Friday, September 14, 2018

हार्मनी विथ ए. आर. रहमान (Harmony with A. R. Rahman)


ही 'अॅमेझॉन प्राईम'वर रिलीज झालेली पाच भागांची एक सिरीज. ह्यात ए. आर. रहमान भारतातल्या चार वेगवेगळ्या राज्यांतल्या चार कलाकारांशी संवाद साधून, त्यांच्या कलेशी ओळख करून व करवून देतो आणि पाचव्या भागात हे चार जण चेन्नईला रहमानच्या स्टुडीओत येऊन रहमान आणि त्याच्या ensemble सह एक मैफल करतात. 

हे चार भाग असे -

भाग-१. सजित विजयन - केरळ - मेळावुवादन (Mizhavu) 

भाग-२. बहाउद्दीन डागर - नवी मुंबई - रुद्रवीणा (धृपदवादन)

भाग-३. लौरेबम बेदबाती - मणिपूर - खुनुंग इशेई गायन (Khunung Esei)

भाग-४. मिकमा त्शेरिंग लेपचा - सिक्कीम - पन्थोंग पलित वादन (Ponthong Palit)


'मेळावु' हे एक तालवाद्य. साधारणपणे एका मोठ्या गोलाकार माठाच्या तोंडाला चामडे बांधून तयार केलेले हे वाद्य. नादनिर्मितीची अत्यंत संकुचित मर्यादा असल्याने ह्यात वैविध्य फारसं दिसत नाही आणि असल्यास ह्या भागातून ते धुंडाळलंही जात नाही. सिरीजचा हा पहिलाच एपिसोड, ह्या खूप मर्यादित स्कोप वाटणाऱ्या वाद्यावर आधारलेला असल्याने खरं तर पुढील भागांबद्दलची उत्सुकता जरा कमी करतो. 
'केरळ'चं अप्रतिम चित्रीकरण ह्या भागात आहे. एकूणच ह्या सिरीजमध्ये एरियल शॉट्सने अप्रतिम असं निसर्गदर्शन होणार आहे, हे ह्या पहिल्या भागातच स्पष्टपणे जाणवतं. मात्र ह्या निसर्गदर्शनाशिवाय फारसं काही ह्या भागात हाती लागत नाही. सांगीतिक बाजूबाबत बोलायचं, तर रहमान आणि विजयन ह्यांचं जेव्हा एकत्र वादन होतं, तेव्हा ते खऱ्या अर्थाने एकत्र वाटतच नाही. दोघं समांतर चालले आहेत, असंच वाटत राहतं. 

अगदी असाच अनुभव तिसऱ्या एपिसोडमध्येही येतो. त्यात रहमान मणिपूरला जातो. तिथलं लोकसंगीत, जे 'खुनुंग इशेई' ह्या नावाने ओळखलं जातं, त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो. खुनुंग इशेई गायक कलाकार 'श्रीमती लौरेबम बेदबाती' ह्यांचा ह्या भागात सहभाग आहे. बहुतेक तरी ह्या एपिसोडमध्येही लोकसंगीताचा हा प्रकार पुरेसा धुंडाळला गेला नसावा. कारण संगीताचा जो आत्म्यापासून आत्म्यापर्यंत किंवा मनाचा मनाशी असा संवाद, भाषा आणि संस्कृतीच्या बंधनांना पार करून थेट व्हायला हवा, तो काही होत नाही. केरळ आणि मणिपूर, ह्या दोन्ही जागांच्या नैसर्गिक सौंदर्यावर ह्या दोन्ही भागांचा पाया बेतलेला वाटतो. संगीतावर नाही. इथेही रहमानचं वादन आणि बेदबातींचं गायन एकमेकांत मिसळत नाही. 

पहिल्या भागाच्या अपेक्षाभंगावर दुसरा भाग एक प्रकारचं औषध आहे. खऱ्या अर्थाने 'सांगीतिक श्रीमंती' आणि 'संगीताचं तत्वज्ञान' ह्या भागात जास्त चांगल्या प्रकारे आपल्या भेटीला येतं. कदाचित शहरी भागातलं चित्रीकरण असल्याने निसर्गदर्शनावर फोकस जाण्यासाठी स्कोपच नसल्यामुळे हा भाग मूळ मुद्दा - संगीत - बऱ्यापैकी धरून ठेवतो. ह्या भागात रहमानचा पवित्राही इतर तीन भागांपेक्षा खूप वेगळा आहे. तो खूपच बचावात्मक नम्र वाटला आहे. नम्रता तर चारही भागांत त्याच्यात जाणवतेच, मात्र इथे तो स्वत:च बॅकसीटवर जातो आणि बहाउद्दीन डागरसाहेब व त्यांचं कथन पुढे येतं. इथलं रहमानचं एकट्याचं डागरसाहेबांसमोरचं एक छोटं सादरीकरण, त्यावरून सुरु होणाऱ्या चर्चेत राग चारुकेसीचा उल्लेख येऊन नंतर त्याने 'तू ही रे..' मधलं चारुकेसीचं अंग उलगडणं, हे सगळं उत्स्फूर्त आणि सुंदर झालं आहे. त्यानंतरचं डागर साहेब आणि रहमान ह्यांचं एकत्र वादनही रंगतदार वाटतं.

