Thursday, June 29, 2017

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो. पहिल्या बैठकीत ३, दुसऱ्या बैठकीत ४ आणि तिसऱ्या बैठकीत उरलेले तीन, असा पहिल्या सीजनचा फडशा पाडत असतानाच माझ्या लक्षात आलं की हे अद्भुत आहे.

आता सहाच्या सहा सीजन पाहून झाले आहेत. त्यांवर बराच विचारही करून झाला आहे. आता काही तरी लिहिणं भाग आहे !

------------------------------------------------------------------------------------

सात प्रांत. त्यांचे सात मांडलिक राजे आणि सगळ्यांचा मिळून एक राजा. ह्या सगळ्या ठिकाणी एक-एक करून माजत गेलेली अनागोंदी, अराजक.
सत्तापालट, बंड, गद्दारी, मुत्सद्देगिरी सगळं एकाच वेळी सुरु आहे.
युद्धखोर आहेत, कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, समाजकंटकही आहेत.
कुणी समजूतदार आहेत, कुणी कपटी, कुणी तत्वनिष्ठ, कुणी दांभिक, कुणी नीच, कुणी निष्पाप, कुणी शूर, कुणी पुचाट.
मेहनती, ऐतखाऊ, हुशार, मूर्ख, कर्तबगार, नालायक, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, निष्ठावंत, विश्वासघातकी असे सगळे आहेत.
युद्धखोर आहेत. शांतताप्रिय मुत्सद्दी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. अल्पसंतुष्टही आहेत.
ह्या सगळ्याच्या जोडीने चमत्कार, अद्भुत, अमानवी, अवास्तव घटना व व्यक्तीसुद्धा आहेत.

हा एक प्रचंड मोठा पसारा आहे. दूरवर पसरलेला. बर्फापासून समुद्रापर्यंत आणि पर्वतरांगांपासून वाळवंटांपर्यंत. ज्यात माणसाच्या जोडीने कावळे, कुत्रे, लांडगे, घोडे, हत्ती, ड्रॅगन्स, भूतं, राक्षस हे सगळेच आहेत.
माणसंसुद्धा हर तऱ्हेची आहेत. उच्च जातीची, कनिष्ठ जातीची, गरीब, श्रीमंत, विकसित, रानटी, औरस आणि अनौरस !

हा एक शोषक वि. शोषित असा अनादीकाळापासूनचा संघर्षही आहे. एका मोठ्या प्रतलावर. भरपूर उपकथानकांचं मिळून एक कथानक बनत आहे.
कथानक बदल्याचं, संघर्षाचं, जीवन-मरणाचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्तित्वाच्या लढाईचं.
भरमसाट व्यक्तिरेखा आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची एक शैली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख आहे. चढता-उतरता. कुणाचं महत्व वाढत जातं, कुणाचं घटत जातं, तर कुणी सगळ्या गदारोळात आपलं स्थान व महत्व शिताफीने टिकवूनही आहे. ह्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाला छटा आहेत. पांढऱ्यापासून काळ्यापर्यंत जाणाऱ्या रेषेवर वेगवेगळ्या जागांवर ह्या व्यक्तिरेखा उभ्या आहेत. त्या अधूनमधून आपली जागा बदलतातही !
नितीमत्ता, माणुसकी वगैरे काहींच्या ठायी आहेत. मात्र अस्तित्वाचा संघर्ष असा काही पेटला आहे की स्वत:च्या नकळत किंवा मनाविरुद्ध त्यांना दाबून ठेवायला लागत आहे. इतक्या विविध व्यक्तिरेखा असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित उभी राहते. ह्यासाठी लागणारा वेळ त्यांनी घेतला आहे. कुठलीही घिसाडघाई केलेली नाही.

हे एक महानाट्य आहे. त्याच्यासाठी मोठा पडदा हवा.
ह्याची तांत्रिक सफाई अतुलनीय आहे. अविश्वसनीय घटना खऱ्याखुऱ्या वाटतात. व्हीएफएक्सचं ओझं पडद्यावरची प्रत्येक व्यक्ती लीलया वागवते. हे त्यांचं एकमेकांशी एकरूप होणंसुद्धा एक अद्वैतच आहे !
पार्श्वसंगीतात स्वत:चा एक आत्मा आहे. खासकरून शीर्षक संगीत तर काळजाचं ठाव घेणारं आहे.

