिकारपणाबद्दल काही वाईट वाटत नाही.

'डेव्हिड धवन' हे एक अजब रसायन आहे. पंचवीस वर्षं झाली, हा माणूस प्रेक्षकांची नस पकडून आहे. प्रेक्षक बदलतो, तसा हा पुन्हा नव्याने नस पकडतो आहे. वीस वर्षांपूर्वीच्या 'जुडवा'ला पुन्हा घेऊन येताना त्याने योग्य तो मसाला वाढवला आहे आणि नको तो कमीही केला आहे. बिनडोक सिनेमा बनवावा, तर तो डेव्हिड धवनने. बाकी कुणाचं काम नाही ते. कारण प्रत्येक जण, स्वत:च्याच नकळत असेल पण, कुठे न कुठे तरी जरासा सेन्सिबल वगैरे होतो आणि मग सगळं मिसमॅच होतं. 'अथ:'पासून 'इति'पर्यंत 'नॉट-टू-मेक-सेन्स' हे सूत्र जपणं, नक्कीच सोपं नसावं. जाणीवपूर्वक आउटराईट नॉनसेन्स करण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते, हे निश्चितच.
इथेच भन्साळीसारखे लोक कमी पडतात. कारण त्यांच्या स्वत:च्या नकळत 'नॉनसेन्स' बनत असतो आणि डेव्हिड धवनसारखे लोक विचारपूर्वक 'नॉनसेन्स' बनवतात. हाच परफेक्शनचा फरक असावा. 'जुडवा' हा एक परफेक्ट नॉनसेन्स आहे. ह्या कहाणीची मुळं 'जॅकी चॅन' च्या 'ट्विन ड्रॅगोन' नामक सिनेमापर्यंत जातात असं म्हणतात. जातही असतील, अपने को क्या ! तूर्तास तरी 'मॅडम'चा हट्ट पुरवण्यापूर्वी जी धाकधूक मनात होती, तिच्या जागी 'रिफ्रेश' झाल्याचं फिलिंग आलं आहे. कारण आपल्या रटाळ रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी एखादा आउटराईट नॉनसेन्स असलेला मूव्ही रामबाण उपाय ठरत असतो !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Thursday, August 31, 2017

कभी हाँ, कभी ना - १

सुनील संध्याकाळी घरी परततो आणि बघतो.. घरच्यांनी सुनीलच्या जबरदस्त मार्क्स मिळवून पास होण्याच्या आनंदात मस्तपैकी पार्टी ठेवलेली असते.
गोव्यातल्या त्या छोट्याश्या शहरात, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात, आजपर्यंत सुनीलला सगळे कुचकामी समजत असतात. पण आज सुनीलचे वडील अभिमानाने त्या सगळ्यांना सांगत असतात की, 'नाही.. माझा मुलगा कुचकामी नाही! त्याने आज त्याच्या बापाला जिंकलंय.. आजपासून मी त्याला माझ्या गॅरेजमध्ये काम करण्याची जबरदस्ती करणार नाही.. त्याला 'म्युझिक'मध्ये काही करायची इच्छा आहे.. तो तेच करेल. माझा पूर्ण पाठिंबा आणि आशिर्वाद आहे त्याला..!'
उपस्थित सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटात सुनीलला शुभेच्छा देतात. अभिष्टचिंतन करतात. तिथे त्याचे मित्रही असतात, 'अ‍ॅना'ही असते, तिचे आई-वडील व भाऊसुद्धा आणि फादर ब्रीगेन्झादेखिल.

