Thursday, August 29, 2013

शून्य मनाची आर्त विराणी

'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवर कविता - भाग १०८' मध्ये माझा सहभाग -

शून्य मनाची आर्त विराणी
तूही गावी, मीही गातो
मी ऐकावे सुरांस माझ्या
तू ऐकावे तुझेच केवळ

दूर तू तिथे, दूर मी इथे
अज्ञानाच्या आनंदाचे
करू साजरे मूर्त सोहळे
दुनियेला दाखवण्यासाठी
की मी सुखात आहे येथे
पर्वा नाही कुठलीसुद्धा
काय चालले आहे तिकडे

फुटलेल्या गोंडस स्वप्नांचा
जरी ढिगारा मनात असला
तरी जराशीसुद्धा हळहळ
दाखवण्याच्या सौजन्याचे
भान वास्तवाला ह्या अपुल्या
उरू नये इतकेही आता

सरून गेलेल्या काळाच्या
अवशेषांना जपले मीही
आणि खुणांना जपले तूही
ह्या दु:खाच्या कस्तूरीच्या
गंधाच्या उगमाचा पत्ता
शोधुनसुद्धा कुणासही पण
येथे नाही तेथे नाही

....रसप....
२९ ऑगस्ट २०१३

Sunday, August 25, 2013

पुन्यांदा 'पोपट' ! (Popat - Marathi Movie Review)

माणसाचे आयुष्य त्याने केलेली धडपड आणि त्याच्या चुका ह्यातून आकारास येते. काय वाटतं ?
जुलुमाचा राम-राम म्हणून केलेली मेहनतसुद्धा 'धडपड'च आणि नकळत घडलेलीही 'चूक'च किंवा काहीच न करता - असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी - असे म्हणून आळसात वेळ घालवणे हीसुद्धा 'चूक'च. धडपड जास्त की चुका जास्त ह्यावरून आयुष्याचा रस्ता उजवं वळण घ्यायचं की डावं हे ठरवत असावा, बहुतेक.
'पोपट'सुद्धा कुणाची धडपड आणि कुणाच्या चुका दाखवतो. कुठलाही संदेश द्यावा/ पोहोचवावा इतका काही हा चित्रपट खास नाही, हे  आधीच सांगतो. पण अधिक विचार केल्यावर हेच वाटतं की चित्रपट बनविणाऱ्याच्या चुका त्याच्या धडपडीहून जास्त झाल्या असाव्यात.

तर, कोल्हापुरच्या जवळपास 'कुळपे' गाव असतं. 'ग्रामपंचायत' शासित एक खेडंच. ह्या गावातले तिघे मित्र. बकुळ/ बाळ्या (सिद्धार्थ मेनन), रघ्या/ रघु/ रघुनाथ (अमेय वाघ) आणि मुक्या/ मुकुंद (केतन पवार). बाळ्या पक्का 'झोलर'. इकडम तिकडम करून, काही बाही उलट सुलट करून खर्चापुरता जुगाड करणारा, रघुनाथ एक मोठा अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहात कोल्हापुराच्या 'लोकल' चित्रपटसृष्टीत चिल्लर कामं करणारा आणि मुकुंद आषाढी-कार्तिकी केल्याप्रमाणे ऑक्टोबर-मार्च करत बारावीत खितपत पडलेला एक बाप्या. तिघांचं स्वप्न एकच. रघु मोठ्ठा 'ष्टार' झाला पाहिजे ! पण कसलं काय ! त्याच्या हातात असलेलं चिल्लर कामही जातं आणि त्याला हाकलून देण्यात येतं. बास्स ! तीन सुपीक डोकी ठरवतात की आपणच बनवायचा पिच्चर ! नेमकं ह्याच वेळेस गावात 'एड्स जागृती अभियान' सुरु होतं. कण्डोम्स वाटप, पथनाट्यं, पुस्तकविक्री सुरु होते आणि हे त्रिकुट ठरवतं की आपण 'एड्स'वरच पिच्चर काढायचा.
आता पिच्चर काढायचा म्हणजे कॅमेरा ? बाळ्याचा एक मित्र असतो शेजारच्या गावातला फोटोग्राफर 'जन्या/ जनार्दन' (अतुल कुलकर्णी). जन्याला भरीस पाडलं जातं.    

