ह्या जगाच्या अतिप्रचंड पसाऱ्यात असंख्य लोक आपापली थोडीथोडकी जागा पकडून आहेत. हे लोक कधी आले, कुणाला समजलं नाही. हे कधी जातील, कुणाला कळणारही नाही. ह्यांची कुणीही कधीच नोंद घेतलेली नाही, घेणारही नाही. ह्यांच्यासाठी रोजचा दिवस हळूहळू करत मावळण्यासाठीच उगवत असतो. ह्या उगवतीपासून मावळतीपर्यंत दरम्यानच्या काळात हे लोक एकच एक दिवस पुन्हा पुन्हा जगतात. मालकाने पाठीवर लादलेल्या ओझ्याला गपगुमान मान खाली घालून वाहून नेणाऱ्या गाढवाप्रमाणे हे लोक परिस्थितीने पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांना आयुष्यभर मान खाली घालून गपगुमान वाहून नेत राहतात. फरक इतकाच की ह्यांचा प्रवास वर्तुळाकार असतो. गोल गोल फिरत राहतात. आयुष्यभर मरमर, वणवण करूनही ते कुठेही पोहोचत नाहीत. जिथून सुरुवात झालेली असते, तिथेच पुन्हा पुन्हा येत राहतात. बहुतेकदा ही व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली असते आणि ह्या सत्याशी मनापासून जुळवून घेऊन ते समाधानीही असतात.
पण एखादा 'हाथी राम चौधरी' असतो, ज्याला एक संधी मिळते, नेहमीची वाट बदलून स्वतःचा परीघ बदलायची. ही बदललेली वाट बिकट असते, तिथून जाण्यासाठी, चालत राहण्यासाठी खूप किंमत मोजायला लागणार असते. पण किती, हे त्याला सुरुवातीला माहीत नसतं. मात्र हळूहळू त्याच्या मनाची तयारी होते आणि तो आव्हान स्वीकारतो. एखाद्या मुंगीचं निरर्थक आयुष्य जगणारा 'हाथी राम' हत्ती बनतो आणि निबिड जंगलात बिनधास्त घुसतो. पुढे जे व्हायचं ते होतंच.
दिल्लीच्या एका किरकोळ पोलीस ठाण्यातला फुटकळ केसेस करण्यात करियर गेलेला एक किरकोळ इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत). त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडते. नावाजलेला आणि वादप्रिय टीव्ही पत्रकार संजीव मेहरा ह्याच्या हत्येच्या कट उधळला जाऊन चार मारेकऱ्यांना हत्यारांसह पकडलं जातं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून हा कट उधळला जातो आणि ही एक 'ओपन अँड शट' केस त्याच पद्धतीने हाताळण्यासाठी वरिष्ठांसमोर हाथीरामसारखा कर्तृत्वशून्य अधिकारी अनायसेच येतो. मोठी नावं जोडलेली एक 'हाय प्रोफाईल' केस प्रथमच हाथीरामला मिळते आणि तोही मोठ्या उत्साहाने ही केस 'ओपन अँड शट' करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम सुरु करतो. मात्र लौकरच त्याला ह्या केसला अजून काही कंगोरे असल्याचं जाणवतं आणि तो अजून खोलात शिरायचा प्रयत्न करतो. खोलात जाणारा हाथीराम कुठे कुठे पोहोचतो, त्याच्या हाताला काय काय लागतं, त्याला काय काय किंमत मोजायला लागते आणि सरतेशेवटी हा सगळा प्रकार त्याला कुठे पोहोचवतो, ह्या केसचं खरं रूप काय असतं, अश्या अनेक उत्कंठा ताणणारी 'पाताल लोक' सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देते.
