मिचमिचे डोळे. गालांपासून हनुवटीवर येऊन एखाद इंच लोंबणारी काळी-पांढरी दाढी. मिशी स्वच्छ. डोक्यावर दाढीच्या केसांपेक्षा जरा जास्त पांढरे बारिक केस. त्यांच्या मधोमध टक्कल होतं, हे मला एकदाच दिसलं. आजी गेली, त्या वेळी तो स्मशानापर्यंत गेला होता आणि परत आल्यावर त्याने अंघोळ केली तेव्हा डोक्यावरची गोल टोपी काढली होती, तेव्हा.
साधारण ६५ ते ७० वयाचा असेल अल्ताफ चाचा. उज्जैनहून आत्या त्याला घेऊन आली होती, आमच्या नवीन घरात साधारण पाच बाय सहाचं देवघर बांधण्यासाठी.
आत्याने जेव्हा उज्जैनच्या तिच्या घराचं काम काढलं होतं, तेव्हा सलीम म्हणून कंत्राटदार होता. 'यहाँ मुझे एक छोटा मंदिर जैसा बाँधना हैं' असं ती सलीमला म्हणाली आणि तो क्षणभर विचार करून उत्तरला,'फ़िक्र मत करो माँजी, मैं कारागीर ले आता हूँ.' दुसऱ्या दिवशी सलीमसोबत अल्ताफ चाचा हजर. त्याला जरा कमी दिसत असे म्हणून डोळे बारिक करत बोलायचा. बारिक डोळे, बारिक अंगकाठी आणि बारिकच आवाज. शांतपणे तो त्याचं काम करत राही. नमाजाच्या वेळेस नमाज पढे, जेवणाच्या वेळेस जेवे आणि चहाच्या वेळेस चहा घेई. कुठलाही अनावश्यक वेळकाढूपणा नाही. वेळच्या वेळी येणं, वेळच्या वेळी जाणं. ह्या शिस्तीत त्याचं काम चाले.
घराची एक भिंत तोडावी लागली होती. ती तोडल्याच्या दिवशी काम पूर्ण होऊ शकलं नाही. उरलेलं भगदाड अल्ताफ चाचाने त्याच्या सोबतच्या माणसाच्या मदतीने विटा गच्च कोंबून घट्ट बंद केलं आणि आत्याला म्हणाला, 'बहनजी, यह अच्छे से बंद किया हैं. डरने की बात नहीं हैं. आप बिलकुल फ़िक्र मत करना. यह लड़का आज रात इधर ही सोयेगा.'
देवघराचं काम पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:च जाऊन एक फुलांची माळ आणली आणि ती तिथे दरवाज्याच्या वर लावली. त्याच्या चेहऱ्यावर ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीचं दर्शन झाल्याचा आनंद आत्याला दिसला होता.
अल्ताफ चाचाचं कसब, त्याची शिस्त व अतिशय अदबशीर वागणं ह्या सगळ्याने आत्या प्रभावित झाली होती, त्यामुळे जेव्हा आम्ही बदलापूरला घर बांधायचं ठरवलं तेव्हा 'देवघर बांधायचं आणि ते अल्ताफ भाईकडूनच बांधून घ्यायचं' असं तिने जाहीर करून टाकलं ! तिने अल्ताफ चाचाला विचारलं, तो तयार झाला खरा; पण दुसऱ्या दिवशी चाचा आणि त्याचा मुलगा पुन्हा आले. मुलगा म्हणाला, 'माँजी, अब्बू को ठीक से दिखाई देता नहीं. और तबियत भी ठीक नहीं होती. दो-एक रोज़ की बात होती तो मैं उनके साथ चलता. लेकिन अब काम के लिए जाना मतलब काफी दिन लगेंगे. वो कैसे रह पायेंगे. हमें फ़िक्र हो रही हैं..'
आत्याने त्याला कसंबसं समजावलं आणि अल्ताफ चाचालासुद्धा मुंबईला यायची प्रचंड इच्छा होती म्हणून त्याने होकार दिला. निघायच्या दिवशी तो चाचाला गाडीत बसवायला आला तेव्हा पुन्हा आत्याला हात जोडून म्हणाला, 'माँजी, आप साथ में हो, बस इसी लिए मैं अब्बू को भेज रहा हूँ. वरना नहीं जाने देता.'
