एकोणीसशेे नव्वदच्या आसपास मी वर्तमानपत्र वाचायला सुरु केलं असावं. त्या काळात एक बातमी कुठल्याश्या कोपऱ्यात रोज वाचायचो. 'काश्मिरमधला हिंसाचार'. पंडितांचा संहार त्या काळात नियमितपणे चालू होता. काश्मिरात अत्याचार बोकाळला होता. वर्तमानपत्रांनी त्या बातम्यांना क्वचितच मथळ्याची जागा दिली. अपवादानेच अग्रलेखातून कुणी जळजळीत अंजन ओतलं. असंख्य लोक काश्मिरातून हाकलले जात होते. बेघर होत होते. मला त्या वयात कळतच नव्हतं की हे चाललंय तरी काय ? हे कोण लोक आहेत आणि त्यांच्याच देशातल्या लोकांना ते का त्रास देत आहेत? राहतं घर, जमीन, मित्र, नातीगोती सोडून, गाव सोडून असे लोक का निघून येत आहेत? सरकार काहीच का करत नाहीय? हे देशोधडीला लागलेले लोक कसे जगत असतील? रिफ्युजी कँप म्हणजे काय? ह्यांतले काही प्रश्न मला पडत असत आणि तितकी समजच नसल्यामुळे काही पडतही नसत.
आज ३० वर्षांनंतर काश्मिरी पंडीतांचा विषय घेऊन विधु विनोद चोप्रा 'शिकारा' घेऊन आले आणि मला गंमत ही वाटली की वरच्या प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न त्यांनाही पडले असावेत, असं वाटत नाहीय. हा त्यांचा निरागस भोळसटपणा आहे की पुचाट व्यावसायिकपणा की ज्या पंडित समुदायातून आले असल्याचं ते छातीठोकपणे सांगतात त्यांच्याविषयी त्यांना स्वत:लाच असलेली निर्लज्ज अनास्था आहे की अजून काही, हे सांगता येणार नाही. किंबहुना, त्यावर सत्यशोधन करायची गरजच नाहीय कारण 'आजवर न सांगितली गेलेली काश्मिरी पंडितांची कथा' म्हणून जे ह्या सिनेमाबद्दल बोस्टिंग चाललंय, त्याचा विचार करता, हे कथाकथन निव्वळ खोटारडं, अप्रामाणिक व दांभिक आणि म्हणूनच उथळ, निष्प्रभ व सुमारही आहे, ह्याबद्दल वादच नाही.
'काश्मिर प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे', असं एक अतिशय गोंडस विधान अनेकदा केेेेलं जातं आणि त्याच्या मागे आपलं अपूर्ण ज्ञान किंवा सपशेल हताशा किंवा धर्मनिरपेक्षतेतला बेगडीपण सोयीस्करपणे लपवताही येते. मात्र हे विधान खरंही आहेच. प्रश्न गुंतागुंतीचा आहेच. पण खरं हेही आहे की माथेफिरु काश्मिरी फुटिरतावद्यांनी ऐंशीच्या दशकात काश्मिरचं इस्लामीकरण करायच्या हेतूने हिंदू काश्मिरी पंडितांवर क्रूर अत्याचार केले आहेत. जगातल्या विविध 'एथनिक क्लिन्सिंग'च्या घटनांपैकी ही एक महत्वाची मोठी घडामोड होती, ज्यात लाखो काश्मिरी हिंदू विस्थापित झाले, हजारो मारले गेले. स्त्रियांवर अत्याचार झाले. बळजबरी धर्मांतरं केली गेली. बर्फाचा रंग पांढरा असतो. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा 'लाल'. कदाचित काहींना हा रंग भगवा वाटत असेल. पण रक्त कुणाचंही असलं तरी लालच असतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या काश्मिर खोरं धुमसत राहिलं आहे. तसं त्याला ठेवलं गेलं आहे. ज्याला 'नंदनवन' म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे आपण मिरवतो, त्या नंदनवनात पंडितांच्या हत्यांनी अशांतता व असुरक्षिततेची बीजं रुजवली आहेत. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं तेव्हा डोक्यात बदल्याची आग पेट घेते. पंडितांच्या डोक्यांत अशी आग कधी पेटली असेल का ? की हा समुदाय मुळातच शांतताप्रिय आहे व त्याने ह्या भयानक संहाराकडेही सबुरीच्या नजरेने पाहिलं? की त्यांच्यासोबत जे झालं ते बरोबरच होतं ? त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांना व्यवस्थेने तर कधी थारा दिला नाहीच, पण कलात्मक पुरोगामी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सिलेक्टिव्ह पुळका अधूनमधून येणाऱ्या चित्रपटजगतानेही ह्या स्फोटक विषयाला कधी हात का घातला नाही ? 'हैदर'सारखे प्रभावी चित्रपट इथे बनतायत, पण त्यांत औषधापुरताही पंडितांचा उल्लेख असतच का नाही ? का असे एकांगी चित्रपट प्रभावीपणे बनवले जातात ? अश्या अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न 'शिकारा' करेल असं वाटत होतं.