सुनीलचं मन त्याला खायला उठतं. खरं तर तो लागोपाठ चौथ्यांदा नापास झालेला असतो आणि घरच्यांना त्याने नकली मार्क्सशीट दाखवून फसवलेलं असतं !
'हे मी काय करून बसलो ! सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास, किती प्रेम आहे.. आणि मी? खोटी मार्क्सशीट बनवून ह्या सगळ्यांना फसवतोय..!'
स्वतःची शरम वाटत असते त्याला..
'पटेल.' 'चायना टाऊन'चा मालक. त्यानेच त्याला ही आयडिया दिलेली असते आणि बनावट मार्क्सशीटही बनवून आणून दिलेली असते. तो त्यालाच पकडतो.
'काय झालं यार हे, पटेल?'
'सुनील, मला पण वाटलं नव्हतं की इतकं मोठं प्रकरण होईल. पण आता तू खरं सांगितलंस तर काय होईल? कठीण आहे. कोण मदत करू शकेल आता ?'
फादर ब्रीगेन्झा..!! सुनीलवर खूप माया करणारे फादर. ते दिसतात सुनीलला. तो लगेच त्यांना बाजूला नेऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो. फादर हादरतात ! चिडतातही..!
'अरे हे काय केलंस सुनील! तुझ्या आई-बापाच्या चेहर्‍यावर बघ कसा आनंद ओसंडून वाहतोय. त्यांना खरी गोष्ट कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? काही तरी विचार करायचा होतास रे.. ते काही नाही.. आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आई-बापाशी बोलायचंयस, त्यांना खरं खरं सांगायचंस.. हात जोडून, पाया पडून, काय जमेल ते करून क्षमा मागायचीस.. बस्स्स, हे सगळं कांड तू केलं आहेस, तुलाच ते निस्तरावंही लागेल.. चल जा.. सांग विनायकला - तुझ्या वडिलांना - आत्ताच्या आत्ता.. !'

सुनील जातो. आई-बापाला सांगतो.
एकीकडे पार्टी चालू आहे. सगळे हसतायत, खिदळतायत. दुसरीकडे पटेलच्या चेहर्‍यावर टेन्शन.. फादर ब्रीगेन्झा चिंताक्रांत.. आणि इतक्यात सुनीलच्या वडिलांचा - विनायकचा - आवाज चढतो ! ते त्याच्या एक मुस्कटात ठेवून देतात  आणि धक्के मारून दूर ढकलून देतात..
'चल निघ इथून..!! पुन्हा पाऊल ठेवू नकोस ह्या घरात.. चालता हो......!!'

पब्लिक सुन्न..
हात जोडून विनायक सांगतो -
'मित्रांनो, माझ्या ह्या मुलाने मला फसवलं. बनावट मार्क्सशीट दाखवली. तो फर्स्ट क्लास मिळवून पास झालेला नाही.. हा नालायक तर पुन्हा एकदा नापास झालाय.. मी मघाशी मोठ्ठं अभिमानाचं भाषण दिलं होतं, ते सगळं खोटंय.. हा माझा मुलगा आहे, ह्याची मला लाज वाटते.. लाज..! तुम्ही लोक इथे आलात मी तुमचे आभार मानतो..... पण मला माफ करा..!'
कुणाला काय करावं, काही सुचेनासंच होतं !
मटकन् खाली बसून टीपं गाळणार्‍या विनायककडे फादर जातात.. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात - 'विनायक, सुनील फेल नाही, पास झालाय.. इतक्या सगळ्या लोकांसमोर आपली चूक कबूल करायला खूप मोठी हिंमत लागते. ह्यावरून हेच दिसून येतं की ह्याचं मन किती स्वच्छ आहे ! अरे, जगात असे अनेक लोक असतात ज्यांना उद्याचा विचार करणं पटत नाही.  त्यांच्यासाठी आयुष्याचा प्रवासच जास्त महत्वाचा असतो. प्रत्येक क्षण त्यांना सोहळा करायचा असतो. सुनील त्यांच्यातला आहे. त्याला असं परीक्षांच्या निकालावर पास-फेल करू नकोस.. असं बिनधास्त आयुष्य जगायसाठी जबरदस्त मानसिक बळ लागतं. अरे तो 'स्पेशल' आहे.... तो मनाने स्वच्छ आहे, त्याला क्षमा कर.. बघ, माझं म्हणणं तुला पटतंय ना ? पटत असलं तर लगेच बोल की तू त्याला क्षमा केली आहेस..'
सुनीलची आई, अ‍ॅनाचे वडिल, पटेल सगळे विनायकच्या आजूबाजूला.. त्याला 'फादरचं ऐक' असं नजरेतून सांगत आहेत.
विनायक मूक.. शांत.

सुनील आपली सॅक उचलून घराबाहेर जाऊ लागतो.......
आणि गाणं सुरू..................

'वोह तो हैं अलबेला, हजारों में अकेला
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा....'

मजरूह सुल्तानपुरींचे सुंदर शब्द, जतीन-ललितचं अप्रतिम संगीत आणि हृदयाच्या गाभ्यातून येणारा सानूचा गोड आवाज..........
सगळे उपस्थित लोक एकेक ओळ गाऊन विनायकचं मन वळवतात..

