सत्याला स्वत:ची वेगळी चमक असते. जसं कितीही धूळ बसली तरी सोनं चमकल्याशिवाय राहत नाही, तशी ही चमक लपू शकत नाही. आपण म्हणतो, 'कोंबडं झाकलं तरी तांबडं फ़ुटायचं राहत नाही'. म्हणजे हेच की जे २४ कॅरेट सोन्यासारखं शुद्ध सत्य आहे ते कुणी कितीही आटापिटा करून झाकायचा, दडवायचा आणि दडपायचाही प्रयत्न केला तरी त्याला कायमस्वरूपी संपवता येत नाही. कारण मुळात सत्य अदृश्य नसतं, आपण त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते किंवा डोळे मिटून घेतलेले असतात. मग कधी ना कधी एक वेळ अशी येतेच की ते सत्य आरश्यासारखं ढळढळीतपणे समोर येतं आणि मग ते स्वीकारावं लागतंच.
काश्मिरच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं एक असंच सत्य आता स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. गेली अनेक वर्षं ज्याच्याकडे समाजाने, देशाने, अख्ख्या जगानेच पाठ फिरवली होती, हे ते सत्य आहे.
ज्या भयाण वास्तवाच्या विस्तवाची झळ फार क्वचित कुणा कवी, साहित्यिक मनाला जाणवली असेल, हे ते सत्य आहे.
ज्या मुळातून हादरवून टाकू शकेल अश्या विषयाकडे पलायनवादी व चंगळवादी सिनेमासृष्टीने सोयीस्करपणे डोळेझाक केली होती, हे ते सत्य आहे.
काश्मिरी पंडितांच्या सामुहिक हत्याकांडांचं सत्य. त्यांच्यावरील अघोरी अत्याचाराचं सत्य. त्यांच्या देशोधडीला लागण्याचं, त्यांच्यावरच्या लज्जास्पद अन्यायाचं सत्य.
गिनतियों में ही गिने जातें हैं हर दौर में हम
हर कलमकार की बेनाम ख़बर के हम हैं (निदा फाजली)
अश्याप्रकारे आपल्याच देशबांधवांकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचा करंटेपणा केला होता. परिणामी, आज अशी परिस्थिती आली आहे की धर्मांध अमानवीपणाचा वरवंटा यशस्वीपणे फिरवला जाऊन पंडितच नाही तर बहुतांश मुस्लिमेतर काश्मिरी देशाच्या इतर भागांत गेले, आश्रित बनले. 'द काश्मीर फाईल्स' च्या निमित्ताने प्रथमच हिंदी सिनेसृष्टीने ह्या विषयाकडे डोळसपणे पाहायची हिंमत केली आहे.
ही कहाणी एका पंडित कुटुंबाची आहे. १९८८-८९ च्या काळात 'पुष्कर पंडित' हा एक शिक्षक पेश्याचा काश्मिरी पंडित मुलगा, सून आणि दोन नावांसह काश्मिरात राहतो आहे. हे ते काश्मीर आहे जे धगधगत आहे.. इस्लामी धर्मांधतेने लोकांच्या मनात द्वेषाचे वणवे पेटत आहेत. सीमेपलिकडून ह्या कट्टरतेच्या विषारी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक खतपाणी पुरवलं जात आहेच, पण देश व राज्यातील सरकारी व्यवस्थाही मनात ही वाढ रोखण्याबाबत बऱ्यापैकी उदासिन आहे. हा तो काळ आहे, जेव्हा सत्ताधारी लोक ३७० कलमाच्या आड आणि काश्मीरच्या स्वतंत्र संविधानाच्या जोरावर आपला फायदा करून घेण्यासाठी सगळा काश्मिर पेटू द्यायला तयार आहेत. मुस्लिमेतर काश्मिरींवर अत्याचार वाढत चालले आहेत. 'रलीव, गलीव, सलीव' च्या घोषणा मशिदींतूनच नाही, तर रस्त्या-रस्त्यावर घुमतायत.
हे पहिल्यांदा होत नाहीय, ह्याआधीही अनेकदा झालंय. २-४ दिवस जरा ताणतणाव राहील, मग सगळं पुन्हा शांत होईल, अश्या भाबड्या गैरसमजात पंडित व बाकी जनता आहे. पण त्यांचा हा गैरसमज गोळीबार, बॉम्बस्फोट, हत्या, खून, दंगली, जाळपोळ, बलात्कार अश्या सगळ्या अत्याचारांच्या वादळात पाचोळ्यासारखा उडून जातो.
पुष्कर पंडित आणि त्याच्यासारखे लाखो लोक, जे ह्या नरसंहारातून वाचतात, ते देशाच्या इतर भागात पोहोचले आहेत. पुष्करचा नातू दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत उच्चशिक्षण घेतोय.
काय आहे, नेमकी ह्या पुष्करची व्यथा आणि कशी झाली त्याची वाताहात. त्याचा काय परिणाम त्याच्या नावावर झाला आहे, ह्याची नोंदणी म्हणजे 'काश्मिर फाईल्स'.
