नियम आणि संकेत ह्यात फरक आहे. कायदा आणि संस्कार ही दोन वेगळी बंधनं आहेत. माणूस, विशेषकरून भारतीय माणूस अश्या द्विधेत बऱ्याचदा असतो. काही गोष्टी कायद्याने प्रतिबंधित असतात पण संस्कारात मुरलेल्या असतात आणि काही गोष्टी संस्कार करू देत नाहीत, पण कायद्याने त्या स्वीकारार्ह असतात ! आयुष्यभर आपण ह्या द्विधेतच राहातो. शेवटपर्यंत, दोन पर्यायांपैकी अचूक कुठला होता, हे लक्षात येतच नाही. मग परिस्थितीच्या हेलकाव्यासोबत, आपणही झुलत राहातो, भरकटत राहातो. मध्येच विरोध करायचा प्रयत्न करतो, पण तो टिकतोच असं नाही..... विचित्र आहे, पण खरं आहे.
'बॉम्बे टॉकिज' मधली पहिली कहाणी ह्याच द्विधेत अडकलेल्या व्यक्तींची आहे. 'अविनाश' (साकीब सलीम) हा एक समलिंगी आकर्षण असलेला तरूण असतो. त्याच्या ह्या वास्तवाला तो लपवत नसतो. आणि त्यामुळे अर्थातच घरातूनही त्याला प्रखर विरोध व संघर्षाला सामोरं जावं लागतं. घर सोडावं लागतं. पुढे नवीन नोकरीत, त्याची ओळख गायत्री (राणी मुखर्जी) शी होते. गायत्री आणि देव (रणदीप हूडा) आर नॉट लिव्हिंग अ व्हेरी हॅपी मॅरीड लाईफ. ही ओळख वाढल्यावर कहाणी एका विचित्र वळणावर येते आणि असे काही प्रश्न प्रेक्षकाला विचारते, ज्यांची उत्तरं न देणं, त्यांना टाळणंच आपण जास्त सोयीचं समजतो.
एक अतिशय नाजूक विषय, ज्यावर खाजगीत बोलणेही बहुतेक लोक टाळतात, असा विषय करण जोहरनी खूप चांगल्या प्रकारे हाताळला आहे. रेल्वेच्या पुलावर गाणी म्हणणार्या लहान भिकारी मुलीचे पात्र का कुणास ठाऊक लक्षात राहाते. तिने गायलेली दोन्ही जुनी गाणी (लग जा गले... आणि अजीब दास्तां...) व काही संवाद सांकेतिक भाषेत खूप काही बोलतात. राणी मुखर्जी आता स्थूल दिसायला लागली आहे किंवा तिला मुद्दामच तसं दाखवलं असावं. एका दृष्यात अविनाश तिला म्हणतो, 'गले में मंगलसूत्र और आंखों में कामसूत्र !' - ते मात्र पटतं.
इतक्या परिपक्वपणे एक दिग्दर्शक एक समाजाने नाकारलेला विषय हाताळतो, तेव्हा प्रश्न पडतो हाच दिग्दर्शक फुटकळ प्रेमत्रिकोण रंगवण्यात स्वतःचा वेळ, पैसा आणि संवेदनशीलता वाया घालवतो आहे का ? पण ह्याही प्रश्नापासून आपण दूर राहिलेलंच बरं ! कारण उत्तर मिळणारच नाहीये !
मुंबई..... जितकी यशस्वी व्यावसायिकांची आहे, त्याहून जास्त डब्यात गेलेल्यांची; जितकी चमकणार्या सितार्यांची आहे, त्याहून जास्त तोंडावर आपटलेल्यांची; जितकी टोलेजंग इमारतींची आहे, त्याहून जास्त खुराड्यासारख्या चाळींची..... जितकी गडगंज श्रीमंतांची आहे, त्याहून जास्त निम्नमध्यमवर्गीयांचीही....
अश्याच एका तोंडावर आपटलेल्या अभिनेत्याची - जो एका नाकपुडीएव्हढ्या निम्नमध्यमवर्गीय घरात राहाणारा, डब्यात गेलेला व्यावसायिक असतो - कहाणी 'दीबाकर बॅनर्जी' सादर करतो. ही कहाणी आहे 'पुरंदर' (नवाझुद्दीन सिद्दि़की) ची. आजारी लहान मुलगी आणि समजूतदार बायकोसोबत राहाणारा पुरंदर एक दिवस त्याच्या भूतकाळाला अचानकच सामोरा जातो. पण त्याला सामोरं जातानाही त्याचा बावळट, आत्मविश्वासशून्य मध्यमवर्गीयपणा त्याला जाणवतो. फार काही होत नाही, पण स्वतःसाठी मूठभर स्वाभिमान आणि आजारी लहान मुलीला सांगण्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन तो संध्याकाळी घरी येतो. घराच्या चार फुटाच्या गॅलरीत रोज झोपणारा 'पुरंदर', त्या रात्री जरा जास्तच समाधानी चेहर्याने निजतो........
दीबाकर बॅनर्जी आणि नवाझुद्दीन सिद्दीकी - सिनेसृष्टीतील दोन अतिशय आश्वासक नावं. ह्या कहाणीत दोघंही अजिबात निराश करत नाहीत. २५-३० फूट दूर कॅमेरा लावूनही अभिनय कसा करतात, हे एक ह्यापूर्वी न पाहिलेलं प्रात्यक्षिक ही कहाणी दाखवते.
बर्याच काळानंतर हिंदी पडद्यावर दिसणारे सदाशिव अमरापूरकर, मध्यंतरी एका मराठी सिरियलमध्ये केलेला पिचकवणी अभिनय न करता, जुने 'सदाशिव अमरापूरकर' दाखवतात, हेही एक विशेष आकर्षण !!