ह्या सगळ्याला दोन गालबोटं आहेत -
१. 'अतिरंजन' - अनावश्यक हिंसा व नग्न दृश्यांची भरमार केली आहे. इतकी जास्त की त्याचं अप्रूपही वाटेनासं व्हावं. हा भडकपणा म्हणजेच प्रभावी चित्रण, असा एकंदरच आजच्या फिल्ममेकिंगचा प्रामाणिक समज असल्याने कंठशोष वृथाच आहे, तरी !
२. शीर्षक - 'गेम ऑफ थ्रोन्स' पेक्षा चांगलं नाव सुचू नये, हे दुर्दैव. मला स्वत:ला हे एखाद्या व्हिडियो गेमचं थिल्लर नाव वाटतं. कथानकातली काव्यात्मक भव्यता ह्या नावात औषधापुरतीसुद्धा जाणवत नाही. लेखक जॉर्ज रेमंड मार्टिनच्या ज्या पुस्तक-मालिकेवर ही मालिका आधारलेली आहे, त्या 'अ सॉंग ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर' मधल्या सगळ्या पुस्तकांची नावं खूपच आकर्षक आहेत. (इच्छुकांनी गुगलावे.)

असो.
अजूनही काही उणीवा आहेत. कथानकात अगदी सोयीस्करपणे काही सुटे धागे आहेत, काही खड्डे किंवा भगदाडंसुद्धा आहेत. पण उणीवा आहेत म्हणून आवडू नये, असं असलं, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी ! आपल्याला स्वत:सकट अखिल विश्वातलं काही म्हणता काहीच आवडायला नको, नाही का ? उणीवा सहजपणे स्वीकारल्या जातील इतकी ताकद उर्वरित भागात असली पाहिजे. ती असली, तर ती निर्मिती यशस्वी म्हणायला हरकत नसावी.
हा 'गेम ऑफ थ्रोन्स' त्याच्यातल्या उणीवांसह आवडतो. त्यातले चांगले-वाईट सगळे लोक आपल्याला आवडतात. त्यांचे जय-पराजय, त्यांचे अंत हे सगळं आपण एकाच उत्सुकतेने पाहतो. त्याची भव्यता थक्क करते. हे एक अद्भुत सांघिक कार्य आहे, हे पदोपदी जाणवत राहतं.

१६ जुलैपासून पुढचा सीजन सुरु होतो आहे. आत्तापर्यंत सहा सीजन झाले आहेत. प्रत्येक सीजनमध्ये १० भाग. प्रत्येकी साधारण ५०-५५ मिनिटांचे. सुट्टीच्या दिवसांचा योग्य उपयोग व उर्वरित दिवसांत थोडंसं जागरण करून हा बॅकलॉग भरून काढता येऊ शकेल. मेहनतीचं काम आहे. पण एकदा लिंक लागली की आपोआप होत जाईल आणि पूर्ण झालं की दिलेल्या वेळेचं चीजच झालं आहे, हीच भावना असेल. प्रयत्न करून पहा. जरी जमलं नाही, तरी हरकत नाही. जसे सहा बाकी आहेत, तसेच सात बाकी राहतील. आठवा सीजन सुरु होईपर्यंत तरी हे नक्कीच पाहून होऊ शकेल. आत्ता फक्त सुरुवात तरी कराच !


दिग्दर्शन, लेखन, निर्मिती, अभिनय, तंत्रज्ञान, संगीत वगैरे सर्व बाबतींतली फौज भली मोठी आहे. मी कुणाचंच नाव घेणार नाही कारण कुणाचंही नाव न घेणं अन्याय असेल आणि सगळ्यांचा उल्लेख करायचा तर पाल्हाळ संपणार नाही !
मुद्दामच कथानकाविषयीही काहीही नेमकं लिहिणं टाळतो आहे ह्याची दोन कारणं -
१. साथ भागांचं कथानक एका लेखात लिहिणं अशक्य आहे आणि लेख-मालिका लिहिण्यासाठी सध्या वेळ नाही.
२. बऱ्याच लोकांनी अजून पाहिलेलं नाहीय, त्यांनी पाहावं अशी इच्छा आहे.

आणि अर्थात, सातव्या भागापासून मालिका सुरु करता येईलच !

