Saturday, October 29, 2016

यह दिल है कन्फ्युज्ड ! (Ae Dil Hain Mushkil - Movie Review)

'मला काय हवं आहे' ह्याचा थांग बहुतेकांना मर्यादित स्वरुपातच लागत असतो. ह्या 'बहुतेकां'पैकीही बहुतेकांची मजल व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या काय हवं आहे, अश्या विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. स्वत:ची भावनिक गरज नेमकी काय आहे, हे समजून येण्यात उभं आयुष्य निघून जातं. अनेकदा अगदी शेवटपर्यंतसुद्धा हे समजून नाही तर नाहीच येत.
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला 
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
असा हा जटील प्रश्न फार कमी लोकांना सुटत असतो. त्यामुळे साहजिकच आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात एक गोंधळलेले - कन्फ्युज्ड - आयुष्य जगत असतो. भारतीय चित्रपट वास्तववादाकडे जसजसा अधिकाधिक सरकत चालला आहे, तसतश्या चित्रपटाच्या कथानकात अश्या 'गोंधळलेल्या' व्यक्तिरेखा वारंवार येत आहेत. इम्तियाझ अली तर अजूनही हा एकच विषय स्वत:चं पूर्णपणे समाधान होईल इतपत मांडून मोकळा होऊ शकलेला नाहीय बहुतेक. 'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' असे त्याने विविध प्रयोग ह्या एका शोधाला सादर करण्यासाठी केलेले आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरनीही अश्याच व्यक्तिरेखांना सादर केलं आहे आणि तनू वेड्स मनू, कट्टी-बट्टीसुद्धा ह्याच पंगतीत बसवता येतील.
सुरुवातीला बाष्कळ प्रेम कहाण्या दाखवणाऱ्या करण जोहरने नंतर हळूहळू जरासे परिपक्व भावनिक द्वंद्व 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बॉम्बे टॉकीज' मधून दाखवले होते, पैकी 'बॉम्बे टॉकीज' तर खूपच धाडसी आणि चांगला प्रयोग होता. 'ऐ दिल हैं मुश्कील' द्वारे जोहरने 'आपली भावनिक गरज काय आहे', हे समजण्या, न समजण्यामधल्या द्वंद्वात गुंतलेल्या काही मनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न जमला की फसला, हा पुढचा भाग. तो प्रामाणिक होता का, हा पहिला. तर हो. प्रयत्न प्रामाणिक आहे. पण 'मुल्ला की दौड मस्जिद तक़' ह्याचाही प्रत्यय दिला आहेच !

ह्या कथानकातल्या सपशेल कन्फ्युज्ड व्यक्तिरेखा आहेत, अयान (रणबीर कपूर) आणि सबा (ऐश्वर्या राय बच्चन). पैकी बच्चनसूनेला सहाय्यक विभागात मोडेल अशी, दुय्यम किंवा तिय्यम भूमिका असल्याने ती काही महत्वाची नाही. मुख्य भूमिका रणबीर आणि अनुष्का शर्माच्याच आहेत. अनुष्काने साकारलेली 'अलीझेह' त्यातल्या त्यात 'सुज्ञ' वगैरे म्हणता येईल अशी आणि अयान मात्र अगदीच सुदूरबुदूर ! ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.


हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, अजून तरी पूर्णपणे आपल्या मुख्य धारेतल्या सिनेमाकर्त्यांना पटत नसावेच. नाही म्हणायला, काही काळासाठी कथानक थोडंसं लखनऊमध्ये सांडतं. पण पुन्हा एकदा 'तिथेच का' ह्या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. म्हणजे अमुक कथानक अमुक शहरातच का घडावे किंवा कथानकाचा विशिष्ट भाग तमुक ठिकाणीच का घडावा, ह्याचा तर्कसंगत विचार करणे हा वेळेचा अपव्यय आहे, हे समजून घ्यायला हवं !