एक सिनेमा म्हणून हा किती जमला, किती नाही; हा वेगळा भाग आहे. कारण ही धारणा व्यक्तिपरत्वे वेगळी असेल. मात्र ह्या विषयाला हात घालायच्या हिंमतीसाठी मात्र मनापासून दाद द्यायला हवी. हे पहिलं पाऊल आहे, असं नक्कीच समजू शकता येईल. मोठे आव्हान पेलण्यासाठी हिंमतीने टाकलेलं पहिलं पाऊल खूप महत्वाचं असतं. 'काश्मीर फाईल्स'ने फक्त हिंमतीनेच नाही तर पूर्ण आत्मविश्वासाने हे पहिलं पाऊल टाकलं आहे. आता इतर लोकांसाठी हा विषय खुला झाला आहे, जो आत्तापर्यंत एक 'टॅबू' बनलेला होता.
मला असं वाटलं, काश्मीर फाईल्स दोन टोकांवरचा चित्रपट आहे. काही प्रसंग, काही संवाद जबरदस्त जमून आलेले आहेत, तर काही जागी जरा अजून परिपक्वता दाखवता आली असती. असं असूनही एकूणात चित्रपटाचा परिणाम मात्र असा आहे की एकदा तो सुरु झाला की तो संपल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडेपर्यंतही तोंडून एक शब्दसुद्धा निघणार नाही. हा नक्कीच एक कमालीचा ताकदवान चित्रपट झाला आहे. का ?
१. विषय - ही विषयच इतका प्रभावी आहे की किमान संवेदनशीलतेनेही कुणी त्याला पाहिलं तरी परिणाम होईलच.
२. नो नॉनसेन्स - बॉलिवूडच्या तिरस्करणीय सवयीनुसार इथे कुठलीही लव्हस्टोरी वगैरे नाहीय. कुठलाही अनावश्यक टाईमपास नाही. चित्रपट विषयाला धरून, विषयाचंच फक्त बोलतो; बाकी कचऱ्याला इथे कचराकुंडीतही जागा नाही.
३. प्रामाणिकपणा - हाताळणीत, मांडणीत एक प्रकारचा प्रामाणिकपणा सतत जाणवत राहतो. हा चित्रपट विधू विनोद चोप्राच्या पुचाट 'शिकारा'सारखा बुळचटपणा करत नाही. स्वत:च्या भ्याडपणापोटी प्रेक्षकांच्या आणि मुख्य म्हणजे ही ज्यांची कहाणी आहे त्यांच्या भावनांशी खेळ करायचा निर्लज्जपणा इथे तसूभरही नाही. हा चित्रपट अथ:पासून इतिपर्यंत सत्याधारित घटनांचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन मांडत जातो, नाट्यमयपणे. विवेक अग्निहोत्री विषयावरची पकड ढिली होऊ देत नाही.
४. कलाकार - सर्वच कलाकारांनी जीव ओतून कामं केली आहेत. अनुपम खेरचा पंडित जितका सुन्न करतो, तितकाच चिन्मय मांडलेकरचा बिट्टा अंगावर येतो. दर्शन कुमारचा कृष्णा जितका बेचैन करतो, तितकीच त्याच्या आईचं काम केलेली भाषा सुंबली मन विषण्ण करते. मिथुन चक्रवर्तीच्या ब्रह्म दत्त जितका हताश वाटतो, तितकीच पल्लवी जोशींची राधिका मेमन आतल्या गाठीची. छोट्या भूमिकेत दिसलेले प्रकाश बेलवडी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव सारखे लोकही कुठेच कमी पडत नाहीत. काही प्रसंगांत नुसत्याच दिसलेल्या चेहऱ्यांना जरा अजून व्यक्त होता आलं असतं, पण असो.
५. लेखन - कुठल्याही राजकीय प्रपोगंडाला थारा न देता सत्याधारित मांडणी केल्याबद्दल विवेक अग्निहोत्री आणि सौरभ पांडे ह्या लेखकद्वयीचं अभिनंदन ! १-२ प्रसंग मला फारसे पटले नाहीत, मात्र त्याशिवाय सगळंच आटोपशीरच नाही तर मर्मावर बोट ठेवणारं आहे. काही संवाद सूचक, बोचरे आहेत.
संवेदनांची जडणघडण होण्याच्या वयात वर्तमानपत्रात रोजच्या रोज ज्यांच्या अमानुष शिरकाणाच्या बातम्या मी वाचत होतो, थोडीफार संवेदनशीलता मूळ धरलेल्या वयात आल्यावर त्यांच्या आक्रोशाला पडद्यावर आलेलं पाहतो आहे. हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे. इतका वेळ लागायला नको होता. युक्रेन-रशिया युद्ध सुरूही झालेलं नसताना त्या प्रकरणाचं सिनेमॅटिक डॉक्युमेंटेशन करण्याचं काम चित्रपटकर्त्यांनी सुरूही केलं होतं. आपल्याकडे मात्र हिंसाचाराचा नंगानाच सुरु असताना लोक गिळगिळीत प्रेमकहाण्या रंगवण्यात रममाण होते. अनेक दशकांनंतर का होईना, कुणाला तरी जाग आली आहे. आता तरी आपण ह्या विचारपूर्वक विस्मृतीत ढकलण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केलेल्या विषयाला वाचा फोडू. 'काश्मिर फाईल्स' च्या निमित्ताने लोक लिहिते, बोलते होतील. येणाऱ्या पिढीला áआपला एक इतिहास असासुद्धा आहे' ह्याची कदाचित जाणीव होईल.
अगदीच काही नाही तर ह्या विषयाच्या नावाखाली दुसरा 'शिकारा' बनणार नाही, ही आशा आहे.
- रणजित पराडकर