Sunday, March 20, 2016

११ - ० ! (India vs Pakistan - World T20 - 2016)

डावाचं १४ वं षटक. ३० चेंडूंत २८ धावा हव्या होत्या आणि आपल्या पहिल्या २ षटकांत फक्त ३ धावा देणारा मोहम्मद आमीर गोलंदाजीला. पहिल्या ५ चेंडूंत कश्याबश्या ४ धावा, त्यातही दोन चोरट्या, मिळालेल्या. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा ठरणार होता. दबाव पूर्णपणे फलंदाजावर होता. पण फलंदाज होता विराट कोहली. कोहलीने स्थितप्रज्ञतेने आपला एक पाय पुढे टाकून तो चेंडू कव्हर्समधून खेळला. त्या फटक्यात प्रहार नव्हता, अत्यंत शांतपणे मारलेला तो फटका होता. प्रचंड दबावाखाली असताना सगळा आवेश व अभिनिवेश टाळून असा संयत फटका मारणं, ही पराकोटीच्या मानसिक बळाची पावतीच. त्या प्रसंगी इतर कुणी खेळाडू असता, तर नक्कीच त्याने काही तरी अतर्क्य फटका मारायचा प्रयत्न केला असता. मात्र कोहलीला स्वत:ला हे माहित होतं की कुठल्याही प्रकारचा आत्मघातकीपणा न करताही तो धावा जमवू शकतो आणि त्याने जमवल्या. इथे कोहली महान ठरला. बहुतांश खेळाडू अश्या प्रसंगी आपलं संतुलन गमावतात. त्याने गमावलं नाही. हाच फरक असावा उत्तम खेळाडू आणि महान खेळाडू ह्यांच्यात. कोहलीने शांतपणे मारलेला फटका चेंडूला सीमापार घेऊन गेला आणि इडन गार्डन्समध्ये प्रेक्षकांत जल्लोष झाला. सीमारेषेबाहेरील भारतीय डग आउटमधल्या चेहऱ्यांवर अपेक्षापूर्तीच्या भावना उमटल्या. त्यांना माहित होतं की, तो कोहली आहे आणि ह्या दबावाला तो बळी जाणार नाही. त्यांच्या अपेक्षांना कोहलीने पूर्ण केलं होतं.


कालचा दिवस एक वेगळ्याच प्रकारचा 'डबल हेडर' होता. एकाच दिवशी दोन 'भारत वि. पाकिस्तान' क्रिकेट सामने होते. दुपारी झालेल्या महिलांच्या ट्वेंटी२० विश्वचषकातील भारत-पाक सामन्याकडे लोकांचं तुलनेने कमी लक्ष होतं. त्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत माफक ९६ जमवल्या. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांच्या उत्तम गोलंदाजीपुढे भारताला शंभर धावांचा पल्लाही गाठता आला नव्हता. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळेस १६ व्या षटकानंतर सुरु झालेल्या पावसाने सामना पूर्णपणे थांबवला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार २ धावांनी पाकिस्तान विजयी ठरले.
एका थ्रिलरने सुरुवात झाली होती. दिल्लीत जसा पाऊस पडत होता, तसाच तो कोलकात्यातही होताच. जसा दिल्लीत तो 'स्पॉईल स्पोर्ट' ठरला, तसाच कोलकात्यातही ठरायची शक्यता होती. पण तसं झालं नाही. समजूतदार मोठ्या भावाप्रमाणे पावसाने सांभाळून घेतलं आणि लोकांच्या उत्साहावर पाणी ओतलं नाही.

