माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.
हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.
गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !
खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.
'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.
संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !
कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.
तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.
संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.
सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?
आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !
एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !
रेटिंग - * १/२