एखादा रोमहर्षक क्रिकेट सामना आपण Live पाहतो. मनोमन सुखावतो. मग दुसऱ्या दिवशी पुनरानुभूतीसाठी म्हणून त्या सामन्याच्या हायलाईट्सही पाहतो. मजा येते, पण Live पाहण्याची किंवा बॉल-बाय-बॉल पाहण्याची मजा त्यात येत नसते.
'सॅम बहादूर' चं काहीसं तसंच झालं आहे.
'सॅम माणेकशॉ' हे नाव आपण अनेकदा ऐकलं आहे. त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासून ते १९७१ च्या युद्धापर्यंत असं प्रचंड पसरलेलं हे एक मिलिटरी करियर आहे. अनेक लढाया, मोहिमा गाजवलेलं आणि भारतीय सैन्याच्या इतिहासातील कदाचित सगळ्यात नावाजलेलं. ह्या मिलिटरी करियरचा, ह्या नावाचा आणि ह्या व्यक्तीचा पसारा इतका मोठा आहे की एका अडीच तासाच्या सिनेमात तो बसवणं अशक्यप्राय आहे. त्यामुळेच सिनेमा पाहत असताना आपल्याला हायलाईट्स पाहिल्यासारखंच वाटतं. मजा येते, पण तरी पुरेशी नाहीच. हा विषय कदाचित एकाहून जास्त सिनेमांचा किंवा एखाद्या मिनी सीरिजचा असावा. तर त्याला न्याय मिळाला असता.
इतर बहुतांश चरित्रपटांप्रमाणे इथे सिनेमा सॅम माणेकशॉ ह्यांच्या बालपणापासून कहाणी सुरु करतो. पण त्यात फार रेंगाळत नाही. आर्मी ट्रेनिंग, ब्रिटिश आर्मी जॉईन करणं, महायुद्ध, १९४७ चं युद्ध, १९६२ आणि १९७२ असा हा प्रवास चालतो. ह्यापैकी कुठलाच टप्पा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. एका विशिष्ट टप्प्यापासून पुढचं लोकांना माहीत आहेच, असं काहीसं गृहीतक धरलं असावं. हे करणं आवश्यकच होतं कारण बराच मोठा कालखंड व खूप मोठ्ठम कथानक एका सिनेमात बसवायचं होतं.
अनेक दिवसांनी 'शंकर-एहसान-लॉय' ह्या माझ्या आजच्या काळातील सर्वात आवडत्या संगीतकारांचं काम ह्या सिनेमात आहे. गाण्यांना फारशी जागा नाहीय. तीनच गाणी आहेत, पण तिन्ही सुंदर आहेत. मी सिनेमा पाहण्याआधी एकही गाणं ऐकलेलं नव्हतं. पण तिन्ही गाणी मनात घर करून राहतात. 'बढते चलो..' अंगात जबरदस्त जोश फुंकतं. 'इतनी बात..' सारखं हळुवार आणि गोड चालीचं गाणं आजच्या काळात S-E-L च देऊ शकतात आणि गायलाही तिथे सोनू निगम व श्रेया घोषालच हवे. सगळं अगदी मस्तपैकी जुळून आलेलं आहे.
खरं सांगायचं तर मेघना गुलजारचा असल्याने माझी अपेक्षा खूप जास्त होती. बहुतेक तरी पूर्ण झाली नाही. युद्धाचे प्रसंग तर बऱ्यापैकी विचित्रच वाटले. शत्रूसैनिक अगदी ३०-४० फुटांवर येईपर्यंत चकमक सुरु होत नाही, असं २-३ दा दाखवलं आहे. कास्टिंगबाबत सांगायचं तर सान्या मल्होत्रा नेहमीच आवडते. इथेही आवडली, पण तिला वयस्कर दाखवतानाचा गेटअप आणि मेकअप जमल्यासारखा वाटला नाही. 'नीरज कबी'सारखा अत्यंत गुणी अभिनेता जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत नक्कल करण्याच्या नादात वाया गेला आहे. झीशान अयुबलाही जवळजवळ शून्य वाव मिळाला आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे सिनेमा फक्त आणि फक्त विकी कौशलचाच आहे. तो अजिबातच निराश करत नाही. सिनेमाही करणार नाही. फक्त पुरेसा वाटत नाही, इतकंच.
रेटिंग - ***१/२