'जयदीप अहलावत'ला मी सगळ्यात पहिल्यांदा 'कमांडो' मध्ये पाहिला. 'विद्युत जमवाल नावाचा नवा ऍक्टर आलाय आणि तो खतरनाक स्टंट्स, फाईट्स करतो', केवळ ह्या एका कारणासाठी मी तो सिनेमा पाहिला होता आणि त्यातला क्रूरकर्मा व्हिलन जो जयदीप अहलावतने साकार केला होता, हादरवून गेला होता. चेहऱ्यावर असलेले देवीसारखे व्रण ओम पुरींची आठवण करून देणारे, पण हा अभिनेता वेगळ्या पठडीतला. खरं तर कमांडोच्या आधी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तो दिसला होता, पण सिनेमातला त्याचा छोटा, पण महत्वाचा रोल संपल्यावर मनोज वाजपेयी येतो आणि सिनेमा खिश्यात घालतो, त्यामुळे त्यातला अहलावत फारसा लक्षात राहणार नव्हताच. नंतर 'रईस'सारख्या सिनेमांतुनही त्याच्या दुय्यम भूमिका लक्षात राहिल्या नाहीत. पण 'राज़ी'मधला रॉ अधिकारी मात्र चांगलाच लक्षात राहिला. ह्या गुणी अभिनेत्याला प्रथमच अशी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारायला मिळाली असावी. 'पाताल लोक' ही कहाणी अनेकांच्या असली तरी मुख्य व्यक्तिरेखा 'हाथीराम'चीच आहे आणि इतक्या महत्वाच्या व्यक्तिरेखेचं 'जयदीप अहलावत'ने सोनं केलं आहे. त्याच्या देहबोलीत होणारे अनेक बदल स्पष्ट जाणवत राहतात. हाथीराम हा एक सामान्य माणूस आहे. कुणी 'लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर' नाहीय. त्याचा सामान्यपणा त्याच्यातल्या चांगल्या-वाईटासह अहलावतने आपलासा केला आहे आणि म्हणूनच तो खराखुरा उतरलाही आहे. ह्याचं क्रेडिट लेखकांनाही जाईलच कारण नक्कीच ही एक 'ऑथर बॅक्ड' रोल आहे.
ह्याच लेखकांना मात्र एक छोटंसं 'डेबिट'ही जायला हवं. फक्त आपलं स्वतः:चं सेक्युलर, न्यूट्रल वगैरे असण्यासाठी अनावश्यक 'ब्राह्मण आणि इतर' असा अँगल कहाणीत घुसडणे, ह्या हास्यास्पद मूर्खपणातून सर्जनशील लोकांनी बाहेर पडायला हवं. I mean, भारताच्या कोणत्या कोपऱ्यात दलितांचा नेता ब्राह्मण आहे, हे मला तरी माहीत नाही. दलितांच्या मतांसाठी त्यांना वापरून घेणं, जवळ घेणं हा भाग वेगळा आणि 'दलितांचा नेता' हीच इमेज असणं, हे वेगळं असं मी मानतो. दलितांचा नेता दलितच दाखवला असता, तरी कहाणीत तसूभरसुद्धा फरक पडला नसता. तरी ही ओढाताण कशासाठी आणि का, हा प्रश्न लेखक-दिग्दर्शकांनी स्वत:लाच विचारायला हवा. हे प्रपोगंडा आता लोकांना समजून येत असतात, आताचा सोशल मीडिया साक्षर प्रेक्षक खूप बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि मोकळेपणाने व्यक्तही होत असतो, हे आता लक्षात घ्यायला हवं.
अर्थात, हा एक प्रपोगंडाचा छोटासा भाग वगळता 'पाताल लोक' अगदी बांधीव आहे, असंही नाही. नऊ भागांच्या वेब सीरिजमध्ये कहाणी सांगण्यासाठी आणि तरीही तिला उत्कंठावर्धक ठेवण्यासाठी काही अनावश्यक भागसुद्धा ह्यात आहेच. उदाहरणार्थ, हाथीरामच्या मुलाचं उपकथानक. तसेच अटक केलेल्या चार आरोपींचे पुर्वायुष्य वगैरे भागही. मला असं वाटलं की मूळ कथा ही एका चित्रपटापुरतीच आहे. तिला प्रत्येकी ४०-४२ मिनिटांच्या नऊ भागांमध्ये मांडण्यासाठी पसारा वाढवत नेला आहे. चांगली बाब इतकीच की पसारा वाढवल्यावर तो आवरण्यासाठी अनेक मालिकांच्या अखेरच्या भागांमध्ये जी उरकाउरकी केली जाते, तशी घिसाडघाई इथे केलेली नाही. काही भाग आहे तसाच सोडून दिला आहे. प्रत्येकच उपकथानक त्याच्या पूर्णत्वाला आलंच पाहिजे असं काही आवश्यक तर नाहीच.