- रणजित पराडकर

Thursday, June 01, 2017

सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

'रॅग्स टू रिचेस' कहाण्या अनेक आहेत. संघर्षमय यशस्वी वाटचालही अनेकांची आहे. क्रिकेटेतरही अनेक खेळाडूंच्या कहाण्या स्तिमित करणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये 'स्पेशल' आहे, सचिन तेंडूलकर.
का ?

तसं पाहिलं, तर २००१ ची ती इडन गार्डन्सची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट असो, जिच्यानंतर भारतीय क्रिकेटने एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला होता किंवा २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजची फायनल असो, जिच्यात पहिल्यांदाच तब्बल ३२५ धावा चेस करून इतिहास घडवला होता किंवा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका वगैरेंतले ऐतिहासिक टेस्ट सिरीज विजय असो किंवा 'द मदर ऑफ ऑल' २०११ चा वर्ल्ड कप असो, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रवासातल्या ह्या व अश्या वेगवेगळ्या महत्वाच्या टप्प्यांवरचे यशाचे शिल्पकार वेगवेगळे लोक होते. असं अजिबातच नाही सच्याने हे सगळं एकहाती घडवून आणलं किंवा ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या विजयांत त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
खरं तर, सच्याने एकहाती जिंकून दिलेले सामने म्हटल्यावर मला फक्त १९९७-९८ चा शारजा कप आठवतो. एरव्ही भारताचे 'बिग मॅच प्लेयर्स' वेगळेच राहिलेले आहेत.

पण तरी सच्या 'स्पेशल' का आहे ?

सचिनच्या आजवरच्या लौकिकानुसार, 'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या 'डॉक्यु-ड्रामा' मध्येसुद्धा कुठल्याही स्फोटक विषयाला हात घातलेला नाही. भले मग मॅच फिक्सिंग प्रकरण असो, खळबळ माजवणारा 'प्रशिक्षक ग्रेग चॅपेल' कालखंड असो, विनोद कांबळीबरोबरचे वाद असोत, 'मंकीगेट' प्रकरण असो की असे अजूनही लहान-मोठे अनेक किस्से (साउथ आफ्रिकेत सामनाधिकारी माईक प्रॉक्टरनी घातलेल्या बंदीविरुद्धचं बंड, वगैरे) असोत, ह्या फिल्ममधून असं काहीही हाती लागत नाही, जे कधी उघड झालं नाही.
म्हणूनच ही फिल्म निव्वळ एक 'डॉक्यु-ड्रामा' म्हणून मला फारशी आवडली नाही. तरी, वारंवार मी रोमांचित का होत होतो ? पुन्हा पुन्हा माझ्या पापण्या ओलसर का होत होत्या ? आणि सगळ्यात शेवटी, फिल्म संपल्यावर डोळे पुसताना मला लोकांनी का पाहिलं होतं ?
कारण फिल्म सच्याबद्दल होती आणि सच्या स्पेशल आहे.

पण तो का स्पेशल आहे ?

कारण -

सच्या माझा चेहरा आहे. मी.. एक खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय.
गेल्या काही वर्षांत समाजातल्या ह्या 'मध्यमवर्गीय' प्रकारातही काही उपप्रकार झाले आहेत. निम्न मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग वगैरे. मी ह्यांपैकी कशात येतो ? माहित नाही. पण 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दरम्यानचा जो वर्ग, त्या खऱ्या मध्यमवर्गातला मी. सुशिक्षित आई-बाप, स्वत:चं घर, कशाचीही ददात नसणं आणि तरी उधळत जावं असंही काही नसणं, असा मध्यमवर्ग.
ह्या वर्गाचा चेहरा म्हणजे सच्या. म्हणून त्याच्याशी आमची नाळ जुळते.

सच्या मिसरूड फुटण्याच्या वयातही निरागस दिसायचा आणि चाळीसाव्या वर्षी जेव्हा तो आपल्या निवृत्तीचं भाषण देत होता, तेव्हाही निरागसच दिसत होता. त्याच्या त्या निरागसपणात देशभरातल्या तमाम स्त्रियांना आपला मुलगा दिसायचा, अजूनही दिसतो. सच्या तरुण मुलींच्या 'दिल की धडकन' जितका होता, त्याहून कैक पटींनी जास्त तो करोडो स्त्रियांच्या पोटचा गोळाच होता. मुली द्रविड, गांगुली, (फिक्सिंगमध्ये अडकण्यापूर्वीचा) जडेजा वगैरेंवर जास्त मरत असाव्यात. पण त्यांच्या आयांची त्यांच्या मुलींसाठी 'सचिन' हीच पसंती असावी. सच्या अख्ख्या देशाचा सुपुत्र म्हणूनच होता.