'बन्सी को लकडी सदा समझा किये तुम
पर उसके नग़्मों की धुन कहाँ सुन सके तुम..'

आणि मग स्वत: विनायकही म्हणतो, 'वोह तो हैं अलबेला..!!'
तो सुनीलला जवळ घेतो, मिठी मारतो आणि सगळं पब्लिक पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करतं.. प्रत्येक वेळेस तिथे दोन-तीन टाळ्या मीसुद्धा वाजवतो. गलबलून आल्यावर काही गोष्टी नकळत घडून जातात.


'कभी हाँ, कभी ना' मध्ये असे अजूनही काही गलबलून आणणारे क्षण आहेत. ही कहाणी एका 'नोबडी'ची आहे. शाहरुखने लोकांच्या मनात घर करण्याचं एक कारण त्याचे हे सुरुवातीचे काही सिनेमे आहेत. ज्यात तो अगदी तुमच्या-माझ्यासारखा वाटला होता. तो आपलं रिप्रेझेंटेशन बनला होता. इथला त्याचा 'सुनील' एकदम 'परफेक्ट'! त्याचं हुरळून जाणं, निराश होणं, इतकंच काय.. 'अ‍ॅना'चं 'ख्रिस'वर आणि 'ख्रिस'चं अ‍ॅनावर प्रेम असणं, ह्यामुळे त्याचा होणारा जळफळाट हे सगळं त्याला एक 'कॉमन मॅन' च बनवतं. खरं तर इथली सगळीच कॅरेक्टर्स अशीच 'जमिनीवरची' आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्याशी नातं सांगणाऱ्या लोकांनी विणलेलं हे कथानक फक्त एक विरंगुळा देत नाही, तर आपल्यातल्या अस्तित्वहीन सामान्य माणसालाही काही कहाणी असते, ही सुखावह भावना चाळवतं.


'कुंदन शाह'च्या 'जाने भी दो यारों' ने 'ब्लॅक कॉमेडी' मध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान बनवलेलं आहे. पण माझ्या मते 'जाने भी दो यारों' पेक्षाही कैक पटींनी सरस काम 'कभी हाँ, कभी ना' आहे. ह्यात काही मेसेज वगैरे नाहीय, तो असायलाच का हवा ? पण एक-एक पैलू काळजीपूर्वक पाडलेला आहे. सुरुवातीला वर्णन केलेला गाणं आणि त्याच्या आधीचा पूर्ण प्रसंग हे एक उदाहरण. प्रत्येक गाणं असंच खूप विचारपूर्वक चित्रित केलं आहे. 'आना मेरे प्यार को ना तुम..' आपल्याला गुदगुल्या करतं, 'ऐ काश के हम..' आपल्याला झुलवत झुलवत नाचवतं, तर 'दीवाना दिल दीवाना..' गायलाच लावतं. गाण्यांच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी हा सिनेमा एक परिपाठच ठरावा.

'कभी हाँ, कभी ना' सारखे सिनेमे शाहरुखला 'शाहरुख'बनवून गेले आहेत. आज त्याचा राग येतो कारण त्याच्या 'सुनील', 'राजू' वर आम्ही जीवापाड प्रेम केलं आहे आणि करतोही. जो चेहरा कधी आम्हाला 'आमचा' वाटायचा तो आता वाटेनासा झाला आहे, हे खरं दु:ख आहे, हा खरा राग आहे.
हरकत नाही.
आयुष्यभर एकच एक काम कुणी कलाकार करत नाही, करूही नयेच. त्यानेही स्वत:ची इमेज बदलली, टिकवली आता ती पुन्हा बदलायची वेळ आली आहे. मला तो पुन्हा एकदा आपला वाटून घ्यायची इच्छा होते आहे. त्यासाठी त्याने परत बदलावं. सुनील, राजू नको, इतर काही बनावं. त्यात मला 'मी' दिसावा, तो मला 'माझा' वाटावा. कारण तोसुद्धा 'अलबेला' आहेच, नि:संशय !