विश्वचषक क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानला प्रत्येक वेळी पराभूत केलं आहे, हे खरंच. पण अजून एक स्टॅटिस्टिक्स असं होतं की इडन गार्डन्सवर भारत पाकिस्तानवर विजय मिळवू शकलेला नाही ! पहिला सामना गमावल्यावर हा सामना जिंकणं भारतासाठी खूप आवश्यक. त्यात इडन गार्डन्स, जिथे यश कमी मिळालं आहे. त्यात १८ षटकांत ११९ धावांचं एक आव्हानात्मक लक्ष्य ! ह्या सगळ्या प्रतिकूल बाबींसमोर एक बाब अनुकूल होती. पाकिस्तानला खेळपट्टी समजलेली नव्हती. त्यांनी चार तेज गोलंदाज खेळवले होते. ह्या खेळपट्टीवर एक फिरकी गोलंदाज अजून असणं आवश्यक होतं. पण त्यांनी रशीदच्या जागी सामीला खेळवलं होतं. सामीने लागोपाठ दोन चेंडूंवर धवन आणि रैनाला बाद केलं आणि पुन्हा एकदा युवराज व कोहलीवर जबाबदारी आली. हा युवराज आणि पाच वर्षांपूर्वीचा युवराज ह्यांच्यात फरक आहे. २०११ ला विश्वचषक जिंकून देणारा युवी, त्यानंतरचं आजारपण आणि हरवलेला फॉर्म ह्यातून सावरला असला, तरी पूर्वीचा युवी राहिलेला नाही. कोहली तर ताज्या दमाचा आहेच. त्याची खेळी जरी निर्णायक ठरली असली, तरी प्रचंड दबावाखाली युवराजने केलेल्या २४ धावाही तितक्याच महत्वाच्या आहेत. बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने वहाब रियाझला बाउन्ड्रीच्या बाहेर फेकून दिलं, तेव्हाच तर समीकरण रन-अ-बॉलच्या खाली आलं ! त्या आधीच्या षटकात शोएब मलिकला कोहलीने स्क्वेअर लेगवरुन सिक्स मारली होती. तो फटका खरं तर 'टॉप एज' लागून गेला होता. जर तो युवराज असता, तर कदाचित स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातात चेंडू गेला असता. पण जेव्हा फॉर्म सोबतीला असतो, तेव्हा असे 'एज' लागलेले फटके तोंडघशी पाडत नाहीत.
असाच एक फटका रोहित शर्माने सुरुवातीला मारला. मोहम्मद आमीरला मिड ऑनच्या डोक्यावरुन मारायच्या प्रयत्नात त्याचा फटका हवेत उंच गेला. तो इतका उंच गेला होता की कुणा पाकिस्तानी खेळाडूने तो कॅच सोडला असता, तर त्यांना स्वत:लाही नवल वाटलं नसतं. इतके अवघड कॅचेस घेणं, पाकिस्तानला शोभणारं नाहीच. पण कॅच घेतला गेला. तो कॅच घेतला गेला तेव्हाचं दृश्य एखाद्या गल्ली सामन्याला साजेसं होतं. खेळाडूच्या डावी-उजवीकडे दोन खेळाडू अगदी जवळ येऊन थांबले होते. बाजूचे खेळाडू असे घाबरवत असतानाही शोएब मलिकने कॅच घेतला, हे एक आश्चर्यच होतं ! रोहित शर्मा आउट झाला, पण त्याने आधीच्या ओव्हरमध्ये मोहम्मद इरफानला दोन बाउन्ड्र्या मारल्या होत्या. ते दोन्ही फटके केवळ लाजवाब होते आणि त्याचा दर्जा दाखवणारे होते.

असो.
फॉर द रेकॉर्ड्स, युवराजच्या फक्त २४ धावा झाल्या,
फॉर द रेकॉर्ड्स, कोहलीने एक अर्धशतकच मारलं,
फॉर द रेकॉर्ड्स, युवराजने एशिया कपमध्ये अश्याच दबावाखाली, ह्याच पाकिस्तानसमोर आणि अजूनही कठीण पीचवर फक्त १४ च धावा केल्या होत्या,
फॉर द रेकॉर्ड्स, कोहलीने एशिया कपमध्ये अश्याच दबावाखाली, ह्याच पाकिस्तानसमोर आणि अजूनही कठीण पीचवर ४९ च धावा केल्या होत्या,
पण ह्या सगळ्या धावांचं मोल त्या रेकॉर्ड्समधल्या संख्येपेक्षा जास्त आहे. कारण ज्या दबावाखाली त्या धावा बनल्या, तो दबाव दुनियेतलं कुठलंही स्टॅटिस्टिक्स रेकॉर्ड करू शकणार नाही.
आणि तसंच,
फॉर द रेकॉर्ड्स, काल भारताने पाकिस्तानला १३ चेंडू आणि ६ गाडी राखून हरवलं असेल. हा विजय स्टॅटिस्टिक्समध्ये नोंदला जाईल, पण सामना पाहताना अनुभवलेला थरार, दबावाला यशस्वीपणे सामोरे जाणारे दोन भारतीय फलंदाज पाहताना झालेला आनंद आणि शेवटी मोहम्मद इरफानला लाँग ऑनवरुन बाहेर भिरकावून धोनीने सामना संपवल्यावर वाटलेलं 'हायसं' ह्याला दुनियेतलं कुठलंच स्टॅटिस्टिक्स रेकॉर्ड करू शकणार नाही !