बालपण.... बालपण हे एखाद्या झर्यासारखं असावं. त्याला फक्त खळखळ वाहाणं, मागचा-पुढचा विचार न करता उड्या मारणं हेच माहित असतं. पुढे जाऊन त्या पाण्याचं डोहात रुपांतर होतं, मोठ्या पात्रात रुपांतर होतं आणि त्याला एक खोली, दिशा मिळते. पण ह्या सुरुवातीच्या निरागस खळखळाटाला पर्याय नसतो. त्याला तेव्हापासूनच दिशा, खोली, ठहराव देण्याचा प्रयत्न करणे चूकच. त्यामुळे त्याचं नैसर्गिक सौंदर्य तर नासेलच, कदाचित वाढही खुंटेल, प्रगतीही थांबेल किंवा नको ती दिशा किंवा वेग मिळून वायाही जाईल. आपण झर्याला मुरड घालत नाही पण बाल्याला बंधनं घालतो. आपल्या अपेक्षांचे अवास्तव ओझे त्या नाजुक खांद्यांवर लादायचा प्रयत्न करतो. असेच नाजुक खांदे असतात 'विकी'चे (नमन जैन). वडिलांच्या (रणवीर शौरी) अवास्तव अपेक्षांचे ओझे नकोसे वाटत असतानाही वाहाण्याचा प्रयत्न करणारे. पण निरागस नमन, त्याच्या निरगसपणाच्याच जोरावर त्यातूनही मार्ग काढतो आणि आपलं स्वप्न सत्यात आणायचा निर्णय करतो. काय असतं त्याचं स्वप्न ? ते पाहूनच समजेल !
लहानग्या नमन जैनचं काम अप्रतिम सुंदर. त्याची जितकी दया येते, तितकंच त्याचं निरागस हसू भावतं.
झोया अख्तरनी छोट्यांचे भावविश्व सुंदर उभे केले आहे. विकीचे निष्पाप प्रश्न, मोठ्या बहिणीचं लहान भावाला सांभाळून घेणं, विकीला त्याची आवडती कॅटरिना परीच्या वेषात भेटणं, ई. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहातात.
माझ्या आत्याचे यजमान नास्तिक होते. पण घरातल्या कुठल्याही कार्यात ते उत्साहाने सहभाग घेत. ते आत्याला म्हणायचे, "माझा देवावर विश्वास नाही, पण तुझ्या विश्वासावर विश्वास आहे!" खरंच.. 'विश्वास' ही एक अनोखी चीज आहे. हा 'विश्वास' कधी कधी अशी काही शक्ती निर्माण करतो की, कुठल्याही खोल गर्तेतूनही माणूस बाहेर येऊ शकतो. असाच एक विश्वास घेऊन अलाहाबादहून एक तरूण - 'विजय' (विनीत कुमार) - मुंबईत येतो. 'अलाहाबादहून' आणि एक अचाट 'विश्वास' घेऊन.... म्हणजे काय ते कळलं असेलच! हो. तो अमिताभ बच्चनला भेटण्यासाठी येतो. पण इतर अनेक लोकांसारखा 'अॅक्टर' बनण्यासाठी नव्हे! त्याच्या आजारी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपल्या घरचा मोरावळा अमिताभला चाटवण्यासाठी!!
गंमतीशीर वाटेल वाचायला, पण ज्या सहजतेने आणि वास्तववादी दृष्टिने हे कथानक मांडले आहे, त्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपला मानावं ! विशेष हे की, ही कथा मांडताना त्याने कुठेही आई-बहीणीच्या शिव्या वापरल्या नाहीत !!
'विनीत कुमार'ला आपण '
वासेपुर - २' मध्ये नवाझुद्दीनच्या मोठ्या भावाच्या - दानिशच्या - भूमिकेत पाहिलं होतं. तिथे त्याला फारसा वाव नव्हता, पण इथे मात्र त्याने मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं आहे.
--------------------------------------------------
ह्या चार गोष्टींना मिळून 'बॉम्बे टॉकिज' हे नाव का ?
एक तर चारही गोष्टी मुंबईत घडतात आणि चारही गोष्टींत टॉकीजचा - सिनेमाचा, सिनेसृष्टीचा - काही ना काही संबंध आहे.
सरतेशेवटी, हिंदी चित्रपटसृष्टीची १०० वर्षं पूर्ण झाल्याचा जल्लोष म्हणून एक गाणं वाजतं. दोन तासात, चार कहाणींत जे काही ह्या सिनेमाने कमवलं असतं, ते सगळं ह्या ५ मिनिटांच्या गाण्यात मातीला मिळाल्यासारखं वाटतं. हिंदी सिनेसृष्टीची शतकपूर्ती झाल्याबद्दल ह्याहून वाईट मानवंदना एखादा 'RGV के शोले' वगैरे बनवूनच देता आली असती. ज्या जगतास अवर्णनीय सुंदर, मनमोहक संगीताचा अमूल्य ठेवा लाभला आहे, त्याला दिलेली ही मानवंदना निव्वळ 'द ळ भ द्री' आहे.... गाणं सुरू झाल्यापासून हे कधी संपतंय, ह्याचीच वाट मी तरी पाहात होतो. त्यात पडद्यावर ज्या बिनडोकपणाने ठिगळं जोडली होती आणि नंतर एकेक सितारे अवतरत होते, तेसुद्धा अत्यंत कंटाळवाणं होतं.
असो.
एकंदरीत हा 'फोर स्क्रीन' अनुभव नक्कीच एकदा घेण्यासारखा आहेच.
गो फॉर इट !!
रेटिंग - * * * १/२