'अयान'च्या भूमिकेत रणबीरने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. पण गोंधळलेल्या प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारून आता त्याला कंटाळा येण्यास हरकत नसावी. ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. बापासारखं पोराचं होऊ नये. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, बचना ऐ हसीनो ह्या सगळ्यातून रणबीरने आधीच कन्फ्युज्ड तरुण साकार केला आहे. 'ऐदिहैंमु' त्याच सगळ्याला उजाळा मिळत जातो.
एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा ! अगदी सहज वावर, बोलके डोळे व चेहरा आणि जबरदस्त आत्मविश्वास, ह्याचं एक परफेक्ट मिश्रण मला अनुष्कात जाणवतं. 'आत्मविश्वासाने वावरणारी स्त्री' ही सौंदर्याची सर्वश्रेष्ठ मूर्ती असावी. ती झलक अनुष्कात ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन नेहमीच दिसत असते. तिची 'अलीझेह' इतकी सुंदर दिसते की एका प्रसंगात जेव्हा ती 'सबा'च्या (ऐश्वर्याच्या) सौंदर्याची भरभरून स्तुती करत असते, तेव्हा 'हा उपरोध आहे की काय' असा संशय येतो !
ऐश्वर्या आजपर्यंत जितकी चांगली दिसत आली आहे, तशीच दिसते. ना जास्त, ना कमी. खरं तर, तिच्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं, तर तिने मध्यमवयीन दिसणं अपेक्षित होतं, पण ती पुरेशी वयस्कर दिसत नाही. तिची एन्ट्री झाल्यावर सिनेमाच्या गाडीचा ट्रॅक काही वेळासाठी बदलतोच. तेव्हाचे बोजड डायलॉग्स तिच्यासोबतच्या अयानला करतात, त्यापेक्षा जास्त आपल्याला बोअर करतात. 'सबा' कवयित्री का दाखवली आहे, ह्यालाही काही सबळ कारणमीमांसा नाहीय. किंबहुना, ती कवयित्री नसती दाखवली, तर जे कमाल पकाऊ डायलॉग इच्छा नसतानाही पाहाव्या लागणाऱ्या जाहिरातींप्रमाणे आपल्यावर आदळत राहतात, ते तरी टळले असते.

मी सिनेमा पाहण्याची दोन प्रमुख कारणं होती. ट्रेलरमध्ये ऐकवलेला 'एकतर्फा प्यार..' वाला डायलॉग आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं. तो डायलॉग कुठल्या प्रसंगी आहे आणि ते गाणं कसं चित्रित केलं आहे, ह्या दोन गोष्टींची मला खूप उत्सुकता होती. दोन्हींनी मला निराश केलं. धक्कादायक गोष्ट अशी की, 'एकतर्फा प्यार..' वाला तो डायलॉग मुख्य व्यक्तिरेखेच्या तोंडी नाहीच ! (कुणाच्या तोंडी आहे, हे सांगणार नाही. स्वत:च जाणून घ्यावे !) आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं 'क्युटीपाय' ह्या भिकार धांगडधिंग्याला लागूनच सुरु होतं. दोन्ही गाण्यांच्या मेलडीचा, पट्टीचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने हा बिनडोकपणा सहनच होत नाही. मुळात, ती 'क्युटीपाय' नामक टुकारकी अकारणच घुसडलेली आहे. एकंदरीत संगीताबद्दल बोलायचं झालं तर 'चन्ना मेरेया' आवडलंच आहे. शीर्षकगीतही चांगलं जमलं आहे. पण बाकी सगळा आनंदीआनंद आहे. पार्श्वसंगीत तर निरर्थक कल्लोळ माजवतं, बाकी काहीच नाही.

व्यक्तिरेखांच्या मनांतले भावनिक गोंधळ मांडण्यात करण जोहर दोन-तीन भाग वगळले, तर बऱ्यापैकी प्रभावी ठरला आहे. सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे शेवटाकडे. शेवटचा मेलोड्रामॅटिक ट्विस्ट 'सगळं मुसळ केरात'वाला आहे. त्या सगळ्या फिल्मीगिरीनंतर शेवटी सिनेमा त्याच वळणावर संपतो, जिथे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेला असतो. 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कहाणीच्या हाताळणीतली परिपक्वता इथे असती, तर सिनेमा 'जोहरचा सर्वोत्तम' म्हणता आला असता. शेवट वगळता, इतर सादरीकरणातही 'तेच ते'पण जाणवत राहतं.
जोहरच्या सिनेमांत श्रीमंतीचं प्रदर्शन असतं. ते झोया अख्तरच्याही सिनेमांत दिसतं, पण दोन्हींत फरक आहे. जोहरच्या प्रदर्शनात क्रिएटिव्हिटी जरा कमीच वाटते. मोजकीच पात्रं असलेलं कथानक असल्याने, ते आटोपशीर असायला हवं होतं. 'तेच ते'पण आल्यामुळे ते जरासं लांबलंच आहे. बट अगेन, अडीच, पावणे तीन तासाचा पसारा मांडल्याशिवाय चोप्रा, जोहर प्रभूतींना पोटभरीचं झाल्यासारखं वाटत नसावंच बहुतेक !