चौथा भाग सांगीतिक पातळीवर दुसऱ्याच्या खालोखाल वाटला. 'मिकमा त्शेरिंग लेपचा' हे सिक्कीमचे मूलनिवासी 'लेपचा' ह्या समाजाचे प्रतिनिधी. बासरीसारखं दिसणारं पण चारच छिद्रं असलेलं 'पन्थोंग पलित' हे वाद्य, त्याचं विशिष्ट पद्धतीचं वादन व स्वत: मिकमा ह्यांचं गायन, ह्याच्याशी आपली ओळख ह्या भागातून होते. सिक्कीमच्या पहाडी भागातली 'लेपचा' ही एक पहाडी, शिकारी जमात. त्यांचं हे संगीत. त्या संगीतातून एक प्रकारचं गूढ, पण हवंहवंसं कारुण्य जाणवलं. ह्या भागात सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, मिकमा ह्यांची अतीव विनयशीलता. बिकट आर्थिक परिस्थितीतून वर आलेल्या ह्या कलाकाराच्या वागण्या-बोलण्यातून आपण सोसलेल्या प्रतिकूलतेबाबत कुठलाही विचित्र अभिमान - जो आजकाल हलाखीतून वर आलेल्या अनेकांत दिसतो - किंवा त्या काळाबाबत कसलाही असंतोष जाणवत नाही. त्यांचा हाच विनय त्यांच्या वादन व गायनातूनही दिसून येतो. 

पाचवा आणि अखेरचा एपिसोड, आधीच सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या एकत्र मैफलीचा आहे. त्यासाठी सर्वांनी चेन्नईला येणं. तयारी करणं. ह्या सगळ्या प्रोसेसबाबत, रहमानबाबत त्यांना काय वाटलं, ह्याचं कथन आणि सरतेशेवटी वादन, मैफल. साधारण १०-११ मिनिटांची ही मैफल अस्सल रहमानस्पर्श झालेली संगीतनिर्मिती आहे. ही मैफल खूप आवडली, मात्र त्यात पाहुण्या कलाकारांचा सहभाग फार काही लक्षणीय वाटला नाही. खासकरून रुद्रवीणा तर सगळ्या कोलाहलात हरवून गेल्यासारखीच वाटली. 
ह्या मैफलीइतकंच मला शीर्षक संगीतही आवडलं. त्यात वापरली गेलेली छोटीशी धून खूपच मेलडीयस आहे. 

To conclude, 'हार्मनी' मला सिनेमॅटिकली जास्त आवडलं. पाचपैकी दोन एपिसोड तर म्युझिकली फारच कमी पडल्यासारखे वाटले. सर्वोत्तम एपिसोड डागरसाहेबांचा. Shows why Classical Music is the supreme. 
माझी ह्या सिरीजने निराशा झाली कारण 'रहमानसाठी पाहणं' म्हणजे 'संगीतासाठी पाहणं' असतं, छायाचित्रणासाठी नव्हे. छायाचित्रणाचं काम अफलातून झालं आहेच, पण सिरीजचं नेमकं प्रयोजन जर त्या त्या भागातील संगीत आणि त्यांचं त्या त्या भागातील निसर्गाशी नातं उलगडणं हे असेल, तर त्यात एक असमतोल नक्कीच आहे. भारतीय सिनेसंगीत एकसुरी आणि सामान्यत्वाकडे वेगाने घसरत चालले असतानाच्या काळात 'ए. आर. रहमान' एक वेगळा साउंड आणि वेगळं सृजन घेऊन समोर आला होता. He was a Knight in Shining Armour. अधूनमधून त्याने काही अदखलपात्र कामं जरी केली असली, तरी आजही 'रहमान' हे नाव संगीतास्वादकांसाठी अपेक्षांच्या एका मोठ्या उंचीवरच आहे. प्रत्येक वेळी, जसं सचिनकडून शतकाची अपेक्षा असायची, तशी रहमानकडून जादूची अपेक्षा असते. पाच भागांच्या ह्या वेब सिरीजमध्ये असे जादूचे क्षण शोधत राहावे लागले, हा माझा अपेक्षाभंग आहे. 'रहमान'ऐवजी दुसरं काही नाव असतं, तर कदाचित ह्याच निर्मितीने मला अधिक जास्त आनंद दिला असता.

- रणजित पराडकर

Friday, September 07, 2018

पहारा

तुझ्या प्रश्नांमधे असते भयानकशी अनिश्चितता
तुला उलथायची असते स्वत:च्या आतली सत्ता
नवी अन् वेगळी किंमत असे प्रत्येक बदलाला 
कधी मोजायची असते, कधी साभार नशिबाला

कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते
तुला पाहून हळहळते, असे नाही कुणी येथे
जराशी भूल घेण्याला मनाची मान्यता नसते 
व्यथांवर प्रेम जडल्यावर व्यथांनाही व्यथा कळते

कधी थांबायचा झगडा, असे चालायचे कुठवर ?
कधी मिळणार प्रश्नाला बरोबर नेमके उत्तर ?
तसा खंबीर तू दिसतोस पण आहेस ना नक्की ?
पहा, होतील आता तर स्वत:ची माणसे परकी 

घड्याळातील काटाही तुला न्याहाळतो आहे
तुझ्या संवेदनांवरचा पहारा वाढतो आहे
नजर चोरुन, तरी मोजुन, गणित तू मांड श्वासांचे
स्वत:हुन सांगते पत्ते दिशा पाऊलवाटांचे

....रसप....
७ सप्टेंबर २०१८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...