क्रिकेटबद्दल म्हणायचं झालं, तर १६ व्या वर्षी एक कोवळं पोरगं वसीम अक्रम, वकार युनुस वगैरेंसारख्या धिप्पाड लोकांसमोर येतं काय, नाक फुटल्यावरही खेळतं काय, एका प्रदर्शनीय सामन्यातल्या फटकेबाजीमुळे अब्दुल कादिरसारख्या व्हेटरनचं करियरच संपवतं काय.. हे सगळं अद्भुतच होतं.
त्यानंतरची तब्बल २४ वर्षं हा माणूस क्रिकेटविश्वात झळकत राहिला. माझ्यासारख्या अनेक लोकांनी 'क्रिकेट'च्या आधी 'सचिन' हे नाव ऐकलं आहे. त्याची ही २४ वर्षं आमच्यासाठी आमचं संपूर्ण बालपण आणि नंतरची उमेदीची वर्षं आहेत. त्याच्या प्रत्येक शतकामागे आमच्यासाठी आमची एखादी परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा कंपनीतली एखादी मीटिंग वगैरे आठवणी आहेत. कधी कधी काही लग्नं वगैरेही आहेत ! इतरांची कशाला आम्ही आमच्या स्वत:च्या लग्न-मुंजीतही 'सचिन आउट झाला नसेल ना' च्या काळजीत राहिलो आहोत.

'सचिन आउट झाला की बाकीच्यांची सुरु झालेली घसरगुंडी' ह्या आठवणीच्या भळभळत्या जखमा आम्ही आजपर्यंत जपलेल्या आहेत. त्यांतली सगळ्यात खोल जखम १३ मार्च १९९६ ह्या दिवशी आम्हाला श्रीलंकेने दिली होती, हे आम्ही कधीच विसरणार नाही. २००७ च्या वर्ल्ड कपमधल्या मानहानीनंतर आम्ही रात्री बऱ्याच उशीरापर्यंत तळमळत फक्त कूस बदलत राहिलो आहोत. २०११ च्या दिग्विजयानंतर 'We did it for Sachin' म्हणणाऱ्या युवराजने टच्चकन् आमच्याही डोळ्यांत पाणी आणलं होतं. सच्याला खांद्यावर बसवून त्याची वानखेडेवर काढलेली मिरवणूक, त्यातही एकट्या युसुफ पठाणने त्याला खांद्यावर बसवणं.. मग कोहलीने म्हणणं की, 'He has carried the nation on his shoulders for years, its time we carry him on ours' हे सगळं पाहताना आम्हाला अक्षरश: गहिवरून आलं होतं.

- ह्या सगळ्यामुळे सच्या स्पेशल आहे. सच्या हा 'नॉस्टॅल्जिया' ला असलेल्या काही समानार्थी शब्दांपैकी एक आहे. माझ्यासाठी तरी इथे द्रविड, दादा, लक्ष्मण, धोनी असे क्रिकेटमधले इतरही काही समानार्थी शब्द आहेत. पण सच्या स्पेशल आहे, कारण तो माझा चेहरा आहे.

'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' ह्या सगळ्या कडू-गोड आठवणींना उजाळा देतो. मला पुन्हा एकदा माझा चेहरा दाखवतो, जो आजकालच्या भपकेबाज क्रिकेटमुळे झाकोळला गेला आहे. जो आता ह्या खेळाबाबत बऱ्याच अंशी भावनाहीन झाला आहे.
सच्याच्या सिनेमाने मला रडवलं, हसवलं, गहिवरवलं ह्याचं कारण सिनेमा नसून खुद्द 'सच्या' आहे. तो पुन्हा भेटला. काही खपल्या उघडल्या आणि काही मोरपिसं नव्याने फिरली.

यादों की बौछारों से जब पलकें भीगने लगती हैं
कितनी सौंधी लगती है तब माज़ी की रुसवाई भी
एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है वो भी हों तनहाई भी

- गुलजार

बस्.. इतकंच.

- रणजित पराडकर


Related Posts Plugin for WordPress, Blogger...