Friday, December 11, 2009

आकाशवाणीच्या 'जयमाला'चे गाणे

निधड्या छातीला
नसे काळाची भीती
खेळ खेळतो रोजचा
जगण्याशी अन् मरण्याशी

ही धरणी अमुची आई
हा अम्हांस अभिमान
मातृभूमीच्या प्रेमापोटी
उधाळलो बेभान
परमशक्तीचे अम्हां लाभले
तिरंगी वरदान

. निधड्या छातीला......


थरथर कापे हरेक शत्रू
ऐकून जयनादा
अमुच्या शौर्यापुढती उडते
सा-यांची त्रेधा
अजिंक्य आम्ही अमर्त्य आम्ही
लिहितो प्रारब्धा


. निधड्या छातीला......


....रसप....
०९ डिसेंबर २००९

Tuesday, December 08, 2009

हैं कोई दिलवाली?

कुणी घेता का हो हाती
झाला भार मला फार
किती दिवस हे मन
माझे मलाच बेजार

किती समजावू आता
देऊ सबुरीचा धीर
झाले प्रेमाच्या भुकेने
कासावीस उतावीळ

माझा खिसाही फाटका
आणि थोडका पगार
परि मनात बांधला
सोन्या-चांदीचा महाल

नको मला परी कुणी
नको राजकुमारीही
मज बापुड्याला शोभे
अशी असावी कुणीही

मागू नका मोबदला
प्रेम शोधून देण्याचा
करा पुण्याची शिदोरी
जीव वाचे गरीबाचा


....रसप....
०८ डिसेंबर २००९

अंडरडॉग.... चावरा

काळ्या चौकडीचा चष्मा
एका बाजूस वाकलेला
बाटलीभर तेल ओतून
चापून भांग पाडलेला

नाकावरची माशी
शांत बसलेली
स्पोर्टस शूज वरती
formal pant घातलेली
(बरेचदा मोज्यात अडकली..!)

कर्रकर्र वाजणारी प्लास्टिकची पिशवी
..नावं पुसून गेलेली
अर्धवट दाढी..
ना वाढलेली ना कापलेली
....भादरलेली

एकंदरीतच तो
unpresentabale होता
आमच्याशी कोणताच
"गुण" जुळता नव्हता

त्याला आम्ही "चावरा" म्हणायचो
दुधात पडल्या माशीसारखा
बाजूला काढायचो

पिकनिक असो, पार्टी असो
Canteen मधली मैफल असो
'चावरा' नेहमी वेगळा असायचा
कुणालाच बोअर व्हायचा मूड तेव्हा नसायचा

जुने दिवस सरून
बरीच वर्षं झाली
नुकतीच मला एक
नवीन नोकरी लागली
इथे माझ्यासमोर आज पुन्हा चावरा होता
कंपनीचा जी. एम्. - माझा बॉस - बनला होता
माझ्या चौपट पोझीशन आणि पगार त्याला होता
अंगापिंडानेही माझ्या चौपट वाढला होता

ससा-कासवाच्या शर्यतीत
ससा हरला होता
'अंडरडॉग' चावरा
जोरदार धावला होता..!!


....रसप….
७ डिसेंबर २००९

Friday, December 04, 2009

मरणाशी लढाई.... सर्वात सोपी?

मरणाशी लढाई.... सर्वात सोपी!
निकाल निश्चित असतो..
पण जगण्याशी लढाई.... लढावी कशी?
शत्रूच दिसत नसतो..!

एकेक पाऊल.. एकेक विजय
अन् आत्ताचा विजय..
क्षणात… पराजय….??


....रसप....
०४ डिसेंबर २००९

आम्ही सारे कवय्ये

कुणी यावे कुणी जावे कुणी इथे रेंगाळावे शब्दामध्ये इथे सारे गुरफटले
आम्ही साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये
साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये..!

इथे-तिथे पाहताना
नवे काही जाणवावे
कुणालाही दिसेना जे
जगाला त्या भासवावे
एक संध्याकाळही आम्ही ना झोपी जावे
हल्के-फुल्के फटके-चिमटे घ्यावे अन् सोसावे
आम्ही साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये
साsssरे कवय्ये, आम्ही साsssरे कवय्ये..!

....रसप....
३० नोव्हेंबर २००९
मूळ गीत : आम्ही सारे खवय्ये (झी मराठी)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...