Tuesday, January 28, 2014

आयुष्या

मला मी पाहिले आहे तुझ्या डोळ्यात आयुष्या
स्वत:चा चेहरा बघशील का माझ्यात आयुष्या ?

तिची ओवी, तिची गाणी पुन्हा गाणार असशिल तर
मुखी दे घास माझा अन् भरड जात्यात आयुष्या

मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या

किती गझला मुसलसल बांधल्या आहेस माझ्यावर
कसे मांडू तुला मी एकट्या मिसऱ्यात आयुष्या ?

तुझ्याशी सख्यही नाही, तुझ्याशी वैरही नाही
म्हणूनच वाटतो आहेस तू नात्यात आयुष्या

तुझे रुसवे, तुझ्या खोड्या, तुझा संताप, तक्रारी
किती हकनाक होऊ खर्च आयुष्यात आयुष्या ?

....रसप....
२७ जानेवारी २०१४ 

Friday, January 17, 2014

विरामचिन्हे

काही परकी
काही माझी
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..

जिथे न सुचले
शब्द समर्पक
अथवा होते
रुतले, फसले
जिथे मनाचे
विचारचक्रच
तिथे मांडली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे

अवखळ, अल्लड
हळवी, कातर
उदासीन वा
अनवट, अवघड
फक्त निरर्थक
असती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे

विरामचिन्हे
वगळुन बघता
आयुष्याला
व्यापुन उरते
अर्थहीनता
आणि व्यर्थता

तेव्हा मग मी
पुन्हा एकदा
पेरत बसतो
मीच जी कधी
अभावितपणे
वेचली जरा
आणि लपवली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..

....रसप....
१६ जानेवारी २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...