- रणजित पराडकर

(क्रमश:)

Monday, August 07, 2017

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे मठ्ठपणा, पोरकटपणा, थिल्लरपणा आणि सोबतीला वेडेपणा फार क्वचितच एकत्र येतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हुशार, परिपक्व, स्थितप्रज्ञ, शहाणा वगैरे बिरुदं मिरवणाऱ्या माणसाचा तद्दन बिनडोक, बावळट आणि मूर्खपणा असा काही समोर येतो की सगळी ओळख पुसून जाईल की काय असंच वाटावं ! इम्तियाझ अलीचा मो., पो., थि. आणि वे.पणा एकत्र आल्यावर त्याने ठरवलं की अमुक एका स्क्रिप्टवर काम करायला हवं. चुकलेल्या वाटेवर वर्षानुवर्षं मनापासून भरकटत चाललेला शाहरुख खान त्याला ह्यासाठी जोडीदार म्हणून लाभला. आणि ह्या ढवळ्या-पवळ्याच्या सोबतीला 'प्रीतम' नावाचा टवळासुद्धा आला ! ह्या अभूतपूर्व संगमाच्या पवित्र ठिकाणाचं अप्रतिम सुंदर असं नावसुद्धा अस्सल ओरिजिनालिटी मिरवेल असं ठरवलं गेलं - 'जब हॅरी मेट सेजल'.

नाव, ट्रेलर, म्युझिक आणि लोकांकडून मिळालेले अभिप्राय, ह्या सगळ्यानंतर खरं तर सिनेमा पाहायलाच नको होता. पण पाहिला. कारण पहिल्या तिन्ही बाबींना फक्त आणि फक्त इम्तियाझ अलीसाठी दुर्लक्षित करून रिलीजच्या तीन दिवस आधीच बुकिंग्स सुरु झाल्या झाल्या तिकिटं काढून ठेवली होती. अक्कलखाती जमा झालेल्या गडगंज संपत्तीत अजून काही शे रुपयांची भर टाकली आणि मनावर सलमान खान ठेवून सिनेमा पाहायला गेलो.


पर्यटकांच्या एका समूहाला सफर घडवणाऱ्या 'हॅरी' (शाहरुख खान) पासून सिनेमाची सुरुवात होते. पहिल्या एका मिनिटात अशक्य पांचट प्रकारात मोडणारे ३-४ बकवास विनोद-प्रयत्न पुढे येणाऱ्या फुटकळपणाची नांदी ठरतात. आधी डोक्यावर आपटून परिणाम झालेली आणि टप्पा पडून नंतर तोंडावर आपटल्याने चपटी झाल्यासारखी दिसणारी 'सेजल' (अनुष्का शर्मा) ह्या टूअर गाईड 'हॅरी'ला हाताशी धरून आपली हरवलेली एंगेजमेंट रिंग शोधण्यासाठी मुंबईला परत जाणारं विमान आणि आपलं संपूर्ण कुटुंब सोडून मागे थांबते. 'हॅरी'ची इच्छा नसताना, तो मुलींच्या बाबतीत 'कॅरेक्टर-ढिला' आहे हे समजल्यावरसुद्धा तिला तोच सोबतीला हवा असतो. नंतर हे दोघं अ‍ॅमस्टरडॅम, बुडापेस्ट, बर्लिन, लिस्बन वगैरे अनेक शहरांत एक अंगठी शोधत फिरतात. हॉटेलांतल्या टेबलांखाली, सोफ्यांत, हिरवळीत, रस्त्यांवर, पेव्हर ब्लॉक्समध्ये अश्या रॅण्डम जागांवर वाकून, झोपून, खरवडून वगैरे बघतात. ह्या दरम्यान रात्र झाल्यावर अर्धे कपडे घालून रेड लाईट क्लब्समध्ये बागडायची हुक्की सेजलला येत असते. ह्या अर्ध्या कपड्यांत ती सेक्सी दिसते आहे, असं तिला आणि दिग्दर्शकालाच केवळ वाटतं.
मूर्खपणाच्या सगळ्यात वरच्या पायरीपर्यंत चढून लिहिलेले बाष्कळ प्रसंग अंगठीशोधमोहीम आणि हॅरी-सेजल प्रेमप्रकरण दोन्हीला व पर्यायाने संपूर्ण सिनेमालाच असह्य रटाळ व कंटाळवाणेपणाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन प्रेक्षकाचा कडेलोट करतात. ही कडेलोट करेपर्यंतची मिरवणुक कानठळ्या बसवणाऱ्या भुरट्या संगीतावर नाचत नाचत काढली जाते.