कुणी काहीही म्हणो, करण जोहरचंही एक फॅन फॉलोईंग आहे. त्यांना 'ऐदिहैंमु' नक्कीच आवडेल.
रणबीरच्या चाहत्यांनाही 'ऐदिहैंमु' आनंद देईल. अनुष्कासाठी पाहायचा असेल, तर नक्कीच पाहावा.
रणबीर-अनुष्कामध्ये ती 'सिझलिंग केमिस्ट्री' का काय म्हणतात, ती पुरेपूर जाणवते.
ऐश्वर्यासाठी जर कुणी पाहणार असेल किंवा तिच्या व रणबीरच्या तथाकथित गरम दृश्यांबद्दल उत्कंठा असेल, तर नक्की निराशा होईल.
आणि सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा विरोध म्हणून जर कुणी मुद्दाम पाहणार असेल, तर त्यांनाही अगदीच वेठीस धरल्यासारखं वाटणार नाही, असं मला वाटतंय. त्यांनी फक्त 'ऐ दिल, यह हैं बॉलीवूड' इतकं लक्षात ठेवावं म्हणजे झालं !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Monday, October 24, 2016

शब्द काही थांबती ओठातही

शब्द काही थांबती ओठातही
श्वास काही हातचे उरतातही

मुश्किलीने जोडली जातात पण
फार लौकर माणसे तुटतातही

उमगलो आहे स्वत:ला जेव्हढा
तेव्हढा मी गूढ अन् अज्ञातही

गवसले आयुष्य ना आयुष्यभर
शोध घे आता जरा माझ्यातही

साचले नाते इथे डबके बनुन
कोरडेपण वाटते पाण्यातही

हे लिहू की ते लिहू की ते लिहू
चालले वादंग दु:खांच्यातही

तूच तू अन् तूच तू सगळीकडे
वेढते गर्दीच एकांतातही

मी, नशा, कविता, व्यथा, दु:खे, जखम
राहतो सगळेच आनंदातही

नीज माझ्याही कुशीमध्ये कधी
एक आई राहते बाबातही

....रसप....
२३ ऑक्टोबर २०१६

Thursday, October 13, 2016

गुजरते वक़्त की मौज - 'बाजार' - Bazaar (Hindi Movie - 1982)

प्रस्तुत लेखात सिनेमाच्या शेवटाचा उल्लेख टाळायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. जुनाच सिनेमा असल्याने तशी आवश्यकता वाटली नाही. तरी, जर कुणाला सिनेमाचा शेवट आत्ता जाणून घ्यायचा नसेल, तर आधी सिनेमा पाहावा आणि मगच लेख वाचावा, ही विनंती !



गली के मोड़ पे सूना सा कोई दरवाज़ा
तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आएगी

- बशर नवाज़

अशी एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच ! 'बाजार' ह्या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो.

हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत ह्यांना पडली. हाता-पायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याच वेळी पोटालाही भुकेची सवय नाही; अशी एक कधी विचार न केलेली समस्या ह्या लोकांसमोर 'आ' वासून उभी राहिली.
हे नव-गरीब जरा वेगळ्या प्रकारचे होते. ह्यांच्याकडे राहण्यासाठी बऱ्यापैकी मोठी घरं तर होती, पण त्यांच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी पैसा नव्हता. ह्यांच्या आवडी-निवडी, अभिरुची उच्च दर्ज्याच्या होत्या, पण त्या पुरवणे त्यांच्या खिश्यासाठी महाग होते. ह्यांचे कपडे कळकट, फाटके नव्हते, पण मोजकेच होते. ह्यांच्या खिश्यात मुखशुद्धीसाठी पान, विडा होतं, पण पोटाची खळगी एक तर रिकामी होती किंवा अर्धीच भरलेली.
असं म्हणता येईल की, आपल्या ह्या वाताहतीस ते स्वत:च जबाबदार होते.
मात्र, पुरुषांच्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या ह्या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती 'स्त्री'. हे कोणे एके काळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काही वेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा 'हाच एक तरणोपाय आहे', असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार 'निकाह, शादी' ह्या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरु झाला.