'अहलावत'व्यतिरिक्त अजून एका महत्वाच्या भूमिकेत - पत्रकार 'संजीव मेहरा'च्या भूमिकेत - 'नीरज कबी' हा एक तगडा ऍक्टर पुन्हा एकदा आहे. संजीव मेहराला पाहताना टीव्हीवर झळकणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त वरिष्ठ पत्रकार महोदयांची आठवण सतत येत राहते. पत्रकारांच्या ढोंगीपणा उघड करणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि कबी पुन्हा एकदा त्याची कुवत दाखवून देतो. इतर सहाय्यक भूमिकांत हाथीरामचा सहकारी 'इम्रान अन्सारी'च्या भूमिकेतला 'ईश्वक सिंग' लक्षणीय आहे.
'अभिषेक बॅनर्जी'ने साकारलेल्या 'हथोडा त्यागी'चा प्रभाव इतका जबरदस्त आहे की त्याची पूर्णकहाणी सविस्तर दाखवणारा एक स्पिन-ऑफ करायला हवा, असं वाटतं. थंड डोक्याने थरकाप उडवू शकेल असे खून पाडणारा 'हथोडा' अंगावर येणारा आहे.
'गुल पनाग'ने एक अतिशय क्षुल्लक भूमिका केली आहे. ह्या लोकांना घर चालवावं लागतं, बिलं भरायची असतात, असं समजून घ्यायला हवं बहुतेक. राजेश शर्मा, स्वस्तिका मुखर्जी, विपीन शर्मा वगैरे माहितीतले चेहरे, नावं आपापली कामं करून जातात. त्यांना फार विशेष असा काही वाव नाहीय.
'किल्ला' चे दिग्दर्शक अविनाश अरुण आणि 'परी'चे दिग्दर्शक प्रेषित रॉय ह्या द्वयीने कहाणीवरची पकड कुठेही ढिली पडू दिली नाहीय. थ्रिलर पाहताना ही पकड माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी - ज्याचा फार पटकन रसभंग होऊ शकतो - फार महत्वाची असते. गेल्या काही दिवसांत अनेक थ्रिलर्स पाहत असताना दिग्दर्शकाची एक छोटीशी डुलकी सगळा खेळ बिघडवून गेल्याचे अनेक अनुभव मला आले आहेत. 'पाताल लोक' मात्र इथेच वेगळी ठरली.
एक निर्माती म्हणून आपलं वेगळं पण अनुष्का शर्माने ह्यापूर्वीही दाखवलं आहे. खरं तर सीरिज पाहण्याचं प्राथमिक कारण हेच होतं की, अनुष्का शर्माने प्रोड्युस केली आहे. हा कन्टेन्ट वेगळा असणार, चांगला असणार असा विश्वास आधीच निर्माण झाला होता. हे एका निर्मात्याचं यशच म्हणायला हवं !
एकूणात गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही उल्लेखनीय वेब सीरिजच्या ओळीत 'पाताल लोक'ही नक्कीच आहे. आवर्जून पाहावी, असा हा कन्टेन्ट आहे.
टीप - सबटायटल्स चालू करून पाहायला लागू शकते कारण बऱ्याचदा लोक तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे संवाद नीट समजतच नाहीत. 'चांगलं काम करणं म्हणजे तोंडातल्या तोंडात बडबडणं' हा सध्याचा एक विचित्र पायंडा आहे, अशीही एक समजूत होत चालली आहे. असो.
- रणजित पराडकर