पण स्टॅटिस्टिक्स अगदीच फसवं नसतं. कसंही असलं तरी ११-० हा रेकॉर्ड मात्र पाकिस्तानला छळणारा आहे. विश्वचषकातल्या आजपर्यंतच्या ११ सामन्यांत एकदाही भारतावर विजय मिळवता न आल्याची बोच पाकिस्तानला पुढील 'मौका'पर्यंत तरी त्रास देणारच आहे आणि हे ११-० सुधारवायचं झालं तर त्यालाही एक जमाना लागणार आहे !

- रणजित पराडकर

Thursday, March 17, 2016

सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी

सुधारुन आज थोडासा पुन्हा चुकणार आहे मी
कधी चुकलोच नाही तर कसा शिकणार आहे मी ?

मला नाकार तू, झिडकार तू, सोडूनही तू जा
तुझ्या अस्वस्थ रात्री रोज लुकलुकणार आहे मी

तुला भेटायचे असलेच तर येऊन जा लौकर
जगाच्या स्वस्त ठेल्यावर मला विकणार आहे मी

कितीही धाव आयुष्या, तुझा मी माग काढीनच
नको वाटून तू घेऊस की थकणार आहे मी

जरी हा फास पहिला अन् जरी हा श्वास शेवटचा
तरी मातीत गेल्यावर, खरा पिकणार आहे मी

लढाई आत्मभानाची करे अस्तित्व माझ्याशी
न पुढचे ठाव काही आज पण टिकणार आहे मी

रसास्वादामधे ओथंबले तारुण्य हे माझे
जरा* आलीच तर हमखास तुकतुकणार आहे मी

....रसप....
१७ मार्च २०१६

जरा* = वार्धक्य, वृद्धत्व

Wednesday, March 02, 2016

ऐका माझे

माझी इतकी इच्छा आहे, ऐका माझे
'ऐका माझे' एव्हढीच तर इच्छा आहे
पटायला पाहिजेच माझे, असे न म्हटले
द्या किंवा देणे नाकारा मला हवे ते
तुमची मर्जी तसेच वागा, हरकत नाही
केवळ इच्छा मला करू द्या, ऐका माझे

हे मोठे घर तुमचे आहे तुमच्यासाठी
तुम्हीच ठेवा महाल, वाडे, हवेल्यांसही
हराम आहे की घामाची मिळकत आहे
मला न काही देणे-घेणे ह्या सगळ्याशी
निवांत निजण्यापुरती आहे माझी जागा
तेव्हढी तरी मला मिळू द्या, ऐका माझे

मंदिर बांधा, मशीद बांधा, घंटाघरही
बाबा-मातांच्या पायांवर घ्या लोळणही
धर्मासाठी पुन्हा पेटवा, जे जे विझते
ह्या कर्तव्यामधले काही मला न कळते
'सजीव' इतका केवळ माझा धर्म असावा
जगतो आहे, मला जगू द्या, ऐका माझे

मी न कुणाला विचारीन की, "तुम्ही 'असे' का ?"
स्विकारीन मी, स्विकारलेही जसा जो तसा
माझ्याही वागण्यास बंधन नको कोणते
माझ्या अभिव्यक्तीला कुंपण नको कोणते
हवा तेव्हढा तर घेऊ द्या श्वास मोकळा
उच्छ्वासाची मुभा असू द्या, ऐका माझे

'ऐका माझे' एव्हढीच तर इच्छा आहे
इतकी इच्छा तरी करू द्या, ऐका माझे

....रसप....
०१ मार्च २०१६
Related Posts Plugin for WordPress, Blogger...