विलीनीकरण झाल्यानंतरची काही वर्षं हैदराबादची अवस्था कशी होती, हे मला निश्चित माहित नाही. ती खरोखरच इतकी भयंकर होती का ? की 'बाजार' मधून दाखवलेली परिस्थिती अतिशयोक्तीपूर्ण आहे, कुणास ठाऊक ! पण एरव्ही, इतर चित्रपटांत केलं गेलेलं गरिबीचं उदात्तीकरण इथे दिसून येत नाही. इथला गरीब आपली भूक भागवण्यासाठी व स्वत:चे आयुष्य सुखी करण्यासाठी नाती, माणुसकी, तत्वमूल्यं ह्या सगळ्या श्रीमंत आभूषणांना चक्क अडगळीत फेकून देतो. तो आपली बहिण, मुलगी, बायको कुणाचाही सौदा करायला तयार होतो. हे सगळं अतिरंजित वाटू शकतं. पण तरी, अगदीच अविश्वासार्ह नाही. आजही ग्रामीण भागांत मुली विकत मिळतातच. किंबहुना, ज्या प्रकारे उत्तर भारतातील काही भागांतला स्त्री-पुरुष संख्येचा समतोल बिघडत चालला आहे, त्याचा विचार करता भविष्यात असे 'बाजार' भरणं आणखी खुलेआम सुरु होऊ शकेल ! (ह्यावरुन २००३ सालचा 'मातृभूमी' हा एक जबरदस्त सिनेमा मला आठवला. युट्युबवर आहे. पाहू शकता.)

हे एकंदर चित्र फार भीषण आहे. पण ह्या सगळ्याची मांडणी मात्र त्या भीषणतेला प्रभावी करत नाही. कारण 'बाजार' मधली कुठलीच व्यक्तिरेखा पूर्णपणे पटतच नाही. प्रसंगांची वीण आणि संवादांची पेरणी कथानकातलं वजन खूप हलकं करून टाकते.
कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची 'नजमा' आहे. ही प्रमुख व्यक्तिरेखा प्रचंड गोंधळलेली आहे. तिचं बहुतांश वागणं तर्कविसंगत आहे. एका 'अख्तर' नामक (भरत कपूर) तद्दन भुक्कड मनुष्यासाठी ती आपलं घर सोडून मुंबईला पळून जाते. एका अर्थी ते बरोबरच असतं, कारण घरच्यांनी तर असाही तिचा बाजार मांडलेलाच असतो. मात्र ह्या मनुष्याकडे स्वत:चं काही एक कर्तृत्व नाही, तो तिला त्याच्या एका मित्राच्या रिकाम्या घरी आश्रितासारखं ठेवतो आहे आणि लग्न न करता रोज रात्री शय्यासोबत करून जातो आहे. त्याच्याकडे ना धड नोकरी, ना धड व्यवसाय. तो स्वत: इतका तत्वशून्य व लाचार आहे की त्या अमीरजाद्या वयस्कर मित्राच्या हातातलं खेळणं बनला आहे. आणि दुसरीकडे हैद्राबादला असतानापासून तिच्यावर मनापासून प्रेम करणारा सलीम (नसीरुद्दीन शाह) आहे. जो कमावता, जबाबदार आहेच, पण कवी, लेखकही आहे. जो तिला वारंवार हे समजावतो आहे की अख्तर तिला फसवतो आहे. पण तिला ते पटत नाही ! अश्यातच त्या म्हाताऱ्या मित्राच्या मनात स्वत:च्या शरीरसुखाच्या सोयीसाठी एक मादी लग्न करून करून विकत घेण्याचं डोक्यात येतं. ह्यासाठी त्याला मदत करायला लाचार अख्तर तयार होतोच, त्यात काही आश्चर्य नाही. पण तो नजमालाही ह्यासाठी तयार करतो, तेव्हा मात्र ते पटतच नाही.
मग तो वयस्कर मित्र, अख्तर, नजमा, सलीम, नजमाची एक मैत्रीण असं सगळं लटांबर मुंबईहून हैद्राबादला मुलगी विकत घेण्यासाठी येतं. एका फालतू मनुष्याच्या त्याहून फालतू दोस्तासाठी नजमा, जी स्वत:सुद्धा कधी तरी विकली गेलेली आहे, माद्यांचा बाजार भरवते आणि अजून दोन आयुष्यांना बरबादीच्या रस्त्यावर ओढते. तिला जशी आहे तशी स्वीकारायला सदैव तयार असलेलं एक खरं प्रेम २४ तास डोळ्यांसमोर असताना ही बाई असं का वागते आहे, ह्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण मिळता मिळत नाही. कारण अख्तरमध्ये त्याच्यावर जीवापाड प्रेम करावं, असं काहीच नाही आणि नजमा त्यात असं काय पाहत असते, तेही स्पष्ट होत नाही. ह्या सगळ्या ठिसूळपणामुळे कथानकात प्रचंड ताकद असूनही 'बाजार' हवा तितका प्रभावी होत नाही.