मग बदलापूरला आल्यावर उज्जैनच्या शिस्तीतच त्याचं काम सुरु झालं. आमच्या राहत्या घरून, डबा घेउन तो सकाळी 'साईट'वर जात असे, तो थेट संध्याकाळी अंधार झाला की मगच परतत असे. काम जवळजवळ पूर्ण झालं आणि तो बाबांना हळुच म्हणाला, 'हाजी अली दर्गाह पास में ही हैं क्या ?'
बाबाही हसून म्हणाले, 'हाँ. बहुत दूर नहीं हैं. मैं आपको कल ले जाऊँगा'
दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफ चाचा लहान मुलासारखा तयार होऊन बाबांची वाट पाहत बसला. त्या वेळी आमच्याकडे 'साईड कार' लावलेली स्कूटर होती. बाबांनी त्याला साईड कारमध्ये बसवलं आणि दोघं हाजी अलीच्या दर्शनासाठी बदलापूरहून मुंबईला निघाले. रस्त्यात चाचाने पुन्हा पुन्हा विचारलं, 'और कितना दूर हैं.. और कितना दूर हैं ?'
बाबा म्हणत, 'बस.. थोडासाही!'
शेवटी एकदाचे ते पोहोचले. हाजी अलीच्या दर्शनाने चाचा कृतकृत्य झाल्याचं पाहुन बाबाही कृतकृत्य झाले. चाचाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने हाजी अलीच्या भोवतीचं पाणी चाखलं आणि म्हणाला 'यह तो खारा है !' त्याच्या अज्ञानातला निरागसपणा त्याच्या डोळ्यांत ओथंबला होता. त्याच्या मुलाच्या वयाच्या माझ्या बाबांच्या पाया पडावं की मिठी मारावी की काय हे त्याला आनंदातिशयाने कळतच नव्हतं. संध्याकाळी दोघे जेव्हा परत आले तोपर्यंत त्याचे डोळे पाणावलेलेच होते. तो पुन्हा पुन्हा बाबांचे 'शुक्रिया अता' करत होता.
दोन दिवसांनी आत्या चाचाला घेऊन उज्जैनला परत गेली. आम्ही महिनाभराने नवीन घरात राहायला आलो. चाचाने बांधलेल्या देवघरात आमचे देव स्थानापन्न झाले. नियमितपणे त्याची आठवण यायची. आत्याशी पत्रव्यवहारात त्याची ख्यालीखुशाली विचारली, कळवली जायची.
कालांतराने आत्याने उज्जैन सोडलं. अल्ताफ चाचाशी संपर्कही तुटला.
बऱ्याच वर्षांनी, बहुतेक २००८/०९ मध्ये तिचं उज्जैनला जाणं झालं. महांकाळाचं दर्शन घेतलं. तिथे जवळच अल्ताफ चाचाचं घर आहे, हे तिला माहित होतं. शोधून काढलं. घरी मुलगा, सून होते. त्यांनी आत्याला बघता क्षणी ओळखलं. खूप खूष झाले. जुजबी विचारपूस झाल्याबरोबर आत्याने मुख्य मुद्द्याला हात घातला. 'अल्ताफ भाई किधर हैं ?' मुलगा व सून एकमेकांकडे बघत असतानाच आतल्या खोलीतून जमिनीवर स्वत:ला ओढत, खुरडत अल्ताफ चाचा आला. पंचेऐंशीच्या पुढचा चाचा आता हिंडू, फिरू तर शकत नव्हताच, बोलणंही बंद झालं होतं. भरल्या डोळ्यांनी त्याने दुवा दिली, खुशाली सांगितली. आत्याला त्याच्या डोळ्यांत बाबा हाजी अलीचा दर्गाह तरळल्यासारखं वाटलं.
निरोप घेऊन आत्या तिथून निघाली. तिच्या डोळ्यांसमोर चाचाने मोठ्या मेहनतीने उभारलेली दोन्ही देवघरं पुन्हा पुन्हा येत होती.
आता तर आम्हीही बदलापूर सोडलं आहे. आता ते घरही नाही आणि ते देवघरही नाही. पाच सहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत अल्ताफ चाचा दिसला होता, त्यावरून कुणास ठाऊक तो तरी आहे की नाही...
अल्ताफ चाचा... मंदिर वोही बनायेगा.
....रसप....
प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' - जुलै २०१५
प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' - जुलै २०१५