माझं एक मत होतं की सिनेमात गाण्यांचा अत्यंत चतुरपणे कसा वापर करावा ह्याचा इम्तियाझ अली हा एक वस्तुपाठ आहे. आग लागली त्या वस्तुपाठाला ! 'एसीची हवा लागून कुणाला झोप वगैरे लागली, तर खाडकन कानाखाली आवाज काढावा' ह्या एकमेव हेतूने ही गाणी बनवलेली आहेत. मेलोडीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला कल्लोळाच्या डोहात ढकलून दिल्यानंतरच 'प्रीतम'ने चाली बनवल्या आहेत. त्यांवर इर्शाद कमिलचे शब्द स्वत:चे हातपाय तोडून घेतात. कुठलंही गाणं कथानकाला खारीएव्हढाही हातभार लावत नाही. अर्थात, कथानकच मुंगीएव्हढं असल्याने इतका मोठा हातभार लावण्यासारखा वाटा तरी कुठून मिळणार, नाही का !

गेल्या काही सिनेमांतून वेगळ्या अपेक्षा निर्माण करणारा शाहरुख पुन्हा एकदा त्याच माकडचाळ्यांत नव्याने रमलेला पाहून अगदी मनापासून वाईट वाटलं. रईस, गौरव-आर्यन आणि जहांगीर खान अश्या ठोस व्यक्तिरेखा साकारल्यानंतर 'हॅरी'सारखा पिचकवणी रोल शाहरुखला करावासा वाटतो, ही खरोखर दु:खाची गोष्ट आहे. तो कुठेही कमी पडत नाही, नक्कीच. पण कमी पडलं जाऊ शकेल, असं आव्हानात्मक काही नव्हतंच तर !
अनुष्का शर्माबाबतही तसंच. त्यात तिला गुजराथी ढब काही नीटशी जमलेलीही नाही. त्याची गरजही काय होती, कुणास ठाऊक !

शाहरुख आणि अनुष्काबाबत माझी सध्याची मतं जरी सकारात्मक असली, तरी मी फक्त इम्तियाझ अलीसाठी तिकीट काढलं होतं. कधी तरी कुणी तरी त्याला विचारायला हवं, Et tu, Brute ? 'कॉफी विथ करण' च्या एका भागात रोहित शेट्टी, कबीर खान आणि इम्तियाझची एकत्र मुलाखत होती. पडद्यावर असणाऱ्या चौघा दिग्दर्शकांमध्ये इम्तियाझ एलियनच वाटत होता. त्याची उत्तरं, त्याचे विचार खूपच भिन्न होते. आता मला कळत नाहीय की इम्तियाझचं नाव लावून 'जब हॅरी मेट सेजल' दुसऱ्याच कुणी बनवला आहे की तो मुलाखतीत दिसलेला इम्तियाझ खोटारडा होता ? सवडीनुसार आपली बोलायची ढब सर्रास बदलणारी सेजल त्याने सहनच कशी केली ? 'तू तिकडून चालत ये.. मला कॉफी प्यायला ने' वगैरे भंकस प्रसंग, असंबद्ध गाणी हे सगळं त्याला पचलंच कसं ? एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी ढिसाळ, पसरट पटकथा त्याने लिहिलीच कशी ? असे सगळे प्रश्न मलाच निरुत्तर करत आहेत. राम गोपाल वर्मा आणि मधुर भांडारकरप्रमाणे इम्तियाझ अलीसुद्धा एक 'स्पेंट फोर्स' होतो की काय, अशी भीती वाटतेय.

'जब तक हैं जान' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखच्या तमाम सुमारपटांमध्ये आघाडीवर समजायला हवे. 'जतहैंजा'च्या वेळेस तरी शाहरूखची बऱ्यापैकी हवा होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स पाहायला मिळतील म्हणून तिकिटं काढेल इतका प्रेक्षक बिनडोक राहिलेला नाही आणि हळूहळू का होईना त्याची स्टारशरणताही कमी कमी होत चालली आहे. रविवार असूनही नाईट शोसाठी थिएटर जेमतेम १५-२०% भरलेलं होतं आणि त्यातही १०-१२ लोक अर्ध्यातून उठून गेले. एखाद्या आठवड्यातच 'जहॅमेसे'ला गाशा गुंडाळावा लागला, तर मला आश्चर्यही वाटणार नाही आणि वाईटही.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...