कहाणीतला दर्द जसा स्मिता पाटीलच्या 'नजमा'मध्ये आहे, तसाच तो सुप्रिया पाठकच्या 'शबनम' आणि फारुख शेखच्या 'सज्जो'च्या प्रेमात आहे. हे प्रेम -

नज़रें मिलती हैं जाम मिलते हैं
मिल रही है हयात फूलों की

- असं गोडगोजिरं राहत नाही. तर ते ह्या गोंडसपणापासून -

बहुत आरजू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहा कर चले

- अश्या शोकांतिकेपर्यंत पोहोचतं. खरं तर हा प्रवास मन चुरगाळणारा आहे. कुठे तरी आपल्याला आधीच जाणवलेलंही असतं की 'हा स्वच्छ, गुळगुळीत कागद आणि त्यावरचं टापटीप, मोत्यांसारखं अक्षर' हे काही शाश्वत ठरणार नाही. ह्याची नासाडी अटळ आहे. ते तसंच होतं.

देख लो आज हमको जी भरके
कोई आता नहीं है फिर मरके

हे म्हणणारी सुप्रिया पाठक खूप गोड दिसते, कामही मस्तच करते. तिच्यासोबत फारुख शेखही नेहमीप्रमाणेच सहजाभिनय करतो. मात्र ठिगळं-ठिगळं जोडलेलं कथानक एकसंधपणे समोर येत नाही. काही न काही कमी राहतेच राहते.

नसीरुद्दीन शाहचा सलीम मात्र सगळ्यांत जास्त लक्षात राहतो. अजून एक बाजार भरवला जातो आहे, हे जेव्हा त्याला समजतं त्या वेळचा त्याचा मोनोलॉग तर पुन्हा पुन्हा पाहावा असा आहे. ही एक व्यक्तिरेखाच मला तरी मनापासून पटली. तरी त्याचा उद्रेक होतच नाही, हेही जरासं अविश्वसनीय वाटतं.
'निशा सिंग'चाही एक लहानसा रोल आहे. जो तिने मनापासून निभावला आहे. एकाच वेळी तिच्या डोळ्यांत समंजसपणा आणि खट्याळपणा जाणवतात.

'बाजार' हा 'सागर सरहदी' दिग्दर्शित (बहुतेक) एकमेव चित्रपट. 'सागर सरहदी' हे खरं तर लघुकथालेखक. त्यांनी यश चोप्रांच्या काही सिनेमांचे पटकथा, संवाद लेखनही केलं होतं. 'बाजार'ची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच. पण स्वत: लिहिलेली ही कथा त्यांना स्वत:लाच दिग्दर्शक म्हणून पेलताना कसरत करावी लागली आहे. खूप विचित्र प्रकारे चित्रित केलेले अनेक प्रसंग जाणवतात.
उदाहरणार्थ -
१. 'शबनम'च्या आईकडे (सुलभा देशपांडे) शबनमच्या लग्नासाठी स्थळं घेऊन येणारी एक वृद्ध बाई व्हरांडा/ ओसरीत बसून स्थळ सांगत असताना बाजूला एका अर्धपारदर्शक पडद्याआड शबनम आणि तिची बहिण/ मैत्रीण उभ्या राहून सगळं ऐकत आहेत. त्यांचं तिथे उभं राहणं, एकमेकांशी कुजबुजणं खूपच कृत्रिम, अवघडलेलं वाटतं.
२. नजमा 'सज्जो'ला (फारुख शेख) घरी पार्टीसाठी आमंत्रण देते, तेव्हा ती म्हणते की, 'आज शाम को दावत हैं.' त्या 'दावत'साठी सज्जो आणि शबनम जातात. तिथे शबनम गाणं गाते. ती गात असताना मागे काळाकुट्ट अंधार आहे. म्हणजे रात्र झालेली दाखवली आहे. तर पुढच्याच दृश्यात सज्जो आणि शबनम जेव्हा रस्त्यावर बाहेर पडतात, तेव्हा बाहेर उजेडही असतो आणि मशिदीतली 'अजान'ही ऐकू येते ! इथे वेळेचं गणित गडबडलंय बहुतेक.