पुढे, चित्रपटाचे चित्रिकरण आणि खरेखुरे आयुष्य ह्यांचा गुंता होत जातो अन् कहाणी विचित्र वळण घेते.
ती काय वळण घेते आणि कुठे पोहोचते, हे जाणून घ्यायचे असेल तर पिच्चर पाहा. 'पोपट' झाल्यास मी जबाबदार नाही !!



खूप वेगळा विषय आहे. असे वेगळेपण दाखवायचे धाडस करण्यासाठी नक्कीच चित्रपटकर्ते अभिनंदनास पात्र आहेत. बट देन, वेगळेपण, प्रयोगशीलता मराठी चित्रपट नेहमीच दाखवत असतो! प्रॉब्लेम 'सफाईदारपणा'त असतो. गुलजार साहेब सांगतात, 'हर मिसरा अच्छी तरह से साफ करके पेश करना चाहिये.' कुठे तरी अश्या प्रकारच्या सफाईत जशी आजची कविता आळशी झालीय, तसेच आजचे प्रयोगशील लेखक-दिग्दर्शकही झाले असावेत का ?

अनेक दृश्यं कंटाळा येईपर्यंत अकारण लांबवली आहेत, तर काही दृश्यं कशासाठी होती? असाही प्रश्न अखेरीस पडतो. नक्कीच अश्या काही ठिकाणी साफसफाई करता आली असती, असं वाटतं.
रघ्या आणि बाळ्याला गावची भाषा विशेष जमली नाही, असं जाणवतं. दोघांचं बोलणं नक्लीच वाटत राहतं. मुक्या मात्र परफेक्ट !

अतुल कुलकर्णीचा 'जन्या' अप्रतिम ! २-३ दृश्यांत अ. कु. पडदा खाऊन टाकतो. पण मग वाटतं की, वाया घालवलाय यार ! ह्याच्या सोबतीला कुणी तरी 'खमक्या' असता तर मजा आली असती. 'प्रेमाची गोष्ट' नंतर 'पोपट'सुद्धा केवळ अतुल कुलकर्णी असल्यामुळे बघितला जातो.
'अविनाश-विश्वजित' जोडीचं संगीत चांगलं आहे. का श्वास हा.., दाबा की बटन मोबाईलचं..  ही गाणी चांगली जमून आली आहेत.

'दुनियादारी' टीमने जी हुशारी, जे धाडस दाखवले नाही, ते 'पोपट' टीमने केलं. नवीन चेहरे आणले. जरी हा प्रयोग पूर्ण यशस्वी झाला नसला, तरी जर रघ्या-बाळ्या-मुक्या च्या जागी तेच थोराड, खप्पड, जुनाट चेहरे असते, तर चित्रपट मध्यंतरापर्यंतसुद्धा पाहवला नसता, हेही तितकेच खरे आहे. वेगळा विषय व वेगळे चेहरे पडद्यावर आणण्यासाठी सतीश भाऊ राजवाडेंचे पुनरेकवार अभिनंदन. पण पुढील खेपेस कात्रीचा वापर अधिक व्हावा ही अपेक्षा !

एकंदरीत, 'पोपट' केला गेला नसला तरी 'पोपट' होतोच.

