२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लागले आहेत. सामान्य माणूस - Layman - आणि त्याची कहाणी दाखवणारे सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले आहेत आणि असामान्य कहाण्या सांगणारे सिनेमे पाहताना प्रेक्षकांनी आपली सारासारविचारशक्ती परंपरागत सवयीनुसार थिएटरात येण्यापूर्वी मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवल्यासारखी काढून ठेवायचं बऱ्याच अंशी बंद केलं आहे. त्यामुळेच रेस-३, ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या मोठ्या स्टार्सच्या, बॅनर्सच्या सिनेमांना नेहमीप्रमाणे मिळणारं हमखास यश मिळालं नाही, तर बधाई हो, अंधाधून, स्त्रीसारखे 'लो प्रोफाईल' सिनेमे यशस्वी ठरले.
सुपरस्टार्सच्या बाबतीत आजकाल बहुतांश प्रेक्षकांचा एक तक्रारीचा सूर ऐकू येतो की, इतकं नाव, पैसा कमवून झाल्यावर तरी हे लोक वेगळ्या वाटेचे प्रयोगशील सिनेमे का करत नाहीत. पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास, अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा एक खूप मोठा आणि वेगळ्याच वाटेवरचा यशस्वी प्रयोग होता. आमीरचा 'दंगल'ही तसाच खूप वेगळा आणि शाहरुखचा 'डिअर जिंदगी' एक हटके प्रयोग होता. हृतिकचे आशुतोष गोवारीकरसोबतचे दोन्ही सिनेमे प्रयोगशीलच मानायला हवे. शाहरुखच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रा-वन' आणि 'फॅन' हेसुद्धा प्रयोगच होते.
मात्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो.
असो.
मेरठच्या 'बौआ सिंग'ची ही कहाणी आहे. 'बौआ' ची शारीरिक रचना ठेंगणी आहे. घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे. 'झीरो' ही कहाणी 'बौआ सिंग'च्या 'मेरठ'च्या लहान-मोठ्या गल्ल्या, बाजारांपासून मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत, रस्त्यावरच्या टपोरीगिरीपासून बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत उठ-बस करण्यापर्यंत आणि जमिनीपासून ते अंतराळापर्यंतच्या प्रवासाची आहे.
हा प्रवास 'तर्क' नावाच्या सिद्धांताचं बासन गुंडाळून पार अगदी मंगळ ग्रहापर्यंत भिरकावून देतो. 'बोटाने स्मार्टफोनला स्वाईप केल्यासारखं आकाशाच्या दिशेने हवेत स्वाईप करून आकाशातले तारे पाडणं', ही हिंदी सिनेमाच्या इतिहासात तर्काने मारलेल्या सर्वात खोल डुबक्यांपैकी एक डुबकी असावी. एका प्रसंगी तर आकाशातले तारे इतके सुदुरबुदूर होतात की त्या काळ्याभोर प्लॅटफॉर्मवर मुंबईतल्या ऐन ऑफिस अवर्सच्या वेळेची एखादी लोकल ट्रेन येऊन थांबली असावी आणि चहूदिशांनी सगळ्यांची धावपळ सुरु व्हावी, तसं काहीसं वाटतं.
मात्र असं असलं, तरी ही सगळी अतर्क्यता बऱ्यापैकी आत्मविश्वासाने सादर झालेली आहे.
शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.
अनुष्का शर्माने कमाल केली आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्यात अनुष्का शर्माचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही. चित्रपटभर शाहरुखच शाहरुख असला, चर्चासुद्धा त्याच्याविषयीच होत असली तरी प्रत्यक्षात हा चित्रपट अनुष्का शर्माने जिंकलेला आहे. तिने साकारलेली निग्रही 'आफिया' तिच्या आजवरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.
'रईस'नंतर पुन्हा एकदा शाहरुखच्या पात्राचा 'साईड किक' म्हणून मोहम्मद झीशान अयुब सहाय्यक भूमिकेत जान ओततो. हा गुणी अभिनेता असल्या दुय्यम भूमिका करण्यातच गुंतत जातो आहे, ही हळहळ पुन्हा एकदा वाटते.
कतरिनाच्या भूमिकेची लांबी तिला जितका वेळ सहन केलं जाऊ शकतं, त्याच्याआत आहे.
तिगमांशु धुलियासह बाकी सर्वांना अगदीच कमी काम आहे. त्यामुळे काही दखलपात्र असं जाणवत नाही.
'अजय-अतुल'कडे सध्या काही मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आलेले आहेत. पैकी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फुसका बार ठरला. 'झीरो' त्या मानाने खूपच उजवा आहे. 'मेरे नाम तू..' हे गाणं तर मनाचं ठाव घेणारं आहे. त ऐकत असताना एक वेगळाच विचार मनात आला. प्रसिद्धीमध्ये ह्या गाण्याच्या तुकड्याला 'थीम'प्रमाणे वापरलं असतं तर ? एकंदरीतच संगीताच्या बाजूला अजून जास्त आक्रमकतेने सादर करायला हरकत नव्हती. त्यात तितकी कुवत आहे, असं वाटलं.
'आनंद राय' हे काही दिग्दर्शकांपैकी खूप मोठं क्रिटीकली अक्लेम्ड नाव आहे, असं मला वाटत नाही. आनंद रायचे चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवूनच केलेले असतात, हे त्यांच्या फिल्मोग्राफीला पाहून लगेच लक्षात येतंच. त्यांनी इथेही दुसरं कुठलं गणित मांडलेलं नाही. मात्र आव मात्र तसा आणला असल्याने 'करायला गेले गणपती आणि झाला मारुती' अशीच गत झाली आहे !
शाहरुखच्या सुजाण चाहत्यांसाठी 'झीरो' म्हणजे पुन्हा एकदा एक अपेक्षाभंग आहे. मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर