Saturday, January 09, 2016

२०१५ ची एक विना-शीर्षक आठवण

खरं तर, त्या दिवसाचा अनुभव मी दुसऱ्याच दिवशी लिहायला घेतला होता. पण जमलं नाही. मग अधूनमधून ३-४ वेळा मी प्रयत्न केला, तरी मला नेमके शब्द सुचलेच नाहीत. कदाचित मला काय सांगायचं आहे, हे आत्ताही माझं मलाच नीटसं उमगलेलं नाही. पण आता हे मनात अजून दाबून ठेवता येत नाहीय. लहान मुलाला एखादं खेळणं किंवा नवीन कपडा दिला किंवा मिळाला तर ते लहान मूल कमालीचं बेचैन होतं. ह्या विचाराने की 'कधी एकदा ते खेळणं किंवा तो कपडा मी सगळ्यांना दाखवीन !' ही बेचैनी माझ्यातल्या लहान मुलाने गेला महिनाभर अनुभवली आहे. आज त्या दिवसाला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. आज मी हे हातावेगळं करणारच आहे. माझी कमाई मी सर्वांना दाखवणारच आहे.

२०१६ सुरु होऊन नऊ दिवस होऊन गेलेत. आत्तापर्यंत नव्याची नवलाई ओसरली असेलच. काही लोकांची रिझोल्युशन्ससुद्धा गुंडाळून झालेली असतील. ह्या नऊ दिवसांत अनेकांनी 'त्यांच्यासाठी २०१५ कसं गेलं' हे सांगणाऱ्या पोस्ट्स टाकल्या. काय कमावलं, काय गमावलं, असा सगळा ताळेबंदही मांडून झाला.
पण मी माझा ताळेबंद मांडला नाही. ['लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा' (पापा कहतें हैं बड़ा नाम करेगा..) सारखं !]
Honestly, ताळेबंद मांडलाच जाऊ शकत नाही. कारण माझ्या बाबतीत आत्तापर्यंतच्या सगळ्या वर्षांची कमाई ह्या सरलेल्या वर्षातल्या एका दिवसातच झालेली आहे. एरव्ही 'बाईकने किती मायलेज दिलं' इथपासून ते 'मुलगा झाला' इथपर्यंत प्रत्येक लहान-मोठी बातमी मी फेसबुकवर जाहीर करत आलो आहे. ही गोष्ट मात्र मी आत्तापर्यंत फार कमी लोकांना सांगितली. This was differently special, specially special and differently different. जे घडलं, ते काही माझं स्वप्न वगैरे नव्हतं. मात्र ते घडून गेल्यावर कळलं की झालं ते स्वप्नवतच होतं !

३ डिसेंबर २०१५.
फेसबुक मेसेज बॉक्समध्ये कौस्तुभ दादाचा मेसेज आला. '९ तारखेला मी मुंबईत येतोय. आलास तर 'किशोर'च्या बंगल्यावर घेऊन जाईन!'
'किशोरच्या घरी जायला मिळणार ?' मी कसलाही विचार न करता ठरवून टाकलं की जायचंच !
९ ला सकाळी मुंबईला पोहोचलो. बरोबर एक किशोरभक्त मित्र तुषार ढेरे. कौस्तुभदाला दुपारी भेटून, जेवून आम्ही 'जुहू तारा'ला गेलो.



'किशोर कुमार गांगुली मार्ग', 'Kishore Kumar Bungalow' अश्या पाट्या दिसल्या आणि दोन-चार ठोके गडबडलेच छातीत !
गेटमधून आत पाउल टाकलं आणि मला एकाच वेळी पिसासारखं हलकंही वाटायला लागलं आणि पायांत काही किलोंचं वजन बांधल्यागत जड-जडही ! लाल रंगाचं ते टुमदार घर. इथल्याही झाडांशी किशोरदाने गप्पा मारल्या असतील का ? हा समोर जो झोपाळा आहे, तो त्याच्या काळीही असेल का ? त्यावर तो बसला असेल का ? त्याच्या गाडीची जागा कोणती असेल ? एकेक पाउल अतिशय शांतपणे टाकत आणि असे अनेक प्रश्न मनातच रुजवत गेटपासून मुख्य घरापर्यंत गेलो. दार उघडंच होतं. (Yes. You read it right. दार उघडंच होतं.) मंदिरात शिरताना किंवा स्टेजवर जाताना किंवा सामन्यापूर्वी मैदानावर पाउल ठेवताना जसा नमस्कार करतो, तसा नमस्कार तो उंबरा ओलांडून आत शिरण्याआधी अभावितपणेच केला गेला. मंद उजेड असलेल्या त्या वास्तूत समोर असलेल्या प्रशस्त जिन्यावरुन आम्ही तिघे एकेक पायरी चढत वर जात होतो. डावीकडच्या भिंतीवर किशोरदा आणि अमित कुमारचे स्वतंत्र व एकत्र असे लहान-मोठे खूप फोटो होते. दीड जिना चढून पुन्हा डावीकडे वळल्यावर एका दिवाणखान्यात आम्ही शिरलो. तिथे एक वयोवृद्ध माउली एका छोट्याश्या सोफ्यावर बसली होती. रुमा गुहा. किशोरदाच्या पहिल्या पत्नी. त्यांच्या पाया पडलो. त्या साध्याश्या दिवाणखान्यात मोजक्याच वस्तू होत्या. समोर असलेलं केनवूडचं सेंटर टेबलही इतकं साधंसं होतं की त्याच्या काचांवर चरेसुद्धा दिसत होते. काही वेळानंतर चहा आला. तो एरव्ही आपण चित्रपटांत पाहतो तसा पाणी, दूध, साखर, वगैरे सगळं वेगवेगळं असलेला नव्हता. माझ्या घरी जसा पाहुण्यांना दिला जातो, तसा सगळं एकत्र केलेला बदामी रंगाचा चहा.




'किशोरदाच्या घरात बसून मी चहा प्यायलेला एक कप चहा' ही होती ह्या वर्षाची कमाई. ही कमाई आजवरच्या सगळ्याला पुरून उरलीय. तिथे अर्धा-पाउण तास आम्ही रुमाजींशी काय गप्पा मारल्या, माझ्या लक्षात नाही. कारण माझी नजर फक्त हेच टिपत होती की कुठे कुठे किशोरदा दिसतोय.. तो मला खिडकीत उभा असलेला दिसला. आजूबाजूच्या खोल्यांतून ये-जा करताना दिसला. समोर असलेल्या अगदी छोट्याश्या खोलीत हार्मोनियम घेऊन बंगाली गाणं गातानाही दिसला. मध्येच तो समोरच्या सोफ्यावरसुद्धा दिसला आणि विक्षिप्तपणे म्हणाला, 'हो गया मुझे देखकर ? अभी आप जा सकतें हो, आपसे मिलकर बड़ी ख़ुशी हुई !'

जरा वेळाने लीना चंदावरकरसुद्धा भेटल्या.
बरेच फोटो झाले. पण जे डोळ्यांनी टिपलं, ते कॅमेरा टिपू शकणार नव्हताच. जे कानांनी ऐकलं, ते ह्या शब्दांत मी कथन करू शकणार नाहीच. मी आजही एकच कल्पना करून शहारतोय की घर व सभोवतालच्या त्या संपूर्ण परिसरात एखाद्या ठिकाणी तरी असं झालं असेलच ना की जिथे कधीकाळी किशोरदाचं पाउल पडलं असेल अगदी तिथेच बरोब्बर माझंही पडलं असेल ?



I am sure, तुषारचा अनुभवही असाच काही असणार आहे. ह्यासाठी कौस्तुभदाचे आभार वगैरे मानणं, म्हणजे शुद्ध करंटेपणा ठरेल. त्याने आम्हाला तिथे का नेलं, हे मी समजू शकतो. त्याने आम्हाला श्रीमंत केलं आणि आम्हाला श्रीमंत केल्याचा आनंद त्याला संपन्न करून गेला. असे अनेक आनंद त्याने आजपर्यंत वेचले आहेत आणि त्या प्रत्येक आनंदक्षणाने तो संपन्नांतलाही संपन्न होत गेला आहे अन् जाणार आहे.

- आपला (नवश्रीमंत)
रणजित पराडकर 

Saturday, January 02, 2016

उणीवांची जाणीव - नटसम्राट (Movie Review - Natsamrat)

'नटसम्राट' पाहून झाल्यावर एक वेगळीच जाणीव जागृत होते. ही जाणीव उणीवेची की रितेपणाची, नक्की समजायला थोडा वेळ जातो. तोपर्यंत आपण आपल्या मनाची हीच समजूत घातलेली असते की हे एक रितेपणच आहे. जळून खाक झालेल्या नाट्यगृहात, त्या अवशेषांप्रमाणेच ध्वस्त, मोडकळलेला, खंगलेला एक महान कलाकार जे रितेपण अनुभवत असतो, तेच आपल्या मनातही आलं असावं, असं वाटतं. असं वाटण्यामागे कारणंही आहेत. नाना पाटेकरने साकारलेला अप्रतिम 'नटसम्राट गणपत रामचंद्र बेलवलकर', मेधा मांजरेकरनी साकारलेली 'सौ. बेलवलकर', बेलवलकरांच्या मित्राच्या सहाय्यक भूमिकेत कमाल करणारे विक्रम गोखले, मूळ संहितेचा जपलेला प्राण, एकापेक्षा एक जबरदस्त स्वगतं, सर्व सहाय्यक कलाकारांचा (एखादा अपवाद वगळता) जबरदस्त अभिनय, सक्षम तांत्रिक बाजू (कॅमेरावर्क इत्यादी) अशी अनेक कारणं.

पण काही काळ गेल्यावर आपलंच आपल्याला समजतं की ही जाणीव रितेपणाची नाही ! ही जाणीव तर उणीवेची आहे किंवा 'उणीवांची' आहे !
सगळ्यात मोठी उणीव ही की ह्या कहाणीत काही म्हणता काहीसुद्धा नाविन्य राहिलेले नाही. मुलांनी नाकारलेल्या म्हाताऱ्यांची फरफट आजपर्यंत कित्येकदा पाहिलेली आहे. वेगवेगळ्या भाषांतून पाहिलेली आहे. अगदी थेट आणि तितकीच भ्रष्ट नक्कल आपण हिंदी चित्रपट 'बागबान'मध्ये पाहिली. तो चित्रपट वेगवेगळ्या वाहिन्यांवरुन इतक्या वेळा माथी मारून झाला आहे की इच्छा नसतानाही पाहिला गेला आहे. असेच इतरही अनेक चित्रपट, मालिका आपल्या माथी मारल्या गेल्या आहेत. असेल, त्या सगळ्याचं उगमस्थान वि.वा. शिरवाडकरांचं 'नटसम्राट'च असेल आणि त्या अर्थी हा चित्रपट 'ओरिजिनल'ही असेल. पण हा ओरिजिनल अनेक 'डुप्लिकेट्स' नंतर आल्याने, त्याची 'ओरिजिनलिटी' लुप्त झालेल्या एखाद्या मोहेंजोदडोसारख्या संस्कृतीसारखी गाडली गेलेली आहे.
अर्थात, चित्रपट पाहायला जातानाच आपल्याला हे सगळं माहित असतं. असं अजिबात नाही की आपल्याला कहाणीची कल्पना नसताना हे कथानक आपल्यासमोर उलगडतं. पण मग हे जे नाट्य रंगभूमीवर गाजलं आहे, ते मोठ्या पडद्यावर सादर केलं जात असताना त्यात काय वेगळेपण असेल, हे कुतूहल उरतं. त्या कुतुहलापोटी चित्रपट पाहत असताना विक्रम गोखलेंचं 'रामभाऊ' हे पात्र वगळता ठसठशीत वेगळेपण असं काही दिसत नाही. नाटकाचं चित्रपटीकरण करताना एक अजून वाव मिळतो, तो म्हणजे संगीताचा. खासकरून प्रचंड भावनिक ओढाताण व नाट्यमयता असलेल्या कथानकात तर संगीत खूपच महत्वाचा भाग बनू शकतं. किंबहुना, ते बनायला हवं, अशी अपेक्षा असल्यासही गैर नसावं. मात्र इथे ही बाजू सपशेल लंगडी पडली आहे. १-२ गाणी जी अध्ये-मध्ये अर्धी-मुर्धी वाजतात ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली जातात. But then, 'संगीत' हा चित्रपटाचा एक भाग असणं, ही संकल्पनासुद्धा आता कालबाह्य झालीच आहे. त्यामुळे त्याकडे होणारा कानाडोळा स्वाभाविकच.
मात्र चित्रपट पाहायला जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं, 'नाना.' नाना निराश करत नाही. नानाने कधीच निराश केलेलं नाही. नाना हा अभिनेता निराश करणाऱ्या अभिनेत्यांच्या जमातीचा नाहीच. बेलवलकराचा विक्षिप्तपणा आणि मनस्वीपणा तो पुरेपूर साकार करतो. बापाचं हळवेपण, पतीचं प्रेमळ मन, कलावंताचा अभिमानी बाणा अशी सगळी रूपं हा महान अभिनेता अजोड सक्षमपणे सादर करतो. "मी आहे ज्युलियस सीझर, मी प्रतापराव, मी ऑथेल्लो, मी सुधाकर आणि मीच गणपत रामचंद्र बेलवलकर 'नटसम्राट!' " हे म्हणतानाचा नानाचा आवेश अंगावर काटा आणतो ! ज्यांनी डॉ. श्रीराम लागूंचा 'नटसम्राट' पाहिला आहे, त्यांना नानाच्या नटसम्राटावरही त्याचा प्रभाव जाणवेल. मात्र तो केवळ 'प्रभाव'. नानाचा 'नटसम्राट' स्वतंत्रपणे नक्कल करण्याचा विषय आहे खचितच.
रामभाऊच्या भूमिकेतले विक्रम गोखले मनावर आघात करतात. 'अरे नीच माणसा, चप्पल हरवल्याचं दु;ख लंगड्याला तरी सांगू नकोस !' असं हसत हसत आपल्या मित्राला सुनावताना त्यातली सुप्त व्यथा ते बेमालूमपणे पोहोचवतात. दोघांवर चित्रित झालेल्या प्रत्येक प्रसंगांत अश्या प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळते. इस्पितळात गणपतराव आणि रामभाऊ 'कौन्तेय' मधील कृष्ण-कर्ण संवाद उत्स्फूर्तपणे सादर करतात. तो प्रसंग अभिनयाच्या जुगलबंदीचं एक शिखर आहे.
इतर वेळी कधी मेधा मांजरेकर तर कधी मृण्मयी देशपांडे जान ओततात. खासकरून मुलीच्या घरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावरचा जो प्रसंग आहे, ज्यात मुलीला (मृण्मयी) उपरती होऊन ती गयावया करून आई-वडिलांची क्षमा मागते आणि अपमानामुळे रागाचा पारा चढलेली आई (मेधा मांजरेकर) जळजळीत कटाक्ष टाकून दोन शब्द सुनावते, तो सगळा प्रसंग तर 'बॉयलिंग पॉईण्ट' ला पोहोचणारा आहे. सगळ्या सहाय्यक अभिनेत्यांत 'अजित परब' का आहेत, हे मात्र समजत नाही. त्यांचं संगीत जितकं नीरस वाटतं, तितकाच त्यांनी साकारलेला मुलगासुद्धा. त्या भूमिकेसाठी इतर कुणीच का मिळू नये ?

ह्या सर्व कलाकारांकडून उत्तम काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांना सलामच. मात्र हे नाटक चित्रपटात आणताना पदरचं जे काही ओतलं, घातलं आहे, ते कमी पडल्याने; त्याचं माध्यमांतर करण्याचा हेतू काय ते कळत नाही. 'पुनरुज्जीवन' हाच जर हेतू असेल, तर तो साध्य नक्कीच झाला आहे. पण त्याहून पुढे त्यांनी जायला हवं होतं. कुठे तरी त्यांच्यातला पटकथाकार बचावात्मक झाला.



'नटसम्राट - असा नट होणे नाही'.
डोळ्यांत पाणी आणतो. व्याकुळ करतो. मात्र तरीही ही जाणीव मागे सोडतोच की अजूनही काही तरी हवं होतं. अगदी हीच नाही, पण अशीच थोडीशी जाणीव 'कट्यार काळजात घुसली'नेसुद्धा मागे सोडली होतीच. मात्र 'कट्यार' मध्ये असलेल्या 'नटसम्राट'च्या मानाने प्रचंड मोठ्या उणीवांवरसुद्धा 'कट्यार'ने मात केली होती, ती त्यात असलेल्या इतर काही प्राबल्यांमुळे. इथे मात्र 'अभिनय' वगळता त्या उणीवांवर मात करण्यासाठी काहीच नसल्याने 'अभिनय ह्या लोकांनी करायचा नाही, तर कुणी करायचा?' असा सरळसाधा प्रश्न पडतो आणि उणीवांवर मात केली जात नाही. थोडक्यात, ज्या कारणासाठी 'कट्यार' आवडला, त्याच कारणामुळे 'नटसम्राट' कमी आवडतो. 'आवडत नाही' असे मी म्हणणार नाही. पण अजूनही खूप आवडायला हवा होता. कारण अखेरीस आपण आवंढे गिळतो. पाणी पुसतो आणि खुल्या दिलाने ह्या कलाकृतीला दादही देतो. मात्र ती दाद खऱ्या अर्थाने असते पडद्यावर दिसलेल्या कलाकारांसाठीच. पूर्ण चित्रपटासाठी नव्हे.

रेटिंग - * * *

Related Posts Plugin for WordPress, Blogger...