रेटिंग - * * 

Saturday, August 24, 2013

झंकार

ती रोज चोरून मला बघते
तिला वाटतं मला कळत नाही
पण मला सगळं समजतं
फक्त मी दाखवत नाही

तिच्या नजरेत मला दिसते
मी जवळ घेईन अशी आशा
तिच्या व्याकुळतेच्या बदल्यात
मी तिला रोज देतो फक्त निराशा

खरं तर मलाही वाटत असतं
की तिला जवळ घ्यावं
छातीला लावावं
तिने गळ्यात पडावं
माझी बोटं तिच्यावरून फिरावीत
गात्रं शहारावीत
थरथरून कंपनं उठावीत
त्या कंपनांचे सूर कानात घुमावेत
मनात रुजावेत
आणि एखादी वेगळीशीच धून वाजावी,
जिची नशा आसमंतास व्यापावी..

पण,
असं काही होत नाही
मी तिची नजर टाळतो
रोजच तिला नाकारतो

मग एक दिवस
तिची आर्तता जिंकते
ती मला जवळ ओढते
मीही तिला बाहूंत घेतो
तिच्या लडिवाळ मिठीत धुंद होतो
तिच्या स्पर्शाने उत्साहाचा तरंग येतो
आणि माझ्या पहिल्या स्पर्शानेच उठतो
तिच्यातून एक धुंद धुंद झंकार
माझ्या हातून स्वत:ला अशीच छेडून घेते
माझी अकॉस्टिक गिटार ! ;-) :-)

....रसप....
२१ ऑगस्ट २०१३

Friday, August 16, 2013

एव्हढेच बस !

नकोत कागद
नको लेखणी
शब्दही नको
अंतरातली
तेजोवलयी
ज्योती बन तू
लिहिण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

'तो' दगडाचा
निश्चल निष्ठुर
ढिम्म राहतो
'त्या'चे डोळे
वाळुन गेली
खोल खोबणी
लढण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

वेढा माझ्या
सभोवताली
विरोधकांचा
ललकाऱ्यांनी
आसमंतही
दुमदुमलेला
भिडण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

कुणी निरागस
लोभसवाणा
गोड चेहरा
इवले डोळे
खट्याळ निरलस
मला पाहता
हसण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

'तुझ्यामुळे ह्या
आयुष्याला
अर्थ मिळाला'
कुणी बोलता
पाठीवरती
हात ठेवुनी
निजण्यासाठी
पुरे वाटते
एव्हढेच बस्

….रसप….
१५ ऑगस्ट २०१३

Wednesday, August 14, 2013

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो..

त्याला शाहरुख आवडत नाही, तिला शाहरुख आवडतो
पिच्चर रिलीज झाल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो

मी तुला आवडते पण शाहरुख आवडत नाही
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही !!

शाहरुख म्हणजे उथळ काला, शाहरुख म्हणजे बडबड
शाहरुख म्हणजे मालमसाला, शाहरुख म्हणजे धडधड
शाहरुख डोकं खराब करतो, शाहरुख वैतागवाडी
शाहरुख म्हणजे हसूची लाट, शाहरुख म्हणजे गोडी
शाहरुख वेडेवाकडे चाळे, शाहरुख म्हणजे अ‍ॅक्टिंग चुलीत
शाहरुखकडे गुपचूप पाहता, मन जाऊन बसतं त्याच्या खळीत

दरवर्षी पिच्चर येतो, दरवर्षी असं होतं
शाहरुखवरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

शाहरुख आवडत नसला तरी ती त्याला आवडते
शाहरुखसकट आवडावी ती म्हणून तीही झगडते

रुसून मग ती निघून जाते, बसून राहते थेटरात
त्याचं-तिचं भांडण असं सणासुदीच्या दिवसात !