अश्या अजूनही काही गोष्टी खटकतात. ह्या फक्त वानगीदाखल.
शेवट तर अगदीच अतर्क्य आहे. जर शबनमला जीवच द्यायचा होता, तर ती लग्न करतेच का ? इतकी पराकोटीची कृती करण्यापेक्षा पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही किंवा लग्नाआधीच जीव का देत नाही किंवा तसा प्रयत्न तरी का करत नाही ? केवळ एक शोकांतिका लांबवण्यासाठी, जेणेकरून ती अधिकाधिक बोचावी, लग्न होऊ दिलं आहे असं वाटतं.
शबनमच्या मृत्युनंतर सज्जो एक किंकाळी फोडतो. त्याचं ते किंकाळी फोडण्याचं दृश्य म्हणजे नुसतंच एक ठिगळ जोडल्यासारखं झालं आहे. म्हणजे, >ती मरते + सज्जोच्या आजूबाजूला चार-पाच माणसं आहेत, तो किंचाळतो + पुढचं ठिगळ< असा सगळा प्रकार आहे.

'बाजार'ची सगळ्यात मोठी ताकद आहे 'खय्याम'चं संगीत. ह्या संगीताची आणि 'उमराव जान'च्या संगीताची जातकूळ एकच. ह्या सर्व गाण्यांसाठीही लता मंगेशकरांपेक्षा आशा भोसले हव्या होत्या, असं माझं आधीपासूनचंच मत आहे. गाणी पडद्यावर पाहत असताना ते अजून ठाम झालं. 'तलत अजीझ'चा 'फिर छिडी रात..' मधला आवाज मला तरी आवडत नाही. त्यांचा हा विशिष्ट आवाज, जो अनेक गाण्यांत आहे, तो मला एका कपात १० चमचे साखर घातलेल्या चहासारखा वाटतो. सुरेश वाडकरांशी मिळताजुळता. (वाडकरांचा जो दमदार आवाज 'हुजूर इस कदर भी..', 'साँझ ढ़ले गगन तले..' सारख्या काही गाण्यांत आहे, तसा नाही, इतर काही गाण्यांत आहे तसा.) हा आवाज गुळगुळीत, मिळमिळीत वाटतो.  'दिखाई दिए यूँ..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं. पडद्यावर पाहताना ते अंमळ अजून आवडलं, कारण सुप्रिया पाठक !
'उमराव जान' ची गाणी 'शहरयार'नी लिहिली होती, तर इथे बशर नवाज, मीर तकी मीर, मिर्झा शौक़, मखदूम मोहीउद्दीन असे वेगवेगळे शायर आहेत. सगळ्यांनी वजनदार लिहिलं आहे आणि म्हणूनच आजही ही गाणी आपल्या ओठांवर आहेत, उद्याही असणार आहेत.

'बाजार' खूप अपेक्षा ठेवून पाहिला. चांगला आहे, पण महान वगैरे वाटला नाही. एक अप्रतिम काव्य बनता बनता राहून गेलं, ह्याची हुरहूर मनाला लागली आहे. अर्थात, काव्याची अनुभूती ही व्यक्तीसापेक्ष असते. एकाला जे आवडेल, ते सगळ्यांना आवडेलच असं नाहीच आणि जे एकाला आवडणार नाही, ते सर्वांना आवडलेलं असूही शकतं. त्यामुळे ही 'बाजार' नावाची चित्रपट कविता मला जरी खूप आवडली नसली, तरी इतरांना आवडू शकेलच.

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...