प्रत्यक्षात मात्र 'शिकारा' एक बुळबुळीत प्रेमकथाच आहे. तिच्यासोबत काश्मिरी पंडितांचं विस्थापन दाखवलं गेलं आहे. जे खूपच सौम्यपणे चित्रित केलं गेलेलं आहे आणि जो हिंसाचार झाला त्याचं खापर अगदी सहजपणे अमेरिकेच्या माथी फोडलं गेलं आहे. इथे दाखवलेले मुसलमान केवळ पंडितांच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्याइतपतच खलवृत्तीचे दाखवले आहेत. ते गोड गोड बोलून हे विस्थापन घडवून आणतात. कुठेही कुणी माथी भडकावणारी भाषणं देताना दिसत नाही. कुठेही कुणी 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देताना दाखवला जात नाही. कुठल्याही मशिदीतून खुलेआम 'हाकला, मारा, बाटवा' सारखे फतवे सोडले जात नाहीत. 'ह्या लोकांच्या हातात अमेरिकेने पाकिस्तानच्या मार्फत हत्यारं ठेवली आणि त्यांच्या हातून एक आगळीक घडली', अशी एक पळपुटी थिओरी इथे मांडली जाते. इथे पंडितांना जिवंत जाळले जात नाही. स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. इथे फक्त त्यांना हाकललं जातं. त्यातही त्यांचे काही समंजस मुसलमान स्नेही त्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतात. जणू काही जे काही घडतंय त्यासमोर ते स्वत:ही हतबल आहेत. ही जणू काही एखादी नैसर्गिक आपत्तीच असावी !
पंडितांच्या देशोधडीच्या रक्तरंजित इतिहासात काळीकुट्ट नोंद असलेला १९ जानेवारी १९९० चा दिवस तर 'शिकारा' इतका पुचाटपणे दाखवतो की संतापाचा कडेलोट व्हावा. १९ आणि २० रोजी सगळ्या काश्मिरात वीज बंद केली जाऊन मशिदींमधून भडकावू घोषणा दिल्या जात होत्या. पंडितांवरील अत्याचाराने अरीसिमा गाठली होती. सामुहिक हत्याकांडं घडली होती. रस्त्यांवर रक्ताच्या नद्या वाहिल्या होत्या.
पण विधु विनोद चोप्रांच्या भंपक व डरपोक अभिव्यक्तीला हेे दोन दिवसही प्रेमळ 'रोगन जोश' सारखे चविष्ट वाटले आहेत. ह्या दिवसाचं 'शिकारा'मधलं महत्व इतकंच आहे की ह्याच दिवशी चित्रपटातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा अखेरीस आपलं गाव, घर-दार सोडून काश्मिरातून बाहेर पडल्या, बाकी काही नाही.
नवोदित कलाकार आदिल खान आणि सादिया हे लेखक, दिग्दर्शकाच्या हाराकिरीवर कळस चढवतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीत नवोदितपणा जाणवत राहतो, बोलण्यात नकलीपणा दिसून येतो. किंबहुना, पडद्यावर दिसणारा कुणीच स्वत:च्या भूमिकेत पूर्णपणे शिरलेला वाटतच नाही. कदाचित ह्या पटकथेतला अप्रामाणिकपणा त्यांनाही जाणवला असावा.सिनेमॅटोग्राफीही अगदी सपक आहे. एकही दृष्य डोळ्यांत भरत नाही. कॅमेरावर्क कुठलीही चमत्कृती करत नाही.संगीताची बाजूही, जी आजपर्यंत चोप्रांच्या चित्रपटात कधीच नव्हती, अतिशय मरतुकडी आहे. एखादी 'शिकारा थीम' वगैरे बनवता आली असती, पण सुचलंच नसावं बहुतेक. सपक संवाद पटकथेच्या भंपकपणाला साजेसे आहेत आणि एडिटर विधु विनोद चोप्रा तर कायमच निद्राधीन वाटत राहताात.
एकंदरीत, हा चित्रपट चोप्रांंनी हा चित्रपट बनवलाच तरी का असंं वाटतं. जर त्यांना पंडितांच्या हृदयद्रावक वास्तवाची खिल्ली उडवायची होती, तर ती ते ह्या विषयाकडे - जसा चित्रपटविश्वातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायमच केलाय तसा - कानाडोळा करुन प्रेमकथा विकण्यासाठी दुसरा एखादा मसाला बनवू शकले असते. लोकांना जळजळीत मिसळ देण्याची बतावणी करुन प्रत्यक्षात फोडणीपासून सजावटीपर्यंत रवाळ, मिळमिळीत सफरचंद टाकायचा नतद्रष्टपणा करायची काही एक गरजच नव्हती.
ह्यावर थुकरट ऐतिहासिक चित्रपटांकडे 'ह्या निमित्ताने लोक त्याच्याबद्दल शोधून वाचतील तरी' असला भिकार दृष्टीकोन ठेवून पाहणारे तसंच काहीसं विधान करतील. पण हा दांभिकपणा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 'जय श्रीराम'च्या घोषणा देत, भगवे फडकवत वातावरण तापवणं, माथी भडकावणं हा जसा नालायकपणा आहे, तसाच 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत, हिरवे झेंडे फडकावत अत्याचाराचा नंगानाच घडवणंही. हे दोन्ही घडत असतं आणि हे सत्य कितीही अप्रिय असलं तरी ते आधी स्वीकारायला हवं. आपण जर 'डिनायल मोड' मध्येच राहणार असू, तर ह्यात बदलही कधी होणार नाही. जर एका बाजूच्या कट्टरवादावर आपण उघड भाष्य करत असू, तर दुसऱ्याही बाजूला दुर्लक्षाचं सुरक्षाकवच देऊन चालणार नाही.
जर दुसरी बाजू समोर आणायचीही आपल्याला भीती वाटत असेल, तर उलट ह्यावरूनच हे समजावं की कुठली बाजू जास्त भडक आहे.
- रणजित पराडकर