....रसप....
१३ ऑगस्ट २०१३

---------------------------------------------------------------

मूळ कविता - 

त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो 

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही  
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही 

पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ 
पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी 
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी 
पाऊस रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुटी उगाच 
पावसामध्ये गुपचूप निसटून, मन जाऊन बसतं ढगात 

दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं 
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं 

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते 
पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते 

रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात
त्याचं-तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात 

- सौमित्र 

Tuesday, August 13, 2013

व्यवहार

स्वप्नांच्या आडोश्याला लपलेलं वास्तव
मी शोधतच नाही म्हटल्यावर
स्वत:च बाहेर येतं आणि 'भो:' करतं !
मला माहित असतं की,
त्याच्या बाहेर येण्याची वेळ आली आहे
पण तरी, दचकण्याची सवयच झाली आहे

त्यानंतर रोज सकाळी मी आणि आयुष्य
एकमेकांशी हातमिळवणी करतो
आणि शस्त्रसंधी केलेल्या देशांसारखे
जबरदस्तीचा संयम पाळतो

रात्र, स्वप्नांच्या लपाछुपीची
दिवस, वास्तवाशी शस्त्रसंधीचा
उरते संध्याकाळ
नेहमीच संवेदनशील
तेव्हढा वेळ सोडल्यास सारं काही आलबेल असतं
शांततेच्या राज्यात दु:खसुद्धा गालात हसतं

निदान,
तुझ्या दिवस-रात्रींचा व्यवहार तरी,
तुझ्या मनासारखा घडतोय ना गं ?

....रसप....
१२ ऑगस्ट २०१३

Friday, August 09, 2013

वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.



चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
 
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! :-)
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२


Thursday, August 08, 2013

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी..

'मराठी कविता समूहा'च्या 'अशी जगावी गझल - भाग २९' मध्ये माझा सहभाग -

ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे

भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे

दाढ्यांना कुरवाळुन जो तो 'हांजी-हांजी' करतो
मलाच केवळ खरे बोलण्याचा हा विकार आहे

हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे

------------------------------------------------------

कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे

....रसप....
७ ऑगस्ट २०१३ 

Wednesday, August 07, 2013

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी..

बोल तू माझ्या घराशी एकटी असशील तर
सावली शोधायला मी सोडले केव्हाच घर

जो गुन्हा केलाच नाही डाग तो देऊ नका
दोष द्या दुसरा मला मी खूप चुकलो आजवर

माणसांची वेगळीशी चालली शर्यत इथे
जिंकले कोणीच नाही, जिंकले आहे शहर

ईश्वरा, दगडातही मी पाहिले होते तुला
पाहिले ना तू मला जीतेपणी आयुष्यभर

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी
आपल्या अस्तास रोजच पाहुनी जगला ज़फ़र

------------------------------------------------------

हात हाती घेतला अन् थेट सारे बोललो
ऐकण्याआधीच उत्तर वाजला होता गजर


....रसप....
५ ऑगस्ट २०१३ 

Monday, August 05, 2013

खुळा

सुमन तिचे सुमनासम सुंदर स्वच्छ पवित्र सुगंध जसा
नितळ निळ्या नयनी नभरंग निरागस लोभस अल्लडसा
अधरकळी कमनीय जुळी मकरंदकुपी पुरती भरली
बघुन तिला मज ईश्वरदर्शनआस नसे दुसरी उरली

रुणझुण पैंजण नादत भासत मोहक चालत मोहविशी
अलगद शब्द अनाहुत येउन स्पर्श करे जणु मोरपिशी
कटिखटके लटके झटके बघता उडते मन होत खुळे
लय हलते हृदयात नि स्पंदन एक-दुज्यास कधी न जुळे

झुळुकहवा उडवून खट्याळ बटांस तिच्या लडिवाळपणे
बहरुन येउन बाग हसे भ्रमरासम हे मन बागडणे
जणु हरिवल्लभ व्यस्त झुले श्रवणाभरणे झुलतात तशी
नकळत मी झुललो उलटा, झुरलो पडलो नित तोंडघशी

लिहुन किती कविता जमल्या पण शब्द न एक कधी वदलो
कुणि सुकुमार तिचे मुख चुंबित पाहुन मीच खुळा ठरलो

....रसप....
४ ऑगस्ट २०१३
सत्यकथेवर आधारित
वृत्त श्रवणाभरण - ललललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...